तुरुंगातील ‘भाई’गिरी

मुंबईत जेव्हा गँगवॉर तेजीत होते तेव्हा त्या काळात अनेक वेळा तुरुंगातच जोरदार हाणामाऱ्या व्हायच्या.

मुंबईत जेव्हा गँगवॉर तेजीत होते तेव्हा त्या काळात अनेक वेळा तुरुंगातच जोरदार हाणामाऱ्या व्हायच्या. पण तुरुंगात नेमके काय घडतेय, हे कधीच बाहेर यायचे नाही.

मंजुळा शेटय़े या महिला कैद्याच्या हत्येमुळे भायखळा येथील महिलांच्या तुरुंगातील महिला अधिकाऱ्यांची दादागिरी समोर आली. जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यानुसार हायप्रोफाइल कच्ची कैदी असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिच्यामुळे इतर कैद्यांना चिथावणी मिळाली आणि हा प्रकार उघड तरी झाला. तुरुंगाधिकाऱ्यांच्या अमर्याद दादागिरीचा प्रसाद सहन करीत अनेक कैदी, कच्चे कैदी जीवन कंठत असतात. त्यांना कोणी वालीच नसतो. तक्रार करायची म्हटली तरी पुन्हा त्याच तुरुंगात राहायचे असल्यामुळे कुणी िहमत करीत नाही. मंजुळाच्या खुनामुळे हे प्रकरण तरी बाहेर आले. परंतु अशा किती मंजुळा शेटय़े अत्याचार सहन करीत असतील याची कल्पनाही येणार नाही.

महिला तुरुंगातील हा एक प्रकार उघड तरी झाला. परंतु पुरुषांच्या तुरुंगात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. बऱ्याच वेळा हे प्रकार बाहेरही येत नाहीत. गँगस्टर असाल वा पशांच्या थल्या रिक्त करण्याची ताकद असेल तर मग अशा तुरुंगातही तुम्ही राजासारखे राहू शकता, ही आजही वस्तुस्थिती आहे. राज्यातील विविध तुरुंगांचा समोर दिसणारा चेहरा वेगळा आहे आणि या बुरख्याआड दडला आहे तो तुरुंगाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार. अन्याय, दहशत, प्रसंगी मारहाण सहन करीत असंख्य कैदी आणि कच्च्या कैद्यांना निमूटपणे राहावे लागत आहे. एखादी घटना घडली तरच खळबळ माजते. काही काळात सारे आलबेल होते आणि पुन्हा नवी घटना घडण्याची वाट पाहिली जाते. वर्षांनुवष्रे हे चालत आले आहे. १९८२-८३ मध्ये तुरुंग पद्धतीत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय समिती नेमण्यात आली. या समितीने कैदी आणि कच्चे कैदी यांना स्वतंत्रपणे ठेवण्यात यावे अशी शिफारस केली. याशिवाय गुन्हेगार, खतरनाक गुन्हेगार, संघटित गुन्हेगारी अशी वर्गवारी करावी, असेही नमूद केले. परंतु क्षमतेपेक्षा अधिक कैदी कोंबण्यात आलेल्या तुरुंगात या शिफारशी लागू करणे शक्य नाही, असे स्पष्ट करण्यात आले आणि ते खरेच आहे. त्यामुळेच तुरुंग प्रशासनाचे फावले आहे. सुविधा पाहिजे तर पसे मोजा, असा त्यांचा सरळसोपा हिशेब आहे.

मुंबईत जेव्हा गँगवॉर तेजीत होते तेव्हा तुरुंगाधिकाऱ्यांची अक्षरश: मजा होती. दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अमर-अश्विन नाईक, संतोष शेट्टी, रवी पुजारी टोळ्यांतील म्होरक्यांमध्ये चुरस लागायची की, तुरुंगात कोणाची अधिक दहशत चालते हे दाखविण्याची. त्या काळात अनेक वेळा तुरुंगातच जोरदार हाणामाऱ्या व्हायच्या. अर्थात या हाणामाऱ्या नंतर मिटविल्या जायच्या. त्यामुळे तुरुंगात नेमके काय घडतेय, हे कधीच बाहेर यायचे नाही. मात्र त्यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांचे खिसे चांगलेच गरम व्हायचे. संघटित गुन्हेगारांच्या दहशतीमुळे अनेक कच्चे कैदीही सुविधा मिळाव्यात यासाठी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये शिरू लागले. कारण या संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांचा आशीर्वाद असल्यास आपलेही तुरुंगातील दिवस चांगले जातील, याची त्यांना कल्पना होती.

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगापासून दाऊदचा पाकमोडिया स्ट्रीटचा अड्डा असो वा अरुण गवळीची दगडी चाळ असो अन्यथा अमर नाईकची १४४ टेनामेंट असो, हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंडांच्या अड्डय़ांतून या सर्वाचे साथीदार अगदी सहजपणे तुरुंगात येजा करीत असत. यापोटी महिन्याकाठी ठरावीक रकमेचा हप्ता तुरुंगातील कर्मचाऱ्यांना दिला जायचा. आताही या परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळेच अलीकडेच बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यात हाणामारी झाली तेव्हा त्याचे पडसाद उमटतील या भीतीने सालेमला तळोजा येथील खुल्या तुरुंगात हलविण्यात आले.

संघटित गुन्हेगारांची चलती होती तेव्हा असे म्हणतात, की आर्थर रोड तुरुंगात गुंड टोळ्याच समांतर सरकार चालवायचे. १९९६ मधील घटना आहे. आर्थर रोड तुरुंगात तत्कालीन कारागृह उपनिरीक्षकांनी पहाटेच्या वेळी अचानक धाड टाकली तेव्हा मोबाइल फोन, ६५ हजार रुपयांची रोकड, एक पेगच्या असंख्य विदेशी बाटल्या, चाकू आणि उंची वस्तू आढळून आल्या. छोटा राजन टोळीतील अवधूत बोंडे, विलास माने, बंडय़ा मामा यांच्या बराकीजवळ या वस्तू सापडल्या होत्या. मोबाइल फोनमधून ८०० कॉल्स बाहेर करण्यात आले होते. तब्बल २८ बिल्डरांना आणि काही हॉटेल मालकांना धमकावण्यात आले होते. त्याआधीही दाऊद व गवळी टोळीच्या म्होरक्यांमध्ये हाणामारी झाली. तेव्हा चिडलेल्या तुरुंग कर्मचाऱ्यांनी कैद्यांनी दारू पिऊन िधगाणा घातल्याचा आरोप करीत कैद्यांना मारहाण केली. त्यात गुंड बिपिन शेरे याचा मृत्यू झाला. परंतु तुरुंगात या कैद्यांना दारू कशी मिळाली याचे उत्तर आजतागायत तुरुंगातील कर्मचारी देऊ शकलेल नाहीत. तुरुंगातून काही कैद्यांना घरी जाण्याचीही मुभा होती. दाऊद टोळीतील एक कैदी असाच रात्री तुरुंगाबाहेर असायचा. त्याची पत्नी गर्भवती राहिली तेव्हाच तो कुठे जायचा हे स्पष्ट झाले.

दाऊद-छोटा शकीलच्या म्होरक्यांना वेगळ्या बराकीत ठेवले जायचे तर अरुण गवळी-छोटा राजनचे गुंड एकाच बराकीत असायचे. कारण म्हणे त्यांचे चांगले जमते. अमर आणि अश्विन नाईक टोळीच्या म्होरक्यांसोबत त्यांची नेहमी भांडणं व्हायची. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून वावरावे लागायचे. या हाणामारीतून अनेक वेळा मग विविध टोळ्यांच्या म्होरक्यांना अन्य तुरुंगात हलविण्यावाचून प्रशासनाला पर्याय उरायचा नाही. ओमप्रकाश सिंग आणि डी. के. राव हे दोघे म्होरके छोटा राजन टोळीतील. परंतु दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. किंबहुवा सिंग हा फितूर झाल्याचा छोटा राजनचाही समज होता. आर्थर रोड तुरुंगातच त्याला ठार मारण्याचा प्रयत्नही झाला, परंतु त्यात यश आले नाही. त्यातच सततच्या हाणामाऱ्यांमुळे आर्थर रोड तुरुंगातून ओ. पी. सिंगची रवानगी नाशिक तुरुंगात करण्यात आली. सप्टेंबर २००२ मध्ये डी. के. राव १३ साथीदारांसमवेत नाशिक तुरुंगात आला आणि त्याने आपल्या टोळीतील १३ साथीदारांना घेऊन   ओ. पी. सिंगची हत्या केली. त्यासाठी त्याने आर्थर रोड आणि नाशिकच्या तुरुंगाधिकाऱ्यांना चिरीमिरी दिली. त्यामुळे नाशिकच्या तुरुंगाधिकाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु पुढे काहीही झाले नाही. सारे चिडीचूप झाले. संबंधित तुरुंगाधिकारी पुन्हा सेवेतही आले.

औरंगाबाद येथील हर्सूल तुरुंगातील मुंबईच्या दोन टोळ्यांतील टोळीयुद्धानेही खळबळ माजवून दिली होती. त्या वेळी प्रतिस्पर्धी टोळ्यांतील १५ जण गंभीर जखमी झाले होते. त्या वेळी चौकशीत असे निष्पन्न झाले की, या सर्व कैद्यांनी मद्यपान केले होते. तुरुंगात दारू कशी पोहोचली याची मग चौकशी सुरू झाली. परंतु दारूच काय कैद्याच्या बराकीजवळ चरस, गांजाही सहज आढळतो, अशी गंभीर बाब पुढे आली. काही तुरुंगांत तर कैद्यांना बायकाही पुरविल्या जात होत्या, असे स्पष्ट झाले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगातील मोहम्मद कतिल सिद्दीकी या बिहारच्या बॉम्बस्फोटातील आरोपीच्या तुरुंगातच केलेल्या हत्येनेही खळबळ माजली होती. पुण्याचा खतरनाक गुंड शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव याने पायजम्याच्या नाडीचा वापर करून सिद्दीकीची गळफास लावून हत्या केल्यानंतर तुरुंग प्रशासनाला इलास्टिकचे पायजमे देण्याचे आदेश द्यावे लागले. परंतु इलास्टिक काढून त्याचा गळफास लावला जाणारच नाही, याची खात्रीही नसल्याने आता सर्व तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहे. आता पूर्वीसारखी दहशत तुरुंगात नसल्याचा कितीही दावा केला जात असला तरी भायखळ्याच्या एका घटनेने तुरुंगातील वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. तुरुंगाधिकारीच अत्याचार करू लागल्यावर काय करायचे असा प्रश्न आता कैद्यांना पडला आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांची जागा आता बॉम्बस्फोटातील आरोपी, अतिरेक्यांनी घेतली आहे. देशद्रोही कारवायांसाठी या कच्च्या कैद्यांकडून तुरुंगाधिकाऱ्यांचा वापर झाला तर ते अधिक धोकायदायक ठरणार आहे.

10-lp-don

राज्यातील काही महत्त्वाच्या तुरुंगांमध्ये आर्थर रोड, येरवडा, तळोजा, ठाणे कारागृहांचा समावेश आहे. त्यातल्या त्यात आर्थर रोड हा तुरुंग मुंबईत असल्याने मोठय़ा गुन्ह्यंतील गुंडांना उच्च न्यायालयात नेणे सोयीचे व्हावे, यासाठी येथे ठेवण्यात येते. या तुरुंगाची क्षमताही मोठी आहे. पण त्याच्या तुलनेत जास्त कैदी ठेवल्यामुळे मानवी हक्कासाठी काम करणाऱ्यांकडून याबाबत कायम ओरड होत असते. अशा या आर्थर रोड तुरुंगात अधूनमधून राडा होत असतो. परंतु सर्व घटना बाहेर येतातच असे नाही.

तुरुंग मॅन्युएलप्रमाणे, कैदी जेव्हा तुरुंगात येतो तेव्हा त्यांच्या अंगावरील कपडे काढून घेतले जातात आणि तुरुंगात वापरासाठी असलेले कपडे त्यांना दिले जातात. अंगावर असलेल्या मौल्यवान वस्तूंचेही तसेच आहे. त्यामुळे तुरुंग मॅन्युएलप्रमाणे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या हातात कोणतीही वस्तू नसते. असे असताना तुरुंगात बाहेरून येणाऱ्या वस्तू, त्यातही शस्त्रे कुठून येतात हा संशोधनाचा विषय आहे. एक तर कैदी तुरुंगातच शिक्षा भोगत असल्याने त्यांचा जगाशी संपर्क नसतो. अशा वेळी आपोआप संशयाची सुई वळते ती तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडे. या कर्मचाऱ्यांच्या चिरीमिरीच्या अपेक्षेमुळे तुरुंगात मोबाइल फोन, अंमली पदार्थ तसेच शस्त्रांची खुलेआम देवघेव होत असते, हे गुपित राहिलेले नाही.

मुंबई व उपनगरांतील कुख्यात गुंड हे आर्थर रोड तुरुंग व जवळच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या तुरुंगामध्ये दाऊद, छोटा राजन, रवी पुजारी, अमर, अश्विन नाईक यांच्या टोळींतील सदस्य विविध गुन्ह्यंमध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या तुरुंगात हाणामाऱ्या होतात. त्यातील काही हाणामाऱ्या माध्यमांतून बाहेर येतात. काही प्रकरणे दाबली जातात. त्या त्या परिसरातील गुंडांना जवळच्या तुरुंगात ठेवण्यात येत असल्याने त्यांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधाही तिथे उपलब्ध होतात.

शंकरराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी तुरुंगातील या प्रकाराबाबत एक तोडगा सुचवला होता. तो तोडगा होता आंतरराज्यीय तुरुंग व्यवस्थेचा. म्हणजेच महाराष्ट्रातील एखाद्या अट्टल गुन्हेगाराला तिहार किंवा राज्याबाहेरील तुरुंगात ठेवणे. त्यातून त्याची रसद आपोआप कमी होऊ शकते, असा त्यामागे उद्देश होता. पण ते काही झाले नाही. ते जर झाले असते तर आपोआपच तुरुंगातील भाईगिरीला लगाम लावता आला असता. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्यांत गृह विभागाची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तर केंद्रात राजनाथ सिंह या संवेदनशील विभागाचा वारू सांभाळत आहेत. त्यांनी तुरुंग व्यवस्थेतील त्रुटीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा तुरुंगातील आत्महत्या, हाणामाऱ्या हे प्रकार घडत राहतील. माध्यमांसाठी अशा घटना एक-दोन दिवस बातम्यांचा विषय होतील. नंतर पुन्हा दुसऱ्या हाणामारीची आपण वाट पाहत राहू.

11-lp-abu-salemअबू सालेमचा थाटमाट…

तळोजा तुरुंगात छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या गँगस्टर अबू सालेमचा तुरुंगातील नवाबी थाट एका तुरुंग अधीक्षकाने दिलेल्या माहितीमुळेच उघड झाला आहे. तुरुंगात सालेम इतर कैद्यांबरोबर पाटर्य़ा झोडतो.. शिवाय त्याला घरचे जेवणही कसे मिळते.. एवढेच नाही तर केएफसीच्या चिकनवरही सालेम कसा ताव मारतोय, याचा पाढाच या अधीक्षकांनी वाचला. याचे कारण म्हणजे तुरुंगात आपला छळ होतो, असे तुणतुणे सालेमने लावल्यामुळे या अधीक्षकाची चौकशी सुरू झाली. तेव्हा चौकशी समितीसमोरच ही बाब त्याने उघड केल्याने ही माहिती तरी बाहेर आली.

तुरुंग अधीक्षकांकडून आपला सतत छळ होतो आणि हा प्रकार आत्महत्येस प्रवृत्त करणारा असल्याचे प्रतिज्ञापत्र टाडा कोर्टात सादर झाले होते. त्यानंतर तुरुंग विभागाचे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक बिपिन कुमार सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याला प्रत्युत्तर देताना संबंधित तुरुंग अधीक्षकांनी सालेमचा तुरुंगातील नवाबी थाट उघड केला आहे.

तुरुंगात सालेमसोबत राहत असलेला कैदी राजा उत्ता िलगम नदार (कैदी नंबर ३३९) हा सालेमचे कपडे धुतो, त्याच्यासाठी चहा बनवतो आणि त्याला जेवणही देतो, त्यांची भांडी धुतो आणि कोठडीही साफ करतो. कैदी नदारनेच हे कबूल केल्याचं अधीक्षकांच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. सालेमला दररोज आंघोळीसाठी गरम पाणी मिळते. अनेक वेळा तरुंगातील अधिकाऱ्यांनी सालेमकडून मोबाइल चार्जरही जप्त केले आहेत. म्हणजेच सालेम तुरुंगात सर्रास मोबाइल वापरत असल्याचे स्पष्ट झाले. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सालेम सतत वेगवेगळी कारणे शोधत असतो. मग गरज नसतानाही हॉस्पिटलला जाणे तसेच वेगवेगळ्या खटल्यांच्या सुनावणीच्या बहाण्याने इतर ठिकाणी जाणे, सालेमला शक्य होते ते तुरुंग कर्मचाऱ्यांना दिलेल्या चिरीमिरीमुळेच. जे. जे. इस्पितळात सालेम वर्षभरात ४२ वेळा जाऊन आला. डॉक्टरांच्या तपासणीत त्याला कुठलाही आजार आढळून आलेला नाही. तुरुंगातून थेट लाइव्ह व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा असताना एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्याने दिल्लीत जाण्यासाठीही तगादा लावला होता.

बाहेरून तुरुंगात परतल्यानंतर सालेम इतर कैद्यांसोबत पाटर्य़ा करतो. केएफसी चिकनवर सगळे मिळून ताव मारतात. शाही पाटर्य़ासाठी केएफसी चिकन आणताना सालेमला अनेकदा पकडण्यात आलं. तुरुंगात आपलं नेटवर्क सेट करण्यासाठी सालेम बाहेरून आणलेले पदार्थ इतर कैद्यांसोबत खातो. सोबतच त्याला घरचं जेवणही येतं. त्यात तिघा-चौघांसाठी जेवण असतं. हे जेवणही तो आपल्या कोठडीत कैदी आणि इतर कोठडीतील कैद्यांमध्ये वाटून खातो. तुरुंगातील सालेमचा हा नवाबी थाट बंद केल्यानंतर तो अधिकाऱ्यांना धमकावू लागला. तुरुंगाबाहेर जाण्यास तुरुंगांतील डॉक्टरांनी नाकारल्यानंतर तो त्यांच्यावर धावून गेला. २०१० च्या जुलमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी मुस्तफा डोसा याने सालेमवर हल्ला केला होता. त्यानंतर सालेमला तळोजा तुरुंगात हलवण्यात आले होते. परंतु अधीक्षकांवर सालेमने आरोप केले नसते तर ही माहिती बाहेर आलीच नसती.

नियंत्रण कुणाचे?

दाऊदच्या इशाऱ्यावरून गँगस्टर अमीरजादा याची हत्या परदेशी नावाच्या तरुणाने केल्यानंतर त्याला अटक झाली होती. आर्थर रोड तुरुंगात त्याला डांबण्यात आले होते. परंतु तुरुंगातील भिंतींना दोर बांधून म्हणे तो पळून गेला, असे त्या वेळी तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितले होते. या आरोपीला काही दिवसांनी गोरेगाव पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने जबानीत दिलेली माहिती पाहिल्यावर, तुरुंगातील यंत्रणा किती सडलेली आहे याची कल्पना येते. तो म्हणाला, मी काही तुरुंगातील िभतीवर दोर बांधून पळालेलो नाही. मला बाबू रेशीमने तुरुंगातून बाहेर काढले. त्या वेळी दाऊद स्वत: आलिशान गाडी घेऊन तुरुंगाबाहेर आला होता. त्याने मला गाडीत बसविले आणि अमीरजादाला मारल्यापोटी २० हजार रुपये दिले.
निशांत सरवणकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dons in jail