मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित ‘समुद्र’ हे भद्रकाली प्रॉडक्शनचे पन्नासावे नाटक रंगभूमीवर आले आहे. त्यानिमित्त ‘भद्रकाली’चे प्रसाद कांबळी यांच्याशी गप्पा-

मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर ‘समुद्र’ हे पन्नासावे नाटय़पुष्प तुम्ही सादर करत आहात. भद्रकाली प्रॉडक्शनचे अर्धशतक पूर्ण होत असताना मनात काय भावना आहेत ?
नक्कीच आनंद आहे. १९८२ साली ‘चाकरमानी’ हे आमचे पहिले नाटक आले. त्यानंतर बाबांनी शेवटचे नाटक केले ते ‘भैय्या हातपाय पसरी.’ बाबांनी २००७ पर्यंत एकूण ३८ नाटके केली. त्यांच्यानंतर आता हे माझे बारावे नाटक आहे. ‘वस्त्रहरण’ हे आमचे गाजलेले नाटक. हे ‘भद्रकाली’चे चौथे किंवा पाचवे नाटक असेल. यापूर्वी हे नाटक ओम ‘नाटय़गंधा’ ही संस्था करत होती. या नाटकातून बाबांना काढण्यात आल्यावर ‘भद्रकाली’ची स्थापना झाली. बाबांनी ३८ पैकी २५ नाटकांमध्ये कामे केली. उर्वरित १३ नाटकांमध्ये हुंडाबळी या विषयावर रत्नाकर मतकरी यांचे ‘अग्निदिव्य’, भक्ती बर्वे यांचे ‘रातराणी’ या नाटकांचा समावेश होता. भद्रकाली’च्या परंपरेतील ‘समुद्र’ हे पन्नासावे नाटय़पुष्प आहे.
‘भद्रकाली’ म्हणजे मालवणी नाटकंच, अशी एक ओळख होती. पण तुम्ही आणलेल्या नाटकांमध्ये वैविध्य पाहायला मिळते, याबद्दल काय सांगाल?
मच्छिंद्र कांबळी या नावाचे वलयच एवढे मोठे होते की, त्यांची ही जी १३ नाटके होती, ती झाकोळली गेली. ‘अग्निदिव्य’, ‘रातराणी’ नाटकाला बरीच बक्षिसे मिळाली. ‘रातराणी’ हे नाटक गुजराती रंगभूमीवरही सादर झाले. ‘अफलातून’ हे नाटक विनय आपटे यांनी दिग्दर्शन केले असल्याने ते नाटक त्यांचेच असल्याचे लोकांना वाटले. ‘सांगोवांगी’ या एकांकिकेवर आधारित भरत जाधवचे ‘आता होऊन जाऊ दे’, रंगभूमीवर पुनरागमन केलेले अशोक सराफ यांचे ‘अनधिकृत’ अशी नाटकं आम्ही केली. पण बाबांविषयी जनमानसात हे मालवणी नाटक करणारे, असे चित्र निर्माण झाले होते. जसे मोहन वाघ म्हणाले की, त्यांनी त्यांचे सिंहासन स्वत: बनवले होते आणि जाताना ते घेऊन गेले, असे आपण या बाबतीत म्हणू शकतो.
नाटय़निर्मितीकडे तुम्ही कसे वळलात?
मी इंजिनीअरिंग केले होते, माझा व्यवसायही सुरु होता. बाबा गेल्यावर माझे पहिले लक्ष्य होते की, ‘भैय्या’चे १०१ प्रयोग झाले होते आणि पुढचे १०१ प्रयोग मला करायचे होते. पण त्यानंतर नाटय़निर्माता बनण्याचा विचार माझ्या मनातही नव्हता. पण बाबा गेल्यावर प्रसारमाध्यमांबरोबर आमच्या क्षेत्रातही चर्चा सुरू झाली की, आता ‘भद्रकाली’चे काय होणार? ही चर्चा झाली नसती तर मी आता रंगभूमीवर आलो नसतो. मला lp48व्यक्तीश: रंगभूमीत जास्त रस नव्हता. पण बाबांनंतर सुरू झालेल्या चर्चेमुळे मी दुखावलो गेलो आणि ‘भद्रकाली’मधून ‘म्हातारे जमीन पर..’ हे पहिले नाटक केले. पण काही प्रयोगांनंतर ते बंद केले. ‘वस्त्रहरण’चे पाच हजार प्रयोग करायचे लक्ष्य होते, ते पूर्ण केले. ‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग कुणीही विसरू शकणार नाही, असा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला. सर्वच मोठय़ा कलाकारांनी यामध्ये भाग घेतला आणि या नाटकाचे ५०० रुपयांचे तिकीट काळाबाजारात तब्बल १२ हजार रुपयांना विकले गेले. १२ मार्च २०११ ला ‘वस्त्रहरण’ बंद केले. तेव्हा मी काही करीन, असे वाटले नव्हते. पण त्यानंतर विश्रांती घ्यायचे ठरवले. त्यानंतर भावनिक न होता व्यावसायिक होण्याचे मी ठरवले. त्यावेळी ‘वडिलांनी जे केले तेच प्रसाद करतो’, असे म्हटले जात होते. एकेदिवशी कुमार सोहनींचा दूरध्वनी आला, एक चांगली स्क्रिप्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मला त्यांचे नाटक फार आवडले. गिरीश ओक म्हणाले की, मी हे नाटक करायला तयार आहे, चिन्मय मांडलेकरही तयार झाला. ३१ जुलै २०११ ला ‘सुखांशी भांडतो आम्ही’ हे नाटक आले. हे माझ्यासाठी टर्निग पॉइंट ठरले. या ४० ते ५० नाटकांमुळे लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर ‘भारत भाग्यविधाता’ आले. त्यावेळी मला काही जण म्हणाले की, तुझ्या नाटकांमध्ये कोण काम करणार? त्यामधले काही जण माझ्याबरोबर आताही काम करतात. पण, २०११ पर्यंत जास्तीत जास्त कलाकारांनी आमच्याकडे काम केलंय. प्रत्येकाला आता ‘भद्रकाली’मध्ये काम करण्याची इच्छा आहे. माझ्यावर झालेली किंवा होत असलेली टीका मला सुदृढ स्पर्धा वाटते. टीका होण्याच्या काही गोष्टी माझ्यासाठी टर्निग पॉइंट ठरल्या. कारण कोकणी माणसासारखाच माझा स्वभाव आहे की, कोणी डिवचलं की आम्ही हजारपटीने पेटून उठतो. ‘समुद्र’ एका महिन्यात आलेले नाटक आहे. ‘पांडगो इलो रे बा इलो’ आलं, चिन्मय मांडलेकरने गेल्या चार वर्षांत पाच नाटके केली. ‘नांदी’ हे एक चांगलं नाटक माझ्या हातून घडलं. त्यानंतर ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ आणि ‘जस्ट हलकं फुलकं’ ही नाटकं रंगभूमीवर आली. त्यानंतर ‘बीपी’ आणि आता ‘समुद्र.’ वेगळं असं काही नाही, पण लोकांना चांगलं द्यायचं हे ठरवलंय.
आतापर्यंतचा तुमचा रंगभूमीवरचा प्रवास कसा वाटतो?
बाबांकडे पाहून काही गोष्टी शिकता आल्या. त्यांनी फार हलाखीत दिवस काढले. जेव्हा तुम्ही एका व्यवसायामध्ये येता तेव्हा नफ्याबरोबर तोटाही होऊ शकतो, हे डोक्यात पक्के करावे लागते. सर्जकता आणि नावीन्यपूर्ण गोष्टी बनवण्यामध्ये जास्त जोखीम असते. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक नाटक त्याचं भविष्य घेऊन येते, असं मला वाटतं. प्रत्येक आईसाठी आपला मुलगा खासच असतो, तसंच माझ्यासाठी या नाटकांचं आहे. प्रत्येक कलाकृती चांगलाच करण्याचा प्रयत्न असतो, पण शेवटी रसिक प्रेक्षकांवर सारे काही अवलंबून असते.
नाटक हे तुमच्यासाठी काय आहे? व्यवसाय, वेड की रसिकांसाठीचं देणं?
मी या क्षेत्रात फक्त बाबांमुळे आलो. त्यांनी जे नाव कमावलं त्याला धक्का पोहोचू नये, हाच माझा हेतू होता. माझ्यासाठी खरं तर हा जुगार होता, असं म्हणू शकतो. नाटय़क्षेत्रासाठी योग्य स्वभाव नसल्याचं मला घरच्यांनी सांगितलं होतं. या क्षेत्रात सरळमार्गी असून चालत नाही, असं म्हणतात, पण मी तसाच आहे. मला जर कोणतीही कलाकृती आवडली तरच मी ती लोकांसमोर सादर करतो.
एकाच वेळेला बरीच नाटकं चालू असताना तारांबळ उडते का?
सध्या पाच नाटकं सुरू आहेत. कलाकारांपासून ते बॅकस्टेज आर्टिस्टपर्यंत सर्वच जण मला चांगले मिळाले आहेत. आमची टीम चांगली जमून आली आहे, त्यांच्याशिवाय हे होऊच शकत नाही. यात महत्त्वाचं असतं ते व्यवस्थापन. इंजिनीअरिंग करताना मी हे शिकलो होतो. खरं तर मला हा व्यवसाय आवडायचाच नाही, पण शेवटी नियती असतेच.
एखादं चांगलं नाटक अयशस्वी झाल्यावर काय वाटतं?
मला असं कधीच वाटलं नाही. मी फक्त नफा-तोटा पाहून नाटक ठरवतच नाही. त्यामुळे मला वाईट वाटत नाही. कुणाला नाही आवडलं तर मला आवडलेलं असल्यामुळे मी नक्कीच ते पाहीन. जेव्हा जास्त अपयश येतं, तेव्हा तुम्ही यश मिळवण्यासाठी जास्त धडपड करता. या क्षेत्रात काही लॉबी आहेत, पण त्याचा परिणाम नाटकावर होऊ नये, असंच वाटतं.
बाबांकडून कोणते गुण घेतले आणि तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी केल्या?
बाबांकडूनच मी बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यांना कळायचं की किती लोकांनी तिकीट काढलं आहे आणि किती जण सन्मानिका घेऊन बसले आहेत. कारण त्यांनी डोअरकीपर म्हणूनही काम केलं होतं. माझं एवढं काटेकोर लक्ष नसते. त्यांची व्यवसाय करण्याची पद्धत वेगळी होती. तेदेखील चिडायचे आणि मी पण चिडतो, पण दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. ते कधीही लवकर कोणाशी शत्रुत्व घेत नव्हते. पण मी स्पष्टवक्ता आणि एक घाव, दोन तुकडे करणारा आहे. बाबांची एक इच्छा होती की, एका वेळेला माझी पाच नाटकं चालावीत. त्यांची ती इच्छा पूर्ण होत आहे, मी फक्त एक माध्यम आहे.
पुढे इंजिनीअरिंग की नाटक व्यवसाय?
मला इथे बरं वाटतं. फक्त प्रेमविवाह होण्यासाठी मी इंजिनीअरिंगला गेलो असं वाटतं. नाटक व्यवसाय फक्त पैशांसाठी करत नाही. बाबांचा वारसा पुढे चालवण्यासाठी मी या व्यवसायात आलो आहे. त्यांनी जे काही कमावलं आहे त्याला माझ्याकडून गालबोट लावणारी गोष्ट घडणार नाही, याची मी फक्त दखल घेतो. ज्या दिवशी माझ्याकडून असे काही होईल, त्या दिवशी मी हा व्यवसाय बंद करून टाकीन.
एकाचवेळी पाच नाटकं करताना उडालेली तारांबळ, बुकिंग्जची गडबड, या व्यवसायातले गट-तट, या साऱ्यांमधून हा व्यवसाय कसा निभावता?
कुटुंबांचा पाठिंबा आहेच, त्याशिवाय काहीच शक्य नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये मी आठ नाटकं केली. मला कोणीतरी डिवचलं की, पुन्हा तडफेने पेटून उठतो. हा कालखंड मला सर्वात आवडतो. कारण यावेळी चांगला विचार घडत असतो. मला अजून बरंच काही चांगले द्यायचे आहे. मला वाटलंही नव्हतं की एवढय़ा झपाटय़ाने ही नाटकं येतील. मी काही ठरवत नाही. कोणतीही कलाकृती ही जुळून यावी लागते.
आता पुढचे लक्ष्य काय?
कासवगतीने ‘स्लो आणि स्टेडी’ जायचं. आता अर्धशतक पूर्ण केलंय, आता शतक कधी होतंय हे पाहायचं. शंभरी कधी गाठेन ते मला माहिती नाही. पन्नाशी हेईल, हेदेखील मला वाटलं नव्हतं. जेवढी चांगली नाटकं देता येतील, तेवढी द्यायचा प्रयत्न करायचा.
प्रसाद लाड