scorecardresearch

मोहिनी अशी की, दर्ग्यामध्ये गीतरामायण

गीतरामायण हे केवळ मराठीत सीमित न राहता अनेक भाषांत पोहोचले आहे.

मोहिनी अशी की, दर्ग्यामध्ये गीतरामायण

गीतरामायण हे केवळ मराठीत सीमित न राहता अनेक भाषांत पोहोचले आहे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, कन्नड भाषांत गीतरामायणाची भाषांतरं तर झालीच पण बाबूजींचं संगीत तसंच ठेवून अनेकांनी त्याचं गायनदेखील केलं आहे. हिंदीत रुद्रदत्त मिश्र यांनी केलेल्या समश्लोकी भाषांतराचे डोंबिवलीच्या वसंत आजगावकरांनी आजवर शेकडो प्रयोग केले आहेत. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवानिमित्त हिंदी गीतरामायणाचा प्रवास त्यांनी खास ‘लोकप्रभा’च्या वाचकांसाठी उलगडला आहे.

सन १९८०, वेळ रात्रीची १० वाजताची, ठिकाण ग्वाल्हेरमधील उर्स शरीफ दर्गा..आणि कार्यक्रम गीतरामायणाचा? दग्र्यामध्ये आणि गीतरामायण ऐकायला समोर बसलेले तीन-चार हजार श्रोते.. आश्चर्य वाटले ना.. पण हिंदी गीतरामायण गाणारे ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर यांनी गप्पांच्या ओघात दग्र्यामध्येसुद्धा एकेकाळी गीतरामायणाचे कार्यक्रम केले जायचे असे सांगितलं. हे ऐकूनच आजघडीला आश्चर्य वाटेल. ग्वाल्हेरमधील सुप्रसिद्ध श्रीसाईबाबा उत्सवामध्ये डोंबिवलीच्या वसंत आजगावकर यांना गीतरामायण सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सलग दोन-तीन वर्षे या उत्सवात हिंदी गीतरामायणाचे कार्यक्रम गाजले, ‘या कार्यक्रमाची माहिती उर्स शरीफ उत्सवाच्या आयोजकांना मिळाली आणि नंतरच्या वर्षी उर्स शरीफ उत्सवात दग्र्यामध्ये गीतरामायण सादर करण्याचे निमंत्रण घेऊन आयोजक थेट माझ्या डोंबिवलीच्या घरी आले. अतिशय प्रेमाने हिंदी गीतरामायण ऐकण्यासाठी मुस्लिम श्रोते जमले होते’, वसंत आजगावकर आठवणींत रमून गेले. ‘रात्री १० वाजता सुरू झालेला कार्यक्रम इतका रंगला की पहाटेचे तीन वाजेपर्यंत सारेच तल्लीन झाले, गीतरामायणाच्या गोडव्यात न्हाऊन निघाले. हिंदी गीतरामायण दग्र्यासमोर सादर करीत असताना वरून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षांव माझ्यावर केला जात होता. वातावरण भक्तिमय आणि सुगंधी बनले होते. पहाटे तीन वाजता गीतरामायणाची सांगता झाली आणि त्यानंतर दर्गा उत्सवाच्या आयोजकांनी दग्र्यावर पांघरलेली हिरवी चादर सुगंधी अत्तर शिंपडून मला प्रेमाने आणि निरतिशय आदराने भेट म्हणून दिली’ हे सांगताना वसंत आजगावकर आजही मोहरून जातात.
‘ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले गीतरामायण १९५७ साली डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मी ऐकले. आकाशवाणीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गीतरामायणाचे कार्यक्रम सादर करण्यास बाबूजींनी तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. रेडिओवर संपूर्ण गीतरामायण ऐकले होतेच. त्यातील ‘लीनते चारूते..’ हे एक गाणे मी रेडिओवरही गायले होते. बाबूजींच्या कोरसमध्येदेखील होतो. त्यानंतर कर्जत येथील गणेशोत्सवात गीतरामायण सादर करण्यासाठी मला निमंत्रण मिळाले होते. त्या कार्यक्रमात बाबूजींनी मी सादर केलेल्या गीतरामायणाला आणि माझ्या आवाजालाही मनसोक्त दाद दिली. त्यांचा उमदेपणा एवढा की, अनेकदा त्यांना एखाद्या ठिकाणी कार्यक्रम करण्यास जायला जमणार नसेल तेव्हा संबंधित आयोजकांना माझे नाव आपणहून त्यांनी सुचवायला सुरुवात केली’, आजगावकर सांगतात.
हिंदी गीतरामायणाची कूळकथा
मराठी गीतरामायणाची मोहिनी समाजावर कायम होतीच. ग. दि. माडगूळकर यांचे शब्द आणि बाबूजींचे संगीत, आवाज आणि सादरीकरण यामुळे अमराठी लोकांनाही गीतरामायण आवडले. चित्रकार, संगीत दर्दी नागेश जोशी यांनीही अनेकदा गीतरामायण ऐकले आणि ते भारावून गेले होते. प्रभु रामचंद्रांची गीतरामायण कथा सबंध भारतातील लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर हिंदीतून गीतरामायण लिहिले गेले पाहिजे असे त्यांना १९६८ साली तीव्रतेने वाटले. म्हणून त्यांनी मुंबई भेटीवर आलेल्या कवी रुद्रदत्त मिश्र यांची भेट घेतली. त्यांना मराठी व्यवस्थित समजत नव्हते. म्हणून गीतरामायणातील प्रत्येक गाण्याचे प्रत्येक कडवे, त्याचा अर्थ नागेश जोशी यांनी त्यांना गाऊन समजावून दिला. मग रुद्रदत्त मिश्र यांनी मराठी गीतरामायणाची चाल कायम ठेवून हिंदीत गीतरामायणाचा समश्लोकी अनुवाद केला. जवळपास सहा महिन्यांच्या अथक परिश्रमातून हिंदी गीतरामायणाचा जन्म झाला. ग. दि. माडगूळकर यांच्या जादूई शब्दांना आणि बाबूजींच्या लयीला, संगीताला अजिबात धक्का न लावता हिंदी गीतरामायण साकारले हाही अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे, असे आजगावकर यांनी आवर्जून नमूद केले.
हिंदी गीतरामायणाच्या जन्मानंतर आणि संगीतमेळ्यासह ते रियाज करून बसविल्यानंतर वसंत आजगावकर यांनी पहिल्यांदा हिंदी गीतरामायण सादर केले ते १९६९ सालच्या मे महिन्यात. तेव्हा तत्कालीन जनसंघाचे मोठे अधिवेशन मुंबईतील कफ परेड येथे भरले होते, त्यात त्यांचा १५ हजार लोकांच्या उपस्थितीत पहिला जाहीर कार्यक्रम झाला. वसंत आजगावकर यांच्यासोबत कवी पं. रुद्रदत्त मिश्र हेही या वेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हिंदी गीतरामायणाच्या जाहीर कार्यक्रमांची अशी अविस्मरणीय सुरुवात झाल्यानंतर आजगावकरांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदी गीतरामायणाची महती सर्व रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वसंत आजगावकर आणि नागेश जोशी यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम करायला सुरुवात केली. दिल्ली दूरदर्शनवर वसंत आजगावकर यांनी हिंदी गीतरामायण सादर केले. त्याच दौऱ्यामध्ये दिल्ली, कानपूर, अलाहाबाद असा उत्तर भारताचा दौरा करून हिंदी भाषकांपर्यंत हिंदी गीतरामायण पोहोचविण्यात वसंत आजगावकर यशस्वी ठरले. रामायण, रामकथा, रामलीला याला उत्तर भारतातील समाजामध्ये मोठी मान्यता आहे. त्याविषयी लोक पूर्वीपासूनच खूप आदर बाळगून होते. परंतु, काव्यमय, संगीतमय असे प्रभु रामचंद्रांचे जीवनपट उलगडून सांगणारा हिंदी गीतरामायणाचा कार्यक्रम हा नवा प्रकार उत्तर भारतातील लोकांना खूप भावला, आवडला. सर्वच ठिकाणी रसिकांची मनमुराद दाद मिळत गेली. हिंदी गीतरामायणाचे वैशिष्टय़ सांगताना आजगावकर सांगतात की, हिंदी भाषा वापरली असली तरी समश्लोकी अनुवाद करताना आणि मुख्य म्हणजे त्याचे पावित्र्य मराठीएवढेच हिंदीत टिकून राहावे यासाठी पं. रुद्रदत्त मिश्र यांनी संस्कृतप्रचुर हिंदी शब्दांचा अधिकाधिक वापर केला आहे आणि त्यामुळे हिंदी भाषिक लोकांना मी गायलेले हिंदी गीतरामायण अतिशय भावले असे त्यांनी स्पष्ट केले.
१९७१ सालच्या उत्तर भारत दौऱ्यानंतर साधारण १९८० च्या सुमाराला बंगलोरच्या राष्ट्र उत्थान या संस्थने हिंदी गीतरामायणातील २४ गाण्यांच्या तीन कॅसेट्स काढल्या. अलाहाबाद येथे त्या दरम्यान झालेल्या कुंभमेळ्यामध्ये या कॅसेट्सचे प्रकाशन करण्यात आले. त्याबरोबर न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात बाबूजी, ग. दि. माडगूळकर यांच्या उपस्थितीत कॅसेट्सचे प्रकाशन झाले.
हिंदी गीतरामायण गायला सुरुवात केल्यापासून एक महत्त्वाची घटना घडली त्याबद्दल आजगावकर यांनी सविस्तर विशद केले. ते म्हणाले की, १९८० साली गीतरामायणाला २५ वर्षे पूर्ण झाली. रौप्यमहोत्सवानिमित्त मोठा कार्यक्रम पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. सलग सात दिवस जणूकाही गीतरामायण महोत्सवच होता. त्यात दररोज दोन तास बाबूजी गीतारामायण सादर करायचे. त्याआधी रोज एकेक दिवस हिंदी, कानडी, गुजराती, बंगाली, तेलुगू, संस्कृत अशा पाच भाषांमधील गीतरामायण सादर होत असे. . जवळपास २५-३० हजार रसिकश्रोते दररोज या महोत्सवात गीतरामायण ऐकायला यायचे आणि प्रत्येक भाषेत गीतरामायणाचा आस्वाद घेण्यात दंग होऊन जायचे, ही अविस्मरणीय घटना होती असे वसंत आजगावकर यांनी आवर्जून नमूद केले, ‘मी हिंदी गीतरामायण सादर केले त्या दिवशी प्रख्यात हिंदी कवी नरेंद्र शर्मा आणि प्रख्यात गायक पं. वसंतराव देशपांडे प्रमुख पाहुणे होते. गीतरामायण रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी तर पं. भीमसेन जोशी प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमांमुळे रसिकश्रोत्यांबरोबरच अनेक महनीय व्यक्ती, मान्यवरांची कौतुकाची थाप मिळाली’, हे सांगताना आजगावकर स्मरणरंजनात रमून जातात.

जिवंत काव्य
मराठी गीतरामायण १९६० सालापासून आकाशवाणीवर तसेच जाहीर कार्यक्रमांमध्ये असंख्य वेळा गायले आहे. हिंदी गीतरामायणचे शेकडो जाहीर कार्यक्रम केलेत. परंतु तरीसुद्धा आजही गीतरामायण गाताना कधीच कंटाळा येत नाही कारण हे जिवंत काव्य आहे. वातावरण मंगलमय, राममय, पवित्र करण्याची ताकद यात आहे. भावगीत भक्तिगीतांचे अनेक कार्यक्रम केले मात्र गीतरामायणाला रसिकजनांची उत्स्फूर्त दाद मिळाली त्याची तुलना अन्य कोणत्याच कार्यक्रमाशी करता येणार नाही.

गीतरामायणाचे झपाटलेपण आजगावकर यांच्यात आजही कायम आहे. ते सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरीला होते. नोकरी सांभाळून त्यांना भारतभर हिंदी गीतरामायणाचे कार्यक्रम करायला मिळाले याबद्दल ते स्वत:ला भाग्यवान समजतात. बिर्लाच्या या कंपनीत नोकरी करत असताना स्वत: बिर्ला कुटुंबीयांनीच कोलकात्यामध्ये वसंत आजगावकर यांचे हिंदी गीतरामायणाचे कार्यक्रम आयोजित केले. एवढेच नव्हे तर कोलकात्यात त्यांच्या गाण्यांचे खासगी रेकॉर्डिगही केले.
हिंदी गीतरामायणीतील भावलेल्या समश्लोकी अनुवादाबाबत सांगताना ते म्हणाले की, महत्त्वाच्या घटनांवरच्या १५-१६ गाण्यांचा समश्लोकी अनुवाद मला अतिशय भावतो. उदाहरणच द्यायचं तर ‘स्वयंवर जनकनंदिनी का’ या गाण्याचे सांगता येईल. मराठी गीतरामायणात ‘आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे..’ असे शब्द आहेत. त्याचा समश्लोकी अनुवाद पाहा किती सुरेख झाला आहे – ‘नाता नभ के साथ जुड गया माता धरणी का, स्वयंवर जनकनंदिनी का स्वयंवर जनकनंदिनी का’ असा अनुवाद रुद्रदत्त मिश्र यांनी केला. जनकनंदिनी हा मराठीत नसलेला शब्द त्यांनी समर्पकपणे वापरला आहे. अगदी पहिले गाणे ‘स्वये श्री रामप्रभु ऐकती’ या गाण्याचे हिंदी शब्द पाहा – ‘रामप्रभु सुनते है गायन सुनाते कुश लव रामायण’. त्याचप्रमाणे ‘सेतू बांधा रे सागरी’ या गाण्याचा अनुवाद करताना केलेली शब्दयोजना अतिशय चपखल आहे ती अशी – सेतु बाँधोरे! सेतु बाँधोरे सहचरो! त्याचप्रमाणे ‘नकोस नौके परत फिरू’ या गाण्याचा चपखल अनुवाद ‘हे नौका तुम लौट न आना’ असा अप्रतिम केल्याचे वसंत आजगावकर यानी नमूद केले. गीतरामायणने माझं आयुष्य कसं व्यापून खूप आठवणी सांगताना आजगावकर यांनी आवर्जून ग. दि. माडगूळकरांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, ‘‘माडगूळकर एकदा म्हणाले होते. गीतरामायाची गीतं मी आणि बाबूजींनी केली म्हणण्यापेक्षा आमच्याकडून ती झाली असे म्हणावे लागेल. गीतरामायणाने मला काय दिले हे सांगण्यासाठी माडगूळकर मोरोपंतांच्या ओळींचा आधार घेतात. रणभूमीवर जेव्हा भीष्मांना श्रीकृष्ण आपल्यावर चालून येतो हे समजल्यावर भीष्म उद्गारले ‘येतो देखे तो रथनिकट तो श्यामल हरी.. केले मज सकळ लोकांत बरवे’ याच धर्तीवर गीतरामायणाच्या बाबतीत गदिमा म्हणाले ‘रामराये केले मज सकळ लोकांत बरवे’. जशी गदिमांची गीतरामायणामुळे ही स्थिती होती तसेच आमची देखील झाल्याचे सांगताना आजगावकरांच्या मनातही अशाच भावना दाटून आल्या होत्या.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2014 at 01:05 IST

संबंधित बातम्या