परिचय ‘ओमायक्रॉन’चा

सार्स कोव्ही-२च्या दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या उत्परिवर्तित रूपाला जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमायक्रॉन’ असे नाव दिले आणि हे चिंताजनक उत्परिवर्तन असल्याचेही स्पष्ट केले.

corona vaccine
आजवर ‘डेल्टा ’हा सर्वाधिक संसर्गक्षमता असलेला उत्परिवर्तित अवतार म्हणून ओळखला जात होता, मात्र प्राथमिक माहितीनुसार ‘ओमायक्रॉन’ हा त्याहूनही अधिक संसर्गक्षम असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कौनैन शेरिफ एम – response.lokprabha@expressindia.com
सार्स कोव्ही-२च्या दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या उत्परिवर्तित रूपाला जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमायक्रॉन’ असे नाव दिले आणि हे चिंताजनक उत्परिवर्तन असल्याचेही स्पष्ट केले. या नव्या रूपात नेमके काय बदल झाले आहेत, त्याची संसर्गक्षमता किती, त्याच्या संसर्गाचे आरोग्यावर किती गंभीर दुष्परिणाम होतील, उपलब्ध लसी त्यावर परिणामकारक ठरतील का, असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील ‘द नेटवर्क फॉर जिनॉमिक्स सव्‍‌र्हिअलन्स’ने हे उत्परिवर्तन सर्वप्रथम ओळखले. सार्स कोव्ही-२ विषाणूंच्या बी.१.१.५२९ या वर्गातील हा विषाणू असल्याचे तिथल्या संशोधकांच्या निदर्शनास आले. आजवर ‘डेल्टा ’हा सर्वाधिक संसर्गक्षमता असलेला उत्परिवर्तित अवतार म्हणून ओळखला जात होता, मात्र प्राथमिक माहितीनुसार ‘ओमायक्रॉन’ हा त्याहूनही अधिक संसर्गक्षम असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लशी त्यापुढे कितपत प्रभावी ठरू शकतील, याविषयीही शंका व्यक्त केली जात आहे.

ओमायक्रॉनविषयी सध्या हाती आलेली माहिती

सार्स कोव्ही-२ जगभर पसरत असताना त्यात उत्परिवर्तने होत गेली. प्रत्येक उत्परिवर्तन किती घातक आहे, हे स्पष्ट व्हायला बराच वेळ जावा लागतो. कोणते उत्परिवर्तन महत्त्वाचे आहे, हे जाणून घेण्यासाठी जगभरातील आरोग्यविषयक संस्था-संघटनांना, प्रत्येक उत्परिवर्तनावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. अशा स्वरूपाच्या सातत्यपूर्ण निरीक्षणातूनच द नेटवर्क फॉर जिनॉमिक्स सव्‍‌र्हिअलन्सला बी.१.१.५२९ हे उत्परिवर्तन आढळले.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार बी.१.१.५२९ मध्ये विषाणूच्या स्पाइक प्रोटिन्समध्ये (प्रथिनांच्या आवरणांवरील टोकेरी भागांत) अनेक बदल झाले आहेत आणि प्राथमिक विश्लेषणानुसार सार्स-कोव्ही-२ चा हा नवा उत्परिवर्तित अवतार अधिक संसर्गक्षम आहे. या उत्परिवर्तनानंतर गेल्या दोन आठवडय़ांत दक्षिण आफ्रिकेत नव्या रुग्णांमध्ये चौपट वाढ झाली आहे.

जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियाचा समावेश असलेल्या गॉटेन्ग प्रांतात ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत वेगाने वाढ झाल्याचे द नेटवर्क फॉर जिनॉमिक्स सव्‍‌र्हिअलन्सने गुरुवारी स्पष्ट केले. बहुतेक प्रांतांत ओमायक्रॉन पसरल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

या उत्परिवर्तनाची वैशिष्टय़

द नेटवर्क फॉर जिनॉमिक्स सव्‍‌र्हिअलन्सने दिलेल्या माहितीनुसार बी.१.१.५२९ मध्ये उत्परिवर्तनाचे नेहमीपेक्षा वेगळे समूह आढळले आहेत. त्यापैकी तब्बल ३० बदल हे विषाणूच्या मानवी शरीरातील प्रवेशास कारणीभूत ठरणाऱ्या स्पाइक प्रोटिन्सच्या  भागात झाले आहेत. काही बदल हे विषाणूच्या संसर्गक्षमतेला आणि त्याच्या प्रतिकारशक्तीचे कवच भेदण्याच्या क्षमतेला कारणीभूत ठरणाऱ्या भागात झाल्याचे आढळले आहे. यातील काही उत्परिवर्तने ही अल्फा आणि डेल्टा प्रकारांतही आढळली होती. मात्र अन्य अनेक बदल हे आजवर फारसे आढळले नव्हते आणि त्यांच्या वैशिष्टय़ांची नोंदही झाली नव्हती. त्यामुळे विषाणूतील या परिवर्तनाचे महत्त्व अद्याप  नीटसे स्पष्ट झालेले नाही. या उत्परिवर्तनामुळे विषाणू अधिक संसर्गक्षम झाला आहे का, लशीचे आणि प्रतिकारशक्तीचे कवच भेदण्याच्या त्याच्या क्षमतेवर काही परिणाम झाला आहे का आणि त्यामुळे या उत्परिवर्तनामुळे विषाणू अधिक घातक झाला आहे की त्यामुळे उद्भवणारा धोका कमी झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी संशोधन सुरू असल्याचे, आफ्रिका सेन्टर्स फॉर डिसीज कन्ट्रोलने स्पष्ट केले आहे.

चिंतेचा मुद्दा ठरलेली उत्परिवर्तने

एच६५५वाय, एन ६७९के, पी६८१एच हा बदलांचा समूह विषाणूच्या पेशींमध्ये शिरण्याच्या क्षमतेत वाढ करणारा आहे. त्यामुळे त्याच्या संसर्गक्षमतेतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यातून अल्फा, बीटा, गॅमा आणि लॅम्बडा प्रमाणेच एनएसपी६ नाहीसा झाला आहे. या घटकाचा संबंध प्रतिकारशक्तीवर हल्ला करण्याच्या विषाणूच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या घटकाशी असल्यामुळे यातील बदलांमुळेही संसर्गक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती द नेटवर्क फॉर जिनॉमिक्स सव्‍‌र्हिअलन्सने व्यक्त केली आहे.

अल्फा, बीटा, गॅमामध्ये आढळलेले आर२०३, जी२०४आर हे उत्परिवर्तन ओमायक्रॉनमध्येही आढळले आहे. या उत्परिवर्तनामुळे संसर्गक्षमता वाढण्याचीही भीती आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते…

जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाची नुकतीच बैठक झाली असून त्यात या उत्परिवर्तनाचे वर्णन चिंतेचा मुद्दा म्हणून करण्यात आले आहे. चिंताजनक प्रवर्गात गणना करण्यामागे संसर्गक्षमतेत वाढ मात्र निदानाच्या अचूकतेत, लसी व उपचारांच्या परिणामकारकतेत घट यापैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविडविषयक तांत्रिक गटाच्या प्रमुख मारिया वॅन केरकोव्ह यांनी सांगितले की, आफ्रिकेतील सहकाऱ्यांनी या उत्परिवर्तनाची नोंद केली असून त्यांनीच त्याविषयी आम्हाला कळवले आहे. जनुकीय बदलांच्या १०० पेक्षा कमी नोंदी उपलब्ध आहेत. अद्याप याविषयी फारशी माहिती नाही. या प्रकारात मोठय़ा संख्येने उत्परिवर्तने झाली आहेत, एवढेच सध्या माहीत आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने झालेल्या उत्परिवर्तनांचा परिणाम विषाणूच्या वर्तनावर होऊ शकतो आणि तोच आपल्यासाठी काळजीचा मुद्दा आहे.

लक्षणांतील बदल

बी.१.१.५२९ या कोविडच्या उत्परिवर्तित विषाणूच्या संसर्गाची नेहमीपेक्षा वेगळी अशी कोणतीही विशेष लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील द नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसने दिली आहे. ‘डेल्टा’सारख्या संसर्ग वेगाने पसरवणाऱ्या अन्य उत्परिवर्तित विषाणूंप्रमाणेच ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांपैकीही काही रुग्ण लक्षणरहित आहेत, हे देखील संस्थेने स्पष्ट केले आहे.

लसींची परिणामकारकता आणि आजाराची तीव्रता

सध्या उपलब्ध असलेल्या लशींची ‘ओमायक्रॉन’विरोधातील परिणामकारकता जाणून घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील प्रयोगशाळांत संशोधन सुरू आहे. यातून लशींच्या क्षमतेचाही अंदाज घेतला जाईल. रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण आणि ओमायक्रॉनचा त्यावर झालेला परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी यंत्रणाही निर्माण करण्यात आली आहे. या उत्परिवर्तनामुळे आजाराच्या तीव्रतेवर आणि सध्या रुग्णालयांत करण्यात येत असलेल्या औषधोपचारांच्या परिणामकारकतेवर काही परिणाम झाला आहे का, हे देखील या अभ्यासातून स्पष्ट होईल.

आरटी-पीसीआरची अचूकता

विषाणूसंसर्ग लवकर ओळखण्यास सहाय्यभूत ठरणारा एस हा जनुकीय घटक बी.१.१.५२९मधून नाहीसा झाल्याचे दक्षिण आफ्रिकेतील द नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसने स्पष्ट केले आहे. मात्र गॉटेन्ग प्रांतातील आजवर तपासण्यात आलेल्या १००हून अधिक नमुन्यांमध्ये एन आणि आरडीआरपी जनुकीय घटकासह अन्य अनेक घटक कायम असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पीसीआर चाचणीच्या एकंदर अचूकतेवर परिणाम होण्याची शक्यता धुसर आहे. पीसीआरमध्ये किमान दोन वेगवेगळ्या जनुकीय घटकांची चाचणी केली जाते. एकात उत्परिवर्तन झाले, तरी दुसऱ्या घटकामुळे विषाणू ओळखता येईल, हे त्यामागचे कारण आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

लसीकरण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सर्वच तज्ज्ञगटांचे म्हणणे आहे. रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आणि मृत्यूचा धोका त्यामुळे कमी होऊ शकतो. जिथे मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाले आहे, तिथे आरोग्य यंत्रणेवरच्या ताणात लक्षणीय घट झाल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

साथीची अखेर अद्याप खूप दूर असल्याचे नव्या उत्परिवर्तनामुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोविडकाळात घ्यावी लागणारी काळजी म्हणजे मुखपट्टीचा वापर, अंतरभान, हवा खेळती राखणे, हात वारंवार धुणे आणि सर्व पृष्ठभाग सॅनिटायझरने र्निजतुक करणे हे यापुढेही सुरूच ठेवावे लागणार आहे. (दि इंडियन एक्स्प्रेस’मधून)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Understand omicron coronavirus covid 19 coverstory dd70

ताज्या बातम्या