News Flash

प्रासंगिक : राम मंदिर आणि सोमपुरा

सोमपुरा कुटुंबाने आत्तापर्यंत सोमनाथ मंदिरासह २०० वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत.

अहमदाबादच्या गजबजलेल्या भागात सोमपुरांचं कार्यालय आहे. तिथे काही माणसं संगणकावर त्रिमिती डिझाइनवर काम करताना दिसतात.

लीना मिश्र – response.lokprabha@expressindia.com

अहमदाबाद येथील चंद्रकांत सोमपुरा यांनी त्यांच्या ४७ व्या वर्षी म्हणजे १९९० मध्ये विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल यांच्यासह अयोध्येला भेट दिली होती. त्यानंतर गेली ३० वर्षे अयोध्येचं संभाव्य राम मंदिर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण या मंदिराचं आरेखन त्यांच्या कुटुंबाने केलं आहे. सोमपुरा कुटुंबाने आत्तापर्यंत सोमनाथ मंदिरासह २०० वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत. पण अयोध्येमधलं राम मंदिर हे त्यातलं सगळ्यात बहुचर्चित मंदिर असणार आहे. ३० वर्षांपूर्वी ते अशोक सिंघल यांच्याबरोबर अयोध्येत गेले होते तेव्हा त्या वादग्रस्त जागेला कसं लष्करी छावणीचं स्वरूप होतं याच्या आठवणी आता ७७ च्या आसपास असलेल्या चंद्रकात सोमपुरा यांच्याकडे आहेत. ‘मोजमाप करण्याची कोणतीही आयुधं आत न्यायला परवानगी नव्हती. ती न घेताच मी आत गेलो आणि माझी पावलं मोजत गाभाऱ्याची मापं घेतली’ असं ते सांगतात.

१९९० नंतरच्या काळात भारतीय राजकारणाला नवं वळण देणाऱ्या अयोध्येतल्या त्या संभाव्य राम मंदिराने सोमपुरा यांच्या मनात त्या क्षणापासूनच आकार घ्यायला सुरुवात केली. त्या जागेत काहीतरी वेगळं होतं, हे १९९० साली तिथे गेल्यावर जाणवलं असं ते सांगतात. ‘सी. बी. सोमपुरा, टेम्पल आर्किटेक्ट’ ही त्यांची कंपनी राम मंदिर उभारणीच्या प्रकल्पात पहिल्यापासून सहभागी आहे.

बाबरी मशिदीचं पतन, कोर्टातल्या लढाया या सगळ्या घडामोडींनंतर गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधण्यासाठी सगळी वादग्रस्त जागा ट्रस्ट स्थापून त्याच्याकडे सोपवण्यात यावी असा निकाल दिला. त्याशिवाय बाबरीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात होतच राहणार आहे.

आता ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २०० जणांच्या उपस्थितीत राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. अखेर आता तरी मंदिर बांधणीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या या भावनेने सोमपुरा समाधानाचा सुस्कारा सोडतात.

अहमदाबादच्या गजबजलेल्या भागात सोमपुरांचं कार्यालय आहे. तिथे काही माणसं संगणकावर त्रिमिती डिझाइनवर काम करताना दिसतात. हे नव्या, मोठय़ा राम मंदिराचं आरेखन आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या राम मंदिराच्या उभारणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ट्रस्टने १८ जुलै रोजी या नवीन आरेखनाला मान्यता दिली आहे. प्रभाशंकर सोमपुरा हे चंद्रकांत सोमपुरांचे वडील. सोमनाथ मंदिराच्या उभारणीत त्यांचं योगदान आहे. तेही सध्या या कामाच्या गडबडीत आहेत तर आशीष हा सोमपुरा यांचा ४९ वर्षांचा मुलगा आताचा राम मंदिराचा प्रकल्प हाताळतो आहे. तो १८ जुलै रोजीच्या ट्रस्टच्या बैठकीला उपस्थित होता. तो सांगतो, विश्व हिंदू परिषदेने मंदिराच्या उभारणीचं काम सोपवल्यानंतर त्याच्या वडिलांनी १९९० मध्ये अयोध्येतील वादग्रस्त जागेला भेट दिली आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या कुटुंबाने मंदिराच्या आरेखनावर काम करायला सुरुवात केली. आधी आरेखन केलेलं मंदिर आकाराने खूपच लहान होतं. पण नंतर त्याचा आकार वाढवण्यात आला.

६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या बाबरी मशिदीच्या पतनानंतर मंदिर उभारणीच्या कामाला गती आली हे मान्य करून आशीष सोमपुरा सांगतात, हाइट तब बढा, जब ढाँचा गिरा. आणि मग आमच्याही लक्षात आलं की हे मोठं काम आहे.

१९९२ ते १९९५ च्या दरम्यान अयोध्येत विश्व हिंदूू परिषद संचालित राम जन्मभूमी न्यासाच्या कारखान्यांमध्ये राम मंदिरासाठीचं काम जोरात सुरू होतं. पण त्यानंतर विश्व हिंदूू परिषदेकडचे पैसे संपले आणि परिषद बऱ्याच न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकली. आणि त्यामुळे मंदिराच्या कामाला खीळ बसली असं आशीष सोमपुरा सांगतात.

आशीष यांनी आणंद येथील बीसी पटेल स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून आपलं स्थापत्य शिक्षण घेतलं आहे. ते सांगतात, मी कामाला सुरुवात केली तेव्हा माझ्या दृष्टीने राम मंदिराचं काम हे माझ्या वडिलांच्या इतर अनेक कामांपैकीच एक होतं. ते काही फार मोठं काम आहे असं आम्हाला कुणालाच वाटत नव्हतं. तेव्हा आमचं कामही घरातून चालायचं. त्यामुळे आमचे ग्राहक कधीही उठून भेटायला येत. ‘सोमपुराजी तुम्ही या दहा बाय बाराच्या खोलीत बसून किती तरी मंदिरांचं आरेखन केलं असेल नाही?’ असं एकदा अशोक सिंघलजीही माझ्या वडिलांना म्हणाले होते. आशीष यांनीच घरातून काम करणं हा प्रकार बंद करायला लावून नवं कार्यालय थाटायला लावलं. पण असं असलं तरी आजही त्यांचे वडील आणि आजोबा आरेखन करतात आणि त्यांचाच शब्द अंतिम असतो हेही ते सांगतात.

चंद्रकांत सोमपुरा यांना त्यांची स्थापत्यशास्त्राची कौशल्यं त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली आहेत. आपल्या पूर्वजांना मंदिर उभारणीची कला विश्वकम्र्याने शिकवली असं त्यांना वाटतं. त्यांच्या मुलानातवंडांनी मात्र स्थापत्यकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं आहे. चंद्रकात सोमपुरा यांच्या नातवाने, आशुतोषने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि आता तो कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावतो आहे.

सोमपुरा सांगतात की तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय नरसिंह राव यांनी त्यांना फोन केला होता आणि विचारलं होतं की, ‘मशीद न पाडता राम मंदिर बांधता येऊ शकेल का?’ कारण तेव्हाच्या काँग्रेसची ती भूमिका होती.

सोमपुरा सांगतात, ‘आधी आम्ही मंदिराची एक प्रतिकृती तयार केली होती. त्यात एका बाजूला मंदिर होतं आणि मशिदीचे तीन घुमट तसेच ठेवलेले होते. भक्त रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेला भेट देतील आणि मग देवळामध्ये येतील अशी ती मथुरेसारखीच रचना होती. पण विश्व हिंदूू परिषदेचं म्हणणं पडलं की रामजन्मभूमीची जागा सहा बाय तीन एवढीच आहे. मंदिर त्या जागी बांधलं जाणार नसेल तर ते अहमदाबादमध्ये शरयू नदीच्या किनारी बांधलं तरी आम्हाला काही घेणंदेणं नाही.’ राम मंदिराचं बांधकाम जिथे एके काळी बाबरी मशीद उभी होती त्या जागीच व्हायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर गेल्या ३० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.

बाबरी प्रकरणानंतर झालेल्या हिंसेबद्दल विचारल्यावर ते सांगतात, ‘त्या सगळ्या िहसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसं व्हायला नको होतं. पण हेही खरं आहे की परकीयांनी आपल्यावर आक्रमणं केली. आपली मंदिरं उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या धर्माचा प्रसार करायचा प्रयत्न केला. हे सगळं चुकीचंच होतं. आता सोमनाथ मंदिरच किती वेळा उद्ध्वस्त केलं गेलं बघा ना..’

आशीष सोमपुरा यांना ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रण आहे. तिथे ते मंदिर आराखडा सादर करणार आहेत. या नव्या आराखडय़ामध्ये एक समोर आणि दोन बाजूला असे तीन कळस आहेत. खांबांची संख्या १६० वरून ३६६ वर गेली आहे. जिन्याची रुंदी सहा फुटांवरून १६ फुटांवर गेली आहे. मंदिराची उंची १४१ वरून १६१ फुटांवर गेली आहे. मंदिर उभारणीच्या शास्त्रानुसार गाभारा अष्टकोनी असणार आहे. त्याच परिसरात सीता, लक्ष्मण, गणपती, हनुमान तसंच इतर देवदेवतांची वेगळी देवळं असणार आहेत. आधीच्या आरेखनानुसार तीन लाख क्युबिक फीट दगड लागणार होता. आता तो दुप्पट लागेल.

सोमपुरा यांच्या मते मंदिराचं बांधकाम तीन- साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. पण आताच्या करोनाच्या महासाथीमुळे सहाआठ महिने जास्त लागू शकतात. विश्व हिंदू परिषदेने मंदिर उभारणीचं काम तीन कंत्राटदारांना दिलं होतं. आता त्यांच्याकडून काढून ते एल अ‍ॅण्ड टीला दिलं आहे.

आशीष सांगतात की त्यांनी १८ जुलै रोजी बांधकाम होणार आहे त्या जागेला भेट दिली होती तेव्हा एल अ‍ॅण्ड टीने जमिनीचं सपाटीकरण केलेलं होतं.

सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिराच्या आरेखनाचं काम त्यांनी केलं असलं तरी त्यांच्यासाठी सोमनाथ मंदिराला भावनिकदृष्टय़ा विशेष स्थान आहे. आशीष सोमपुरा सांगतात, आमचं सगळं कुटुंबच या मंदिरांशी जोडलं गेलं आहे. तो आमच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा ठेवा आहे.’

संडे एक्स्प्रेसमधून

अनुवाद – वैशाली चिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 2:31 am

Web Title: ram mandir and sompura prasangik dd70
Next Stories
1 मैत्रीदिन विशेष : हिरवे मित्र
2 राशिभविष्य : दि. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२०
3 स्पीकरशाळा
Just Now!
X