News Flash

नाचू आनंदे -स्वत्वाच्या शोधासाठी..

अगदी परवाच्या दिवशी माझ्या सहा महिन्यांच्या पुतण्याला बघायला मी काकाकडे गेले होते. ते बाळ निवांत गादीवर पहुडलं होतं.

| January 2, 2015 01:18 am

अगदी परवाच्या दिवशी माझ्या सहा महिन्यांच्या पुतण्याला बघायला मी काकाकडे गेले होते. ते बाळ निवांत गादीवर पहुडलं होतं. तेवढय़ात कुणाच्या तरी मोबाइलच्या रिंगटोनचं गाणं वाजलं आणि त्या छोटय़ा बाळाचे हातपाय अचानक त्या गाण्यावर तालबद्ध हालचाली करू लागले. सगळेच त्याच्याकडे बघत चकित झाले आणि मग हळूहळू हा एक खेळच चालू झाला. ते गाणं मोबाइलवर वाजवायचं आणि त्या चिमुकल्याच्या हालचाली पाहायच्या. मग कुणी नातेवाईक भेटायला आले की, चिमुकल्याचा त्या गाण्यावरील कार्यक्रम ठरलेलाच! अगदी ‘वन्समोअर’सकट! हा प्रसंग आणि आठवण आपल्याला काही नवी नाही. बहुतांश लोकांनी कधी ना कधी असा प्रसंग पाहिला असेल किंवा खुद्द त्यात सहभागी झाले असतील. कदाचित त्या बाळाला माहितीही नसेल की त्याचे हात-पाय त्या गाण्यावर थिरकताना ते तालबद्ध, लयबद्ध होते. इतरांना ते नृत्यस्वरूप भासले! त्या दिवशी माझ्या विचारांच्या दिशेने वेग पकडला आणि खरचं आपण नृत्य का करतो? का करायला हवं? या प्रश्नांचा जणू पाठपुरावा करायला सुरुवात केली.
नृत्याची अगदी साधीसोपी परिभाषा करायची म्हटली तर, ‘अंगाच्या सुस्वरूप, तालबद्ध, लयबद्ध व सुसंगत हालचाली’ अशी करता येऊ शकते. कुठल्याही नृत्यवर्गाला न जाताही लहान मुलं विविध प्रकारे नृत्य करतता. भाषा, विहार इ. मूलभूत क्रियांप्रमाणेच ‘नृत्य’ हीदेखील नैसर्गिक आणि मूलभूत शरीरप्रक्रिया आहे. पण त्याचे अभिजात कलेत रूपांतर होण्यासाठी मात्र अनेक वर्षांपूर्वी भरतमुनींसारख्या दिग्गजांनी त्याला शास्त्रोक्त पाया दिला व आज ‘नृत्य’ ही अनन्यसाधारण कला म्हणून ओळखली जाते. पण जेव्हा आपण नृत्य या कलेचा अगदी त्याच्या मुळाशी जाऊन विचार करतो, तेव्हा या कलेच्या पारंपरिक स्वरूपाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अगदी पुरातन काळातही मानवाने आनंदाच्या क्षणी, लग्न, मुलाचा जन्म अशा विविध प्रसंगांच्या वेळी गायन-वादन-नर्तन करून भावना व्यक्त केल्या. या कलांचा मानवी जीवनाशी, संस्कृतीशी निकटचा संबंध आहे. मानवी भावना व्यक्त करण्यासाठी विविध ‘कला’ हे प्रभावी माध्यम आहे.
58नृत्यकलेचा जर विस्तृत स्वरूपात विचार करायचा झाला तर हे नर्तन, लयबद्ध हालचाली आपल्याला निसर्गात, दैनंदिन जीवनातसुद्धा दिसून येतात. नदीच्या प्रवाहाला लय आहे. झाडांच्या-पानांच्या हालचालीतही ताल आहे. वाऱ्याच्या गतीत, मेघांच्या वर्षांवात, मोराच्या चालीत, सर्वत्र आपल्याला निसर्गाचे नृत्य बघायला मिळते. कधी हे सौम्य (लास्य) स्वरूपात दिसते, तर कधी हे भयंकर (तांडव) रूप धारण करते. निसर्गातील या नृत्यमय हालचालीच कदाचित मानवी हालचालीत परिवर्तित झाल्या असतील किंवा इतर अनेक गोष्टींप्रमाणे मनुष्याने निसर्गातील विविध पैलूंचे अनुकरण करताना नृत्य कलेचा उगम झाला असेल.
कधी कधी मला वाटतं की, नृत्य ही मानवी आयुष्याची गरज आहे. शरीर व मन यांना जोडणारा ‘नृत्य’ हा एक धागा आहे. नृत्याचे अनेक शारीरिक, मानसिक, बौद्धिक फायदे आहेत. शरीराला सुबक वळण देण्यासाठी डौलदार हालचालींसाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी, शरीराची शक्ती व बळकटी वाढवण्यासाठी शरीर अधिक लवचीक बनवण्यासाठी इ. अनेक कारणांसाठी नृत्याचा उपयोग होतो. त्याप्रमाणेच मनुष्याची बौद्धिक गरज, सर्जनात्मक गरजसुद्धा नृत्यकलेद्वारे पूर्ण होते. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भावना प्रकट करण्यासाठी, समाजप्रबोधनासाठीसुद्धा नृत्याचा सुंदर वापर करता येऊ शकतो. जरी ही कला अंगभूत असली तरी त्याच्या शास्त्रोक्त शिक्षणाने, अभ्यासाने ती परिपक्व होते, यात काही वाद नाही. सर्जनाचे, नवनिर्मितीचे दृक्श्राव्य माध्यमाचे उत्तम प्रतीक असणारे ‘नृत्य’ मनुष्य स्वत:च्या आनंदासाठी, समाधानासाठी, परमेश्वरप्राप्तीसाठी आणि मनोरंजनासाठी विविध प्रसंगी करतो आणि त्यातूनच समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग अवलंबतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
I dance to live
I dance to breathe
I dance to be free
I dance to be Me
या ओळींमध्ये प्रत्येक नर्तकाची भावना व्यक्त झाली आहे. नृत्य करण्यामागचं कारणच इतकं मूलभूत आणि बळकट आहे. नृत्य करताना स्वत:चा नवीन शोध घेता येतो. श्वासालासुद्धा लय प्राप्त होते आणि विविध बंधनांतून मुक्त होऊन स्वछंद विहरण्याचा आनंद उपभोगता येतो. आपण कसे दिसतो, कसे वागतो, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची पर्वा न करता जर आपण भान हरपून नृत्य केले तर स्वत:शी एकरूप होण्याची प्रक्रिया आपल्याला अनुभवता येते. स्वत:शी एका वेगळ्या प्रकारे संवाद साधता येतो आणि स्वत:बद्दलचे पूर्वग्रह मनात न ठेवता आपल्याला आपण आहोत तसे स्वीकारता येते. मार्था ग्राहम (Martha Graham) या थोर नर्तकीने म्हटले आहे की, “Dance is the hidden language of the soul”. अशा यथार्थ शब्दात नृत्याचे वर्णन करून त्यांनी सांगितले आहे की, नृत्य हे फक्त शारीरिक पातळीवर केले जात नाही तर नृत्य हे आत्म्याशी संवाद साधण्यासाठीचा एक दुवा आहे. फक्त जप-मंत्र याद्वारे परमेश्वराची उपासना करता येते असं नाही, तर कला हासुद्धा फार प्रभावी मार्ग आहे, ज्याद्वारे कलेच्या दैवताची, जगाच्या विधात्याची आराधना करता येते. जे कलाकार त्यांच्या कलेलाच दैवत मानतात ते परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी, परमेश्वरप्राप्तीसाठी कलेची साधना, उपासना करतात. स्वत्त्वाचा शोध घेण्यासाठी, आत्मरूप अनुभूतीसाठी नृत्य हा अनेक पिढय़ांनी अवलंबलेला प्रभावी मार्ग आहे.
Alan Watts यांनी देखील नृत्याचे वर्णन करताना म्हटले आहे-“The only way to make sense out of change is to plunge into it, move with it, and join the dance.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:18 am

Web Title: explaining art of dance
Next Stories
1 फॅशन पॅशन- परफ्यूम कुठला वापरू?
2 पुस्तकाचं पान -फिनिक्स भरारी
3 ‘ती’चं विश्व -‘पीके’च्या निमित्ताने
Just Now!
X