पावसाळा विशेषांक
शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशात पाऊस हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याला केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्याच पातळ्यांवर महत्त्वाचं स्थान आहे. अशा या पावसाचा देशभर फिरून सर्व अंगांनी अभ्यास करायचा असं ठरवून तरुणांचा एक गट ‘प्रोजेक्ट मेघदूत’ नावाचा एक प्रकल्प हातात घेऊन बाहेर पडला. गेली तीन वर्षे त्यांनी पावसाच्या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पाऊस समजून घेतला. अर्थात आपल्या देशाची एकूण व्याप्ती पाहता त्यांचा हा पावसाचा अभ्यास एवढय़ात संपलेला नाही. पण गेल्या तीन वर्षांच्या भटकंतीत त्यांच्या शिदोरीत बरंच काही साठलं आहे. समाजाकडे बघण्याची एक नवी दृष्टीच त्यांना मिळाली आहे.
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या या सगळ्या प्रक्रियेबद्दल या प्रकल्पाचा प्रमुख मयूरेश प्रभुणे याच्याशी बातचीत-
तुझी आणि पावसाची ही मैत्री कधीपासूनची?
अगदी लहानपणीपासून. कोणत्याही मैत्रीमध्ये असतात तसे या मैत्रीमध्येही बरेच चढ-उतार आहेत. नंतर थोडं मोठं झाल्यावर पावसात भटकंती करायला सुरु वात झाली होती. कधी मित्रांबरोबर, तर कधी एकटाच. त्यामुळे लहानपणीचा पाऊस आठवतो तो असा. त्यानंतर शाळा संपवून कॉलेजमध्ये गेल्यावर खगोलशास्त्राचं वेड लागलं होतं. ‘खगोल विश्व’ नावाची संस्था आम्ही चिंचवडला सुरू केली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास करायचो. खगोलशास्त्र शिकताना हे पावसाळ्याचे चार महिने असे असतात की जेव्हा आकाश निरीक्षण करायला आकाश मोकळं मिळणं मुश्कील होऊन जातं, तेव्हा पहिल्यांदा पावसाबद्दल, या मान्सूनच्या चार महिन्यांचा विचार सुरू झाला. मग जून ते सप्टेंबर करायचं काय म्हणून आम्ही काही इनडोअर कार्यक्रम करायचो. या ‘खगोल विश्व’मुळे तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे पावसाबद्दलचा, पाऊस एन्जॉय करणं सोडून विचार सुरू झाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा शास्त्रोक्त पद्धतीने विचार करायची सवय लागली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असाच विचार करणारा, माझ्याच वयाचा एक मस्त गटही मिळाला. आताच्या ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची मुळंही या ‘खगोल विश्व’सारख्या उपक्रमांमधून झाली असं म्हणायला हरकत नाही.
तू तेव्हा पत्रकार म्हणूनही काम करत होतास ना?
हो, म्हणजे पदवीचं शिक्षण संपल्यावर. मी विज्ञान पत्रकारिता करत होतो, आणि अजूनही करतो. २००७ च्या सुरुवातीला मी हवामानही कव्हर करू लागलो. मी माझ्या कामाच्या निमित्ताने पुण्यातल्या बऱ्याच विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांशी संबंधित होतो. २००७ मध्ये यात पुणे वेधशाळेचीही (आय.एम.डी.) भर पडली.
म्हणजे पत्रकारितेतून तू मॉन्सूनकडे अधिक लक्षपूर्वकपणे बघायला लागलास?
हो, अनेक वेळा बातम्या देताना अनेक विषय कानावर पडायचे. २००७ सालच्या एप्रिलमध्ये जेव्हा वेधशाळेने आपला मॉन्सूनचा अंदाज नोंदवला तेव्हा त्यात त्यांनी सहा  वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या आधारे तो अंदाज वर्तवला होता. त्यातून १६ वेगवेगळ्या मुद्दय़ांवर आधारलेलं नारळीकरांचं मॉडेल माहीत होतं. त्या ज्ञानात भर पडली. मग कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर नेमकं काय होतं. ऑफशोर ट्रफ आहे, सायक्लोन्स आहेत, अशा काय काय संकल्पना त्या वेळेस त्या कळत गेल्या. त्या बातम्या आम्ही त्यातल्या त्यात सोप्या मराठीत देण्याचा प्रयत्न करायचो. नंतर मॉन्सून झाल्यावर अंदाज किती बरोबर आला, किती चुकला, त्याची कारणं काय, अशा बातम्याही आम्ही करत होतो. म्हणून हे पहिलं वर्ष मॉन्सूनबद्दल वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यात निघून गेलं. तेव्हाच आय.आय.टी.एम.  (Indian Institute of Tropical Meteorology) मधल्या काही हवामान शास्त्रज्ञांशी ओळख झाली. त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळालं. त्यानंतर २००८ मध्ये मग या सगळ्या संकल्पना सर्वसामान्यांना कळतील अशा भाषेत मांडायला सुरुवात केली. तेव्हा मेधा खोले या पुणे ऑब्जर्वेटरीच्या संचालकपदी होत्या. त्यांनी एक एक गोष्ट समजून सांगायला सुरुवात केली. त्यांनी मला समजावताना काही नकाशे मागवले. त्यात मॉन्सून तयार कसा होतो, हाय प्रेशर, लो प्रेशर, मॉन्सून पुढे पुढे कसा सरकतो, अशी सगळी सविस्तर माहिती दिली. ही माहिती मी माझ्या बातम्यांमधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करत होतोच, पण त्याचबरोबर माझ्या ‘खगोल विश्व’च्या सहकाऱ्यांसमोर मी ही माहिती वेळोवेळी मांडत होतो. त्याचबरोबरच मॉन्सून म्हणजे पाऊस ही आपली समजूत चुकीची कशी आहे, हेही आम्ही मांडत होतो.

मग तुला हे सगळं प्रत्यक्ष जाऊन बघावं असं कसं वाटलं?
मी हवामानाच्या बातम्या देत होतो, पण ऑफशोअर ट्रफ आहे, लो प्रेशर एरिया आहे, पण वातावरणात नक्की काय घडतं हे समजून घेण्याची इच्छा होती. महत्त्वाचं म्हणजे, या वातावरणातल्या बदलांमुळे जर कोकणासारख्या भागांत पूर येत असेल तर याचे वातावरणावर आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष मानवी आयुष्यात काय परिणाम होतात हे बघणं अत्यावश्यक आहे, असं जाणवू लागलं.
खरंय, पाऊस म्हणजे फक्त वातावरणातला बदल नाहीये.
होय, पाऊस म्हणजे फक्त इतका मिलिमीटर, तेव्हाच प्रेशर काय, वाऱ्याचा जोर काय, फार फार तर नद्यांना पूर आले आहेत आणि पुढच्या दोन दिवसांचा पावसाचा अंदाज. बातम्या करताना पाऊस यापलीकडे जात नव्हता. पुढे-मागे ज्या घटना घडलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे तिथले स्थानिक लोक त्या घटनेकडे काय म्हणून पाहत आहेत हे समजून घेणं आणि त्याची नोंद होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे मनामध्ये होतंच, पण हे माझ्या पत्रकारितेत यावं असंही वाटायला लागलं. यामध्ये पूर नेमका निर्माण कसा होतो, तेव्हा पावसाबरोबर आणखी कोणती लक्षणं दिसत असतात, तेव्हा माणसं काय, कशी वागतात, प्राणी-पक्ष्यांचं काय असे प्रश्न पडायला लागले. पूर ओसरल्यावर तिथे जाणं वेगळं, मग लोकांच्या काही स्टोरीज करता येतात; पण ते घडायच्या आधी आपण तिथे गेलो तर आपल्याला ती घटना संपूर्णपणे अनुभवता येईल, ते सगळं चक्र समजेल. मग अशा घटनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरची उत्तरं आपल्याला आधीच शोधता येतील असं वाटायला लागले. पावसाला फक्त पाऊस म्हणून न बघता एक घटना म्हणून बघणं आणि त्याचा अभ्यास करणं हे मला महत्त्वाचं वाटायला लागलं.
आपल्याकडच्या पावसाचा असा अभ्यास यापूर्वी कधी झालाय?
अगदी अशा प्रकारचा नाही, पण काही प्रमाणात झाला आहे. मी माझी ही कल्पना माझ्या ऑफिसमध्ये सांगायला सुरुवात केली होती, तेव्हा काही लोकांनी अलेक्झांडर फ्रेटरच्या पुस्तकाची आठवण करून दिली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव ऐकून होतो, पण ते अजून वाचलं नव्हतं. मग त्यांचं ‘चेसिंग द मॉन्सून’ नावाचं पुस्तक मागवलं आणि एका रात्रीत वाचून काढलं. फ्रेटर हे एक ब्रिटिश पर्यटक आणि लेखक, त्यांनी भारतात मॉन्सूनच्या काळात फिरून पाऊस आणि त्यानिमिताने त्यांना दिसणाऱ्या दृश्यांची टिपणे काढली होती. १९८७ मध्ये फ्रेटर यांनी मॉन्सूनच्या आधीपासूनच भारतात तळ ठोकला होता. तेव्हा उत्तर-मध्य भारतात कडक उन्हाळ्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती त्यांनी अनुभवली होती. त्यानंतर मॉन्सूनच्या दक्षिण भारतातल्या आगमनापासून त्याचा उत्तरेकडे पाठलाग केला. या प्रवासामध्ये त्यांनी विविध लोकांशी बोलून, पावसाचा लोकांवर कसा परिणाम होतो याचं उत्तम वर्णन त्यांच्या पुस्तकात केलं आहे.
माझ्याही मनात असंच काहीसं होतं. पाऊस असताना प्रत्यक्ष बाहेर पडून फिरावं आणि प्रत्यक्ष पाऊस अनुभवावा, पण हे करणं लगेच जमलं नाही. मग २०१० मध्ये पहिल्यांदा आमच्या ‘खगोल विश्व’च्या कॅम्पसमध्ये मॉन्सून हा विषय अभ्यासायला सुरुवात केली. मुलांना घेऊन सिंहगडावर गेलो. तिथे पहिले मॉन्सूनचे वारे कसे येतात हे पाहिलं, पण तेव्हा हे नक्की ठरवलं होतं, की पुढच्या वर्षी आपण मॉन्सूनचा चक्क पाठलाग करायचा.
यापूर्वी मॉन्सूनचा आमच्या डोक्यात होता तसा व्यापक स्वरूपात अभ्यास झालेला आमच्या तरी वाचनात आला नव्हता. आम्ही खूप शोधनिबंध मिळवले. त्यात काम केलेलं असतं, पण हे सगळे अभ्यास खूप तुकडय़ातुकडय़ांमध्ये असतात. म्हणजे मॉन्सून होऊन गेल्यावर त्याचा अन्नधान्यावर कसा परिणाम होतो, याचा गेल्या तीन वर्षांचा आढावा असतो. दुष्काळ किंवा पुरामुळे किती नुकसान झालं याची आकडेवारी असते. पण मॉन्सूनची ही एकत्रित प्रक्रिया आहे, असा कोणी त्याचा अभ्यास केलेला आमच्या तरी वाचनात आला नव्हता.
मॉन्सूनचा असा पाठलाग करायची तयारी कशी केली?
याआधी आमची निरीक्षणं सुरूच होती. ती निरीक्षणं खगोलशास्त्रीय होती. मग आम्ही आणखी खोलात या सगळ्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आम्ही म्हणजे मी आणि माझ्या ‘खगोल विश्व’च्या आणि काही इतर मित्रांनी. तेव्हाच मी मॉन्सूनबद्दल, त्याचा पाठलाग का करावासा वाटतो आहे याबद्दल ब्लॉगही लिहायला सुरुवात केली होती. २०११ मध्ये मी तेव्हा रु टीन पत्रकारिता सोडली होती. विज्ञानप्रसार करण्यासाठी स्वत:चं मासिक सुरू केलं होतं. त्यामुळे आता माझा वेळ माझ्या हातात होता. मला कुठून सुट्टी काढायला लागणार नव्हती. म्हणून आणखी वेळ मी माझ्या स्वत:च्या अभ्यासाला देऊ शकत होतो. हा सगळा अभ्यास करताना मी माझी ही कल्पना माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडली.
काय होती तुझी ही पाठलागाची कल्पना?
मला केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत मॉन्सूनबरोबर फिरायचं होतं. मॉन्सून येतो म्हणजे नेमकं काय होतं, ही घटना समजून घ्यायची होती. एक उन्हाळ्यातला असा दिवस असतो की, उन्हाळा त्याच्या चरणसीमेवर असतो आणि त्या दिवशी एकाएकी चित्र पालटू लागतं. या बदलाची सीमा काय आहे, ते आम्हाला समजून घ्यायचं होतं. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, त्यामुळे आमच्याकडे तसे काही ठोकताळे नव्हते, की आम्ही काय केलं म्हणजे बरोबर किंवा काय चूक! आत्तापर्यंत पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास होतच होता, पण आमचा केवळ तसा अभ्यास असणार नसून त्या आकडेवारीचा परिणाम प्रत्यक्ष बघणं असा होता, कारण त्याचे परिणाम कसे आहेत ते समजून घेतलं तर तो कसा आहे, हे आपल्याला कळू शकतं. एखाद्या वर्षीचा मॉन्सून चांगला असणं किंवा नसणं म्हणजे काय? उदाहरणार्थ गेल्या वर्षीचा महाराष्ट्रातला मॉन्सून चांगला नव्हता, कारण पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचं नुकसान झालं होतं, लोकांचे व्यवसाय बुडाले होते. लोक आपलं गाव सोडून स्थलांतर करत होते. म्हणून, वाईट मॉन्सून म्हणजे शेतकऱ्यांना किती भरपाई दिली याची आकडेवारी नसून त्याचा लोकांवर काय परिणाम झाला आहे; मुलांवर, त्यांच्या शिक्षणावर काय परिणाम झाला आहे हे समजून घेणं म्हणजे मॉन्सून समजून घेणं. आम्हाला असाच अख्ख्या भारताचा मॉन्सून समजून घ्यायचा होता. याचं एक शास्त्रीय चित्र समजून घ्यायचं होतं आणि ते लोकांसमोर मांडायचं होतं.
मान्सूनच्या पाठलागाचं तुझं हे तिसरं वर्ष आहे, तर हे कार्यक्रम तुम्ही कशाच्या आधारे ठरवत होतात?
सुदैवाने अशी एक गोष्ट घडत होती की, प्रत्येक वर्षी एक काही तरी संदर्भ मिळत होता. जसं पहिल्या वर्षीचा आमचा धागा होता तो म्हणजे अलेक्झांडर फ्रेटरचं ‘चेसिंग द मॉन्सून’ हे पुस्तक. त्यांनी केरळमध्ये बराच काळ घालवला होता. ते मुंबईमध्ये आले होते. त्यांनी मॉन्सूनपूर्व परिस्थतीही अनुभवली होती. काहीशी तशीच परिस्थिती आम्ही अनुभवत होतो. त्या वेळेस फ्रेटरमुळे एक दिशा निश्चित मिळाली. त्यांना जसंच्या तसं फॉलो आम्ही केलं नाही. त्यांच्या फक्त ह्य़ूमन स्टोरीज होत्या. आमच्या फिरण्याला, निरीक्षणांना शास्त्रीय आधारही आम्ही देत होतो. त्यानंतर आम्हाला ‘मेघदूत’ हे कालिदासाचं काव्य एक आधार म्हणून होतं आणि या तिसऱ्या वर्षी आम्ही पश्चिमोत्तर भारतात पावसाचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आम्ही सरस्वती नदीचा अभ्यास करतो आहोत. त्याचबरोबर या नदीच्या प्रवाहादरम्यान येणाऱ्या काही पुरातन संस्कृतींचा, त्यांचा आणि पावसाच्या संबंधाचा अभ्यास आम्ही करतो आहोत.
पहिल्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये तुमचा प्रवास कसा झाला?
पहिल्या वर्षीच्या मॉन्सूनचा आम्ही केरळमधून मागोवा घ्यायचं ठरवलं होतं. पहिल्यांदा हवामानाचे अंदाज आले होते, त्यामुळे साधारण कधी मॉन्सून दाखल होईल अशी पुसट कल्पना होती. केरळमध्ये मॉन्सूनचं आगमन होताना आम्ही तिथे असणार होतो. जिथे पहिले वारे येतील तिथे आम्ही असणार होतो आणि ते वारे जसे जसे पुढे सरकत जातील, तो लो प्रेशरचा बेल्ट जसा पुढे सरकत जाईल त्याला धरून उत्तरेकडे पावसाचं प्रमाण वाढत वाढत जाईल. त्या वाढत्या प्रमाणाबरोबरच त्याला फॉलो करून आम्ही वर येऊ आणि त्या क्षणाला होणारे जे बदल आहेत, निसर्गातले आणि समाजातले, ते बदल टिपणं असा आमचा कार्यक्रम होता. हे बदल टिपले, खरं तर हे बदल खूपच पटकन होणारे आहेत; पण हे बदल टिपून आम्हाला मॉन्सून अधिक चांगला समजून घेता येणार होता, कारण एकदा स्थिरस्थावर झालेला मॉन्सून आपल्याला समाजातले फार बदल दाखवत नाही, पण या पहिल्या क्षणाचे जे बदल आहेत ते शास्त्रीयदृष्टय़ा महत्त्वाचे ठरतील. आम्हाला या पहिल्या प्रवासात या प्रदेशाची जैवविविधता समजून घ्यायची होती. त्याचबरोबर वेधशाळेकडून आम्ही एक छोटी ऑबझव्‍‌र्हेटरीही बरोबर घेतली होती. त्यामध्ये आम्हाला हवामानाची निरीक्षणं घ्यायची होती आणि त्याचबरोबर समाजाच्या कोणत्या घटकावर पावसाचा कसा परिणाम होतो ते आम्हाला पाहायचं होतं.
या प्रवासात तुम्ही काय काय केलं?
पहिल्या वर्षी आम्ही सात जण या प्रवासाला निघालो होतो. त्यात आम्ही हवामानाचा अभ्यास करणारच होतो. प्रत्येक ठिकाणाची हवामानशास्त्रीय निरीक्षणे आम्ही घेत होतो. त्याचबरोबर या सगळ्या प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास आम्ही करत होतो. आपण अनेक वेळा म्हणतो की झाडं भरपूर असल्यावर पाऊस पडतो, पण ते तसं नसतं. पाऊस आहे म्हणून झाडंही चांगली असतात. याचबरोबर आम्ही या सगळ्या प्रदेशाच्या जैवविविधतेचाही अभ्यास करणार होतो. यामधून आम्हाला फक्त या सगळ्या प्रदेशाची माहिती होणार नव्हती. तर, पाऊस येण्याआधी इथल्या वनस्पतीवर त्याची काय लक्षणे दिसायला लागतात, कोणते कीटक दिसतात, याचा अंदाजही आम्ही बांधत होतो. यामध्ये प्राणी-पक्ष्यांच्या हालचालींमधले बदल असतील, पालवी असेल. तर ते आधी होणारे बदल आणि मग पहिला पाऊस पडल्यावर होणारे बदल आम्हाला अनुभवायचे होते. म्हणजे अगदी आपण बेडकांचं उदाहरण घेऊ, कुठे असतात हे वर्षभर, कुठून येतात हे एकदम पाऊस सुरू होण्याआधी? कसं कळतं त्यांना? हे सगळं अभ्यासायचं होतं. अजून एक महत्त्वाचा भाग होता ते समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी जाऊन बोलण्याचा. त्यांचे अनुभव ऐकण्याचा, नोंदवून घेण्याचा. हेच सर्व आम्ही तीनही वर्षे करत आलो आहोत.
पावसाचा अभ्यास करताना आम्ही वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधल्या लोकांशी बोलत होतो. त्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली ती म्हणजे, आर्थिकदृष्टय़ा सर्वात दुर्बल जो घटक आहे, त्यावर पावसाचा थेट परिणाम अधिक होत असतो. कारण तो थेट त्या पावसावर अवलंबून असतो. आर्थिकदृष्टय़ा सबल गट, त्याचा व्यवसाय पाण्यावर किंवा पावसावर किंवा कोणत्याच प्रकारे निसर्गावर अवलंबून नसतो. त्याच्याकडे पाणी साठवायचे विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे लहरी पावसामुळे आर्थिक घडी बिघडते ती समाजाच्या सर्वात दुर्बल घटकाची.
तुमच्या प्रकल्पाला ‘मेघदूत’ हे नाव कसं सुचलं?
आम्ही आमच्या प्रवासाला ‘चेसिंग द मॉन्सून’ असं जरी म्हणत असलो तरी ‘मेघदूत’ या शब्दाला एक वेगळा अर्थ होता. कालिदासाचं जे काव्य आहे त्यामध्ये कल्पना अशी आहे की तो ढग एका यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रेयसीकडे चालला आहे. तो जाताना एका ठराविक मार्गाला धरून प्रवास करतो आहे. तो मार्ग मॉन्सूनशी मिळताजुळता आहे असं काही लोकांनी सांगितलं होतं. आम्ही आमच्या दुसऱ्या वर्षीच्या प्रवासात ते तपासणार होतो. आम्ही आमचा प्रवास एक दूत म्हणूनच फिरणार होतो. काही माहिती एकत्रित करून आणि मग ती कायमस्वरूपी सगळ्यांसाठी जतन करून ठेवणं हे आमचं काम होतं त्यामुळे ‘मेघदूत’ हे नाव खूप योग्य वाटलं  
 या पहिल्या वर्षी तुम्ही काय पाहिलं?
पहिल्या वर्षी आम्ही कोवलमपासून सुरुवात केली. कोवलमच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. तिथे आम्हाला काही मच्छीमार भेटले. पाऊस सुरू झाला की त्या क्षणाला यांचा रोजगार बंद झालेला असतो. ते हातांनी वल्हवायच्या बोटी नेत होते. उसळलेल्या समुद्रामध्ये त्यांना त्यांच्या या बोटी नेता येत नाहीत. त्यावेळी फक्त मोटर असलेल्या बोटीच समुद्रात जाऊ शकतात. याचबरोबर पावसाळा हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ते दोन महिने तसंही मासेमारी करू शकत नाहीत. त्यामुळे पावसाचं आगमन त्यांच्या एकूणच रोजगारावर कुऱ्हाड आणणारं होतं. तिथून आम्ही साधारणत: ३०० किमी वर असणाऱ्या आलेप्पीमध्ये पोहोचतो. पाऊस तसाच कोसळत असतो. त्या समुद्रकिनारी एक छत्रीचं दुकान असतं आणि तो माणूस याच चार महिन्यांच्या काळामध्ये २० लाख छत्र्या विकतो आणि कोटय़वधी रु पये कमावतो. तर, एक पाऊस एकाच प्रदेशामध्ये एका माणसाचा रोजगार बुडवतो आहे तोच पाऊस दुसऱ्या एका माणसाला कोटय़धीश करत असतो. ही अशी विविधता आम्हाला प्रत्येक ठिकाणीच दिसत होती.
थोडं आणखी पुढे आल्यावर अगुम्बेमध्ये आम्हाला खूपच वेगळं चित्र दिसलं. अगुम्बे हे खरंतर पावसाचं गावच म्हणायला हवं. कारण चेरापुंजीनंतरचा सर्वाधिक पाऊस इथे पडतो. इथे वार्षिक ७५०० मिमी पाऊस पडतो, अशी नोंद आहे. इथे डोंगराळ भाग आहे, त्यामुळे शेतीही होत नाही. इथे पर्यटनाचाही विकास झालेला नाही. इथल्या लोकांचं सरासरी वय ६० च्या पुढे आहे. इथे गावात करायला काही नाही. उद्योगधंदे नाही म्हणून इथला तरु ण बंगलोरला शिक्षणाला जातो आणि तिथेच स्थायिक होतो. आपण महाराष्ट्रात, पाऊस नाही म्हणून झालेलं स्थलांतर अनुभवत असतो, इथे आम्ही पाऊस अधिक आहे म्हणून होत असलेलं स्थलांतर पाहात होतो. पावसाच्या विविधतेचं, त्याच्या विविधतेच्या परिणामांचं हे दुसरं उदाहरण.
आम्ही तेव्हा ज्या भागात फिरत होतो तो भाग, म्हणजे केरळ राज्य हे संपूर्ण पावसाचं साम्राज्य असलेलं राज्य आहे. आलेप्पीच्या बॅक वॉटर्समध्ये मध्ये काही शतकांपूर्वी भराव टाकून लोकांनी आपली घरं बांधली होती आणि काही अशी क्षेत्र तयार करून घेतली होती. एक भाग पाण्याचा ठेवायचा आणि त्याच्या आजूबाजूला भराव टाकायचा. पाणी काढून घ्यायचं त्यात भात शेती करायची. परत जेव्हा हवं तेव्हा त्या बॅक वॉटर्समधून पाणी आत सोडायचं. वर्षभरात असं ते तीन वेळा पीक घेतात. इथे सर्वात जास्त प्रतिहेक्टर तांदळाचं पीक घेतलं जातं. म्हणूनच त्याला तांदळाचं कोठार म्हटलं जातं. या अशाच एका कुट्टनाड नावाच्या गावात आम्ही गेलो होतो. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे वर्षभर पाणी आहेच. पण पाऊस आला की इथली पाण्याची पतळी आणखीनच वाढते आणि इथली पूररेषा ही इथल्या घरातून जाते. इथले लोक जवळजवळ या पाण्यातच राहत असतात. ते चक्क काही फळकुट घालून त्यावर राहतात आणि त्याच्या खाली पाणी असतं. आपल्याकडच्या पुराचं आणि इथल्या पुराचं चित्र केवढं वेगळं आहे.
तिथे अनुभवलेल्या पावसाच्या अनुभवाबद्दल सांग ना..
आम्ही कालिकतमध्ये होतो. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार इथे ऑफशोअर ट्रफ निर्माण होत होता. त्या क्षणाला आम्हाला कळालं की म्हणजे  काय. कमाल चित्र बघायला मिळालं आम्हाला. सगळे ढग हे समुद्रावर जमा झालेले आहेत आणि सगळ्या लाटा या ढगांच्या दिशेने अक्षरश: उफाळत आहेत. प्रचंड प्रचंड गडगडाट. आणि एकदम सुरू झालेला मुसळधार पाऊस. यामध्ये ढग आणि समुद्र एकमेकांमध्ये एकरूप झालेला आहे. त्यात प्रचंड पाऊस कोसळतो आहे. या सगळ्यामधून एक प्रचंड ऊर्जा आम्हाला जाणवत होती. प्रचंड ऊर्जा.. खूपच भारावून टाकणारं हे सगळं चित्र होतं. पण, हेच ढग जेव्हा एखाद्या मानवी वस्तीवर कोसळायला लागतात त्या वेळेला त्याचा वेगळाच परिणाम दिसायला लागतो. जोपर्यंत या सगळ्या ऊर्जेची आपल्याशी थेट संबंध नसतो तेव्हा एक दृश्य म्हणून, एक घटना म्हणून आपण हवामानशास्त्रीयदृष्टय़ा हे बघू शकतो. पण जेव्हा संबंध येतो तेव्हा सगळा हाहाकार दिसू लागतो.
‘प्रोजेक्ट मेघदूत’बरोबर येणारा प्रत्येक जण- त्याच्यासाठी हा पावसाळा खूप वेगळा होता हेच सांगत असतो. आपण आपल्या घराच्या खिडकीतून अनुभवतो तो पाऊस किंवा अगदी घराच्या गच्चीमधून दिसणारं पावसाचं चित्र म्हणजे छत्री घेऊन जाणारे लोक, हातात चहाचा कप घेऊन पाऊस बघणारे एखादे काका किंवा आपल्या दुचाकीवरून भिजत काढलेली पावसाळी सहल यापलीकडे नाही. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवर उभे राहून पाऊस अनुभवता, तेव्हा त्या अनुभवाची तीव्रता खूपच जास्त असते. म्हणजे कल्पना करा, आपण एखाद्या शेतात आहोत. एकाएकी पाऊस पडायला लागला आहे, समोर भात लागवड सुरू आहे. आपण रेनकोट घातला आहे, पण तरीही संपूर्ण भिजतो आहोत. ही तीव्रता खूप काही गोष्टी शिकवणारी असते.
दुसऱ्या वर्षी तुम्ही कोणत्या भागात फिरलात?
पुढच्या वर्षीची थीम आधीच ठरलेली होती. आम्ही मेघदूताच्या काव्यामध्ये त्या यक्षाने मेघदूताला सांगितलेल्या वाटेने फिरणार होतो. तो मार्ग म्हणजे रामटेकपासून ते कुरुक्षेत्रापर्यंत, नंतर हिमालयातल्या अलकानगरी या काल्पिनक शहरापर्यंत, जी हिमालयात आहे असं सांगण्यात येतं. हा सगळा भाग सांस्कृतिकदृष्टय़ाही खूप महत्त्वाचा आहे. इथे काही प्राचीन मंदिरं आहेत. इथे काही महत्त्वाच्या राजवटी होऊन गेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या भागाच्या उत्कर्षांत पावसाचा कसा संबंध आहे हे आम्हाला पाहायचं होतं. यामध्ये पावसाविषयी लोकांमध्ये पारंपरिक ज्ञान काही जतन झालं आहे का, ते काय आहे, अशीही उत्सुकता आम्हाला होती.
मागच्या वर्षीचा आमचा प्रवास ३० जूनला सुरू झाला. नंतर आम्ही रामटेकमधल्या नागार्धन किल्ल्याजवळ पोचलो. याच किल्ल्यात बसून कालिदासाने आपले महाकाव्य लिहिलं आहे असं मानलं जातं. मग पचमढीचा भाग येतो. मग तिथून विदिशा शहर येतं, मग दशपूर, त्यानंतर कुरु क्षेत्र असं येतं.
१९९३मध्ये डॉ. एस.व्ही भावे यांनी त्यांच्या चार्टर विमानातून या मार्गाचे निरीक्षण केले होते. त्या वेळेस त्यांनी निसर्गाच्या, तिथल्या भौगोलिक परिस्थितीच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. परंतु त्यांना हवामानाचा सखोल अभ्यास करता आला नव्हता. या वर्षी आम्ही बारा जणांनी मध्य भारत पालथा घातला.
इथे पेंचच्या जंगलाशी, तिकडच्या गोंड आदिवासींशी आम्ही संवाद साधला. पाऊस यायला उशीर झाला होता. गटाचे दोन भाग करून हे किल्लारी आणि फुलझरी या दोन गावांमध्ये आम्ही फिरलो. फुलझरी हे गाव जंगलाच्या बरंच आतमध्ये आहे. हे सुरक्षित जंगलाच्या हद्दीत येत असल्याने लवकरच विस्थापित होणार आहे. आदल्याच आठवडय़ामध्ये हलका पाऊस पडून गेल्याने पेरणी सुरू झाली होती. पण नंतर पाऊस थांबल्याने त्यांची पेरणी वाया गेली होती आणि बरंच नुकसान झालं होतं. एकतर शिक्षण अगदी कमी, फुलझरीमध्ये पंचाग बघून पावसाचा अंदाज बांधायला मदत करण्यासाठी कोणी ब्राह्मण नव्हता, गावात वीज नसल्याने हवामान केंद्राकडून काही बातमी मिळणं अशक्यच होतं. कोणाला विचारायला जावं तर जवळचं गाव ४ ते ५ कि.मी. वर होतं. या सगळ्या कारणांमुळे त्यांचं हे नुकसान झालं होतं. दुर्दैवाने हीच परिस्थिती आज भारतात अनेक गावांची आहे. पावसाचं योग्य निदान न झाल्याने शेकडो लोकं गरिबीतून अतिगरिबीकडे वाटचाल करत आहेत. केवळ योग्य माहिती त्याच्यापर्यंत पोहचू शकत नाही या एका कारणाने.
याउलट किल्लारी हे गाव तसं मुख्य प्रवाहातलं होतं. वन अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असलेलं असं होतं. आमच्याशी बोलताना त्यांनी पावसाचे अनुभव अतिशय व्यवस्थित सांगितले. पाऊस आणि पीक चांगलं येण्यासाठी त्यांच्याकडे ते एक ‘सैला’ नावाचं नृत्य करतात. साधारण पावसाच्या सुरुवातीला गुजराती गरबाशी साधम्र्य असलेला हा नाच या गावातले लोक देवासमोर सादर करतात. हा सोहळा एकदा रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला त्यांनी जेव्हा एक पाऊस पडला होता त्या सुमारास केला होता. पण त्यानंतर पाऊस एकदम गायब झाला होता. प्रोजेक्ट मेघदूताचा गट तिथे असताना गुरुपौर्णिमा होती. गुरु पौर्णिमा हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सण. तेव्हा पुन्हा एकदा ते हा सोहळा करणार होते. आपल्या गटाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा ‘सैला’ नावाचा सोहळा संध्याकाळी गटासमोर सादर केला.
तू इथे पारंपरिक ज्ञानाबद्दल बोलतो आहेस, त्याबद्दल तुम्ही कोणाशी बोललात का?
या दुसऱ्या वर्षीच्या प्रवासादरम्यान आम्हाला या विषयी खूप माहिती मिळू शकली. उदाहरण द्यायचं झालं तर चित्रकूटचं देता येईल. या भागात पारंपरिक ज्ञानाचा वापर करून नानाजी देशमुखांनी इथल्या गावांमध्ये काही पर्यावरणपूरक प्रकल्प उभे केले आहेत. आता इथलं काम भरत पाठक पाहतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या भागात घाग, बंदरी किंवा बड्डरी नावाचे दोन कवी मोघलांच्या काळात होऊन गेले. त्यांचा हवामान शास्त्राचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत म्हणी रचल्या. या म्हणी इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. या म्हणींमध्ये पावसाबद्दलचं ज्ञान लपलेलं आहे. कोणत्या नक्षत्रात कसा पाऊस, दुष्काळ, पीक-पेरणीबद्दलचं हे मौखिक ज्ञान इथल्या शेतकऱ्यांचं तयार आहे. ते त्यांच्या रोजच्या वापरात या म्हणी वापरत असतात.
यानंतर आम्हाला खजुराहोच्या रस्त्यावर आपल्याकडे जो मृगाचा किडा हा पावसाळा सुरू होण्याआधी दिसतो तोही इथे दिसला. इथे त्याला लाल गाय असं म्हणतात. तिथेच म्हणजे सागर आणि छतरपूर जिल्ह्याच्या मध्ये एक शेतकरी भेटला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेली दहा वर्षे अत्यंत कमी पाऊस पडल्याने पीक बदललं गेलं होतं. दहा वर्षांपूर्वी इथे खूप पाणी लागणारं भाताचं पीक घेतलं जायचं. त्याचबरोबर अजून एका शेतकऱ्याने जांभूळ, कडुलिंब आणि बोर या तीन झाडांची फळं पडायला लागणं हे पावसाचं चिन्ह असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलेली आणखी चिन्हे ही त्या घाग-बड्डरीच्या म्हणींशी मिळतीजुळती होती.
मध्य भारताच्या या प्रवासात आम्हाला सगळीकडे सामान्य लोकांचे अंदाज खरे ठरताना दिसत होते. काही परंपरा आणि पाऊस या गोष्टी अनेक वर्षे सतत जुळून आल्याने स्थानिकांचा त्या रूढींवरचा विश्वास दृढ होत होता. पंचांगात सांगितल्याप्रमाणे पाऊस उशिरा आणि नेहमीपेक्षा कमी हे समोरच दिसत होतं. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवताना हे पारंपरिक ज्ञान, ठोकताळे आणि हवामान खात्याचे अंदाज याचं गणित कसं मांडायचं हा मोठा प्रश्न आम्हाला पडला होता.
‘मेघदूत’ आणि मॉन्सूनचा मार्ग याचा संबंध तू कसा लावशील?
‘मेघदूता’च्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या काव्यामधल्या श्लोकानुसार जात होतो. त्या प्रत्येक ठिकाणी तो श्लोक जसातसा आम्हाला अनुभवता येत होता. प्रवासाची सुरुवात रामटेकपासून होते. कालिदासाला तो मेघ रामगिरीच्या पर्वतावर उतरलेला दिसतो आणि तो त्याला तिथून उत्तर दिशेला जायला सांगतो. उत्तरेला दशार्ण देशाकडे तो त्या मेघाला जायला सांगतो. हा भाग आत्ताच्या छत्तीसगढम्मध्ये येतो. मग पश्चिमेला वळून पेंच अभयारण्य लागतं आणि नंतर पचमढी लागतं. कालिदासाने पचमढीला आम्रकूट असं म्हटलं आहे. या भागात कालिदासाने त्या मेघाला ‘रेंगाळू नकोस आणि पुढे उत्तरेला जात राहा’ असा सल्लाही दिला आहे. या आम्रकूटमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आज १६०० वर्षांंनीसुद्धा इथे गावठी आंब्यांची बरीच झाडं दिसतात आणि इथल्या पचमढीच्या पायथ्याच्या ‘बरीआम’ या गावात आंबा मोठय़ा प्रमाणात विकलाही जातो.
यानंतर तो त्या मेघाला आणखी पुढे जायला सांगतो आणि त्याला एका महादेव पर्वतावर विसावा घ्यायला सांगतो. या ठिकाणी विसावा घेताना तुला ‘पृथ्वीचे स्तन’ दिसून येतील असंही सांगतो आणि त्याप्रमाणे खरंच आपल्याला तो पर्वत दिसतो, त्या पर्वतावर उतरून आलेले ढग दिसतात आणि समोर दोन डोंगरही दिसतात, ज्यांचा आकार स्तनांसारखा वाटू शकतो. आजही या परिसरातली भौगोलिक परिस्थिती बदललेली नाही.
या वर्षी या प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे, कुठे जाऊन आलात तुम्ही?
या वर्षी आम्ही पश्चिम भारतात फिरलो. हा भाग सगळाच कमी पावसाचा प्रदेश आहे. इथे पाऊस सगळ्यात उशिरा पोचतो आणि कमी काळ राहतो. त्यामुळे अशा प्रदेशामधल्या लोकांची पावसाची पाण्याची गरज, ते काही पाणी वापराच्या वेगळ्या पद्धती पाळतात का? असा सगळा अभ्यास आम्हाला करायचा होता. त्याबरोबरच आपण कायम ऐकत आलो आहोत की या प्रदेशातली सरस्वती नदी लुप्त झाली, त्या नदीविषयी माहितीही आम्हाला मिळवायची होती.
या प्रवासात जेव्हा आम्ही हरियाणामध्ये फिरत होतो तेव्हा आमचा बऱ्यापैकी अपेक्षाभंगच झाला. हरियाणामधल्या प्रत्येक गावात एक तळं आहे. अनेक तळी ही पुरातनकालीन आहेत. पण आज तिथली लोकं त्यांचा सुयोग्य वापर करताना दिसत नाहीत. हा सगळा प्रदेश हरित क्रांतीमुळे हिरवा झालेला. सगळीकडे कालव्यांचं जाळं. पण तरीही इथल्या भूजलाची पातळी प्रत्येक वर्षी कमी होताना दिसते आहे. पाणी ३00 ते  ४00 तर काही ठिकाणी ६00 फुटावर लागत आहे. इथले लोक हे ठिकठिकाणी बोअरवेल्स खणून भातशेती करताना दिसतात. ज्या भागात केवळ सहा महिनेच शेती करणं बंधनकारक आहे तिथे अशाच भूजलाच्या आधारे आणि हव्यासापोटी बाराही महिने शेती होताना दिसते. इथल्या माणसाचा पावसाशी संबंध फार कमी, कारण पाऊस नसला तरी त्यांना हिमालयाच्या नद्यांमधून पाणी मिळत असतं. म्हणून पाऊस आला की तेवढय़ापुरतं त्याचं पंपाचं बिल कमी होतं तेवढाच काय तो यांचा पावसाशी संबंध. त्यांना पाऊस महत्त्वाचा नसून पाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा सगळा भाग हे भारताचं धान्याचं कोठार आहे, हे जरी मान्य असलं तरी ते कशाच्या किमतीत याची जाणीव आपण ठेवायला हवी असं मला वाटतं.
या सगळ्या प्रवासामध्ये असं एक प्रकर्षांने जाणवलं की माणसाचा आणि पावसाचा संबंध खूप कमी झाला आहे. माणसं पावसापासून लांब गेली आहेत. एक तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाणी उपलब्ध केलं आहे. मग ते धरणाने असो किंवा बोअरने. त्यामुळे आता पडणारा पाऊसच आपण वापरायचा आहे हे बंधन आपल्यावर नाही. ते पावसाचं पाणी कोणीतरी साठवेल आणि ते आपल्या घरापर्यंत येईल अशी खात्री आपल्याला आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा जो पावसाकडे बघायचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे तो या खात्रीमुळे. नळाला पाणी नाही आलं तरी आपण टँकर मागवू. भले आपल्याला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. पण पाणी नक्की मिळेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य, त्यात शहरी पावसाकडे एक नैसर्गिक संसाधन म्हणून पाहात नाहीयेत. त्यामुळे आपण आपलं पाणी साठवावं ही भावना कमी आहे आणि एका प्रकारे या संसाधनाला गृहीत धरलं जातंय असं मला वाटतंय.
गेली तीन र्वष हा प्रवास आणि संशोधन सुरू आहे. कोणकोण आहे तुझ्याबरोबर?
गेल्या तीन वर्षांंत आतापर्यंत आम्ही, २५,००० किलोमीटर्सपेक्षा जास्त प्रवास केला आहे. यामध्ये पश्चिम घाट, मध्य भारत आणि वायव्य भारत यांचा समावेश आहे. त्यालाच धरून महाराष्ट्रात केलेला प्रवास आहे. यामध्ये आजपर्यंत चाळीसपेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. यातले सर्वजण २० ते ३० या वयोगटातले आहेत. यातले बरेचसे शास्त्र विषयाचे आहेत. काही हवामानशास्त्र शिकत आहेत, काही जैवविविधतेमध्ये अभ्यास करत आहेत. बरेचसे झुऑलॉजी, बॉटनी या विषयांचा अभ्यास करत आहेत. काही समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत, कलाकार आहेत. पत्रकार तर आहेतच. फोटोग्राफर्स आहेत आणि दरवर्षी याची संख्या वाढतेच आहे. आजही दिवसाला एखादा तरी मेल मला येतो की मला उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं आहे, कसं होऊ, असं विचारणारा. या सगळ्या प्रकल्पाला माध्यमांनीही चांगली साथ दिली आहे.
आणि या सगळ्याचं आर्थिक गणित?
सध्या या सगळ्या प्रकल्पाचं स्वरूप स्वयंसेवी आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’मध्ये सहभागी होतो तो प्रत्येक जण त्याच्या प्रवासाचा खर्च उचलतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाहीये किंवा अशी मदत मिळाली म्हणून आम्ही हा प्रकल्प करतो आहोत असं नाहीये. मी व्यक्तिगत यामध्ये दीड ते दोन लाख रु पये खर्च केले असतील. यामध्ये दरवर्षी सहभागी होणारेही त्यांना त्या विषयाची ओढ वाटते म्हणून, आणि पावसाचा अभ्यास व्हायला हवा आहे अशी त्यांची इच्छा असते म्हणून वर्षभर पैसे साठवून ठेवतात आणि या प्रकल्पात सहभागी होतात. प्रत्येक वेळी आम्ही प्रवासाच्या शेवटी जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा प्रत्येकाच्याच
बोलण्यात असं येतं की या पावसाने त्यांना अभ्यासक म्हणून,  माणूस म्हणून नक्कीच समृद्ध केलं आहे.
 आता या प्रकल्पाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढची योजना काय आहे?
पुढच्या वर्षी आम्ही अंदमान आणि उत्तर-पूर्व भारत पार करणार आहोत. यातला बराचसा भाग बोटीनेही असणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी बिहार, उत्तर-प्रदेश आणि हिमालय, म्हणजे काश्मीरपर्यंत असेल. याच वर्षी परतीचा मान्सूनही अनुभवायचा असं आम्ही ठरवलं आहे. म्हणजे भारताचा पूर्व तट पार करून रामेश्वरपर्यंत येऊन हा प्रवास संपेल.
हा प्रवास झाल्यावरच खरं काम सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीचं संकलन करून या सर्व माहितीचा मॉन्सून एन्सायक्लोपीडिया सर्वांसमोर आणणं हे ‘प्रोजेक्ट मेघदूत’चं यापुढचं उद्दिष्ट आहे. या एन्सायक्लोपीडियासाठी सर्व भागांमधल्या छोटय़ा छोटय़ा गटांनी तिकडच्या हवामानाची आणि पावसासंबंधी इतर माहिती गोळा करून आमच्यापर्यंत पोहोचवणं हा मोठा भाग पार पडणं अपेक्षित आहे. यात जेवढा लोकसहभाग वाढेल तेवढं हे ज्ञान विस्तृत होत जाईल. म्हणून आम्ही ज्या ज्या भागात जातो त्या भागातले स्थानिक पत्रकार, विद्यार्थी-प्राध्यापक यांना बरोबर घेतो आणि त्यांना त्यांच्या भागाचा पावसाबद्दलचा अनुभव विचारतो आणि त्यांनाही काही आकडेवारी आणि इतर स्थानिक माहिती जमा करायला सांगतो. याने ते प्रकल्पाशी जोडले जातात आणि आपलं सर्वांचं एकत्रित ज्ञान समृद्ध होत राहतं.
आम्ही जिथे जिथे जातो, तिथे आम्हाला पावसाबद्दलचं स्थानिक ज्ञान सांगणारे जे जे भेटतात ते सगळे साठी-सत्तरीच्या पुढचेच असतात. जसजशी वर्षे जातील तसं हे पारंपरिक ज्ञानही संपत जाईल अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आमच्यासाठी हा मान्सून एन्सायक्लोपीडिया लवकरात लवकर तयार होणं अतिशय महत्त्वाचं आहे.