मी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचा गेली २५ वर्षांपासून वाचक आहे. मराठीतले माझे हे आवडते साप्ताहिक आहे. ५ डिसेंबरच्या अंकात धुळ्याचे मुकुंद धाराशीवकर यांच्या कार्यावर लिहिलेला लेख आवडला. खरोखरच तो त्यांच्या कार्याला सलाम करणारा आहे. योगायोग असा की, त्यांच्या ‘पाणी तुमचं आमचं’ या पुस्तकाला गेल्या आठवडय़ात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला. ‘लोकप्रभा’ने कायमच अशा ध्येयवेडय़ा व्यक्तींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. धाराशीवकर सरांसोबत जैन इरिगेशनच्या संदर्भाने भेट झाली होती. त्यांनी ‘जलसंवाद’मध्ये पाण्यावर केलेले लेखन, संपादन मलाही खूप आवडलेले आहे. खरोखर हा जलमागोवाच घेतला आहे. लेखकाने अत्यंत बारकाव्याने आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे. एका योग्य आणि प्रकाशात नसलेल्या माणसाची ओळख वाचकांना करून दिल्याबद्दल टीम ‘लोकप्रभा’ला मन:पूर्वक धन्यवाद.
– किशोर कुळकर्णी, जळगाव, ई-मेलवरून
मदत करायला आवडेल
५ डिसेंबरच्या अंकातील डॉ. मुकुंद धाराशीवकर यांच्या कामगिरीवरील लेख आवडला. त्यांची कामगिरी मोठीच आहे. मी स्थापत्य अभियंता नाही; पण पाणीटंचाई या समस्येतून महाराष्ट्र मुक्त करण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कामासाठी मला त्यांना मदत करायला आवडेल.
– अमोल भागवत (ई-मेलवरून)
भाजपाच पक्षपाती
‘घटस्फोटांचा अन्वयार्थ’ हा भाजपाचा पक्षपात करणारा लेख (‘लोकप्रभा’ १० ऑक्टो.) वाचला. आज कुणीही कुठल्याही एखाद्या पक्षाचे निर्विवादपणे समर्थन करूच शकत नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्य भाजपाचे आधुनिक साडेतीन शहाणे कोण, हे प्रकट होणार आहे.
सेना-भाजपा युती हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर झालेली असली तरी संघ-भाजपाचा हिंदुत्वावर विश्वास नसून गांधीवाद, समाजवादावर होता आणि आहे. तसे नसते तर संघ-भाजपाने स्वा. सावरकर- हिंदूमहासभेला वाळीत टाकले नसते. हे वास्तव आता मोदींनी सिद्धही केलेले आहे. महाराष्ट्रात स्थान मिळविण्याकरिता संघ-भाजपाने केलेली ती एक खेळीच होती. ‘वापरा आणि फेका’ हा संघ-भाजपाचा मूलमंत्रच आहे. यांनी जिथे जिथे युती केली तिथेही हेच केलेले आहे. म्हणून नितीश-पटनाईक-चंद्राबाबूंनी यांना पुन्हा जवळ केले नाही. केले तरी तात्पुरतेच! आता युती तोडण्याचे कारण जागा आणि मुख्यमंत्री पद नसून मोदींमुळे आम्ही कुठेही एकटे बहुमताने निवडून येऊ, ही घमेंड भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला झाली. शहा-मोदींनाही याची परीक्षा करावीशी वाटली. अमेरिकेच्या दौऱ्यामुळे (फॅन्सी) मोदींनाही आपल्या अमेरिका रिटर्नचे मोजमाप काढावेसे वाटले आणि शहा-मोदींनी आपण व्यापारी असल्याचे मान्य केले आहे, पण शिवसेना ही व्यापारी संघटना नव्हे याचा संघ-भाजपा नेत्यांना विसर पडला. हे महाराष्ट्रीय जनतेला कळत नाही असे थोडेच आहे? भाजपाच्या सुमेरसिंग-खरकसिंग गारद्यांचा डाव शिवसेनेने पूर्णपणे उधळून लावला आहे. त्यामुळे युती शिवसेनेने तोडली असे म्हणण्यास संघ-भाजपाच्या नेत्यांना अजिबात वाव राहिलेला नाही. उलट हिंदू-मराठी मतांच्या विभाजनास संघ-भाजपा नेतेच जबाबदार हा आरोप त्यांनी स्वत:वर ओढवून घेतलेला आहे. त्यामुळे एकटय़ाने बहुमत हे संघभाजपाचे दिवास्वप्नच ठरणार यात काहीएक शंका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादींना पावन करून घेण्याचे धोरण (शिवसेनेला बाजूला सारून) संघ-भाजपाच्या चांगलेच अंगलट येणार आहे. खडसे, फडणवीस, गडकरी, तावडे हे ज्या तऱ्हेने शिवसेनेबरोबर वागले ते पाहिले तर ‘युती’ तोडण्याचा त्यांचा आधीपासूनच कट होता हे सिद्ध होते. तिथे युवा आदित्य ठाकरेंना दोष का द्यायचा? पण मोदी- डॉ. भागवत हेच युतीतोडीचे शिल्पकार हे परिस्थितीजन्य पुरावा सांगतो. हे संघ-भाजपाचे हिमालयीन ब्लंडर ठरणार आहे.
सूर्यकांत शानबाग,
अर्थपूर्ण लेख
‘लोकप्रभा’च्या २८ नोव्हेंबरच्या अंकातला शैलेश परुळेकर यांचा ‘तुम्हाला काय हवंय, शिस्त की पश्चात्ताप’ हा लेख वाचला. हा लेख बरेच काही शिकवून जातो. खरोखर हे अगदी तंतोतंत जुळते, की आपले शरीर आपल्याला सांगते. हा अनुभव मला नुकताच आला. मी खाणे-पिणे यांच्या वेळा सांभाळते. तसेच फिरणे व इतर व्यायामही करते. काही ना काही करत असतेच; पण थोडी जास्तच कामे केल्याने पायाचा त्रास सुरू झाला. डॉक्टरकडे जाणे भाग पडले. शरीराचे ऐकले असते तर हा त्रास झाला नसता. मनाचे ऐकले तेच चुकले. अतिशय अर्थपूर्ण लेख आहे. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. लेखाबद्दल आभार.
शर्मिला (वेबसाइटवरून)
अपंगांच्या कथा आणि व्यथा
सोनाली नवांगुळ यांनी लिहिलेला ‘ऑस्कर रिवाच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. आमच्यासारख्या खुर्चीला बांधल्या गेलेल्या लोकांच्या कथा आणि व्यथा इतक्या प्रभावीपणे आजपर्यंत कोणीही मांडल्या नव्हत्या. ‘लोकप्रभा’ने आणि सोनालीने हा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल सर्व अपंग ऋणी आहेत.
– भावना विसपुते, ई-मेलवरून
नसरुद्दीनची मुलाखत भावली
१४ नोव्हेंबरच्या अंकातील नसरुद्दीन शहा यांच्या आत्मचरित्राच्या अनुशंगाने रजत कपूर यांनी घेतलेली मुलाखत आणि शशिकला लेले यांचा ‘अमेरिकेचा लाडका सण..’ हे दोन्ही लेख वाचले. दोन्ही लेख उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण होते.
भाऊराव हेडाऊ, नागपूर, ई-मेलवरून