‘लोकबिरादरी प्रकल्पा’ला भेट दिल्यानंतर लोकप्रभाच्या वाचकांनी पाठवलेली प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील ‘हेमलकसा’ या गावी बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाची सुरुवात केली. पुढे त्यांनी या प्रकल्पाची जबाबदारी त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्यावर सोपवली. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकल्पावर गेली ४० वष्रे अहोरात्र केलेल्या कामाची दखल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. २००८ साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. तसेच त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड (पूर्वीचा मध्य प्रदेश) व आंध्र प्रदेशच्या सीमा जेथे भिडतात अशा जंगलमय दुर्गम ठिकाणी हा प्रकल्प आहे. थोडय़ाच दिवसांपूर्वी ‘यूथ हॉस्टेल असो. ऑफ इंडिया, अंबरनाथ युनिट’च्या वतीने या प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देण्याचे भाग्य लाभले व अक्षरश: धन्य झालो. वर्धा रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजता पोहोचलो. पुढे गाडीरस्त्याने ८ ते ९ तासांचा प्रवास करत सायंकाळी आम्ही हेमलकसा या प्रकल्पावर पोहोचलो. या ठिकाणी पाहुण्यांसाठी राहण्याची व भोजनाची नाममात्र दरामध्ये उत्तम सोय उपलब्ध आहे. पण त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांची जेव्हा आमच्याशी प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा आम्ही सर्व जण भारावून गेलो. पांढरी हाफ पॅन्ट व अंगात पांढरे बनियान अशा पेहरावात ते अगदी साधेपणाने आमच्यासमोर आले. त्यांना प्रत्यक्ष बघून आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो व काय बोलावे हे सुचत नव्हते. पण बहुधा त्यांनी आमची अवस्था ओळखून स्वत:च गप्पांना सुरुवात केली व वातावरण मोकळे झाले. पुढील तासभर आम्ही प्रकाश व मंदाताई आमटे यांच्याशी अगदी भरभरून गप्पा मारल्या. त्यातून त्यांच्या कामाबद्दल समजलं. प्रकाशवाटा या पुस्तकातून त्याचा सगळा तपशील आलेला आहे. सध्या आलेल्या समृद्धी पोरे दिग्दर्शित चित्रपटातूनही तो सगळा तपशील पाहायला मिळतो आहे. बाबा आमटे यांच्या कामाबद्दल महाराष्ट्राला माहीत होतेच. आता प्रकाश आमटे यांच्या कामाबद्दलही सगळ्यांना माहीत आहे. भामरागडचे जंगल, प्राण्यांचे-पक्ष्यांचे आवाज; वाहणाऱ्या नद्या याव्यतिरिक्त दुसरा आवाज माहीत नसलेल्या, कपडे घालणं माहीत नसलेल्या, निव्वळ दिवसभराचं खाणं मिळवणं यासाठीच जगणाऱ्या, जगाशी काहीही संपर्क नसलेल्या इथल्या आदिवासींसाठी प्रकाश-मंदाताईंनी आपलं अवघं जीवन कसं वेचलं याबद्दल नव्याने सांगण्याची आणि वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. मांत्रिकाखेरीज कोणतेही उपचार माहीत नसलेले इथले आदिवासी सुरुवातीला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या रॅपरसकट खायचे. अंगाला लावायचा साबणदेखील त्यांना खायची वस्तू वाटायची. अशा मुलांना आमटे कुटुंबीयांनी शाळेत जायला शिकवलं. त्यांच्यासाठी माडिया मराठी शब्दकोश तयार केला. आदिवासींबरोबर काम करता करता छोटय़ा अनाथ प्राण्यांसाठी प्राणिसंग्रहालय सुरू केलं. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत.
आम्ही एप्रिल २०१४ मध्ये प्रकल्पाला भेट देण्याकरिता गेलो असता, आमच्यासमोरच बिबटय़ाने जखमी केलेल्या एका आदिवासी बांधवाला काही लोक उपचारासाठी दवाखान्यात घेऊन आले. या घटनेमुळे आजही आदिवासी या प्रकल्पावर किती अवलंबून आहे हे स्पष्टपणे जाणवले. ‘आमटे’ कुटुंबाची तिसरी पिढी प्रकाशभाऊंची मुले ‘दिगंत’ व ‘अनिकेत’ त्याच तळमळीने या प्रकल्पावर काम करीत आहेत.
प्रकल्प सुरू झाल्यापासून आजवर विविध लोकांनी अगदी अमेरिका, युरोप, इ. देशांतूनही या प्रकल्पाला भेट दिली. या सर्व लोकांनी मन:पूर्वक या प्रकल्पाला आíथक हातभार लावला. पण आजही प्रकल्पाचा एकूण आवाका पाहता या चांगल्या कामासाठी निधीची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता आहे.
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही समाजासाठी काहीतरी करायचे असते, पण त्यासाठी योग्य मार्ग सापडणे आवश्यक असतो. ‘लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा’ हा यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष भेट द्यावी असा हा जगावेगळा अनोखा प्रकल्प आहे. एवढे मात्र नक्की.