lp55विस्तीर्ण समुद्रकिनारे, पांढरीशुभ्र रेती, खोल समुद्रातलं डॉल्फिनचं नर्तन, हिरवीगार झाडं, वेगवेगळे जलदुर्ग पाहायचे असतील, कोकणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर अट एकच.. सायकल काढा आणि चला..

‘मुंबई-गोवा-मुंबई सायकल मोहीम. इच्छुकांनी संपर्क साधावा.’ ही बातमी वाचताक्षणीच जाण्याचा निर्णय पक्क झाला. सायकलचा अनुभव नसल्यामुळे १५ दिवस २० किमी सायकल चालवण्याचा सराव केला. दोन दिवस त्रास झाला, पण नंतर पायाला सवय झाली.
कोकण रेल्वेने कधी प्रवास केला नव्हता म्हणून गोव्याला जायचंच आहे तर कोकण रेल्वेने जावं म्हणून मग परभणीहून मुंबई आणि मुंबईवरून मांडवी एक्स्प्रेसने निघालो. असंख्य बोगदे आणि दरी-खोऱ्यातून जाताना एकामागून एक रेल्वे स्टेशनं जात होती. संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन लागलं आणि अंगावर काटा उभा राहिला. इथेच गणुजी शिर्के याच्या गद्दारीमुळे सह्य़ाद्रीचा वाघ, हिंदवी स्वराज्याचा छत्रपती मुगलांच्या हातात सापडला होता. मुगलांचा सेनापती मुकरब खान व त्याची सेना संभाजी महाराजांना जिवंत पकडूनसुद्धा खूप घाबरलेली होती, कारण त्यांना वाटत होते की कुठून तरी मावळे येतील आणि आपली मुंडकी उडवून आपल्या लाडक्या राजाला घेऊन जातील. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. बराच वेळ डोळ्यासमोरून ते चित्र जात नव्हते.
संध्याकाळी पणजीमध्ये मुक्काम केला. सकाळी यूथ होस्टेलच्या (वायएचए) कॅम्पवर आलो. संध्याकाळपर्यंत आमच्या सायकल मोहिमेचे सर्वजण जमा झाले. सगळ्यांची ओळख झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातला निघताना खूप उत्साह होता. रस्त्यावरील सर्वांच्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. एकदम हिरो असल्यासारखं वाटत होतं.
अध्र्या तासात फेरी स्थानकावर आलो. बोटीतून उतरून सायकलवरून कलंगुटकडे निघालो. पुढे सिओलिमवरून हर्लेमला जाताना चापोरा नदीवर सुंदर पूल आहे. पुलावर उतरून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. तिथेच उंच नारळाच्या झाडावर ब्राम्हणी घारीच्या जोडीचे दर्शन झाले. आरमबोलमार्गे क्वारीमला फेरीसाठी पोहचलो. रस्त्यात खूप सुंदर समुद्रकिनारे लागले. पांढरीशुभ्र वाळू, निळाशार समुद्र आणि मधूनमधून डोकावणारी नारळाची झाडं.
क्वारीमवरून फेरीने नदी पार करून तेरेखोलला पोहोचलो. तेरेखोल ते तेरेखोल किल्ला हे अंतर चढ-उताराचे होते. तेरेखोल किल्ल्याने गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारकांना निवारा देण्याचे मोठे काम केले आहे. सावंतवाडीच्या राजाने बांधलेला हा किल्ला १७४६मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेट्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली जिंकला. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी, पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीची छाप दिसते. किल्ल्यामध्ये एक चर्चसुद्धा आहे. किल्ल्यावरून खाडी व नदीचा प्रदेश खूप सुंदर दिसत होता. सध्या तेरेखोल किल्ल्याचे हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे.
रस्त्यात मस्त कोकणी जेवण केलं आणि पाच वाजेपर्यंत आरवलीला पोहोचलो. वेताळेश्वरच्या मंदिरात मुक्काम होता. तिथून जवळच समुद्रकिनारा होता. दमलेली पावले पुन्हा नव्या जोमाने आरवलीच्या किनाऱ्याकडे निघाली. रस्त्यात नीलपंख बगळे, घार या पक्ष्यांचं दर्शन झालं. समुद्रकिनारा स्वच्छ, अतिशय शांत आणि सुंदर आहे. आमची मस्ती सुरू असतानाच एका समुद्री घारीने केलेली समुद्री सापाची शिकार हे दुर्मीळ दृश्य पहायला मिळालं. त्याचे फोटोही काढता आले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ डिसेंबरला सकाळी सहा वाजता हेड लॅम्पच्या प्रकाशात सायकलिंग सुरु होतं. वेंगुर्ला-परुळा करत करत केरीच्या कोरजाई जेट्टीवर पोहचलो, ते देवबागला फेरीने जाण्यासाठी. बोटीने देवबागला उतरलो आणि पलीकडील दृश्य पाहून थक्क झालो. विशाल समुद्रात शिवरायांचा सिंधुदुर्ग ताठ मानेने उभा होता. गडाला मुजरा करून पुन्हा सायकलवर टांग मारली. तारकर्ली मार्गे मालवण दुपारी दोन वाजले पोहचायला. मस्त मालवणी जेवण करून आम्ही पुढे निघालो. आचऱ्याला पोहचायला सहा वाजले, ब्राह्मण देवळात मुक्काम होता.
lp56१६ डिसेंबरला सकाळी सहा वाजता निघालो. रस्त्यात भैरवनाथ महादेव मंदिरात दर्शन घेतले. हिंदळे गावावरून कुणकेश्वरला आलो. कुणकेश्वर येथील महादेवाचे अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर आहे. परिसरात सुंदर कुंड आहेत. त्यात अनेक कमळाची फुले फुललेली होती. कुणकेश्वरवरून जामसंडे व तेथून देवगडला गेलो. रस्त्यातील चढउतार थकवून टाकणारे होते. रस्त्यात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा दिसत होत्या. देवगडवरून पडेलला पोहोचलो. पडेलवरून पुढे जाताना खाडीच्या पुलावरून खाली उतरताच विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन झाले. समुद्रात घुसलेला जमिनीचा एक चिंचोळा भाग आणि त्यावर बांधलेला विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग बांधणीचे श्रेय शिलाहारवंशीय राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. त्याच्यानंतर बहामनी, आदिलशाही असा प्रवास करत किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला. शिवरायांनी या गडाचे महत्त्व ओळखून तिहेरी तट बांधले व किल्ला चारी बाजूंनी मजबूत केला. समुद्रावरील शिवाजी अशा शब्दात इतिहासकारांनी गौरविलेल्या कान्होजींनी विजयदुर्गाच्या साहाय्याने इंग्रज व पोर्तुगीज आरमारावर अभूतपूर्व विजय मिळवले. अशा या पावन किल्ल्याला दुरूनच मुजरा करून पुढे निघालो. आता भिंतीवर विविध ठिकाणी ‘जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प शाप आहे’ अशा आशयांचे मजकूर दिसू लागले होते. आम्ही जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात पोहचलो होतो. या परिसरात मच्छीमारीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात होतो. ठिकठिकाणी मासे वाळवण्यासाठी दगड रचून चौकोन करून त्यामध्ये मासे वाळत घातले जातात. बर्फाचे कारखाने व बर्फ फोडून गाडीत भरून देणारे मजूर दिसत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ डिसेंबरला ११० कि.मी. अंतर पार करायचे होते आणि रस्ता अतिशय सुंदर किनाऱ्यांचा होता. सकाळी साडेपाचलाच निघालो. सकाळी सायकल चालवण्याची मजा काही वेगळीच आहे. चढावर सायकलची विशिष्ट गियर पद्धती लक्षात आली होती. त्यामुळे कितीही चढ असला तरी सायकलवरून उतरून चालण्याची वेळ आता येत नव्हती आणि अवघड चढ-चढून गेल्यानंतर एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत असे.
आडिवरेवरून निघून पूर्णगड-पावस करत साडेनऊ वाजता रत्नागिरीत पोहचलो. लोकमान्य टिळकांचा जन्म झाला त्या घराला भेट दिली. रत्नागिरीतून बाहेर पडून गणपतीपुळे रस्त्याला लागलो. आरे-वारे येथील समुद्रकिनाऱ्यांवरून समुद्रातील डॉल्फिनच्या झुंडीच्या झुंडी श्वास घेण्यासाठी पाण्यातून वर येताना दिसत होत्या. दुपारी साडेबाराला गणपतीपुळ्याला पोहोचलो. मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघालो. रस्त्यात मालगुंड लागले. हे कवी केशवसुत यांचे जन्म ठिकाण. त्यांच्या जन्मघराचे दर्शन घेऊन जयगडच्या जेट्टीजवळ पोहचायला चार वाजले. बीटवर सायकल चढवून पलीकडे तवसाळला उतरलो. तवसाळ-नरवण- हेदवी करत वेळणेश्वर या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी साडेसहा झाले होते. वेळणेश्वरला एका बाजूला विशाल अरबी समुद्र पसरलेला होता आणि एका बाजूला सह्यद्रीची पर्वत रांग.. मध्ये हे टुमदार गाव वसले होते.
१८ डिसेंबरला वेळणेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊन पुढे निघालो. पालशेत-मोडकाहार असे करत सकाळी lp53नऊ वाजता ‘काकस्पर्श’ या मराठी सिनेमाचे शूटिंग जिथे झाले त्या २०० वर्षे जुन्या वाडय़ापाशी येऊन पोहोचलो. तो बघताना सिनेमामधील प्रत्येक क्षण आठवत होता. तिथून गुहागरला आलो. गुहागरहून धोपावेकडे जेट्टीकडे आलो व तेथून दाभोळला पोहोचलो. जेट्टीजवळ पीटर नावाचा एक अवलिया भेटला. तो दक्षिण आफ्रिकेतून सायकलवर जगभ्रमंती करत आहे. पाच वर्षे तो जगातील विविध देशांना भेट देणार आहे.
दाभोळ येथे जाताना वाटेत चंडिकादेवीचे मंदिर लागले. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे ११ फूट उंचीची पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. मूर्तीजवळ इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजाऱ्यांची श्रद्धा आहे. या देवीला फक्त तेलाच्या दिव्याचा प्रकाश चालतो म्हणून गुहेत अंधार असून फक्त मूर्तीजवळ दिव्यांचा प्रकाश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराला भेट देऊन निघालो. माँसाहेब मशिदीजवळच्या हॉटेलमध्ये जेवण केले. माँसाहेब मशिदीएवढी भव्य देखणी आणि अद्यापही चांगल्या स्थितीत असलेली कोकणात दुसरी मशीद नाही. ६०x७० फूट लांबी-रुंदी असलेल्या या वास्तूला चार मीनार आहेत आणि ७५ फुटांचा भव्य घुमट आहे. विजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे. इतिहासानुसार विजापूरची राजकन्या आयेशा बीवी (सुलतान महम्मद शाहची मुलगी) जाण्यासाठी दाभोळला आली होती; परंतु हवामान ठीक नसल्यामुळे तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही. तिच्यासोबत २० हजार घोडेस्वार आणि संपत्ती होती. प्रवास रद्द झाल्यावर काय करावे, अशा चिंतेत माँसाहेब असताना बरोबर असलेल्या काझी व मौलवींनी सदर धन काही धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची तिला सूचना केली. तेव्हा तिने या मशिदीचे काम हाती घेतले व ते चार वर्षे चालू होते. या कामी १५ लाख रुपये खर्च आला. कामील खान नावाच्या शिल्पकाराने ही मशीद बांधली आहे.
दाभोळ हे इतिहासकालीन वैभवसंपन्न प्राचीन बंदर आहे. प्राचीन काली दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभील नाव पडले असे मानले जाते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नाही. टॉलेमीच्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुस्लीम यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदरात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंदू म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात. इथून तलम वस्त्रांचा व्यापार होत होता. अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत इथला सालीपाडा गजबजलेला होता. तेराव्या शतकाच्या मध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ ३०० वर्षांपासून अधिक काळ दाभोळवर मुसलमानी सत्तेचा अंमल राहिला होता. शहाजी राजे व शिवाजी महाराजांना घोडय़ाची उत्तम जाण होती आणि साम्राज्यउभारणीत घोडय़ाचे महत्त्व त्यांना चांगले माहीत होते. त्यामुळे महाराजांच्या पागेत उत्तम अरबी घोडे होते. अरबस्तानातून येणाऱ्या अरबी घोडय़ांची आयात दाभोळ बंदरातून होत असे.
१९ डिसेंबरला सकाळी जालगाववरून निघून दापोली हर्णेला आलो. तिथे आधी कणकदुर्गाचे आणि काही अंतर पुढे गेल्याबरोबर सुवर्णदुर्गाचे दर्शन झाले. सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे, तर कणकदुर्ग जमिनीवर आहे. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी अली आदिल शहा दुसरा याला हरवून किल्ला ताब्यात घेतला. पुढे हा किल्ला lp54कानोजी आंग्रेंच्या आधिपत्याखाली राहिला. दुरून किल्ला पाहात हर्णे बंदरावर पोहोचलो. येथून बोट घेऊन समुद्रात डॉल्फिन पाहण्यासाठी गेलो. पुढील एक तास समुद्रात डॉल्फिन जवळून पाहण्यात व तसेच तपकिरी डोळय़ाचा कुख पक्षी (Brown Headed Gull) जवळून पाहण्यात गेला. बोटीतून निघून पुन्हा सायकलवर स्वार झालो. हर्णेवरून आंजर्ले आणि आंजर्लेवरून केळशीला पोहोचलो. केशळी गाव तसे छोटे आहे, पण भौगोलिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा एका घटनेचे अवशेष तिथे आहेत, ते म्हणजे त्सुनामीमुळे तयार झालेली वाळूची टेकडी. सप्टेंबर १५२४ ला अरबी समुद्रात एक मोठी त्सुनामी आली होती. ही त्सुनामीची टेकडी (Sand dunes) भारजा नदीच्या दक्षिण बाजूला आहे. ही वाळूची टेकडी श्रीकांत कारलेकर यांनी १९९०मध्ये शोधून काढली; परंतु शोकांतिका म्हणजे इथेच नदीवर एक पूल बांधण्याचे काम चालू आहे आणि त्यामुळे कदाचित ही वाळूची टेकडी पाण्यात जाईल, असे सांगितले जाते. केळशीहून वेसवीला आलो. तेथून फेरी घेऊन बागमांडलाला उतरलो. तेथून चार कि.मी.वर हरिहरेश्वरला मुक्कामाला पोहचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून निघून श्रीवर्धनला आलो. हे इतिहासप्रसिद्ध शहर तसेच बंदर. युरोपीयांच्या प्रवासवर्णनात याचा झिफरदन असा उल्लेख आढळतो. पेशव्यांचे मूळ भट घराणे श्रीवर्धनचे आहे. श्रीवर्धनहून-दिवेआगार वेळास-आदगाव-सर्वे-दिघीला आलो. वेळासवरून दिघी सरळ रस्ता असताना समुद्रकिनाऱ्याने सायकलिंग करावयास मिळावी म्हणून हा वाकडा रस्ता निवडला. दिघीच्या फेरी स्थानकावरून मुरूड जंजिरा किल्ला दिसत होता.
२१ डिसेंबरला सकाळी माजगाववरून आणि काशिदवरून कोर्लई येथील किल्ला व प्रकाशघर पाहण्यासाठी थांबलो. कोर्लई किल्ला दक्षिण-उत्तर पसरलेला आहे. त्याचा दक्षिण भाग जमिनीशी जोडलेला आहे. कोर्लईवरून रेवदंडा-चौल-अक्षी- अलिबाग रस्ता सपाट होता, चढउतार नव्हते. अलिबाग ते रेवस हे अंदाजे २५ कि.मी.चे अंतर पार करून भाऊच्या धक्क्याला जाणारी फेरी पकडली. तिथून एक ते दीड तासात मुंबईत भाऊच्या धक्क्यावर आणि तिथून परळला युथ होस्टेलच्या ऑफिसमध्ये पोहोचलो.
आता इथून प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गानी जाणार होता. माहीत नाही पुन्हा कधी आमचे रस्ते पुन्हा एक होतील की नाही.. पण आम्ही सगळेचजण एका समान दुव्याने जोडले गेलो होतो, तो म्हणजे सायकल.