गावात भैरोबाच्या देवळाशी बसलेल्या मंडळींनी दादांना चांगलेच फैलावर घेतले. कशाला या पोरांना अशा जिकिरीच्या वाटांनी फिरवलंस म्हणत वर पुन्हा कोणाला अशा आडवाटांवर घेऊन जाऊ  नकोस अशी तंबीही दिली. पण एवढा ओरडा खाऊनही हे वात्रट बेणं खूशच दिसत होतं.

सकाळचे अवघे साडेसातच वाजले होते तरी उन्हे अंग जाळीत होती. सॅक आवरून आम्ही किवणीच्या पठाराकडे चालू लागलो. घनगडाच्या खिंडीकडील बुरुजावर फडफडणारा भगवा लक्ष वेधून घेत होता. आमचा आजचा बेत जरा कस लागणारा होता. नाणदांड घाटाने उतरून भोरप्याच्या नाळेने चढायचे होते आणि पुन्हा तेलबैलाहून एकोल्यात चालत पोहोचायचे होते. आमच्यासोबत नेहमी येणारे मामा पायाला दुखापत झाल्याने आज येऊ  शकत नव्हते. गावातील एक अत्यंत वात्रट बेणं म्हणजेच अर्थात लहू दादा, त्यांनी आमच्या सोबतीला दिला होता. मागील खेपेला घोडदांडा घाटाच्या वेळीही याला आम्ही भेटलो होतो. हे उथळ पाण्याच्या खळखळाटासारखं होतं. त्यातच त्याला भोरप्याची नाळ माहीत नसल्याने काही दुसरा प्लान करण्याचा विचार घोळत होता. घोडदांड घाट चढताना मामांनी घुटक्याच्या पाळण्या (घुटका नावाच्या गावाजवळील पाळणा नावाचा डोंगर)बद्दल सांगितले होते. तिथे जावे की आधी ठरलेला प्लानच मार्गी लावायचा याचा विचार करीत असतानाच, घरी न्याहारी करायला गेलेले दादा परतले. घनगड पाहत किवणीकडे सरकू लागलो आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे सहज दादाकडे विचारणा केली की, घनगडाच्या बाजूच्या डोंगराचे नाव काय?

 

‘‘हा होय, लय मोठा डोंगर हाय तो. ‘मारथाणा’ म्हणत्यात त्याला,’’ इती दादा.

‘‘हो, मोठा तर आहेच, माथ्यावर जाता येतंय का ह्य़ाच्या?’’ माझा पुढचा सवाल.

‘‘येतंय की जाता, सोपी वाट आहे. ती बघा ती तिरकी कपची दिसत्ये ना त्यातनच जायचं चढून..’’ म्हणत दादा मारथाण्याच्या दिशेने बोट दाखवत उभे राहिले.

घनगडाच्या तुलनेत मारथाणा तसा दुप्पट उंचीचा. त्याची एक सोंड घनगडाकडे उतरत गेलेली, थेट खिंडीपर्यंत. सोंडेच्या वरील भाग उपडा ठेवलेल्या गडूसारखा सरळसोट उंच उभा. डोंगराची अशी विशिष्ट रचना पाहून डोळ्यासमोर तराळला तो धमधम्या डोंगरावरून दिसणारा सिद्धगडाचा नजारा. त्यापाठोपाठ आठवले ते, प्रबळगडावरून होणारे कलावंतीणचे दर्शन, दाजीपूरच्या पठारावरून दिसणारा शिवगड, देऊळ दांडय़ावरून दिसणारा कांगोरी, एक से एक बेहेत्तर. अगदी डोळ्याचे पारणे फेडणारी डोंगराची रूपे. मारथाण्याहून घनगडाचे असेच रुपडे पाहायला मिळणार हे डोक्यात पक्के झाले.

माझा पुढचा प्रश्न अर्थातच होता की, मारथाण्याहून पाळण्याला उतरता येईल का? हे डोंगर जोडलेले आहेत का? दादांची मान होकारार्थी हलताच मी यज्ञेश आणि राजसकडे पाहिले. इतकी वर्षे एकत्र भटकंती करीत असल्यामुळे आताशा प्रत्यक्ष शब्दाची गरजच भासत नाही. मारथाणा चढून पाळणामार्गे घुटक्याला उतरायचा बेत सर्वानुमते झटक्यात मान्य झाला. दादा तर खूशच झाले होते, एक तर कमी पायपीट आणि माहितीतला रस्ता.

मारथाण्याकडे पाहताना तरी वाट बिकट असावी असे वाटत होते. आणि नेमके आज मी वर्षभर घासून सोलचा गुळगुळीत गोटा झालेले शूज घातले होते. दादांना पुन्हा एकदा वाटेबद्दल विचारणा केली असता त्यांनी छातीठोकपणे वाट सोपी असल्याचा निर्वाळा दिला. आमचा मोर्चा मारथाण्याकडे वळताच, वाट सोपी हाय, पण आताशा कोणी येत-जात नाही ना, वाट निपजावी लागल कुठं कुठं, तेव्हा कोयता आणतो म्हणत दादा कोयता आणायला घराकडे सटकले. ‘सोप्पी’वर जोर देणाऱ्या दादाची कोयती आणायसाठी चाललेली लगबग पाहून पुढे काय वाढून ठेवले असणार आहे याचा हलकासा अंदाज आलाच.

गरजाई देवीच्या देवळासमोरून डावीकडे वळत आम्ही घनगडाचा रस्ता सोडला. आता पायवाट अशी नव्हतीच. आंब्याच्या गर्द छायेतून बूट बुडतील एवढय़ा खोल पातेऱ्यातून, कारवी वाकवत आमचा प्रवास सुरू झाला. अवघ्या १० मिनिटांत आम्ही कातळकडय़ाच्या पोटाशी येऊन पोहोचलो. येथून जवळजवळ संपूर्ण चढाई ७०-८० अंशातील सरळसोट कातळ टप्प्यावरून होणार होती. पुरुषभर उंचीचा सोपा टप्पा चढून वाट डावीकडे वळली. जेमतेम पाऊल ठरेल एवढय़ा चिंचोळ्या मुरमाड वाटेवरून तोल सांभाळत २०-३० मीटर आडवे चालत जाऊन पुन्हा एक सात-आठ फूट उंचीचा टप्पा चढून आम्ही वर आलो. खाली डोंगर तीव्र उतरत गावापर्यंत पसरलेला होता. अर्थातच उतार तीव्र असल्यामुळे पावलागणिक आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो. पुढच्या टप्प्यावर साधारण ७० अंश तिरकस घसाऱ्यावरून ५० मीटर आडवे चढत जायचे
होते. आधाराला कारवीदेखील शिल्लक राहिली नव्हती. आणि तोल गेलाच तर चार-पाचशे फूट खोल दरीत आपटणार यात शंका नव्हती.

दादा आणि यज्ञेश माकडाच्या गतीने भसाभसा पळत वरच्या टप्प्यापाशी पोहोचले. मी एक एक पाऊल जमिनीवर घट्ट रोवून हळूहळू पुढे सरकत होते. मुरमाड माती पायाखालून निसटत होती. कोयतीने खणून एक-दोन जागी पाय रोवण्यापुरत्या पावटय़ा खणून घेतल्या. या घसाऱ्याच्या वर कातळ टप्प्याच्या पोटाशी पोहोचलो आणि घनगडाकडे लक्ष गेले. आमच्या समांतर उंचीला घनगडाचा पहिला दरवाजा शोभून दिसत होता. घनगडाच्या दिशेने आडवे चालत जात आम्ही अखेर दादांनी गावातून दाखवलेल्या दगडी चिपेपाशी पोहोचलो. येथून ५० फुटांचा सरळसोट कातळ टप्पा चढून जायचे होते. पहिले दोन टप्पे चढले आणि वर दगडात कोरून काढलेल्या पावटय़ा दिसल्या. पावटय़ा असल्या तरी वाट वापर नसल्याने त्यावर वाहून आलेला गाळ साचला होता. काही पावटय़ा गाळाखाली गाडल्या गेल्या होत्या. अध्र्याएक पावटय़ा पार केल्या. सहज खाली लक्ष गेले आणि पाय लटपटायला लागले. एकदम खुटेदरा घाटाची आठवण झाली. एक तर गाळ साचलेल्या पावटय़ावर पकड बसत नव्हती. त्यात खाली खोलच खोल दरी दिसत होती. पुढच्या पावटय़ा गाळाखाली दबल्याने मुरूम मातीवरून गवताच्या जळून गेलेल्या खुटय़ांच्या आधारे स्वत:ला वर खेचायचे होते.  सवंगडय़ांच्या मदतीने कसाबसा हा टप्पा पार केला.

वर येताच दादांनी झालंच, आता १५% आलो आपण म्हणत दिलासा दिला. १५% (?) वाट भलतीच सोपी आहे दादा असं म्हणत आम्ही पुढे सरकलो. पाच-सहा फूट उजवीकडे चिंचोळ्या वाटेने आडवे चालत जाऊन पुन्हा एकदा निसरडय़ा घसाऱ्यावरून ४०-५० फूट चढून आम्ही अखेर सोंडेवर पोहोचलो. इथेच एका झाडाच्या सावलीत न्याहारी आटोपून घेतली. सकाळचे नऊ वाजले होते. घनगडाचा माथा समांतर उंचीवर दिसत होता. सोंडेवरून उतरत जाऊन खिंडीच्या टोकापाशी जाण्याचा प्रयत्न केला. पण कडा मध्येच तुटला होता. सोबत दोर नसल्यामुळे उगाच जीवघेणा आगाऊपणा करण्याचा मोह सोडून आम्ही मागे फिरलो. न्याहारी आटोपून दादांच्या गप्पा ऐकत बराच वेळ आम्ही तेथे बसून होतो. एकोले, तेलबैला, त्यामधील घळी, डोंगर, नाले, घनगड, त्यापलीकडे किवणीचे प्रशस्त पठार, तेलबैलाच्या जुळ्या कातळ भिंती, सुधागडाचा अवाढव्य पसारा, घोडदांड, घुटक्याचे पठार आणि पदरातलं घनदाट जंगल. सकाळचा थंड वारा आणि त्याच्या तालावर हेलकावणाऱ्या दादांच्या गप्पा. त्या अगदी छोटय़ाशा विश्रांतीमध्ये स्वत:च्या शालेय जीवनापासून आत्तापर्यंतचा सगळा प्रवास दादांनी सुरेख रंगवून सांगितला.

पावणेदहा वाजता चला चला, उशीर होतोय म्हणत दादा झटक्यात उठून उभे राहिले. कारवी आणि बांबूच्या दाट जाळीतून चढणाऱ्या तीव्र उताराच्या मुरमाड वाटेवर तोल सांभाळत चढताना चांगलेच नाकीनऊ आले होते. माझे बूट जणू काही मला खिजवत होते, ‘फार हौस आहे ना तुला आडवाटा धुंडाळायची, भोग आता हा सरपटीचा चढाव.’ मुख्य डोंगराशी पोहोचलो तेव्हा त्या बांबूच्या वाळलेल्या पाल्यातून चढून येताना आमची झालेली त्रेधातिरपीट पाहत दादा मिश्कील हसत होते. पुन्हा एकदा वाट तशी सोपीच असल्याचा निर्वाळा देत होते. वर परत ‘तुम्ही म्हणत असाल तर नको जायला माथ्यावर, या आडव्या वाटेने पलीकडे निघू या, डायरेक्ट पाळण्यावर, म्हणत दादांनी पर्यायी वाटेकडे निर्देश केला.

यज्ञेश, राजससारखे डोंगरसोबती असता अशा पर्यायी वाटेचा विचार करायची गरजच नव्हती. दादांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आम्ही मुख्य चढाईला सुरुवात केली. घनगडाच्या पाठी दडलेल्या तेलबैलाच्या कातळभिंत्ती हळूच वर डोकावू लागल्या. पुन्हा एकदा ८० अंशांतून चढाई आणि निसरडय़ा मातीशी कडवी झुंज सुरू झाली. वाट अजिबात वापरत नसल्याने पावटय़ा गाडल्या गेल्या होत्या. जागोजागी गवत आणि कारवीचे रान माजल्यामुळे काठिण्यपातळी वाढत होती. दगडांचा, गवताचा, तर कधी मुळांचा आधार घेत आम्ही फक्त स्वत:ला पुढे रेटत होते. कुठेही जरा जरी गडबड झाली असती तरी उरलेल्या दोघांना दरीत हाडामांसाचे गाठोडे बांधायला जावे लागले असते यात शंका नाही. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक मंदगतीने एकमेकांच्या आधाराने आम्ही एक एक टप्पा पुढे सरकत होतो. जवळजवळ सगळीच चढाई ७०-८० अंशांत सरळसोट होती. त्यात मध्ये मध्ये घसाऱ्याचे आडवे टप्पे होतेच.

एके ठिकाणी अगदी छाताडावर येणारा प्रस्तर आडवा ओलांडून पलीकडे जायचे होते. दोन्ही हातांनी दगडाला गच्च मिठी मारून, दरीकडे पाठ करायची, उजव्या हाताच्या दोन बोटांनी खोबणीत घट्ट पकड घ्यायची, शरीर दगडावर झोकून देऊन डाव्या हाताने पलीकडच्या दगडातील झाडाचे मूळ चाचपडायचे, ते हाताशी आले की अलगद पाय सरकवायचे, मग उजव्या हाताची पकड सोडायची, आता सगळी मदार त्या मुळावरील पकडीवर. तसं पाहायला गेलं तर तो आधारही नाममात्रच. तोल गेला तर मुळासकट दरीत. पण तशी वेळ आली नाही. एक एक करून आम्ही सगळे पलीकडे सुखरूप पोहोचलो. हा टप्पा ओलांडताना भीमाशंकर शिडी घाटातील दोन बोटय़ा टप्प्याची आठवण आली.

असो, तर एक किंचित जोखमीचा टप्पा चढून आम्ही एका चिंचोळ्या खिंडीत पोहोचलो. दादांनी आता आपण ५०% चढाई पूर्ण झाल्याचे घोषित केले. पुढच्या सपाट दगडात ३-४ खोबण्या केलेल्या होत्या. त्या चढून पुन्हा एक घसाऱ्याचा आडवा टप्पा ओलांडून आम्ही मुख्य कातळ टप्प्यापाशी पोहोचलो.

हा बघा मॅडम, हा सोपा टप्पा ओलांडला आणि वर शिंदीपाशी पोहोचलो की मग पुढे काय त्रास नाय बघा. इति दादा. (सोपाचा अर्थ एव्हाना तुमच्या लक्षात आलाच असेल.) कोयता आणि पाठीवर एक सॅक घेऊन टप्पा चढण्यात दादा सपशेल अयशस्वी झाले. दादांना मागे सारून कोयता, काठय़ा, सॅक सगळे सांभाळत आमचा जंगूमेन ३-४ आडव्यातिडव्या ढांगा टाकत सहज वर चढून गेला. मागोमाग दुसऱ्या प्रयत्नात दादाही वर चढून गेले. टप्प्याची सुरुवातच जरा जिकिरीची होती. पुढे चार-पाच पावटय़ा खोदलेल्या होत्या, पण ती पहिली झेप घेणे कठीण होते. उजवीकडच्या खोबणीपर्यंत माझा पाय पोहोचत नसल्याने मला हाताच्या पकडीच्या जोरावरच स्वत:ला वर खेचावे लागणार होते. राजस आणि यज्ञेश आधारासाठी सज्ज असले तरी काही चूक झालीच तर तिघांचीही दरीत घरंगळती होणार हे नक्की होतं. अशा वेळी लंबू लोकांच्या लांब पायांचा मला खूप हेवा वाटतो. शेवटी वरच्या पकडीवर स्वत:ला वर खेचलं, फ्लॅट हॅण्डवर तोल सांभाळला आणि वरच्या खोबणीत पकड घट्ट करून वर चढून गेले. खाली उतरून जाणे अधिक जिकिरीचे वाटत असेल तेव्हा चढायचा टप्पा कितीही बिकट असला तरी वर चढून जायचे बळ आपोआप येते ते असे. वर चढल्यावर सॅका पाठीला लावल्या आणि पुढचा गुळगुळीत कातळ टप्पा घोरपडीसारखा कातळाला चिकटून सरपटत पार केला. पुन्हा एकदा घसाऱ्याची आडवी चाल, एक-दोन बोटय़ा आणि निसरडय़ा कातळातील गवतमय चढाई करून अखेर आम्ही शिंडीच्या जाळीशी पोहोचलो.

मॅडम ७०% आलो बरं का आपण चढून. आता एकदम सोपी वाट बघा, असे दादांनी म्हणताच त्याच्या ‘सोपी’वरील जोरावर एकच हशा पिकला. कंबरभर गवतातून वाट काढत आम्ही वर चढू लागलो. १०-१५ मिनिटांत मुख्य माथ्याकडे जाणाऱ्या धारेवर पोहोचलो.

एका खुरटय़ा झाडाच्या छायेत पाठ टेकली आणि मागून येणाऱ्या यज्ञेशला माझ्या बुटांच्या तळव्याचे दर्शन घडले. गुळगुळीत गोटा झालेले सोल पाहून चिडचिड झालेल्या यज्ञेशने माझ्यावर विशेषणांची चांगलीच सरबत्ती केली. असो, पण एवढय़ातच डोक्यावरून क्रेस्टेड सर्पेट इगलचे जोडपे चीत्कारत घनगडाकडे झेपावले.

वाटेवरच्या पावटय़ा कधी आणि कोणी खोदल्या याबद्दल दादांना खात्रीलायक काहीच सांगता आले नाही. त्यांना फक्त एवढेच माहीत होते की, १५-२० वर्षांपूर्वी गावातील लोक माथ्यावर गवतासाठी येत असत.  गवताच्या मोळ्या बांधून त्या खाली लोटून दिल्या जात असत. आता गुरेच नाहीत तर गवत कापायला कोण येतेय इथवर मरायला.

इथवर चढून तर आलो होतो. पण पलीकडून उतरायला नक्की सोपा मार्ग असणार आहे की नाही, याची कोणालाच खात्री नव्हती. गावात ताक पिताना तुम्ही आधी कधी आला होतात का, या माथ्यावर या प्रश्नाचे उत्तर देणे दादांनी जाणूनबुजून टाळले होते, हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. त्यात नुकताच दादांनी मी याआधी येथून कधीच पाळण्याला गेलो नसल्याचा गोप्यस्फोट केला.

माथ्यावरून पाळण्याचा डोंगर पहिल्यांदा नजरेत भरला. पाळण्यापर्यंत उतरत गेलेली एक धार दिसत होती खरी, पण ती गाठायला डोंगर थोडा उतरून त्याला अध्र्यातून वळसा मारत धारेवर पोहोचावे लागणार होते. मुळात मारथाण्यावरच बऱ्याच वर्षांत कोणी आलेले नव्हते हे निश्चित होते. त्यामुळे येथून पाळण्याला कोणी जात असल्याची पुसटशीही शक्यता नव्हती. पायवाट तर सोडाच, कारवीच्या जाळीतून जेमतेम अंग पुढे रेटत या दोन डोंगरांना जोडणाऱ्या धारेवर पोहोचायला आम्हाला चांगलेच कष्ट पडले. बांबू-कारवीच्या दाट वनातून धारेच्या कडय़ालगत चालत साधारण तासाभरात आम्ही पाळण्याच्या डोंगरावर पोहोचलो.

पाळण्यावरून घुटका आणि भांबुर्डे गाव दिसू लागले. पाळण्यावरही मनुष्यवावराच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. डुकरा-वांदरांची विष्ठा मात्र सगळीकडे पसरली होती. हरणाची, सशांची विष्ठाही अधूनमधून दिसत होती. भांबुर्डेकडे उतरणाऱ्या सोंडेवर घनदाट जंगल पसरले होते, तर गुठक्याकडे उतरणाऱ्या सोंडेवर कारवीचे रान माजले होते. कोणत्याही दिशेला खाली उतरणारी पायवाट दिसत नसल्याने कारवीतून उतरणारी पुसट जनावरांची वाट धरण्याचे ठरवले. त्यापूर्वी झाडाच्या सावलीत बसून जेवण उरकून घेतले. पुन्हा एकदा घसारा, कारवी, काटेरी झुडपे, पायाखालून निसटणारे दगड, निसरडे गवत असा जीवघेणा खेळ सुरू झाला. मधले टप्पे चुकवत कारवीतून उभे-आडवे घुसत, वाट मोडत, खाली पठारावर पोहोचायला पाऊण तास लागला. अजून बरेच खाली असले तरी गुठका आता समोरच दिसत होते.

पठारावरून एक ठळक पायवाट पाळण्याच्या सुळक्यांकडे उतरत होती. हीच पायवाट खाली गावात उतरत असावी असे वाटून आता गाव जवळच आहे म्हणत सगळे पठारावर निवांत बसले. गपिष्ट दादांच्या तोंडाचा पट्टा सकाळपासून अखंड सुरूच असल्याने सगळे लक्ष त्यांच्या वटवटीत गुंगून जात होते. त्यामुळे आतापर्यंत पडलेल्या कष्टाची फारशी जाणीव अद्याप झाली नव्हती. पण गवतावर निवांत बसल्यावर हळूहळू, मुरगळलेला पाय, तोंडावर मानेवर उठलेले ओरखडे, इत्यादींची जाणीव व्हायला लागली. उनं कलायला लागल्यामुळे सोनेरी किरणांत डोलणारे सोनपिवळे गवत मृगजळासारखे लकाकत होते. मागे मुळशीकडे आभाळ भरून आले होते. थंड वारेही वाहू लागले होते आणि कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे अधिक वेळ न दवडता आम्ही मार्गस्थ झालो. पण ही पायवाट सुळक्यांच्या टोकाशी जाऊन लुप्त झाली. येथून खाली उतरण्याची कोणतीच शक्यता दिसत नव्हती. अखेर आल्या मार्गे मागे फिरलो. तीच वाट पुढे पठारावरून डोंगराच्या पोटाशी काटकोनात वळून समोरच्या डोंगराच्या पठारावर जात होती. वाट ठळक असल्याने ती कुठे तरी गावाशी उतरेल असा कयास करीत आम्ही याच वाटेने पुढे झालो. दादा मात्र मधे आडव्या गेलेल्या एका ओहोळात शिरले.  ओहोळाचा उतार पाहून मला तो एखाद्या कडय़ापाशी अडकेल असे वाटत होते. आम्ही ओढा ओलांडून पुढच्या पठारावर गेलो. पण ही वाट अशीच दूरवर डोंगराला समांतर पठारावर पुढे पुढे जाताना दिसत होती. काय करावे या विचारात असताना खालून दादांनी हाळी दिली. आम्ही पटापट खाली उतरून गेलो. दादा कडय़ापाशी थांबले होते. खाली जंगलात मधून मधून पायवाटा दिसत होत्या. अजून ३००-४०० फूट उतरायचे बाकी होते. तुम्ही इथवर या, मी पुढे उजवीकडच्या जंगलातून वाट बनवतो म्हणत दादा झाडीत घुसले. हळूहळू ओढय़ातून उतरत आम्ही कडय़ापाशी पोहोचलो आणि दादांच्या मागून रानात शिरलो. घसारा, कारवी, कातळ टप्पे अजून काही आमचा पिच्छा सोडत नव्हते. अध्र्या तासाची जीवघेणी कसरत करीत अखेर आम्ही डोंगरघेऱ्यातील दाट जंगलात उतरलो. तिथून आणखी अध्र्या तासाची पायपीट करीत गाव गाठले.

गावात भैरोबाच्या देवळाशी बसलेल्या मंडळींनी दादांना चांगलेच फैलावर घेतले. कशाला या पोरांना अशा जिकिरीच्या वाटांनी फिरवलंस म्हणत वर पुन्हा कोणाला अशा आडवाटांवर घेऊन जाऊ  नकोस अशी तंबीही दिली. एवढा ओरडा खाऊनही हे वात्रट बेणं खूशच दिसत होतं. ‘काय पण म्हणा मॅडम, मारथाण्यावर ट्रेकिंगला जाणारे आपणच पहिले’ म्हणत तो आनंदात नाचत होता. पहिले की दुसरे काहीही म्हणा, पण आजचा संपूर्ण दिवस आम्ही या माणसाच्या निरागस विश्वात रममाण झालो होतो. त्याच्या अखंड बडबडीत त्याने आम्हाला असे काही गुंतवून ठेवले होते की बिकट वाट पार करताना होणाऱ्या शारीरिक श्रमांची जाणीवही झाली नाही. मारथाण्याची बिकट वाट वहिवाटीसारखी पार झाली असे म्हणायला हरकत नाही.
प्रीती पटेल – response.lokprabha@expressindia.com