05 August 2020

News Flash

चर्चा : आता तरी जागे व्हा!

केंद्रीय ग्राम विकासमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघात, वाहतूक सुरक्षा या मुद्दय़ांची चर्चा सुरू झाली.

| November 14, 2014 01:19 am

lp48केंद्रीय ग्राम विकासमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघात, वाहतूक सुरक्षा या मुद्दय़ांची चर्चा सुरू झाली. पण तरीही आपण या प्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने पाहतो असं दिसत मात्र नाही.

‘मैं गोपीनाथ मुंडे, ईश्वर के सामने शपथ लेता हूँ कि..’ ही शपथ दूरदर्शनवर तमाम भारतीयांनी पाहिली-ऐकली. काही दिवसांतच भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंना दिल्लीत रस्त्यावर अपघात झालाय, ही बातमी नुकतेच झोपेतून उठू पाहणाऱ्या भारतीयांना समजली अन् पुढच्या काही मिनिटांतच निधनाची सुतकी वार्ता आली. झोपेतून उठणाऱ्या सर्वाचेचे डोळे खाड्कन उघडले.

सीट बेल्ट, सिग्नल, वेगावर नियंत्रण हे वाहतुकीचे नियम कागदावर आहेत नि ते पाळलेच पाहिजेत, असे वातावरण ज्या देशाच्या राजधानीतच नाही तेथे इतर शहरांची, गावांची काय कथा. त्यामुळे अशा अपघातांनंतरची चर्चा ही वांझोटीच ठरते.

तसे तर भारतात रस्ते अपघात ही बाब नित्याचीच! परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते ना. गोपीनाथ मुंडे यांच्या रस्ते अपघातातील निधनामुळे आपल्या देशात कधी नव्हे ती सडक सुरक्षितता या विषयावर गंभीर चर्चा सुरू झाली. (ही गंभीरता किती दिवस टिकते ते पाहूच!)

भारतात दरवर्षी दोन लाख ६५ हजारांहून जास्त लोक रस्ते अपघातात मरण पावतात, तर पाच लाखांहून अधिक शारीरिक व आर्थिकदृष्टय़ा कायमचे विकलांग होतात. याचाच अर्थ आपल्या देशात दर पाच मिनिटाला एक जण रस्ते अपघातात ठार होतो. मृत्यूंचे व जखमींचे हे दोन्ही आकडे जगातल्या अन्य कोणत्याही देशांपेक्षा जास्त आहेत. यावरून रस्ते सुरक्षितता या गंभीर विषयाकडे आपण करत असलेले दुर्लक्ष कसे आणि किती अक्षम्य या श्रेणीत मोडते हे लक्षात येते. विकसित देशांमध्ये अत्यंत महत्त्व दिले जात असलेल्या या विषयाकडे भारतात नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. विकसित देशांमध्ये रस्ते अपघातांकडे केवळ एक दुर्दैवी, अपशकुनी घटना या हतबल दृष्टीने बघितले जात नाही, तर प्रत्येक अपघाताचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला जातो आणि भविष्यात तशा प्रकारचे अपघात टाळण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी तपासातून निघणाऱ्या निष्कर्षांचा वापर केला जातो. याउलट आपल्या देशात मात्र अपघातात सामील असलेल्या वाहनांपैकी मोठय़ा वाहनाच्या चालकाची चूक असल्याचे गृहीत धरूनच तथाकथित तपासाचा निष्कर्ष काढला जातो व एखाद्या अकार्यक्षम पोलीस कर्मचाऱ्याकडे अपघाताचा पुढील तपास करण्याचे (न संपणारे) काम सोपवले जाते. अपघातांच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नोंदविलेले प्राथमिक माहिती अहवाल (एफ आयआर) किंवा न्यायालयात कित्येक वर्षे प्रलंबित असलेली अपघात प्रकरणे यांची माहिती घेतल्यास त्यामधील एकसुरीपणा सहज लक्षात येईल.

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दिवसेंदिवस अपघातांचे वाढते प्रमाण पाहिले तर रस्ते, उड्डाणपूल, वळणे यांचे सदोष बांधकाम तर जबाबदार आहेच आणि हे आता वैश्विक सत्य आहे, परंतु नव्वद टक्क्यांहून जास्त अपघातांचे कारण हे ‘मानवनिर्मित चुका’ हेच असते, ही जगभर मान्यता पावलेली बाब. खरं तर हा धोक्याचाच सिग्नल आहे.

काही जागा ज्याप्रमाणे अपघातप्रवण क्षेत्र (अ‍ॅक्सिडेंट प्रोन एरिया) असतात, त्याप्रमाणे काही व्यक्तीसुद्धा अपघातप्रवण या व्यक्तिदोषात (अ‍ॅक्सिडेंट प्रोन पर्सनॅलिटी) मोडतात. ते दोष म्हणजे शिस्तीचा अभाव, बेफिकिरी, उगाच गाडीला पळवण्याची ईष्र्या, अतिवेग, दारू पिऊन गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, मोटारसायकल चालवताना झिगझ्ॉग पद्धतीने चालवत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत वायुवेगाने गाडय़ा दामटणे, सायकल चालवताना एखाद्या वेगवान वाहनाला पकडून त्याच्या गतीने जाणे, बढाई मारण्यासाठी एकशेवीस-दीडशेची स्पीड ठेवत अ‍ॅक्सिलेटर पिळणे, तसेच तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या गाडय़ांना होणाऱ्या अपघातांमागे कमी जागरूकता असणे, ‘तो सर्व बघून घेईल’ या भरवशावर गाडी चालविणे.. अशी कारणे कायमचेच ‘वैकुंठाला’ घेऊन जातात!

‘सडक पर मस्ती, जान नहीं सस्ती!’ ‘सीट बेल्ट, हेल्मेट ऑन, मोबाइल ऑफ’ असे कितीतरी सूचना देणारे फलक आपण वाचतो, पण त्याकडे लक्ष देत नाही याची प्रचीती रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येवरून येते.

खरं तर रस्ते सुधार योजनेअंतर्गत रस्त्यांची सुधारणा होत आहे ही बाब स्वागतार्हच आहे, रस्ते या शहरांच्या, गावागावांच्या धमन्या आहेत. रस्ते हे विकासाचे मूलभूत स्रोत आहेत, रस्ते चांगले असल्यास वाहन गतीने नेता येते, गतीतून प्रगती साधता येते वगैरे वगैरे सर्व मान्य आहे, पण ही गोष्टही लक्षात घेणे तितकेच जरुरी आहे की, रस्त्यांची झालेली सुधारणा, वाहनांची वाढलेली बेसुमार संख्या, ती चालवणाऱ्यांची वयपरिपक्वता, जबाबदार वृत्ती, वाहन चालवणाऱ्याकडे वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना (लायसन्स) या गोष्टी अपघात का होताहेत, ही बाब अधोरेखित करतात.

आज मिसरूड न फुटलेली मुलं, अपरिपक्व मुली थरकाप उडवणाऱ्या वेगाने हमरस्त्यावरून, गर्दीतून गाडय़ा उडवताना चालवणाऱ्यांपेक्षा बघणारेच घाबरून जाताहेत. कॉलेज, टय़ूशन व इतर बाबी यांचे अचूकपणे टायमिंग गाठण्यासाठी आज ८० टक्के मुलामुलींकडे गाडय़ा आहेत आणि त्यातील ५० टक्के गाडय़ा या गीअरलेस व जादा पिकअपच्या आहेत. भरीस भर म्हणजे आज शेंबडय़ा पोराच्या कानाला मोबाइल नावाचा ‘कर्णपिशाच’ चिकटून बसलाय. त्यातूनच कान व खांद्याच्या चिमटीत मोबाइल धरून मान वाकडी करून बोलत फालतू इंप्रेशन मारत टुव्हीलर, फोरव्हीलर गाडय़ा चालवणे ही बाब खरेच ही पिढी एवढी बिझी आहे का, याचं संशोधन करण्यासारखी आहे! चित्रपटातील अनेक बोल्ड, स्टंटबाज दृश्यांचा दुष्परिणाम युवा पिढीवर होत असून यातील वेगाने मोटारसायकल, कारगाडय़ा चालवणाऱ्या दृश्यांची युवा पिढीला जणू भुरळच पडली आहे. अशानेच मग दुधाचेही दात न पडलेला चिंटू जेव्हा धूम स्टाइलने गाडी चालवतो तेव्हा चिंटूच्या मम्मी-पप्पालाही मग कौतुक वाटतं. अशा फाजील लाडावलेल्या चिंटूकडून जर का अपघात झाला, तर शिक्षा व्हायला पाहिजे ती चिंटूच्या आईबापाला, पण तेच होताना दिसत नाही. म्हणतात ना, ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय.’

वास्तविक वेगमर्यादेचं उल्लंघन व ‘ओव्हरटेक’ करणे या दोन्हीही गोष्टी स्वत:सोबतच इतरांच्याही जीवितास धोकादायक असतात; परंतु या नवजात, नवमध्यमवर्गीय पिढीच्या मनाचा ताबा धोक्यांच्या जाणिवेपेक्षा एकमेकांच्या ईष्र्येने घेतलेला दिसतो.

अलीकडे तर महागडय़ा, आलिशान, शक्तिशाली, दणकट, परदेशी बनावटीच्या गाडय़ा खरेदी करून त्यांचे (कु)प्रदर्शन करत स्वत: कोणी तरी व्हीआयपी, स्पेशल मोठय़ा घरातली व्यक्ती आहे या ‘दाखवेगिरीचं’ जणू खूळच आलं आहे. अशा जास्त सीसी, पिकअपच्या गाडय़ा शहराभोवतीच्या िरग रोडवरून २५० ते ३०० च्या वायुवेगाने पळवून त्यांची चाचणी घेण्याद्वारे कमाल वेगाचा थरार, आनंद लुटण्याचा प्रयत्न या मार्गावर होताना दिसतो. परिणामी, शहराबाहेरचे रस्ते हे अशा वाहनांसाठी ‘टेस्ट ट्रॅक’ बनले आहेत. सुसाट गतीने धावणाऱ्या या वाहनांमुळे इतर वाहनचालक गडबडले जातात. त्यांचे स्वत:च्या वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने एक तर ते खड्डय़ात तरी पडतात किंवा रस्त्याकडेच्या कठडय़ावर, समोरच्या वाहनावर धडकतात. त्यात जर रात्रीची वेळ असेल, पाऊस पडत असेल, थोडी फार ‘टाकली’ असेल, डुलकी येत असेल, तर मग जादा सांगायची गरजच नाही!

डिस्क ब्रेक, एअर ब्रेक, एबीएस, हायड्रोलिक ब्रेक, पॉवर ब्रेक असे किती तरी प्रकारचे ब्रेक स्पीडवर ब्रेक आणत असले तरीही ‘मनाचा ब्रेक हा सर्वोत्तम ब्रेक असतो’ ही साधी आणि सिम्पल गोष्ट टेक्नॉलॉजीत जगणाऱ्यांच्या टाळक्यात का बसत नाही याची कमाल वाटते!

वेगमर्यादांचे उल्लंघन, रस्त्याच्या कडेने जाणारी जनावरे, कुत्री, डुकरे, पादचारी अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकी-तीनचाकीस्वार चालकांची अर्निबध घुसखोरी. गाडी वेगात असताना उष्णता निर्माण होऊन अचानक टायर फुटणे, पंक्चर होणे हे अपघातांचे स्रोत ठरतात.

तसेच अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे भारतातले निरनिराळय़ा आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, वैचारिक स्तरांवरचे ड्रायव्हर्स. ट्रक, ट्रॅव्हल्स, भाडोत्री वाहनावर नोकरी करणाऱ्या चालकांच्या अपुरी झोप व दारू या दोन कारणांमुळे अपघातांमध्ये मोठी दैनंदिन भर पडते. बेसुमार लोकसंख्या, उपजत बेशिस्त, वाहतुकीच्या नियमांचे सार्वत्रिक उल्लंघन आणि अज्ञान ही वस्तुस्थिती आहे, पण नागरिकांची सुरक्षा हा सर्वोच्च महत्त्वाचा विषय आहे. वाहनचालक, वाहनातले प्रवासी आणि पादचारी या तिघांच्या सुरक्षिततेचा विचार करणारे वाहतूक व्यवस्थापन ही भारताची तातडीची गरज आहे. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच वाहनचालकांनी राजीखुशीने नियमांचे पालन करायला हवे.

भारतात रस्त्यांच्या दुर्दशेमुळे रस्ते अपघातात भर पडते यात काही शंकाच नाही, पण अकार्यक्षम सरकार व प्रशासन यांना सतत दोष देऊनही वाहनचालकांना हात झटकता येणार नाही आणि यासाठी हवी आहे स्वयंशिस्त व स्वयंनियंत्रण, पण तेच समजेना झालंय. साधे उदाहरण घ्यायचे म्हणजे चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे म्हणजे कमीपणाचे, स्वत:लाच डांबून घेतल्यासारखे वाटतेय, तर दोनचाकीवाल्यांना डोक्यावर शिरस्त्राण (हेल्मेट) वापरणे ही बाब ‘डोईजड’ वाटू लागल्याने हकनाक बळी जात आहेत.

रस्ते अपघातासाठी वाहनचालकांच्या चुकीशिवाय नादुरुस्त रस्ते, पूल, वाहनतळांची अनुपलब्धता, रस्त्यांचे चुकीचे आरेखन, वाहतूक नियंत्रक पोलिसांची मर्यादित संख्या, सिग्नलचा अभाव तसेच सदोष सिग्नल, आपली सुरक्षितता ही वाहनचालकांचीच जबाबदारी असल्याचे मानून मोकाटपणे बिनधास्त हिंडणारे पादचारी, रस्त्यांवर चुकीच्या प्रकारे उभी केलेली वाहने, नादुरुस्त उघडी गटारे, बांधकामासाठी रस्त्यांवरच पडलेले विटा-वाळू-खडीचे ढिगारे, खड्डे, मोठ्ठाले गतिरोधक असे अनेक घटक अपघातास हातभार लावतात.

सिग्नलवरून विषय निघाला म्हणून उल्लेख करावासा वाटतो की, पूर्वी सिग्नलजवळ दिसणारा वाहतूक पोलीस आता गायब झाला असून त्याची नेमणूक आता टोचण वाहनांत बसून ‘वरकमाई’ करण्याच्या गोरखधंद्यावर झाली आहे, तर नियमभंग केला म्हणून वाहतूक पोलीस चलन फाडण्यात धन्यता मानू लागले आहेत. परंतु नियमभंगाची कुठेही नोंद होताना दिसत नाही, त्यामुळे अशा नियमभंगांचे फावते व त्यातूनच बेदरकारपणा वाढतो.

जगातील फक्त २८ देशांमध्ये गती मर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन चालविणे, विनालायसन्स गाडी चालविणे यांसारखे अपघात प्रतिबंधक र्सवकष कायदे कडकपणे राबविले जातात. अर्थातच या देशांत भारताचा समावेश नाही.

एरव्ही सामाजिक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, कॅन्डल क्लब (मेणबत्त्यातून परिवर्तन, जनजागृती करणारे) वाहतूक नियोजनांचे नियम, अंमलबजावणी याबाबतीत अनुत्सुक असतात. त्यातूनच मग वाहनचालक परवाना देण्याच्या ‘सिस्टीम’ला भ्रष्टाचाराचा व्हायरस लागून खालपासून वपर्यंतची सिस्टीम व्हायरल झाल्याने जमिनीवरील लोकांना वरचा मार्ग पत्करावा लागतोय ही आजची शोकांतिका आहे. अपुरे शिक्षण, वय, नियमांची माहिती नसतानाही पैसे फेकले, की लायसन्स घरी येऊन दिले जाते आणि मग अशांच्या हाती गाडीचे स्टेअरिंग आले, की तो ‘मानवी बॉम्ब’च बनतो अन् कधी तरी फुटतो. पाण्याचे टँकर, वाळूचे डंपर, उसाने फुल्ल भरलेले ट्रक-ट्रॅक्टर अशा वाहनांवर सर्रासपणे असे आडमापी ड्रायव्हर असतात. मात्र ‘सब चलता है!’ या सबबीवर सारे काही चालविले जाते नि मोठी जीवितहानी घडून येते.

खरे तर वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे कमीपणा, बावळटपणा असे एक ‘मिथ्या समीकरण’च तयार झालेय. मग यात पोराटोरांपासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सर्वच सामील असतात. लिंगभेद, धर्मभेद, गरीब-श्रीमंत, चारचाकी-दुचाकी या सर्व भेदाभेदांपलीकडील असे हे कार्य सर्व जण मिळून करीत असतात.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराशीच एक भली मोठी पाटी आहे. ‘वाहतुकीचे नियम पाळा, इकडे यायचे टाळा.’ वाहतुकीच्या शिस्तीचे महत्त्व सांगणारी ही (पुणेरी) पाटी फक्त पुण्यातच असली तरी ती गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या वाहनचालकांसोबतच इतरांनाही ती लागू आहे.

अ‍ॅक्सिडंट ही अपघातानेच (अचानकपणे) होणारी दुर्घटना असली तरीही वाहनचालक, वाहतूक व्यवस्थापन व इतर जण या त्रिस्तरांकडून वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे सदैव पालन होईल याची सर्वतोपरी काळजी घेणे, हीच सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावर (जमिनीवर) असणाऱ्या परंतु रस्ते अपघातात दिवंगत झालेल्या गोपीनाथजींना खरी श्रद्धांजली ठरेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:19 am

Web Title: road accident time to wake up
टॅग Charcha
Next Stories
1 मध्यांतर : जिवतीचा वसा
2 सहकार जागर : सभासदांची जबाबदारी
3 कल, स्वभाव आणि माणूस
Just Now!
X