शिवरायांनी आणि जिजाऊमातेने पुण्यामध्ये कसबा गणपतीचे पूजन करून सोन्याचा नांगर फिरवला आणि खरोखरच पुण्याला चांगले दिवस आले. पुढे पेशव्यांनी पुणे हेच राजधानीचे शहर केल्यामुळे तर पुण्याची खरोखर भरभराट झाली. शिक्षणाचे माहेरघर बनलेले पुणे आता तर माहिती तंत्रज्ञानाचे भारतातील अव्वल ठिकाण झाले आहे. पुण्याच्या परिसरात कोणत्याही दिशेला केलेली भटकंती ही कायमच आनंददायी असते. इथे किल्ले, लेण्या, मंदिरे, अशी एक ना अनेक वारसास्थळे सर्वत्र पसरलेली आहेत. नेहमीची ठिकाणे तर आपण पाहतोच, परंतु तेवढीच तोलामोलाची आणि काही अल्पपरिचित ठिकाणे पाहू या.

जुन्नर परिसर
पुण्यापासून ९५ कि.मी.वर असलेला जुन्नर तालुका म्हणजे अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टींची अक्षरश: खाण आहे. जीर्णनगर अशी प्राचीन ओळख असलेल्या या परिसराचा संबंध थेट सातवाहन कुलापर्यंत जातो. सातवाहनांची राणी नागनिका हिने नाणेघाटासारख्या अद्वितीय कलाकृतीशेजारीच सुंदर लेणे खोदवून घेतले आणि त्यातील शिलालेखांमुळे सातवाहन कुलाचा सलग इतिहास आपल्यासमोर उघड झाला. जुन्नरपासून अवघ्या २८ कि.मी.वर हे शिल्पलेणे आहे. आजही जुन्नरला अनेक ठिकाणी जुनी नाणी, खापराचे तुकडे मिळत असतात. याचबरोबर जुन्नरच्या आजूबाजूच्या डोंगरांमधून अनेक लेणी कोरलेली आहेत. ज्यात अंबिका, भीमाशंकर, तुळजा, गणेश अशा काही मातब्बर लेण्यांचा उल्लेख करावा लागेल.
जुन्नरहून आपटाळेमाग्रे नाणेघाटाकडे जाताना वाटेत पूर या गावी अतिशय देखणं ठिकाण आहे कुकडी नदीच्या उगमावरचे कुकडेश्वर. इसवीच्या नवव्या शतकामध्ये शिलाहारवंशीय झंझ राजाने जी १२ शिवालये उभारली त्यात कुकडी नदीच्या उगमाजवळचे कुकडेश्वर हे एक शिवालय आहे. पश्चिमाभिमुख असलेलं हे मंदिर अनेक शिल्पांनी नटलेलं आहे. गणेशपट्टी, कीíतमुखे, बाह्य़भिंतींवर असलेला वराह अवतार, शिवतांडव शिल्प अशी बरीच शिल्पे अगदी आवर्जून पाहण्याजोगी आहेत. चावंड, जीवधन, हडसर अशा मातब्बर दुर्गाची साथ या परिसराला लाभलेली आहे.
मध्ययुगीन कालखंडातसुद्धा जुन्नर ही एक मोठी बाजारपेठ आणि मुघलांचे मोठे ठाणे होतेच. जुन्नरच्या दक्षिणेकडील बुरुजावर एक चित्र कोरलेले आहे, त्यात हत्तीच्या पाठीवर पोपट, तर त्याच्यामागे वाघ तोंडात चांदणी धरून उभा आहे. म्हणजेच या शहरात गजान्तलक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग्य आहे आणि वाघासारखे पराक्रमी शूर योद्धेही इथे आहेत. खरंतर हे जुन्नरचे बोधचिन्ह व्हायला हवे.
जुन्नरप्रमाणेच आळेफाटय़ाच्या परिसरातसुद्धा भटकंतीसाठी उत्तमोत्तम ठिकाणे पाहायला मिळतात. अगदी वैशिष्टय़पूर्ण ठिकाण म्हणजे आळे या गावी असलेली रेडय़ाची समाधी.
ज्ञानदेवांनी रेडय़ाच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेडय़ाच्या मुखातून होऊ लागले. पुढे तो रेडा या भावंडांबरोबरच आळंदीची वाट चालू लागला असता आळेगावाजवळ त्याचे पुण्य संपले व त्याने आपला देह ठेवला. ज्ञानदेवांनी त्याला तिथेच मूठमाती दिली. आळे गावात त्याचे एक मंदिर बांधले आहे. गर्भगृहात समाधीचा दगड हा रेडय़ाच्या तोंडासारखा आहे.

* पुणे-खेड-चास-जुन्नर-नाणेघाट-जुन्नर-आळेगाव-पराशर पर्यटन केंद्र-नारायणगड-पुणे अशी २-३ दिवसांची सहल फारच उत्तम होते. जुन्नर किंवा पराशर केंद्रात राहून आजूबाजूची ठिकाणे पाहता येतात. जेवणाची सोय सर्वत्र आहे.
* पुणे-ताम्हिणी-माणगाव-हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेआगर-पुणे ही कोकणची सहल दोन दिवसांत करता येते. दिवेआगरला राहून ही ठिकाणे पाहून परत पुण्याला दोन दिवसांत येता येईल. मत्स्याहारी लोकांनाही इथे खाण्याची पर्वणी आहे.
* पुणे-रांजणगाव-िपपरीदुमाला-निघोज-रांजणखळगे-दर्याबाईचा डोह-टाकळी ढोकेश्वर लेणी-आळेफाटा-जुन्नर-पुणे असा एक सुंदर वर्तुळमार्ग भटकता येईल. ३ दिवस असतील तर खूप गोष्टी वाटेत पाहता येतात. मुक्काम जुन्नरला करावा.
* पुणे-भोर-कारी-अंबवडे-रायरेश्वर-वरंध घाट-शिवथरघळ-पुणे असा भोर मार्ग भोर परिसरातील ऐतिहासिक भटकंतीसाठी योग्य. शिवथरघळ इथे राहण्याची आणि जेवायची सोय आहे किंवा एका दिवसात पुण्याला परत येऊ शकतो. 
* पुणे-थेऊर-भुलेश्वर-राशीन-सिद्धटेक-बहादूरगड-पुणे अशी सोलापूर रस्त्यावरील भटकंती ठरवता येईल. पुण्याहून लवकर निघून परत पुण्यात मुक्कामी यावे लागेल. जेवणाची सोय सर्वत्र आहे.

मावळातली लेणी
दगडामध्ये खोदलेल्या लेण्यांची संख्या जगात सर्वात जास्त भारतामध्ये आहे आणि भारतामध्येसुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त लेण्यांची संख्या आहे. पुण्याच्या पश्चिमेकडील मावळ तालुका जसा किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे तसाच प्राचीन बौद्ध लयनस्थापत्यासाठी (लेण्या) सुद्धा नावाजलेला आहे. इसवी सनाच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडात दगडात खोदलेल्या काल्रे, मळवलीजवळील भाजे आणि कामशेतच्या जवळचे बेडसे या लेण्या मुद्दाम भेट देण्याजोग्या आहेत. तो आपला सांस्कृतिक वारसा तर आहेच, पण दगडातील खोदकामांमध्ये किती सौंदर्य निर्माण करता येते याचे ते जिवंत उदाहरणच आहे. पुण्यातून एका दिवसामध्ये या लेण्या पाहून होतात. काल्रे लेणी ही एकवीरा देवीच्या ठिकाणामुळे प्रसिद्ध आहेच, पण याच काल्रे लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतील अनेक शिलालेख आणि खांबांच्या वरती उत्तमोत्तम शिल्पकला पाहायला मिळते. स्तूप, छत्रावली, तसेच बुद्धाच्या आयुष्यातील काही प्रसंग या लेण्यांमध्ये शिल्पित केलेले आहेत. पुरातत्त्व विभागाने हा सगळा परिसर सुरेख ठेवला आहे. बेडसा लेण्यांना जायला डोंगर चढून जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. या सर्व लेण्या डोंगराच्या पोटात खोदल्या असल्याने पावसाळ्यामध्ये इथे धबधब्यांची मालिका पाहायला मिळते. परंतु मावळमध्ये प्रचंड पाऊस पडत असल्याने शक्यतो सरत्या पावसात इथे जावे म्हणजे हिरवागार परिसर आणि असंख्य रानफुले पाहायला मिळतात.

दिवेआगर-श्रीवर्धन-हरिहरेश्वर
पुण्यापासून १६० कि.मी.वर कोकणामध्ये हा पर्यटन त्रिकोण नावारूपाला आलेला आहे.
ताम्हिणी घाटाच्या निर्मितीमुळे हा परिसर अगदी जवळ आला आहे. स्वत:चे वाहन असेल तर दोन दिवसांत सहज कोकणची मजा अनुभवता येते. दिवेआगरचा रूपनारायण, श्रीवर्धनचे लक्ष्मीनारायण, जीवनेश्वर मंदिर आणि हरिहरेश्वरच्या किनाऱ्याशेजारची दगडामध्ये लाटा आपटून आपटून तयार झालेली निसर्गलेणी, दगडातील कासव, अनारसे ही शिल्पे खास जाऊन पाहण्याजोगी आहेत. या तीनही ठिकाणी जेवण्या-राहण्याच्या उत्तम आणि भरपूर सोयी आहेत. बिरडय़ाची उसळ, उकडीचे मोदक हे या परिसरातले रुचकर पदार्थ. त्याचबरोबर या प्रदेशाला लाभलेला नितळ समुद्रकिनारा हे तर या भटकंतीमधील खास आकर्षण. परंतु समुद्राजवळ जाताना स्थानिक नागरिकांचा सल्ला घेऊनच जावे. खास करून हरिहरेश्वरला ही काळजी जास्त घ्यावी लागते. समुद्रकिनाऱ्याजवळचा निसर्गलेण्यांचा हा भाग ओहोटीच्या वेळी मोकळा असतो, परंतु भरतीला इथे पाणी भरते आणि म्हणूनच तिथे अडकू नये म्हणून स्थानिकांना विचारूनच तिथे जावे, म्हणजे आपली भटकंती निर्धोक होते.
अष्टविनायक या प्रसिद्ध गणपतींच्या आठ स्थानापकी पुणे जिल्ह्य़ात पाच ठिकाणे येतात. पकी लेण्याद्री आणि ओझर ही जुन्नरच्या जवळ आहेत; तर मोरगाव, थेऊर आणि रांजणगाव ही स्थाने पुण्यापासून ५०-६० कि.मी.च्या परिसरात आहेत. याच स्थानांच्या जवळ काही वैशिष्टय़पूर्ण ठिकाणे आहेत. जेजुरीला अगदी लागून बल्लाळेश्वराचे नितांत सुंदर ठिकाण आहे. हे एक शिवमंदिर असून त्याच्या वरती बांधलेल्या बंधाऱ्यातील पाणी शिविपडीसमोरच्या पुष्करणीमध्ये पडत असते. रमणीय परिसर आहे हा. तसेच दौंडच्या जवळ दुर्योधनाचे मंदिर असलेले दुर्गाव हे गाव, लोणी भापकर इथे असलेला यज्ञवराह आणि विष्णू मंदिर, राजगुरुनगरजवळील चास इथली दीपमाळ आणि त्रिपुरी पौर्णिमेचा देखणा उत्सव. एक ना अनेक अशा ठिकाणांनी हा परिसर नटला आहे. पुण्यापासून कोणत्याही दिशेला दोन-तीन दिवस काढून गेले तर विविध ठिकाणे पाहून होतात आणि वेगळ्याच परिसरात भटकंती केल्याचा आनंद घेता येतो.