अतिशय लाडिकपणे ‘काहीही हां श्री’ असं म्हणत टीव्ही प्रेक्षकांना वेड लावणारी ती आता काय करते हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. याच प्रश्नाच्या शीर्षकाचा तिचा सिनेमा आजच प्रदर्शित होतोय. त्या निमित्ताने तेजश्री प्रधानने प्रेक्षकांच्या मनातल्या अशाच असंख्य प्रश्नांची उत्तरं ‘लोकप्रभा’शी गप्पा मारताना दिली.
झी स्टुडिओच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या तुझ्या सिनेमाविषयी सांग.
‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका सुरू होती, तेव्हाच झी स्टुडिओजचे व्यवसायप्रमुख निखिल साने तसंच दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘ती सध्या काय करते’ या सिनेमाची कथा मला यांनी ऐकवली. प्रेक्षक एखाद्या भूमिकेला रिलेट करू शकले तर त्याला यश मिळतं. एखादी गोष्ट मला भावली तर मी ती प्रेक्षकांपर्यंत भूमिकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सादर करू शकते. हे या सिनेमाची कथा वाचताना मला वाटलं आणि मी सिनेमात काम करायचं ठरवलं. तसंच अंकुश चौधरीसोबत काम करण्याचा आनंद होताच. खरंतर एका मालिकेची मुख्य भूमिका साकारताना दुसरं कोणतंही मोठं काम करणं कठीण असतं. ‘होणार सून..’ करत असताना या सिनेमाविषयी बोलणं सुरू झालं होतं. मालिकेचे दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांनी मला सिनेमा स्वीकारताना खूप पाठिंबा दिला. सांभाळून आणि समजून घेतलं. मालिका संपल्यानंतर सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. त्यामुळे मालिका आणि सिनेमा अशा दोन्ही गोष्टी छान जुळून आल्या. मला अजून एक सांगावंसं वाटतं की गेल्या वर्षांची सुरुवात ‘लोकप्रभा’तील सेलिब्रिटी कॉलमने झाली होती. आणि आता या वर्षीची सुरुवात एका नव्या सिनेमाने झाली आहे. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
या सिनेमातली तुझी व्यक्तिरेखा कशी आहे?
सिनेमात मी तन्वी ही भूमिका साकारतेय. सिनेमात तिचं लहानपणापासूनचं आयुष्य बघायला मिळणार आहे. तन्वी सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. ती कुठेही सिनेमाची हिरोईन वाटत नाही. गर्ल नेक्स्ट डोअर असं म्हणूया हवं तर. म्हणूनच तिच्यात अनेक मुली स्वत:ला पाहतील, अनुभवतील.
‘ती सध्या काय करते’ हे नाव ऐकून तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
पहिल्यांदा या सिनेमाचं नाव ऐकताना एखादं वाक्य शीर्षक कसं काय असू शकतं, असं मला वाटलं. पण नंतर मी सिनेमाच्या प्रक्रियेत शिरत गेले तशी त्यातली गंमत मला कळायला लागली. या सिनेमाविषयी असलेली उत्सुकता सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येतेय.
तुझ्या कॉलेजमधला किंवा शाळेतला ‘तो’ सध्या काय करतोय हे तुला माहितीये का?
माझ्या शाळा-कॉलेजमधले जे जे मला ओळखतात; त्या सगळ्यांनाच माहितीये की मी ब्रेट ली या क्रिकेटरची फॅन होते आणि आहे. त्यामुळे माझा पहिला क्रश, पहिलं प्रेम तोच आहे. त्यामुळे ‘तो’ सध्या काय करतो यावर मी लक्ष ठेवून असते.
लोकप्रिय मालिकेत बराच काळ काम केल्यानंतर सतत मिळणारं प्रेम, कौतुक, आदर याची सवय झालेली असते. मालिका संपल्यानंतर पडद्यापासून दूर राहत एक वर्ष फक्त नाटक करताना या गोष्टीची उणीव जाणवली नाही का ?
याकडे बघण्याच्या प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. एखादी मालिका तुम्हाला विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवते तेव्हा त्या उंचीवर टिकून राहणं महत्त्वाचं असतं. ‘होणार सून..’ या मालिकेने मला यश दिलं. आता ते टिकवणं ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे. खरंतर लवकर लोकप्रियता मिळणं, प्रेक्षकांचं प्रेम मिळणं हे क्षणिक आहे. त्यामुळे एखादी भूमिका, प्रोजेक्ट स्वीकारताना संपूर्ण विचार होणं गरजेचं आहे. एखादी मालिका आवडली की प्रेक्षकांना आम्हा कलाकारांना पडद्यावर सतत बघायचं असतं. पण खरंतर ते आम्हाला आधीच्या व्यक्तिरेखेशी जोडू पहात असतात. एखादी मालिका संपल्यानंतर दुसरी मालिका घेताना त्यात आधीची भूमिका दिसणार नाही याची मी कलाकार म्हणून नक्कीच काळजी घेतली असती तरीही त्या व्यक्तिरेखेत माझी आधीची व्यक्तिरेखा दिसत नसल्यामुळे प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला असता. कदाचित त्यांना नवी भूमिका आवडलीही नसती. हा सगळा विचार दुसरी मालिका किंवा सिनेमा लगेच न घेण्यामागे होता. पण मी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीवर काम सुरू ठेवलं होतं.
जान्हवी ही ओळख पुसली जाऊ नये असं वाटतं का?
जान्हवी ही ओळख पुसली गेली नाही आणि ती पुसावी असंही मला वाटत नाही. प्रेक्षक आम्हाला कलाकार म्हणून स्वीकारतो तिथपासून यशाचा काळ सुरू होतो, असं मला वाटतं. मी लोकांना असं तर सांगू शकत नाही की तुम्हाला मी आवडायला हवी. २००८ पासून मी सिनेक्षेत्रात काम करत आहे. २०१३ मध्ये मी जान्हवी म्हणून प्रेक्षकांसमोर आले, तेव्हा त्यांनी मला कलाकार म्हणून प्रेमाने स्वीकारलं. २००८ ते २०१३ हा काळ मी प्रेक्षकांना मला स्वीकारण्यासाठी दिला. हे कोणामुळे झालं तर जान्हवी या व्यक्तिरेखेमुळे. त्यामुळे माझी ती ओळख आयुष्यात कधीच पुसली जाऊ नये असं वाटतं. उलट आणखी १५ वर्षांनंतरही प्रेक्षकांना मला बघून जान्हवी आठवली तर ते माझं सगळ्यात मोठं यश असेल. त्यामुळे ती ओळख पुसण्याचा मी अजिबात प्रयत्न करत नाही. पण प्रयत्न एकच आहे, की प्रेक्षकांनी मला नवीन भूमिकांमध्येही स्वीकारावं. कारण जान्हवी साकारताना मी जितकी मेहनत घेतली तितकीच किंबहुना जान्हवीमुळे मिळालेल्या यशाची जबाबदारी असल्याने थोडी जास्तच मेहनत मी पुढच्या काही भूमिका साकारताना घेतेय. त्यामुळे माझ्या नवीन भूमिकाही त्यांनी तेवढय़ाच प्रेमाने स्वीकाराव्यात असं मला मनापासून वाटतं.
कॉलेजपासून तू नाटक, एकांकिकांमध्ये होतीस का?
मी कॉलेजमध्ये असताना नाटकाच्या ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. पण ते काही जमून आलं नाही. दहावी झाल्यानंतर मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि अॅक्टिंग अशी दोन महिन्यांची कार्यशाळा केली होती. त्यानंतर अचानक एसवायमध्ये असताना त्या कार्यशाळेतील एका व्यक्तीने मला एका सिनेमात काम करशील का असं विचारलं. सिनेसृष्टीतलं ते माझं पहिलं पाऊल. त्यानंतर एका कामातून दुसरं काम मिळू लागलं. ‘लक्ष्मी’ हा माझा पहिला सिनेमा. त्याचं शूटिंग कधीच पूर्ण झालं नाही आणि तो प्रदर्शितही झाला नाही. या सिनेमाने माझ्या करिअरसाठी दार खुलं करून दिलं. टीवाय सुरू असतानाच ‘या गोजिरवाण्या घरात’ ही मालिका करत होते. त्यानंतर ‘झेंडा’ हा सिनेमा. तो संपतोय तोवर ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ ही मालिका. त्यानंतर मुख्य भूमिका असलेली ‘लेक लाडकी या घरची’ ही मालिका मिळाली आणि त्यानंतर ‘होणार सून.’ ही मालिका. तो प्रवास आता इथवर पोहोचला आहे.
या क्षेत्राकडे करिअर म्हणून गांभीर्याने पहावं असं कधी वाटलं?
अशी विशिष्ट वेळ कधी आली नाही. एसवायला असताना सिनेक्षेत्रात काम करण्याची सुरुवात झाली. मग एका कामातून दुसरं काम मिळत गेलं. त्यामुळे करिअर म्हणून निवडावं का असा विचार करण्याची माझ्यावर वेळच आली नाही. कामं मिळत असल्यामुळे हेच माझं करिअर आहे, असं मी सकारात्मकतेने गृहीत धरलं.
ल्ल पण ग्रॅज्युएशन झालं आणि कामंही थांबली आहेत, असं झालं असतं तर काय केलं असतंस?
मला कौन्सिलर व्हायचं होतं. मधल्या काळात मी जर्मन भाषाही शिकत होते. समीक्षक व्हावं असंही मला वाटायचं. मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. त्यामुळे ज्या क्षेत्रात भाषा महत्त्वाची आहे, अशाच क्षेत्रात मी करिअर केलं असतं. नऊ ते पाच अशी नोकरी मात्र मी करू शकले नसते.
मराठी आणि हिंदी रंगभूमीच्या दोन नावाजलेल्या कलाकारांसोबत तू नाटक करतेस. हा अनुभव कसा आहे?
अनुभव अर्थातच मस्त आहे. प्रशांत दामले आणि दिग्दर्शक मंगेश कदम ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचं स्क्रिप्ट घेऊन घरी आले होते. मंगेश सर म्हणाले की ‘मी नाटकाची दोन पानं वाचून दाखवतो. तुला कशी वाटतात ते सांग. नंतर तू स्वत: वाच. नंतर आवडलं की नाही ते सांग’, त्यांच्या या बोलण्याचं मला आश्चर्य वाटलं. ऑडिशन दे, वाचून दाखव, आधी काय केलंयस असं त्यांनी काही विचारलं नाही. ‘नाटक करशील का’ असं त्यांनी थेट विचारलं. हे माझ्यासाठी अगदी स्वप्नच होतं. या नाटकासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. नाटकासाठी वेगळा आवाज लावावा लागतो. तिथे आवाजातील चढउतार महत्त्वाचा असतो. हे सगळं मी प्रशांत दामले आणि मंगेश कदम यांच्याकडून शिकले. मी माझी एक्स्ट्रीम एनर्जी लावल्यानंतर प्रशांतदादांच्या सहज अभिनयापर्यंत पोहोचायचे. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. ‘मैं और तुम’ हे नाटक मिळण्यात केदार शिंदे हे दुवा होते. ‘सही रे सही’चं हिंदीत रूपांतरित झालेलं ‘राजू, राजा राम और मैं’ हे नाटक शर्मन करत होता. खरंतर केदारदादासोबत मी कधीच काम केलं नाही. तरी त्याने मला फोन करून शर्मन जोशी एक नाटक करतोय त्यासाठी त्याला तुझ्याशी बोलायचं असं सांगितलं. त्यानंतर मी आणि शर्मन जोशी फोनवर बोललो. तेव्हाच आम्ही एकत्र काम करतोय हे ठरलं. इतकं सहज होतं ते.
शर्मन जोशीसोबतचं तुझं टय़ुनिंग कसं आहे?
शर्मन बॉलीवूडमध्ये काम करत असला तरी त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत. तो स्टार आहे, म्हणून तो उशिरा येतो, मला वाट बघत बसावं लागतं असं आजवर एकदाही झालं नाही. कोणताही बदल करायचा असेल तर त्याबद्दल तो माझंही मत विचारतो. मी हिंदी रंगभूमीवर सहज वावरू लागले ते शर्मनमुळेच. मी हिंदीत कधीच काम केलं नव्हतं. आपलं हिंदी थोडं मराठीकडे झुकणारं असतं. हे मला टाळायचं होतं. त्याने त्याच्या आवाजात माझा प्रत्येक संवाद रेकॉर्ड करून त्या व्हॉइस नोट्स मला पाठवल्या. मी त्या व्हॉइस नोट्स सतत ऐकायचे. प्रयोगादरम्यान आमच्यातली मैत्री खुलत गेली.
हिंदी रंगभूमीवर इतर अनेक अभिनेत्री असताना शर्मनने तुझीच निवड का केली असावी?
हिंदी सिनेसृष्टीला मराठी कलाकारांबद्दल खूप आदर आहे. त्यांचं मराठी सिनेसृष्टीवर व्यवस्थित लक्ष असतं. त्यांना मराठी कलाकारांसोबत काम करायचं असतं. केदारदादाने माझं नाव शर्मनला सुचवल्यानंतर त्याने यूटय़ूबवर जाऊन ‘होणार सून..’चे एपिसोड्स बघितले. माझी इतरही कामं बघितली. त्याने माझी लोकप्रियता, फॉलोअर्स हे सगळं तपासलं. कधी कधी मला तो गमतीने म्हणतोही की ‘मी तुझी सगळी हिस्ट्री काढली होती.’
मालिका, नाटकाचे प्रयोग, तालीम हे सगळं कसं जमवलंस?
‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक करताना एक गोष्ट मी कायम डोक्यात ठेवली होती. प्रशांत दामले यांच्यासोबत तितक्याच ताकदीने उभं राहायचं. त्यासाठी तेवढी मी मेहनत घेत होते. त्याच वेळी मालिकाही सुरू होती. मालिकेच्या दोन सीनमध्ये मिळणाऱ्या वेळेतही मी नाटकाचं स्क्रिप्ट घेऊन बसायचे. मालिका आणि नाटक दोन्ही एकाच वेळी करताना कोणत्याच निर्मात्याचं आपल्यामुळे नुकसात होईल अशी परिस्थिती येऊ द्यायची नाही, असं मी ठरवलं होतं. मी मालिकेचं शूटिंग टाळणार नाही किंवा सवलत घेणार नाही असं मी मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांना सांगितलं होतं. मी सकाळी साडेसहा वाजता सेटवर पोहोचायचे. संध्याकाळी सातपर्यंत शूटिंग करायचे. तिथून विलेपाल्र्याला नाटकाच्या तालमीसाठी जायचे. रात्री अकरापर्यंत तालीम करायचे. तिथून घरी आल्यावर पुन्हा सकाळी साडेसहा वाजता मालिकेच्या सेटवर हजर असायचे. सकारात्मक राहिलं आणि मेहनत घेण्याची तयारी असली की सगळं शक्य होतं.
तू मालिका, नाटक, सिनेमा या तिन्हीत प्रस्थापित होतेयस. हे वर्तुळ पूर्ण होतंय असं म्हणूया का?
‘होणार सून..’, ‘कार्टी..’, ‘मैं और तुम’ आणि ‘ती सध्या..’ या चार कलाकृतींमुळे माझा करिअरचा चौकोन पूर्ण झालाय. आता यापुढे माझ्यातल्या कलाकाराची खरी परीक्षा असणार आहे.
कलाकारांनी इव्हेंट्स करणं ही सध्याच्या काळाजी गरज आहे असं वाटतं का?
नऊ ते पाच नोकरी करणारे दिवाळीमध्ये बोनस घेतात ना, तसंच आमचंही आहे. तो आमच्या कामातला बोनस आहे. तो प्रत्येक वेळी मिळत नाही. कामातलाच भाग म्हणून त्याकडे बघावं. त्यात मला काही चुकीचं नाही वाटत.
कलाकाराच्या खासगी आयुष्यातल्या चांगल्यावाईट गोष्टींच्या बातम्या चवीने चघळल्या जातात. मधल्या काळात तुझ्याबाबतीतही असं झालं. त्या सगळ्याला तू कसं तोंड दिलंस?
माझ्या खाजगी आयुष्यातला मधला काळ अस्वस्थ करणारा होता. पण मी त्यात कधीच अडकून पडले नाही. त्यावेळी मी खूप शांत राहिले. त्यावेळी अनेक प्रतिक्रिया माझ्यापर्यंत यायच्या. पण मला वाटतं, प्रेक्षकांनी कौतुक केलेलं आम्हाला आवडतं मग नकारात्मक गोष्टींबद्दल ते चर्चा करत असतील तर तेही स्वीकारता यायला हवं. खूप कठीण काळ होता तो. पण मी खचले नाही. कोणत्याच गोष्टीवर व्यक्तही झाले नाही. स्वत:ला शांत ठेवणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. मी माझा संयम वाढवत होते. मी स्वत:ला नेहमी सांगत आले आहे की आयुष्यात एकमेव गोष्ट कायमस्वरूपी असते ती म्हणजे बदल. आजची गोष्ट उद्या बदलणार आहे. त्यामुळे खचून आपण चुकीचे आहोत असं सतत म्हणण्यापेक्षा शांतपणे आपलं काम करत राहणं हा पर्याय मी निवडला. कानगोष्टीच्या खेळात सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर आपणच आपले शत्रू बनू शकतो आणि आपल्याकडूनच आणखी दोन शब्द लोकांना मिळू शकतात. केव्हातरी हा खेळ संपणार आहे, पुन्हा एक नवी सुरुवात होणार आहे, हे मला माहीत होतं. त्यामुळे शांत राहिलेलंच योग्य आहे. कोणी मुद्दाम चुका करत नाही. कधी कधी एखादं नातं दीर्घकाळ टिकू शकत नाही. ज्या गोष्टी घडतात त्या सकारात्मकरीत्या स्वीकारून पुढे जायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला माफ करायला हवं. मी हे केलंच नसतं, तर ते झालंच नसतं असा विचार करणं थांबावावं. त्या क्षणी प्रामाणिक भावनेने, मनापासून केलेल्या गोष्टींचं वाईट वाटून घ्यायचं नाही. त्याचं पुढे जे झालं ते आपल्या हातात नसतं. घरच्यांचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा पाठिंबा असतो. हे सगळं मला त्या कठीण प्रसंगामुळे समजलं, जाणवलं आणि मी कणखर बनले. हातातून निसटून जाणाऱ्या गोष्टी आणि शाश्वत गोष्टी यामध्ये आपण शाश्वत गोष्टींचा विचार करायला हवा. मला त्या क्षणी असं वाटत होतं की माझं काम ही माझ्यासाठी शाश्वत गोष्ट आहे. माझ्या प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा घर करण्यासाठी, स्वत:ला खंबीर ठेवण्यासाठी, माझ्या माणसांना मी नीट आहे हे सांगण्यासाठी आणि सव्र्हाइव्ह होण्यासाठी शांत राहणं आवश्यक होतं. मी तेव्हा शांत राहिले नसते तर मी यापैकी कोणतीच गोष्ट करू शकले नसते. मग मी या सगळ्या चक्रात कुठेतरी हरवून गेले असते. त्यानंतर एक होती तेजश्री प्रधान असं काहीतरी माझ्या नावावर राहिलं असतं. त्यापेक्षा मी शांतपणे माझं काम करायचं ठरवलं. आज मी एका नव्या भूमिकेतून येतेय. आजही लोक तितकंच प्रेम देताहेत. कौतुक करताहेत, याचा आनंद वाटतो.
तुझ्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
मला माझ्या आईबाबांचं जास्त कौतुक वाटतं. मी त्या परिस्थितीशी सामना केलाच, पण ‘आमचा तुझ्यावर विश्वास आहे’ या आईबाबा, ताई-जिजू आणि मित्रपरिवाराच्या भूमिकेने मला खूप धीर दिला. त्यांच्यापर्यंतही लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचल्या असतीलच, पण त्यांनी मला त्याची कधी कल्पनाच येऊ दिली नाही. कठीण प्रसंगात हक्काची माणसं सोबत राहून ‘तुझ्यावर आमचा विश्वास आहे’ असं म्हणतात; तेव्हा कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडता येतं. मला माझ्या माणसांसाठी जगायचंय हे मला जास्त महत्त्वाचं वाटू लागलं.
तुझ्या मते रिलेशनशिपची व्याख्या काय?
कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रचंड आदरअसायला हवा. एकमेकांना स्पेस दिली जावी. आमच्या नात्याची स्पेस जपा, असं आजूबाजूच्या माणसांना सांगता यायला हवं. कधी कधी एखादं नातं तुटताना त्यामागे होणारा मतांचा भडिमार त्या नात्यातली दरी आणखी वाढवतो. दोन व्यक्तींनी एकत्र घालवलेल्या चांगल्या क्षणांचा आदर ठेवून, शांतपणे, मनात कोणतंही किल्मिष न ठेवता एकमेकांना निरोप दिला तर पुढे कधीही, कोणत्याही कारणाने त्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्याच तर त्यांना ते अवघड जाणार नाही.
पुढचे प्रोजेक्ट्स काय?
‘ती सध्या..’ नंतर दुसऱ्या सिनेमाचं काम सुरू होतंय. एका हिंदी सिनेमाच्या प्रयत्नात आहे. कदाचित या वर्षी त्याची घोषणा होईल. मला आणखी एक मराठी नाटक करायची मनापासून इच्छा आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11