scorecardresearch

जन्मशताब्दी : प्रतिभेचे नाते मातीशी

सत्यजित राय यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कोलकात्यातील एका कलासंपन्न कुटुंबात झाला.

सत्यजित राय

भालचंद्र गुजर – response.lokprabha@expressindia.com

सत्यजित राय हे भारतीय चित्रपटाला जगाच्या नकाशावर नेऊन पोहोचवणारे एक श्रेष्ठ दिग्दर्शक होते, यात शंकाच नाही. भारतीय आणि त्यातल्या त्यात बंगाली संस्कृतीच्या विविध रंगांमध्ये न्हालेली आणि तेथील मातीशी अनेकार्थाने नाते सांगणारी त्यांची प्रतिभा रुपेरी पडद्यावर व्यापूनही दशांगुळे उरणारी होती. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पथेर पांचाली’पासून सुरू झालेली त्यांची चित्रपट कारकीर्द नंतर तीन दशकांहून अधिक काळ जगभरातील प्रेक्षकांच्या कलाविषयक जाणिवांना समृद्ध करत राहिली.

सत्यजित राय यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कोलकात्यातील एका कलासंपन्न कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर राय हे लेखक आणि प्रकाशक होते. सत्यजित यांचे वडील कवी, तर आई गायिका होती. सत्यजित राय दोन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. राय कुटुंब ब्राह्मो समाजी होते आणि रवींद्रनाथ टागोरांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारसरणीचा आणि लेखनाचा सत्यजित राय यांच्या मनावर जाणत्या वयात फार मोठा प्रभाव पडला. कोलकाता विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर टागोरांच्या सूचनेवरून ते चित्रकलेच्या अभ्यासासाठी शांतिनिकेतनमध्ये गेले. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी कथा-कादंबऱ्या, भारतीय साहित्य आणि जागतिक वाङ्मयकृतींचे वाचन केले. त्यामुळे त्यांची साहित्यविषयक जाण विकसित होत गेली आणि जीवनविषयक दृष्टिकोन सखोल झाला. शांतिनिकेतनमधील चित्रकलेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एका जाहिरात कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. याच काळात सत्यजित राय यांना पाश्चात्त्य अभिजात संगीताची गोडी लागली आणि चित्रपटांविषयी आकर्षण वाटू लागले.

१९४८ मध्ये कोलकात्याच्या ‘केमार अ‍ॅण्ड कंपनी’त सत्यजित राय काम करीत होते. या जाहिरात संस्थेचे व्यवस्थापक डी. के. गुप्ता हे साहित्यप्रेमी गृहस्थ होते. त्यांनी विभूतिभूषण बंदोपाध्याय यांची ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी नव्या स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे ठरवले आणि कादंबरीतील चित्रे काढण्याची जबाबदारी सत्यजित राय यांच्यावर सोपवली. त्यानिमित्ताने राय ही कादंबरी वाचत गेले. ‘पथेर पांचाली’ म्हणजे ग्रामीण जीवनाचा विश्वकोशच! तिने राय यांना झपाटून टाकले. पण आपण नंतरच्या काळात ‘पथेर पांचाली’वर चित्रपट काढणार आहोत, याची त्या वेळी पुसटशी कल्पना राय यांच्या मनाला नव्हती.

सत्यजित राय यांना चित्रपटांची अतिशय आवड होती. १९५९ मध्ये त्यांनी चिदानंद दासगुप्ता, अनिल चौधरी, बंसीचंद्र गुप्ता, सुब्रतो मित्र या समविचारी स्नेह्यंच्या मदतीने ‘कोलकाता फिल्म सोसायटी’ स्थापन केली. याच सुमारास ‘दि रिव्हर’च्या चित्रीकरणासाठी प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शक ज्याँ रेन्वा कोलकात्याला आले होते. त्यांच्याशी सत्यजित राय यांचा परिचय झाला. आपली नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी ते रेन्वांसोबत चित्रीकरणासाठी बाहेर जाऊ लागले. या संदर्भात राय यांनी म्हटले होते की, ‘शहरी वातावरणात वाढलेल्या मला ग्रामीण जीवन मुळीच माहीत नव्हते. त्याची थोडीफार ओळख ‘शांतिनिकेतन’मुळे झाली होती. पण रेन्वांसोबत फिरताना मला ग्रामीण जीवन व्यवहारांचे दर्शन घडले.’ ‘दि रिव्हर’च्या चित्रीकरणादरम्यान राय हे रेन्वा यांना अनेक प्रश्न विचारून आपले शंकासमाधान करून घेत असत.

अभिजात पाश्चिमात्य संगीत, चित्रकला, नोकरी आणि चित्रपट यात रममाण झालेल्या सत्यजीत राय यांच्या पटकथा लेखनाचा सराव सुरू केला आणि अल्पावधीतच ते या कलेत पारंगत झाले. याच सुमारास नोकरीतील कामाच्या निमित्ताने राय यांना इंग्लंडला जावे लागले. कोलंबोहून इंग्लंडला बोटीने जाण्यासाठी त्यांना १६ दिवस लागले. या काळात त्यांनी ‘पथेर पांचाली’ची कथा लिहून पूर्ण केली. इंग्लंडमधील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी ९९ चित्रपट पाहिले. रेन्वा, व्हिक्टारिया डीसिका आयझेन्स्टाईन या दिग्दर्शकांच्या शैलीचे आवश्यक तेथे अनुकरण करून आपण चित्रपट करायचा, असे राय यांनी ठरवले होते. स्टुडिओचा मुळीच वापर करायचा नाही, नामवंत कलाकारांऐवजी प्रत्यक्ष व्यवहारातील सामान्य माणसे घ्यायची आणि कोणत्याही रंगभूषेशिवाय त्यांच्याकडून नैसर्गिक अभिनय करून घ्यायचा याविषयी राय यांच्या मनात पूर्णपणे निश्चिती होती.

विभूतिभूषण बंदोपाध्याय यांची ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी म्हणजे अवीट गोडीचे महाकाव्यच आहे. बंगाल प्रांतातील निश्चिंदीपूर या खेडय़ात राहणारा हरिहर हा गरीब ब्राह्मण, त्याची पत्नी सर्वजया, दुर्गा आणि अपू ही त्यांची मुले आणि हरिहरच्या लांबच्या नात्यातील इंदर आत्या ही वृद्ध स्त्री या कादंबरीतील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. त्यांचा तीव्र जीवनसंघर्ष या कादंबरीत वास्तवदर्शीपणे रेखाटला गेला आहे. या जीवनसंघर्षांत दुर्गा आणि इंदर आत्या यांचा बळी जातो. ‘पथेर पांचाली’चा काळ विसाव्या शतकाच्या आरंभीचा असून तिचा अवाका बराच मोठा आहे. ब्रिटिशांनी आणलेल्या औद्योगिक संस्कृतीचे भारतीय समाजावर फार दूरगामी परिणाम झाले. उपजीविकेसाठी माणसे स्थलांतरित होऊ लागली. आपले गाव आणि वडिलोपार्जित घरदार सोडून शहरात जाव्या लागणाऱ्या अशाच एका ब्राह्मण कुटुंबाची ‘पथेर पांचाली’ ही कहाणी आहे. कादंबरीतील गरीब तसेच अतिसामान्य माणसांच्या जीवन व्यवहाराचे जिवंत आणि वास्तवदर्शी चित्रण राय यांनी आपल्या या चित्रपटात केले. शैलीच्या दृष्टीने ‘पथेर पांचाली’ हा इटालियन नववास्तववादाला जवळचा असला, तरी तशा चित्रपटांमध्ये आढळणारे नैराश्य मात्र त्यात नाही. अनेक प्रकारच्या अडचणी सोसूनही जगण्यासाठी चाललेली माणसाची चिवट धडपड या चित्रपटातून दिसते. दारिद्रय़ातही टिकून राहिलेल्या माणुसकीच्या रस्त्याचे हे गाणे आहे (‘पथेर पांचाली’ म्हणजे रस्त्याचे गाणे). सामाजिक बदल अपवादात्मक संवेदनशीलतेने आणि तटस्थपणे टिपणारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा आणि भारतात राष्ट्रपती पदकाचा मानकरी ठरला.

‘अपराजितो’ (१९५६) आणि ‘अपूर संसार’ (१९५९)  या चित्रपटांद्वारे सत्यजित राय यांनी ‘पथेर पांचाली’पासून सुरू झालेली एक त्रिपदी पूर्ण केली. या चित्रपटांतून अपू या व्यक्तिरेखेच्या जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंतचा केवळ प्रवासच नाही, तर ही त्रिपदी म्हणजे विसाव्या शतकात ग्रामीण भागातून स्थलांतरित होऊन शहरात येणाऱ्या भारतातील नवमध्यमवर्गीयांची प्रातिनिधिक कहाणी आहे. ‘पथेर पांचाली’च्या अखेरीस हरिहर, सर्वजया आणि अपू निश्चिंदीपूर सोडून बनारसला स्थलांतरित होतात. तेथे आल्यावर हरिहर भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागतो. त्यांची गरिबी कमी होते. पण हे सुख काही फार काळ टिकत नाही. थोडय़ाच दिवसांत हरिहर अल्पशा आजाराने मरण पावतो. उपजीविकेसाठी सर्वजया एका श्रीमंत कुटुंबात स्वयंपाकाचे काम करू लागते; पण तेथे तिची आणि अपूची स्थिती आश्रितासारखी होऊन जाते. मग ते बनारस सोडून कोलकात्याजवळच्या मानसपोटा या गावी येतात. तेथे अपू शाळेत जाऊ लागतो. शालान्त परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यावर शिष्यवृत्ती मिळवून तो कोलकात्याला जातो. अपू पदवीधर होण्यापूर्वीच सर्वजया मरण पावते आणि येथेच ‘अपराजितो’ हा चित्रपट संपतो.

नंतरच्या ‘अपूर संसार’मध्ये पदवीधर झाल्यावर चांगली नोकरी मिळवून कोलकात्यात स्थिर होण्यापूर्वी अपूला अनपेक्षितपणे आपल्या मित्राच्या बहिणीशी, अपर्णाशी विवाह करावा लागतो. वर्षभरातच एका मुलाला जन्म देऊन अपर्णा मरण पावते. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झालेला अपू भटकत दूरदेशी जातो आणि एका खाणीत व्यवस्थापक म्हणून काम करू लागतो. त्याचा मुलगा मात्र आजोळी वाढत असतो. या सगळ्या घटना-घडामोडींच्या मानसिक संघर्षांतून गेल्यावर अपू आपल्या मुलाचा स्वीकार करतो आणि भविष्याला आशावादी वृत्तीने सामोरा जातो. या त्रिपदीद्वारे राय यांनी आपली एक अभिजात विधा (तऱ्हा, पद्धत) निर्माण केली. नंतरच्या काळात विषयांचे, व्यक्तिरेखांचे आणि कथावस्तूंचे वैविध्य राखत त्यांनी ही विधा प्रेक्षणीय केली. ‘पथेर पांचाली’ इतके नाही तरी ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ कलात्मक आणि व्यावसायिकदृष्टय़ा बऱ्यापैकी यशस्वी ठरले.

‘जलसाघर’ (१९५८) मध्ये सत्यजित राय यांनी वास्तवाकडे पूर्ण पाठ फिरवून भूतकाळात रममाण झालेल्या एका जमीनदाराचे चित्रण केले आहे. अस्तमान होत चाललेल्या सरंजामशाही जीवनशैलीचे अखेरचे काही क्षण या चित्रपटात कोरले गेले आहेत. त्यानंतरच्या ‘देवी’ (१९६०) मध्ये राय यांनी धार्मिक अंधश्रद्धेवर हल्ला केला आहे. आपल्या सुनेच्या अंगात देवी माँ संचारली आहे असा एका सुशिक्षित जमीनदाराला स्वप्नदृष्टांत होतो. तेव्हापासून त्याची सून त्या कल्पनेने झपाटली जाते आणि पाहता पाहता एका संसारी स्त्रीचे रूपांतर उपास्य देवतेत होते. तिच्या कृपाप्रसादाच्या अपेक्षेने जमीनदाराच्या घरी लोकांची रीघ लागते. तिचा नवरा आणि मुलगा तिच्यापासून जणू तोडले जातात. काही दिवसांनंतर तिच्या अंगातील कथित दैवी शक्ती नाहीशी होते. शेवटी हा सगळा प्रकार अस होऊन तिचा पती आपल्या वडिलांच्या म्हणजे पर्यायाने अंधश्रद्धेच्या विरोधात उभा ठाकतो.

सत्यजित राय यांचा ‘चारुलता’ (१९६४) हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नष्टनीड’ (विस्कटलेले घरटे) या दीर्घकथेवर आधरित आहे. एका विवाहित स्त्रीच्या मनात परपुरुषाविषयी आकर्षण निर्माण झाल्याने तिच्या सुखी संसाराचे घरटे कसे विस्कटून जाते याचे चित्रीकरण करणारी ही कथा आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात भद्र बंगाली गृहस्थांच्या कुटुंबव्यवस्थेला धक्के बसू लागले होते. इंग्रजी शिक्षणामुळे स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांची प्रतिष्ठापना होऊ लागली. या आधुनिक विचारसरणीचा पारंपरिक जीवनमूल्यांशी  होणाऱ्या अटळ संघर्षांतून आकाराला आलेली अपरिहार्य शोकांतिका अत्यंत तन्मयतेने, तरल काव्यात्मकतेने तसेच अभिजात कलावंताच्या अलिप्ततेने टागोरांनी ‘नष्टनीड’ या कथेत सांगितली आणि ती तेवढय़ाच प्रभावीपणे ‘चारुलता’द्वारे सत्यजित राय यांनी पडद्यावर साकारली. भूपती हा इंग्रजी वृत्तपत्राचा संपादक आणि त्याची देखणी, बुद्धिमान आणि तरुण पत्नी चारुलता यांच्या एकसुरी संसारात अमलचे आगमन होते. अमल हा भूपतीचा आतेभाऊ. दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा, देखणा आणि विशेषत: स्त्रियांवर सहजपणे प्रभाव पाडू शकणारा. अतृप्त आणि प्रेमासाठी आसुसलेली चारुलता आणि अमल यांच्यातील दीर-भावजयीचे नाते पारंपरिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडू अशा सीमारेषेवर येऊन उभे राहते की तेथून पुढे जाणे वा मागे परतणेही शक्य नसते. चित्रपटाच्या अखेरीस अमल दुसऱ्या स्त्रीशी विवाह करून परदेशी जातो आणि या संबंधाची कल्पना आल्याने भूपती मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त होतो. चारुलताने प्रतारणा केल्यावर भूपतीला पुन्हा तिच्याशी संसार करणे अशक्य होते, तर एकदा अमलवर प्रेम केल्यावर पुन्हा भूपतीशी शारीरिक आणि मानसिक पातळीवर समरस होणे चारुलतालाही शक्य नसते. रवींद्रनाथ टागोर यांची भावतरल कथा, सौमित्र चॅटर्जी आणि माधवी मुखर्जीच सहजसुंदर अभिनय आणि सत्यजित राय यांच्या दिग्दर्शनाने उजळलेला ‘चारुलता’ हा सर्वार्थाने अभिजात तसेच परिपूर्ण चित्रपट आहे.

सत्यजित राय यांचे ‘महानगर’ (१९६३), ‘अरण्येर दिन रात्री’ (१९६९), ‘प्रतिद्वंदी’ (१९७०), ‘सीमाबद्ध’ (१९७१) आणि ‘जनआरण्य’ (१९७५) हे चित्रपट म्हणजे आधुनिक काळात घडणाऱ्या कथाच आहेत. इंग्रजी शिक्षणाने जागृत झालेल्या अस्मितेमुळे तसेच आर्थिक कारणांमुळे स्त्रियांनी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मध्यमवर्गीय नीतिमूल्ये कालविसंगत सिद्ध होत होती आणि भ्रष्टाचार तसेच चंगळवादाने समाजजीवन आणि व्यक्तिजीवन ग्रासण्यास सुरुवात झाली होती. हा अशांत कालखंड आवश्यक त्या तपशिलानिशी या चित्रपटांतून साकारला गेला आहे. ‘महानगर’मध्ये एक सर्वसामान्य बंगाली गृहिणी नोकरीसाठी घराबाहेर पडल्याने तिच्या घरात निर्माण झालेले वादळ चित्रित केले आहे. तर ‘प्रतिद्वंदी’च्या कनिष्ठ मध्यमवर्गीय नायकाला वडिलांच्या निधनामुळे आपले वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून नोकरी स्वीकारावी लागते आणि बेकारी, आर्थिक विषमता, राजकीय अशांतता यांच्या तणावपूर्ण वातावरणात तो परात्मभावी होत जातो. एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करणारा ‘सीमाबद्ध’चा नायक आपली आर्थिक उन्नती साधताना सदसद्विवेकबुद्धीला तिलांजली देऊन भ्रष्टाचाराचा आधार घेतो. नंतर हाच भ्रष्टाचार मध्यमवर्गीय कुटुंबात प्रवेश करतो आणि पाहता पाहता समाजाला आलेली बकालपणाची अवकळा हाच त्या एकूण कुटुंबाचा स्थायिभाव होऊन जातो, हे राय यांनी ‘जनअरण्य’मधून स्पष्ट केले आहे.

सत्यजित राय यांनी ‘अवर फिल्म्स, देअर फिल्म्स’ या आपल्या पुस्तकात आपल्या चित्रपट निर्मितीमागच्या प्रेरणांविषयी म्हटले होते, ‘मी ‘पथेर पांचाली’ कादंबरी निवडली; ती तिच्यातील श्रेष्ठ वाङ्मयीन मूल्यांसाठी आणि जीवनवादी दृष्टिकोनासाठी तसेच आयुष्यातील सत्याशी असलेल्या सखोल बांधिलकीसाठी..’ सत्यजित राय यांच्या व्यक्तिमत्त्वातही याच मूल्यांना महत्त्वाचे स्थान होते आणि या मूल्यांना अनुसरूनच त्यांनी चित्रपटनिर्मिती केली. राय यांचे जवळपास सर्वच चित्रपट अशाच अभिजात साहित्यकृतींवर आधारित होते. त्यांचा ‘पराश पत्थर’ हा चित्रपट परशुराम यांच्या कथेवर आधारित होता; तर ‘जलसाघर’ ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या कथेवर. ‘देवी’ (प्रभात मुखर्जी), ‘घरे वाई रे’, ‘तीन कन्या’ आणि ‘चारुलता’ (रवींद्रनाथ टागोर), ‘अभिजान’ (ताराशंकर), ‘अरण्येर दिन रात्री’ आणि ‘प्रतिद्वंदी’ (सुनील गांगुली), ‘सीमावद्ध’ आणि ‘जनअरण्य’ (शंकर), ‘महानगर’ (नरेंद्रनाथ मिश्र), ‘शतरंज के खिलाडी’ आणि ‘सद्गती’ (प्रेमचंद) आणि अशनी संकेत’ (विभूतीभूषण बंदोपाध्याय) हे अभिजात साहित्यकृतींवरचे त्यांचे काही चित्रपट. राय यांचा ‘गणशत्रू’ हा सुद्धा इस्वेनच्या ‘एनिमी ऑफ दि पीपल’ या नाटकावर आधारित होता.

‘मानवी व्यवहारांमधील सत्याचा शोध घेणे आणि ते सत्य अभिनेत्यांच्या माध्यमाद्वारे स्पष्ट करणे ही चित्रपटनिर्मितीची सर्वाधिक आव्हानात्मक प्रक्रिया आहे. आपला अनुभव आपल्याला असे सांगतो, की माणसांच्या भावनांमधील बारीकसारीक बदलांचाही त्यांच्या वागण्याबोलण्याचा परिणाम होत असतो. त्याचा साक्षात्कार घडवणे हा चित्रपट कलेच्या अभिव्यक्ती सौंदर्याचा गाभा आहे,’ असे सत्यजित राय यांनी म्हटले होते. त्यांचे स्वत:चे चित्रपट हे या उक्तीची उत्तम उदाहरणे आहेत. राय हे बहुस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. आपल्या चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन, संगीत, प्रसिद्धीची पोस्टर्स या सर्व गोष्टी ते स्वत:च करीत असत. १९५५ ते १९९१ या आपल्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी २७ दीर्घ चित्रपट, पाच अनुबोधपट आणि दूरदर्शनसाठी तीन चित्रपट निर्माण केले. याशिवाय गुप्तहेर कथा-कादंबऱ्यांची १७ पुस्तके, विज्ञानकथांची सात पुस्तके आणि दहा कथासंग्रह त्यांनी लिहिले; तसेच त्यांनी वेळोवेळी केलेल्या चित्रपटविषयक लेखनाचे तीन संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्या आजोबांनी सुरू केलेले आणि नंतर बंद पडलेले ‘संदेश’ हे मुलांसाठीचे नियतकालिक राय यांनी पुनरुज्जीवित केले आणि सातत्याने चालवले. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि रेखाटने केली. (भालचंद्र नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या इंग्रजी पुस्तकाच्या वेष्टनावरील संत तुकारामांचे रेखाचित्र सत्यजित राय यांचे आहे.) मुद्रणकलेच्या क्षेत्रात त्यांनी ‘रे रोमन’ आणि ‘रे बिझार’ असे दोन टाइप तयार केले.

एखाद दुसऱ्या चित्रपटाचा अपवाद वगळता, सत्यजित राय यांचे जवळपास सर्वच चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले. याशिवाय पद्मश्रीपासून भारतरत्नपर्यंतचे सर्व सन्मान त्यांना लाभले. १९८५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने राय यांना डी. लिट. दिली आणि सरतेशेवटी त्यांना ऑस्कर पारितोषिकही देण्यात आले. एकूणच काय, तर सत्यजित राय हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चमत्कारच होते.

सत्यजित राय यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांचा फार मोठा प्रभाव होता. ते लहान असताना एकदा आपल्या आईबरोबर टागोरांना भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांच्या आईने टागोरांना आपल्या मुलासाठी एखादा संदेश देण्याची विनंती केली. टागोरांनी सत्यजित यांच्या वहीवर संदेश लिहून दिला आणि ते म्हणाले, ‘‘मी तुझ्यासाठी कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत. त्या तुला आज कळणार नाहीत; पण तू मोठा झाल्यावर तुला त्यांचा अर्थ समजेल.’’ त्या ओळी अशा होत्या –

‘मी जगभर प्रवास केला.

नद्या आणि पर्वत पाहण्यासाठी

दूरवर भटकलो.

आणि सर्व काही पाहिले,

पण माझ्या घरामागच्या,

गवताच्या एका पात्यावरील

दवबिंदू पाहण्याचे मात्र मी विसरलो.

एक इवलासा दवबिंदू..

ज्यात सभोवतालचे

सर्व जग प्रतििबबित झाले होते!’

सत्यजित राय यांचे जवळपास सर्वच चित्रपट एका अर्थाने टागोरांच्या या कवितेतील आशयाचे प्रतिध्वनीच आहेत. सर्वसामान्य माणसांचा जीवनक्रम ज्या पायवाटांनी जातो, त्या वाटांवरचे सर्वच बारीकसारीक तपशील राय यांनी समंजसपणे स्वत:च्या जाणिवेत सामावून घेतले आणि नंतर तेच आपल्या अभिजात चित्रपटांद्वारे प्रेक्षकांसमोर मांडले. २३ एप्रिल १९९२ रोजी सत्यजित राय यांचे निधन झाले, तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहताना प्रख्यात जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी म्हटले होते. ‘सत्यजित राय यांचे चित्रपट पाहिलेले नसणे म्हणजे या जगात सूर्य किंवा चंद्र न पाहताच जगण्यासारखे आहे!’

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satyajit ray janamshatabdi dd

ताज्या बातम्या