29 January 2020

News Flash

ट्रॅव्हलॉग : तुम्हीच व्हा तुमचे टुर ऑपरेटर

पर्यटनाला जाताना टुर कंपन्यांचा पर्याय चांगला असला तरी टुरभर त्यांच्या तालावर नाचत राहावं लागतं. आपल्याला हवं ते काहीच करता येत नाही. त्याऐवजी आपली आपण टुर

| March 6, 2015 01:05 am

पर्यटनाला जाताना टुर कंपन्यांचा पर्याय चांगला असला तरी टुरभर त्यांच्या तालावर नाचत राहावं लागतं. आपल्याला हवं ते काहीच करता येत नाही. त्याऐवजी आपली आपण टुर ठरवून पार पाडण्यासंबंधीचे अनुभवाचे बोल-

पर्यटनाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. याचा पुरेपूर फायदा घेत टुर कंपन्या वेगवेगळे फंडे वापरून पर्यटकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशाच टुर कंपन्यांच्या जाहिरातीला भुलून मीही त्यांच्या जाळ्यात एकदोनदा नव्हे, तर चक्क तीन वेळा फसलो. सर्वप्रथम मी सहकुटुंब काश्मीरला गेलो, त्या वेळची गोष्ट आहे. पर्यटकांपैकी कुणी रेल्वेने, तर कुणी विमानाने श्रीनगरला येऊन पोहोचले. मुंबई ते श्रीनगर या प्रवासाने सारेच थकलेले असल्याने पहिल्या दिवशी विश्रांती दिली गेली आणि टुरचा पहिला दिवस संपला. संध्याकाळी सगळ्यांची ओळख परेड झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सांगितला गेला आणि बरोबर सकाळी सात वाजता ब्रेकफास्टला हजर व्हावेच लागले. काश्मीरमधल्या त्या थंडीत माझी लहान मुले एवढय़ा सकाळी उठायला तयार होईनात. शेवटी जबरदस्तीने उठवून सकाळी सातच्या आत त्यांनाही तयार केले. ब्रेकफास्ट केल्यानंतर आमची टुर सुरू झाली. टुर ऑपरेटरने ठरवून दिलेल्या वेळेतच प्रत्येक ठिकाण पाहावे लागे. त्यामुळे भोज्ज्याला हात लावण्याचाच कार्यक्रम होत होता. मनसोक्त फिरणे काही झाले नाही. पण नाइलाज होता. मध्ये एके दिवशी त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी शॉपिंगला नेले, हाही दिवस वायाच गेला.
दुसऱ्या वेळेला नैनितालच्या टुरसाठी मी टुर कंपनीच बदलली. त्याही टुर कंपनीत थोडय़ाफार फरकाने तोच अनुभव मिळाला. या टुर कंपनीने शेवटच्या दिवशी तर कहरच केला. एका दिवसाचे हॉटेलचे भाडे वाचविण्यासाठी चक्क रात्री अडीच वाजता उठवले व परतीचा प्रवास सुरू करण्यास आम्हाला भाग पाडून दुसऱ्या दिवशी फ्रेश होण्याचीसुद्धा संधी न देता दुपारच्या सुमारास चार तास अगोदरच रेल्वे स्टेशनवर ड्रॉप केले. खरेतर रात्री जेवण झाल्यावर लगेच प्रवास सुरू करता आला असता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आमचा हॉटेलमध्ये मुक्काम झाला असता. दुसऱ्या दिवसाचे हॉटेलचे भाडे वाचविण्यासाठी हा सारा खटाटोप केला गेला, हे नंतर आम्हाला समजले. हे मला आलेले अनुभव थोडय़ाफार फरकाने अनेकांना अजूनही येतात. पर्यटन कंपन्यांचे एक बरे असते. सारे पैसे पर्यटकांकडून आगाऊ घेऊन पर्यटकांना त्यांचे गुलाम बनवितात. टुर संपल्यानंतर रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर पर्यटकांना ड्रॉप केल्यानंतर त्यांची जबाबदारी संपते.
दोन वेळचा वेगवेगळ्या टुर कंपन्यांचा अनुभव पाठीशी असल्याने केरळ-कन्याकुमारीच्या टुरसाठी अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेल्या एका कंपनीची निवड मी टुरसाठी केली. सुरुवातीला ते आमच्याशी सौजन्यपूर्ण वागले. पहिले काही दिवस चांगल्या हॉटेल्समध्ये त्यांनी आमच्या निवासाची व्यवस्थाही केली. परंतु कन्याकुमारीला आमची टुर संपत आली त्या वेळी मात्र ऐन वेळी ठरलेले हॉटेल बदलून एकदम थर्ड क्लास हॉटेलमध्ये आमच्या निवासाची व्यवस्था केली गेली. त्या हॉटेलमध्ये बाथरूममध्ये तर दरुगधी यायचीच आणि रूममध्येसुद्धा. त्याबाबतचे कारण सांगताना सांगितले की, अगोदर ठरविलेले हॉटेलच उपलब्ध झाले नाही, म्हणून या हॉटेलमध्ये ऐन वेळी व्यवस्था केली. शेवटी आम्ही त्यांच्याबरोबर वाद घातल्यामुळे त्यांनी आम्हाला काही रक्कम परत देण्याचे मान्य केले. पण झालेला मनस्ताप थोडाच भरून निघणार होता. असे सारे अनुभव टुर कंपन्यांमार्फत प्रवास करताना मला आले. त्यामुळे मी आता टुर कंपनीमार्फत पर्यटनाला जाण्याचे टाळतो व स्वत:च्या टुरचे स्वत:च नियोजन करतो.
पुढच्या खेपेला टुर कंपन्यांच्या भानगडीत न पडता कोणतीही रूपरेषा न ठरविता महाराष्ट्राचा व भारताचा नकाशा सोबत घेऊन कोकण किनारपट्टीने कुटुंबासहित भटकंतीला निघालो. निघताना मी मनाशी ठरविले की कोकण किनारपट्टी मार्गाने जात-जात पुढे फोंडाघाटमार्गे कोल्हापुरातल्या राधानगरीतून निघून बंगलोर हायवेला लागत अगदी बंगलोर-म्हैसूर-उटीपर्यंतचा प्रवास करावा. त्याप्रमाणे मुंबईहून निघालो. पनवेलमार्गे जात पालीच्या महागणपतीचे दर्शन घेतले आणि प्रवासाचा श्रीगणेशा केला. तिथून निघून आम्ही मग मुरुड-जंजिरा किल्ला पाहिला आणि मुक्काम हरिहरेश्वर या ठिकाणी करण्याचे ठरवून आम्ही रात्री नऊच्या सुमारास हरिहरेश्वरमध्ये प्रवेश केला. आम्ही तिथे आलो त्या दिवशी नेमका शनिवार असल्याने हरिहरेश्वरमधली सगळीच्या सगळी हॉटेल्स अगदी हाऊसफुल्ल झालेली होती. सोबत पत्नी व दोन लहान मुले होती. हरिहरेश्वरमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच एमटीडीसीच्या निवारा व न्याहारीचा बोर्ड पाहिल्याचे माझ्या लक्षात आल्याने आम्ही त्या एमटीडीसीच्या निवाऱ्याजवळ आलो. त्या ठिकाणी चाळवजा एक खोली आम्हाला रात्रीच्या निवाऱ्याकरिता उपलब्ध झाली. परका मुलूख, बाहेर किर्र्र अंधार. त्यात एमटीडीसीकडून सोय झाली म्हणून मी खूश होतो. जेवून गादीवर अंग टाकले. डोक्यावरून काहीतरी उडाल्याचे दिसले. मान वळवून पाहिले तर डासांबरोबरच झुरळ महाराजही चक्क आमच्या सोबतीला होते. झुरळाला बघून पत्नी तर किंचाळलीच. त्याला कसेबसे बाहेर पिटाळून चादर अंगावर घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. झोप काही येईना. तोच छताकडे लक्ष गेले. एक पाल सर सर करत छताखालून चालली होती. खरे ती तिच्या मार्गाने चालली होती. परंतु, जीव माझा धडधडत होता. जर का ती पत्नीच्या किंवा मुलांच्या अंगावर पडली तर मात्र माझी खैर नव्हती. त्या रात्री खोलीतला बल्ब चालू ठेवूनच आम्ही ती रात्र कशीबशी काढली. तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आला की आजही एमटीडीसीच्या निवाऱ्याचीच भीती वाटायला लागते.
तद्नंतरच्या प्रवासात घासाघीस करून अगदी २० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट घेऊन चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. प्रवास करताना मनाला वाटेल तिथे आम्ही थांबत होतो. रस्त्यात लागतील ती ठिकाणे आवर्जून पाहत होतो. अनेक वेळा शेतातल्या झाडाखाली बसून वनभोजनाचा आनंदही घेतला. दुपारच्या उन्हात भयाण किल्ल्यामध्येही भटकलो. समुद्रकिनाराही मनसोक्त अनुभवला. तसेच पुरातन मंदिरात जाऊन देवासमोर आम्हाला नतमस्तकही होता आले. कधी करवंदे, कधी कैऱ्या, तर कधी कलिंगडाची मजा घेत घेत आम्ही ती टुर एन्जॉय केली. कारण आम्हाला घडय़ाळाच्या पाठीमागे पळविणारे व चला चला, आवरा म्हणणारेही कोणी नव्हते. प्रवास करताना गावखेडय़ातील समाजजीवनही आम्हाला अनुभवता आले. ही मौजमजा आतापर्यंत टुर कंपन्यांमार्फत केलेल्या कोणत्याही टुरमध्ये अनुभवता आली नव्हती.
आपण आपल्या पद्धतीने प्रवास करायचे ठरवून भटकंतीला निघालो की काही अडचणी जरूर येतात. पण आपल्याला आपल्या मनाप्रमाणे भटकंती करता येते. गेल्या कैक वर्षांत अशा पद्धतीने मी भारतातील अनेक राज्यांत सहकुटुंब तसेच माझ्या नऊ मित्रांच्या ग्रुपसोबत गेलो आहे. ज्या वेळी कोणत्याही पायाभूत तसेच ऑनलाइन बुकिंगच्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, अशा जमान्यात स्वत: त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हॉटेल वगैरे धुंडाळून स्वत:ची सोय स्वत: करून घेऊन आपल्या मर्जीने आम्ही आनंददायी भटकंती केली आहे. त्यामुळे ज्यांना स्वत:च्या मनाप्रमाणे भटकंती करायची आहे, अशांनी स्वत: नियोजन करून पर्यटनास जाण्यास हरकत नाही. खरेतर आता सोयीसुविधांत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक उत्तमोत्तम हॉटेल्स जागोजागी आहेत. एका क्लिकवर तुमचे हॉटेलचे, रेल्वेचे, विमानाचे, बसचे बुकिंग तुम्हाला घरबसल्या करता येते. सुट्टीचे दिवस वगळून हॉटेलचे बुकिंग केले तर ते आपणास स्वस्तही पडते. किमान महिना-दोन महिने अगोदर विमानाची तिकिटे घेतली तर तीदेखील स्वस्त पडतात. स्वत:च्या गाडीने भटकंती करायची असेल तर अजून उत्तम. कारण आपल्याला मनाला वाटेल तिथे थांबत थांबत प्रवास करत पर्यटनाचा आनंद लुटता येतो.
ज्या वेळी आपण आपल्या वाहनातून पर्यटनासाठी अनोळखी राज्यातून प्रवास करतो त्या वेळी गुगलमॅपचे तसेच जीपीएसचे साहाय्य घेतल्यास आपणास रस्ता माहीत नसला तरीही ठरविलेल्या ठिकाणी आपणास विनासायास पोहोचता येते. गुगलमॅपवर तर इतक्या सोयी उपलब्ध आहेत की तुम्ही जीपीएसद्वारे तुमचा मार्ग ठरवू शकता. तसेच ठरविलेल्या ठिकाणी जायला कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत, त्या रस्त्याने जायला आपणाला किती वेळ लागेल, हाही बारीकसारीक तपशील आपण गुगलमॅपद्वारे जाणून घेऊ शकतो. तसेच कोणत्या गावात राहण्याच्या सोयी उपलब्ध आहेत, त्या त्या ठिकाणी कोणकोणती पर्यटनस्थळे आहेत, हेही आपणास एका क्लिकवर समजते. काही राज्यांतून प्रवास करताना तिथले स्थानिक गाइडही आपणास प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यास मदत करतात. त्यांच्या मदतीने आपले पर्यटन अजून सुसह्य़ होते. याचा अनुभव मी कैक वेळेला घेतला आहे. बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी जातो, तिथले किल्ले, तिथली प्राचीन मंदिरे, तिथली प्रेक्षणीय स्थळे नुसतीच पाहतो. पण हे सारं पाहण्यासाठी आपण स्थानिक गाइड सोबत घेतला तर आपणास त्या पर्यटन स्थळामागच्या इतिहासात डोकावता येते. तो क्षण, त्या काळात जाऊन प्रत्यक्ष अनुभवता येतो. त्यामुळे आपले पर्यटन आनंददायी होऊन आपणास समाधान लाभते.
आजच्या आधुनिक जमान्यात फेसबुकसारख्या सोशल साइट्समधून वेगवेगळ्या राज्यांतील, देशातील, अनोळखी लोकांशी मैत्रीचा पूल निर्माण करून त्याचा उपयोगही आपणास पर्यटनासाठी करता येतो. हा पर्यटनाचा फंडा दिवसेंदिवस तरुणांमध्ये लोकप्रिय होताना दिसतो. अशा प्रकारे केलेल्या पर्यटनाद्वारे तेथील जनजीवनही समजून घेता येऊ शकते, जवळून पाहता येऊ शकते, हेही मी अनुभवले आहे. ज्यांना अशी मैत्री करायला आवडते, ज्यांना एकटय़ाने पर्यटन करायला आवडते, अशांनी या पर्यायाचादेखील विचार करावा. याद्वारे आपणास अगदी अत्यल्प खर्चात पर्यटन करता येते. तसेच ज्या कुणाला स्वत:च्या पद्धतीने पर्यटन करायचे आहे त्यांच्यासाठी काही टुर ऑपरेटर, टुर कंपन्या किंवा काही टुर अ‍ॅरेंजर आपल्या स्वत:च्या मनाप्रमाणे आपली टुर अ‍ॅरेंज करून देतात. अशा प्रकारे टुर अ‍ॅरेंजरमार्फत टुर अ‍ॅरेंज करून आम्ही सारे मित्र आता दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांत गेल्या कैक वर्षांपासून अगदी अल्प खर्चात आनंददायी भटकंती करीत आहोत.
टुर अ‍ॅरेंजर सव्‍‌र्हिस चार्जेस घेऊन आपल्याला हव्या तशा टुर अ‍ॅरेंज करून देतात. अशा वेळी काय काय पाहायचे हे आपणास अगोदर ठरवावे लागते. मग ते आपण सांगू त्या पद्धतीने आपली टुर अ‍ॅरेंज करून देतात. अगदी हॉटेलचे, बसचे, रेल्वेचे व विमानाचे रिझव्‍‌र्हेशनसुद्धा करून देतात. अशा टुर अ‍ॅरेंजरकडे आपण हॉटेल रिझव्‍‌र्हेशन वगैरे बाबी सोपविल्या तर आपली तेवढी जबाबदारी कमी होते. तसेच मेक माय ट्रिपसारख्या अनेक साइट्सही आपल्या टुरचं नियोजन करून देऊन घसघशीत सवलतही देतात. सध्या लोकप्रिय होणारा दुसरा मार्ग म्हणजे आजच्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला स्वत:च्या टुरचे स्वत:लाच नियोजन करता येते. इंटरनेटवर पाहून तुम्ही तुमच्या हॉटेलचे बुकिंग स्वत:ही ऑनलाइन करू शकता. स्वत: केलेल्या ऑनलाइन बुकिंगचा एक तोटा म्हणजे तुम्हाला हॉटेल बुकिंगसाठी घासाघीस करता येत नाही. त्यामुळे तुमच्या पर्यटनाचा खर्च वाढतो. आजकाल सर्वच शहरांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आपणाला कुठे जायचे आहे, कधी जायचे आहे, आपण कोठे कोठे मुक्कामाला थांबणार आहोत, या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्याबाबतच्या सोयी-सुविधांची जर का ऑनलाइन खात्री करून घेऊन तुम्ही टुरला निघालात तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतरही तुम्हाला हॉटेलचे बुकिंग घासाघीस करून कमी खर्चात करता येते. स्वत: नियोजन करून गेलेल्या टुरमध्ये भन्नाट अनुभव मिळत असतात. असे अनुभव मिळवायचे असतील तर मळलेली वाट सोडून स्वत:च्या वाटेने, स्वत:च्या मनाने ठरवून पर्यटन केल्यास एका वेगळ्या विश्वात फिरून आल्याचे समाधान निश्चितच लाभते. पण त्यासाठी मात्र थोडे धाडस हे करावेच लागते.
धनराज खरटमल

First Published on March 6, 2015 1:05 am

Web Title: you can be your own tour operator
टॅग Paryatan
Next Stories
1 पर्यटन : ग्लेशिअर पार्कची अद्भुत सफर
2 कलाजाणीव
3 कलाजाणीव
Just Now!
X