News Flash

वाचक प्रतिसाद : ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाची जबाबदारी आपलीही

‘अक्षम्य नाकर्तेपणा’ हा मथितार्थ इतिहासप्रेमींनी नुसता वाचून उपयोगी नाही. आपल्या भागातील इतिहासाचा ठेवा पुढील पिढय़ांसाठी कसा राहील यासाठी सरकारकडे

| August 15, 2014 01:01 am

‘अक्षम्य नाकर्तेपणा’ हा मथितार्थ इतिहासप्रेमींनी नुसता वाचून उपयोगी नाही. आपल्या भागातील इतिहासाचा ठेवा पुढील पिढय़ांसाठी कसा राहील यासाठी सरकारकडे, लोकप्रतिनिधी आदींकडे आग्रहपूर्वक मते मांडली पाहिजेत. युरोप, इस्रायल, अमेरिका आदी देशातील ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची मला संधी लाभली. तेथली अशा ऐतिहासिक जागांची त्यांनी वर्षांनुवर्षे घेतलेली काळजी वाखाणण्यासारखी आहे. त्या सर्व ठिकाणी पर्यटकांना चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. कमालीची स्वच्छता ही तेथली खासियत आहे. अर्थात त्यासाठी चलन मोजावे लागते. याचे एक उदाहरण म्हणजे इस्रायलमधील राजा देविडचा किल्ला. जवळपास अडीच-तीन हजार वर्षांपूर्वीचा. किल्ल्यावर जाण्यासाठी हवेतील इलेक्ट्रिक मोटार प्रवास कायम लक्षात राहिला. नायगारा धबधब्याला आता काही काळ लोटला, पण तेथून हटावे असे वाटत नाही. ठाणे जिल्ह्य़ातील मोखाडा या तालुक्यातील डोंगर माथा हा तसा टीटलस या स्विर्झलडमधील डोंगर माथ्यापेक्षा नयनरम्य पण टीटलस त्या देशाला वर्षांला कोटय़वधी रुपयांचे उत्पन मिळवून देते. या उलट आपला डोंगरमाथा धूळ खात पडला आहे.
वसई-विरारला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. बुद्ध काळातील स्तूप, वसईचा किल्ला, अर्नाळा किल्ला, निर्मलची वैदिक काळातील तलाव व १२ व्या शतकातील शंकरार्याचे मंदिर यांना भेटी द्या, तेथून कधी निघतो असे वाटते. पेशवेकालीन आगाशी येथील फडके वाडा पाडू नये म्हणून मी मुंबईतील दैनिकांना लिहिले. त्याकडे सर्वानीच दुर्लक्ष केले. नंतर तो पडून आता तेथे बहुमजली इमारत उभी आहे. स्वच्छतेशी आपला काही संबंध नसतोच. सर्वत्र घाणीचे राज्य. या सर्वाला आपले सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. पुरातन खात्याने वर्ष-दोन वर्षांपूर्वी वसई किल्ल्याची डागडुजी केली. अधिकारी मुंबई-दिल्लीत, जो कंत्राटदार होता त्याने किल्ल्यातील ऐतिहासिक चर्चवरील लिखाण सिमेंट फिरवून कायमचे गजाआड केले. १९९९ साली हरित वसई संरक्षण समितीने त्यावेळच्या केंद्रीय पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार केला व त्यांना विनंती केली होती की वास्तूंची निगा राखावी. त्यांनी राज्य सरकारला या भागातील सर्व ऐतिहासिक वास्तूंची योग्य काळजी घेऊन देखभाल करण्याचे लेखी कळवूनही सरकारने दाद घेतली नाही. आपण नागरिक अशा वास्तूंच्या नाशाला जबाबदार आहोतच, पण सरकार व त्यांचे पुरातन खाते झोपले आहे त्यांना जागे कोण करणार?
मार्कुस डाबरे, पापडी, वसई. (ई-मेलवरून)

विचारांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद
२५ जुलैच्या अंकात माझ्या दोन्ही कादंबऱ्या ‘लातूर पॅटर्न’ व ‘अनरउबिक’वर परिचयवजा विस्तृत लेख प्रसिद्ध केल्याबद्दल आपले आणि पंकज भोसले यांचे प्रथमत: धन्यवाद.
‘लातूर पॅटर्न’ प्रकाशित झाली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ती दैनिकं, साप्ताहिकं व साहित्यविषयक मासिकांना पाठवण्यात आली, पण कोणीही आजपर्यंत त्यावर लिहिले नाही. मला वाटत होते आपण कादंबरीतून जो विषय मांडला आहे त्यात काही गफलत आहे का की तो पुरेशा गंभीरपणे लिहिण्यात आला नाही किंवा आपला विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे किंवा दिशाभूल करणारा आहे. आपली मेहनत वाया गेली असं मनात येत होतं.
‘अनरउबिक’चं लिखाण झाल्यावर दोन-चार मित्रांना दाखवली. त्यांनी अनुकूल अभिप्राय दिला. मग प्रकाशकांकडे जायला लागलो तर ‘लातूर पॅटर्न’पेक्षा वेगळाच अनुभव यायला लागला. ‘लातूर पॅटर्न’ वाचून निदान बघू, करू, दोनेक वर्ष थांबा अशी उत्तरं मिळायची, इथे तर चक्क नकार यायला लागला. त्यामुळे नैराश्य आलं. एका इंग्रजी पाक्षिकात ई-बुक्सबद्दल सविस्तर लेख आला होता तो वाचून आपण याचं ई-बुक स्वरूपात प्रकाशन करायचं असं ठरवलं. अर्थात छापील आवृत्ती काढणाऱ्या प्रकाशकांसारखं हे पण नकार देतील असं वाटलं होतं, पण त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता कादंबरी प्रकाशित करायची तयारी दर्शवली. आपल्या इथे ई-बुक्सचा वाचक दुर्मीळ असल्यामुळे ती म्हणावी तितकी लोकांपर्यंत नाही पोचली. त्यामुळे हीसुद्धा ‘लातूर पॅटर्न’सारखी दुर्लक्षित राहणार बहुतेक असं वाटायला लागलं. परंतु या लेखामुळे मी मांडत असलेले विचार व दृष्टिकोन यांची दखल घेण्यात येत आहे याचा खूप आनंद होत आहे. आपले पुनश्च एकदा धन्यवाद.
विवेक कुलकर्णी (ई-मेलवरून)

कायद्याचा धडा शिकवा
चित्रकार वासुदेव कामत यांच्यावरील अन्यायास आणि शिवचित्रांच्या बाजारास वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. आता शिवप्रेमींनी शहाणे व्हावे आणि भावनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना पेटंट कायद्यान्वये धडा शिकवावा. ही घटना उघडकीस आणणाऱ्या सर्वाना धन्यवाद.
– सुशांत निकम, सांगली (ई-मेलवरून)

‘किशोरांचं वास्तव’ – घरोघरची वस्तुस्थिती
‘लोकप्रभा’चा प्रथमपासून वाचक आहे. त्यातील लेख, प्रासंगिक, कथा इ. सर्वच वाचनीय असते. दि. २७ जून २०१४ अंक हातात पडला आणि नेहमीच्या सवयीने तो वाचून काढला. या अंकातील लेख नुसतेच वाचनीय नाहीत, तर मननीय आहेत. विशेषत: किशोरवय असलेले पाल्य ज्यांच्या घरात आहेत, त्यांनी तर ते लेख वाचलेच पाहिजे व त्याप्रमाणे आपल्या पाल्यांची काळजी घेतली पाहिजे. किशोरांचं वास्तव, बिथरलेली मुले हा डॉ. लता काटदरे यांचा लेख फारच उत्तम आहे. त्यांनी दिलेली उदाहरणे अनेकांच्या घरात आजही घडत असतील. त्याचप्रमाणे ‘स्वास्थ्य’ या सदरातील लेख अभ्यासनीय आहेत. पावसाळ्यातील जुलै महिन्यातील आहार-विहारावरचा लेख मला खूपच आवडला व उपयुक्त वाटला. पाण्याचे किती महत्त्व आहे, हे या लेखावरून लक्षात येते. डॉ. उज्ज्वला दळवींचा लेख ‘संभल ऐ दिल’ खूपच उपयुक्त आहे. हार्ट-अॅटॅकसंबंधीचा लेख अभ्यासनीय आहे. कोलेस्टेरॉलची निर्मिती कशी होते व त्यावर आपण कसे बंधन आणू शकतो इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विशेषत: लेखाच्या सुरुवातीस ‘भाज्यांचे व फळांचे’ जे चित्र आहे. ते लेखाला साजेशे आहे. अशा प्रकारे उपयुक्त लेख प्रसिद्ध केल्याबद्दल आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा!
शिवराम कुलकर्णी, पुणे.

पालकांनी मुलामुलींना समजून घ्यायलाच हवं
‘बिथरलेली मुलं’ (लोकप्रभा २७ जून) हा ‘किशोरांचं वास्तव’ लेख आजच्या पालकांना अत्यंत महत्त्वाचा व पालक कर्तव्य पार पाडायला लावणारा आहे. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. तद्वतच ती प्रत्येक मातापित्याचीही संपत्ती आहे, मात्र या खऱ्या संपत्तीसाठी जगण्यापेक्षा आपण पैशारूपी संपत्तीच्या मागे धावतो व आपल्या खऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष करतो.
आजचा पालक आपल्या व्यवसायात, आपल्या नोकरीत व आपल्या उद्योगात गुंतलेला आहे. त्यामुळे आपली मुलं काय करतात अन् काय नाही, याकडे पाहायला त्याच्याजवळ वेळ नाही. सकाळी लवकर कामावर/उद्योगावर जाणे, रात्री उशिरा घरी येणे, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसणे यामुळे आज ही मुलं बेजबाबदार नीतिमूल्ये पायदळी तुडवणारी संकुचित वृत्तीची घडत आहेत. यामुळे कुटुंब, समाज व पर्यायाने राष्ट्राचे खूप मोठे नुकसान होत आहे.
किशोरवय मुलांना योग्य दिशा देणारे असते. या वयात योग्य दिशादर्शक ज्ञान मिळाले तर मुलं आयुष्यात सक्षमपणे व समर्थपणे उभी राहतात. यासाठी या वयात मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांच्यासाठी वेळ द्यायलाच हवा. अत्यंत उद्बोधक व वाचन करून यातील सूचना अंमल करायला लावणारा लेख प्रत्येक पालकाने वाचायलाच हवा.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2014 1:01 am

Web Title: response to article 16
Next Stories
1 मनुजा येतसे शहाणपण फार!
2 सौंदर्यपूर्ण परंपरेचा आविष्कार – हेमिस फेस्टिव्हल
3 आनंदाचा रंगबिरंगी उत्सव – लडाख फेस्टिव्हल
Just Now!
X