04 July 2020

News Flash

‘लोकमान्य’च्या निमित्ताने…

गेल्या काही वर्षांत लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावरील चित्रपटांची मराठीत काही प्रमाणात लाट आली आहे. ‘बालगंधर्व’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘मी सिंधुताई सपकाळ’ आणि...

| January 16, 2015 01:12 am

गेल्या काही वर्षांत लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावरील चित्रपटांची मराठीत काही प्रमाणात लाट आली आहे. ‘बालगंधर्व’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘मी सिंधुताई सपकाळ’ आणि नुकताच आलेला ‘लोकमान्य एक युगपुरुष’. या बायोपिकचे यश किती आणि कसे यापलीकडे जाऊन लोकमान्यांच्या बायोपिकनिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात.

मुळात बायोपिक करताना कळीचा घटक असतो तो चित्रपट की माहितीपट? व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यातील जास्तीत जास्त घडामोडी दाखविण्याच्या अट्टहासापोटी बहुतांश वेळा चित्रपटाचा माहितीपट होऊन जातो आणि केवळ त्या काळातील घटनांचे नाटय़ रूपांतर असे त्याचे स्वरूप होते. ‘यशवंतराव चव्हाण’ त्याच वाटेने गेला. ख्यातनाम दिग्दर्शक, भक्कम आर्थिक आणि शासकीय पाठिंबा, नावाजलेल्या दूरचित्रवाहिनीचे प्रायोजकत्व असे असतानादेखील तो चित्रपट कमी आणि माहितीपट अधिक झाला. त्यातील गोष्ट हरवली आणि एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची नव्याने ओळख करून देण्याची संधी गमावली. नव्या वर्षांच्या सुरुवातीस प्रदर्शित झालेला ‘लोकमान्य एक युगपुरुष’ने मात्र काही प्रमाणात माहितीपटाची सीमारेषा ओलांडली आहे. संवाद, रंगभूषा, वेशभूषा, वातावरण, कथासूत्र, छायालेखन अशा अंगांनी चित्रपटाचे कौतुक करता येईलच. अर्थात हे स्वागतार्हच आहे.
मूळ मुद्दा आहे तो त्यातून लोकमान्य टिळक किती आणि कसे उलगडले. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत’ वगैरे आजवर ऐकलेले संवाद यात नसणार हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भरपूर वाजवून झाले होते. त्यामुळे काय नवे पाहायला मिळणार याचे अप्रूप होतेच. काही प्रमाणात त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न चित्रपटातून जाणवला. टिळक-आगरकर यांच्या प्रदीर्घ वैचारिक वादाला चित्रपटातून सर्वाधिक फूटेज लाभले आणि ते पडद्यावर पाहणे हे आजच्या पिढीसाठी नवे होते. पण हे नवेपण मांडणीतले होते, विषयाबद्दलचे नव्हे. मुख्य म्हणजे गांधीपूर्व काळातील स्वातंत्र्यलढय़ाचे सेनानी असणारे लोकमान्य हा विषयच आजवर रुपेरी पडद्यावर आला नव्हता. तो हाताळणे हेच या चित्रपटाचे मुख्य यश आहे.
टिळकांच्या कारकीर्दीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. एक मंडालेपूर्व आणि दुसरा मंडालेनंतरचा. म्हणजेच १९०८ पूर्वीचा आणि १९१४ नंतरचा. स्वातंत्र्यलढय़ात टिळकपूर्व (१९२० पूर्व) आणि टिळकोत्तर असे टप्पे मानले जातात. १९२० नंतर गांधीजींचा काळ. गांधीपूर्व काळावर टिळकांचा प्रभाव मोठा होता.
मात्र चित्रपटाचा सारा भर हा बहुतांशपणे लोकमान्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या भागावरच केंद्रित झाला आहे. बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक हे परिवर्तन दाखविताना दिग्दर्शकाने मेहनत घेतली आहे; किंबहुना एक लोकनेता कसा असावा याचे प्रत्यंतर येते, पण टिळकांचे लोकमान्यत्व दाखविताना त्यांना पुण्यातच बंदिस्त करून ठेवले आहे. भारतीय असंतोषाचे जनकत्व त्यांच्याकडे कसे आले आणि स्वातंत्र्यलढय़ातील टिळकपर्व काय होते हे मात्र चित्रपटातून अजिबात उलगडत नाही, स्पष्ट होत नाही, किंबहुना चित्रपटाने अनेक घटना गृहीत धरल्या आहेत, जसे लाल-बाल-पाल ही संज्ञा. चित्रपटातील त्या आनुषंगिक प्रसंगांचा संदर्भ इतका त्रोटक आहे की, ज्यांना हे माहीत आहे त्यांनी स्वत:च अर्थ लावून घ्यावा अशी दिग्दर्शकाची अपेक्षा असावी.
चित्रपटाचा पूर्वार्ध टिळक-आगरकर वादात संपतो. त्याला जोडून केसरी, मराठा, शिक्षणसंस्था या घटना येतात; पण यावरच इतका काळ गेला आहे की, टिळक पुण्यातच अडकून पडतात. त्यामुळे अर्थातच उत्तरार्धात देशातील वातावरण, मंडालेनंतरचा काळ इतक्या वेगात संपवावे लागले आहे. केवळ दखल घेण्याइतपतच हा समावेश होता. तोदेखील प्रभावीपणे नाही. सूरत काँग्रेसमधील फूट १९०७, होमरूल चळवळीचे अध्यक्षपद १९१४, लखनौ करार १९१६, इंग्लंड भेट १९१८ या साऱ्या घटना या टिळकांचं राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व सिद्ध करणाऱ्या आहेत; पण त्यांचा चित्रपटात समावेशच नाही. टिळकांच्या नेतृत्वालादेखील अनेक पदर होते. त्यांच्या राजकीय सामाजिक भूमिकांचा ऊहापोह हा केवळ आगरकर-टिळक वादापुरताच चित्रपटात दिसून येतो. त्यापलीकडे जाऊन टिळकांच्या राजकीय- सामाजिक भूमिकेवर फारसा प्रकाश पडला नाही. चित्रपट म्हणून मर्यादा असतात हे जरी मान्य केलं तरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वावर चित्रपट करताना हे ध्यानात घ्यावे लागेल. त्यातच चित्रपटाचे शीर्षक ‘लोकमान्य एक युगपुरुष’ असे असल्यावर तर युगावर प्रभाव टाकणारा नेता दाखविणे अपेक्षित होते.
हे सारं सांगायचं कारण आज मराठी चित्रपट केवळ मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्यातच ‘लोकमान्य या विषयाची दखल अनेक पातळ्यांवर घेतली जाऊ शकते. सबटायटल्समुळे तो अन्य भाषिकांपर्यंत पोहोचतो आहे. ज्यांनी टिळक वाचले आहेत त्यांना चित्रपटातील हा फोलपणा जाणवेल, पण ज्यांनी वाचले नाहीत त्यांच्यासाठी लोकमान्य केवळ पुण्यापुरतेच मर्यादित वाटतील. टिळकांचे लोकमान्यत्व ठसविण्यास हा चित्रपट कमी पडतो, किंबहुना आजही आपण बायोपिक करताना अशा गोंधळात सापडतो हेच पुन्हा एकदा दिसून येते.
असो, मात्र चित्रपटाच्या निमित्ताने सोशल मीडियाद्वारे काही जाणकारांनी रंगवलेले चर्चेचे फड वाचनीय होते. त्यातील अनेकांनी चित्रपट पाहिलादेखील नव्हता, पण त्यानिमित्ताने लोकमान्यांवर एका वेगळ्या माध्यमातून चर्चा झाली. सोशल मीडियातील तरुणाई मात्र केवळ विभूतिपूजनाच्या भूमिकेत दिसली.
चित्रपटाच्या सादरीकरणात वेगळेपणा आणला हे त्यातल्या त्यात नावीन्य. टिळकांचे चरित्र उलगडून दाखविताना सद्य:स्थितीचा आधार घेत, आजच्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न चित्रपटातून होतो. अर्थात हिंदूी चित्रपटातून हा फॉम्र्युला वापरून झाला आहेच. मराठीत तो प्रथमच आला इतकेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2015 1:12 am

Web Title: marathi movie lokmanya 2
Next Stories
1 नाचू आनंदे : नृत्योपचार म्हणजे नेमकं काय?
2 स्मार्ट ‘ती’ : आंतरपाट : दोन पिढय़ांमधला…
3 फॅशन पॅशन : शिअर ड्रेसिंग
Just Now!
X