News Flash

निकड..शाळा-पूर्व तयारीची!

यंदाच्या ‘असर- २०१९’ सर्वेक्षणातून ‘मुलांचा बौद्धिक विकास, बालशिक्षण आणि शाळा-पूर्व तयारी’ यासंदर्भातील बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत

(संग्रहित छायाचित्र)

 

स्मितीन ब्रीद

smitin@pratham.org

‘असर- २०१९’च्या ताज्या अहवालानुसार, पूर्व-प्राथमिक स्तरावरील मुलांच्या आकलनात अनेक त्रुटी व दोष आढळून आले आहेत. ते दूर करून औपचारिक शालेय शिक्षण सुरू होण्यापूर्वी मुलांचा सर्वागीण विकास कसा होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात विवेचन करणारा लेख. तसेच ‘असर’च्या सर्वेक्षण अहवालाची चिकित्सा करणारा लेख..

यंदाच्या ‘असर- २०१९’ सर्वेक्षणातून ‘मुलांचा बौद्धिक विकास, बालशिक्षण आणि शाळा-पूर्व तयारी’ यासंदर्भातील बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. यानिमित्ताने ‘मुलांचा सर्वागीण विकास आणि बालशिक्षण’ या गोष्टींना महत्त्व प्राप्त होऊन त्याविषयी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे. ‘असर- २०१९’च्या सर्वेक्षण अहवालानुसार, देशभरातील ९०% पेक्षा जास्त मुलांचं कोणत्या ना कोणत्या शैक्षणिक व्यवस्थेत नामांकन झालेलं असतं. महाराष्ट्रात पाच वर्षांखालील मुलं मोठय़ा प्रमाणात (७०% पेक्षा जास्त) अंगणवाडय़ांमध्ये जातात. देशातील इतर अनेक राज्यांच्या तुलनेत याबाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली आहे. इतर बऱ्याच राज्यांना अद्यापि हा टप्पादेखील गाठायचा आहे. म्हणूनच महाराष्ट्रात इतक्या मोठय़ा प्रमाणात जर मुलं अंगणवाडय़ांमध्ये येत असतील तर अंगणवाडय़ांच्या गुणवत्तेबद्दल आणि त्यांच्या योग्य शाळाप्रवेशाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.

सर्वेक्षणात मुलांच्या वयाप्रमाणे बौद्धिक क्षमतांमध्ये वाढ होताना दिसते. परंतु या मूलभूत क्षमता पूर्णपणे विकसित न होताच मुलं औपचारिक शाळेत प्रवेश करतात. त्यांची शाळा-पूर्व तयारी व्यवस्थित झालेली नसते आणि म्हणूनच त्यांचा पाया कच्चा राहतो. शिक्षणाच्या कायद्यानुसार, सहा वर्षांची मुलं इयत्ता पहिलीत प्रवेश करायला हवीत. परंतु देशभर प्रत्यक्षात स्थिती विभिन्न आहे. शाळाप्रवेशासंदर्भातील नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात मुलांचा शालेय प्रवेश मोठय़ा प्रमाणात योग्य तऱ्हेनं होताना आढळत असला तरी राज्यात इयत्ता पहिलीत ९.३% मुलं पाच वर्षांची आहेत आणि सहा वर्षांची १८% मुलं इयत्ता दुसरी व तिसरीमध्ये शिकत आहेत. याचा परिणाम त्या मुलांच्या शिकण्यावर होतो आणि ती मुलं पुढे जाऊन बऱ्याचदा अभ्यासात मागे पडतात. इयत्तेप्रमाणे आणि मुलांच्या वयाप्रमाणे मूलभूत क्षमतांमध्येदेखील (वाचन आणि गणित) वाढ होताना दिसते. परंतु इयत्ता दुसरीच्या शेवटापर्यंत निम्म्यापेक्षा जास्त मुलं मागे पडताना दिसतात. त्यामुळे पुढील इयत्तांमध्ये मुलं अभ्यासात मागे पडलेली आढळतात. ‘असर- २०१८’च्या अहवालाप्रमाणे, महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीतील ३३.६% मुलांना इयत्ता दुसरीच्या स्तराचं वाचन करता येत नसल्याचं आढळून आलं होतं.

लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शासकीय अंगणवाडी व्यवस्थेचं प्राथमिक लक्ष मुलांचं आरोग्य आणि पोषणाकडे अधिक आहे- जे अगदी योग्यदेखील आहे. परंतु या प्रक्रियेत ‘बालशिक्षणा’कडे, विशेषत: मुलांच्या बौद्धिक विकासाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. याकरता अद्याप बरंच काही करणं बाकी आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांचं याबाबतीत योग्य ते प्रशिक्षण आणि त्यांना नियमित मार्गदर्शन (handholding) करणं आवश्यक आहे.

खाजगीरीत्या चालविल्या जाणारी ‘प्री-स्कूल्स’ बऱ्याच ठिकाणी एक पर्याय म्हणून अस्तित्वात आहेत; परंतु त्यांची गुणवत्ता आणि न परवडणारी फी या बाबी अद्यापि आव्हानात्मक आहेत. तसंच ग्रामीण आणि शहरी भागांतील बऱ्याच कुटुंबांमध्ये पालकांनी मुलांशी योग्य प्रकारे कसं वागावं, मुलांना नेमकी कशी मदत करावी, याबद्दल त्यांना योग्य ती माहिती नसते. तसंच त्यांच्याकडे वेळेचादेखील अभाव असतो. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणात पालक आणि आजूबाजूच्या समुदायाचा सहभाग नसल्याने मुलांची योग्य ती वाढ, विकास आणि शाळा-पूर्व तयारी होत नाही. त्यातून मुलांना पुढे शिकण्यात अडचणी येतात आणि ती शालेय अभ्यासामध्ये मागे पडतात.

देशभरातील बालवाडय़ा आणि अंगणवाडय़ांमध्ये मुलांसमवेत काम करत असताना आम्हाला हे निश्चितच समजलं आहे की, मुलांचं पालनपोषण करणं, त्यांना आयुष्यासाठी आणि औपचारिक शालेय शिक्षण घेण्यासाठी तयार करणं, हे केवळ सरकार किंवा अंगणवाडय़ांचंच काम नाही, तर ही समाज आणि सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. बालशिक्षण कार्यक्रमामध्ये मुलांच्या बालशिक्षण आणि शाळा-पूर्व तयारीच्या प्रक्रियेमध्ये मातांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना आवश्यक ती मदत करणं गरजेचं आहे. तसंच मुलांना योग्य आहार देण्याच्या पद्धती, मूलभूत आरोग्य आणि सर्वागीण विकासाबद्दल मातांमध्ये जागरूकता निर्माण करणं, हेही आपलं कर्तव्य आहे. मुलांच्या विकासात त्यांचं ‘कुटुंब’ हा सर्वात पहिला आणि महत्त्वपूर्ण योगदान करणारा घटक असतो. मुलांचा सर्वागीण विकास आणि वाढीसाठी घरातील शिक्षणाचं वातावरण मोठं योगदान देऊ शकतं. एका चिनी म्हणीनुसार, ‘मूल वाढवण्यासाठी आणि घडवण्यासाठी संपूर्ण गावाची गरज असते.’ म्हणजेच या प्रक्रियेत सर्वाचीच भूमिका महत्त्वाची आहे. आतापर्यंत देशातील निरनिराळ्या राज्यांमधील सरकारांनी यासंदर्भात होणाऱ्या बदलांचा, मुलांच्या विकासाच्या सर्व क्षेत्रांचा आणि मुख्य म्हणजे बालविकास प्रक्रियेतील सर्व सहभागीदारांचा विचार न करता व्यवस्था आणि प्रक्रिया तयार केल्या आहेत. मुलांचं योग्य प्रकारे पालनपोषण करण्यासाठी, दर्जेदार ‘अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट’साठी आपण एक चांगली परिसंस्था (इकोसिस्टीम) निर्माण करणं गरजेचं आहे.

लहान मुलांच्या सोबत आई हीच जास्तीत जास्त वेळ असते. त्यामुळे ती मुलांच्या विकासात दीर्घकालीन व प्रभावी भूमिका निभावत असते.  मुलांच्या पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचं काम एक आधारस्तंभ म्हणून ती करत असते. म्हणूनच ‘शाळा-तयारी’ची परिभाषा नीट, स्पष्ट आणि सोपी केली जावी; जेणेकरून लहान मुलांच्या प्री-स्कूल ते शाळेतल्या प्रवेशाचा (पहिली इयत्ता) प्रवास सोपा व्हावा. जर हे स्पष्टपणे परिभाषित केलं गेलं- प्रत्येकानं समजून घेण्याइतकं सोपं केलं गेलं तर प्रत्येक जण- विशेषत: मुलांच्या माता मुलांची शाळा-पूर्व तयारी समर्थपणे करू शकतील.

संपूर्ण देशभर आम्ही ‘प्रथम’ संस्थेतर्फे मातांसोबत जे काम करीत आहोत, त्यात आम्ही पाहिलं आहे की माता आपल्या मुलांसमवेत अर्थपूर्ण कृती करू शकतात. विशेषत: मुलांच्या शाळा-पूर्व तयारीच्या कौशल्यांवर त्या सहज काम करू शकतात. त्याकरता त्यांना फक्त काही प्रात्यक्षिकं करून दाखवावी लागतात, त्यांच्या छोटय़ा गटांत सामूहिक चर्चा घडवून आणाव्या लागतात, छोटय़ा व्हिडीओंद्वारे सोप्या कल्पना त्यांच्यात रुजवाव्या लागतात. या प्रक्रियेत मुलं, पालक, अंगणवाडी, शाळा आणि अभ्यासक्रम यांच्यातील दरी तोडण्यासाठी ‘डिजिटल तंत्रज्ञान’ एक सक्षम साधन आणि प्रभावी दुवा म्हणून कार्य करताना आढळून आलं आहे. बालविकास ही एक सतत व संचयित प्रक्रिया आहे. म्हणूनच मुलांना योग्य अनुभव देणं आणि समाजात शिकण्याचं वातावरण तयार करणं आवश्यक आहे. त्याकरता अंगणवाडय़ांमध्ये मातांना बोलावणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत नियमित बठका आणि वैयक्तिक गृहभेटी आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. त्यांना वारंवार तसंच वेळोवेळी माहिती पुरविली गेली पाहिजे.

देशातील निरनिराळ्या भागांतील मातांसोबत जे काम आम्ही सध्या करीत आहोत, त्या अनुभवाच्या आधारे आणि आम्ही संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, आज अंगणवाडय़ांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या माता या साधारणपणे २० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यातील बहुतेक मातांनी किमान इयत्ता पाचवीपर्यंत स्वत: शाळेत  शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे अशा माता किमान पाचवीपर्यंत आपल्या मुलांना शिकण्यात मदत करू शकतात. मुलांना गोष्टी सांगू शकतात, मुलांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करू शकतात. त्यामुळे आम्ही जिथे जिथे लहान मुलांसोबत काम करत आहोत, तिथे तिथे आम्ही त्यांच्या पाडय़ांपर्यंत जाऊन मातांसोबत लहान गटांत काम करतो. आम्हाला मातांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचे मुलांवर होणारे चांगले परिणामही दिसून येत आहेत. मातांना छोटय़ा छोटय़ा गटांमध्ये भेटल्याने त्या एकमेकींना चांगलं सहकार्य व पाठबळ देताना दिसतात. हे लहान गट मातांमध्ये ‘स्वत:च स्वत:ला मदत’ (Self-Help) करण्याची सवय लावून घेत आहेत.

मुलांच्या विकासामध्ये अधिक सक्रिय भूमिका निभावण्यासाठी, बालविकासाचा दर सुधारण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाकरता घरगुती वातावरण अनुकूल बनवण्यासाठी मातेला सक्षम करणे अत्यंत गरजेचं आहे. अशा सक्रिय माता अंगणवाडीतदेखील मुलांच्या विकासात आणि बालशिक्षणात मदत करू शकतात.

या प्रक्रियेत समुदायातील इतर घटकांनाही सहभागी करून घेणं अत्यावश्यक आहे. बालपणातच जर शिक्षणाचा पाया मजबूत केला गेला तर त्याचे खूप चांगले परिणाम पुढे होतात. म्हणूनच बालशिक्षण आणि मुलांच्या विकासात प्रयत्न, वेळ आणि संसाधनांची गुंतवणूक वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासोबतच यासंदर्भात निरंतर संशोधन आणि मूल्यांकनदेखील होणं गरजेचं आहे.

‘असर- २०१९’मधील महत्त्वाचे निष्कर्ष

देशभरात ९०% पेक्षा जास्त मुलं (४ ते ८ वयोगट) ही कोणत्या ना कोणत्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेली आहेत. पाच वर्षांची ७०% मुलं प्री-स्कूल्समध्ये आहेत. (उदा. अंगणवाडी, सरकारी पूर्व- प्राथमिक वर्ग आणि खाजगी प्री-स्कूल्स) परंतु २१.६% मुलं इयत्ता पहिलीत दाखल झाली आहेत आणि ४.५% मुलं इयत्ता दुसरीत शिकत असल्याचं आढळून आलं आहे.

शिक्षण कायद्यानुसार, इयत्ता पहिलीत सहा वर्षांच्या मुलांनी प्रवेश करणं अपेक्षित असलं तरी प्रत्यक्षात सर्वत्र वेगवेगळी स्थिती आहे. महाराष्ट्रात ८७.२% मुलं अंगणवाडी व खाजगी प्री-स्कूल्समध्ये जातात. मात्र, पाच वर्षांची ११.३% मुलं इयत्ता पहिलीत शिकताना आढळून आली, ही चिंताजनक बाब होय.

यंदाच्या सर्वेक्षणात ४ ते ८ वयोगटातील मुलांचा बौद्धिक विकास आणि त्यांची शाळा-पूर्व तयारी कितपत झालेली आहे, हे तपासण्यात आले. त्यानुसार पाच वर्षांच्या ७०% मुलांना वस्तूंचं रंगानुसार वर्गीकरण करता आलं, तर सोपं ‘पझल’ जोडणं ही कृती ३८.१% मुलांना करता आली. ‘वस्तूंच्या आकारानुसार क्रम लावण्याची कृती ४३.९% मुलांना करता आली. या साऱ्या आकडेवारीतून असं दिसून येतं की, मुलांची अपेक्षित पूर्वतयारी न होताच ती औपचारिक शिक्षणाकरता शाळेत प्रवेश करत आहेत. याचा परिणाम त्यांच्या पुढील शिक्षणावर होतो आणि ती मोठय़ा प्रमाणावर अभ्यासात मागे पडताना दिसतात.

शिवाय जी मुलं लवकर- म्हणजे वयाच्या सहा वर्षांच्या आतच पहिलीत आहेत, त्यांच्यापैकी ५१.९% मुलंच अंक ओळखू शकली. तर ज्यांनी वयाची सहा वर्षें पूर्ण केलेली आहेत आणि पहिलीत प्रवेश केला आहे, अशांपैकी ७४% मुलांना अंकओळख असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं. यावरून हे स्पष्ट होतं की, योग्य वयात शाळाप्रवेश झाला तर त्याचा खूप उपयोग होतो. परंतु योग्य पूर्वतयारीविना अल्प वयात शाळेत प्रवेश घेतला तर त्यामुळे मुलांचं नुकसान होऊ  शकतं.

ही आकडेवारी आणि या क्षेत्रातील अनुभवावरून हेच दिसून आलं की, लहान मुलांची पायाभूत तयारी मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु शाळा-पूर्व तयारी म्हणजे केवळ अंक व अक्षरओळख (विशेषत: ABCD वगैरे) इतकंच नसतं, ही गोष्ट सर्वानी (पालक, शिक्षक, प्रशासक) समजून घ्यायला हवी. त्यात इतरही बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी येतात. त्यात मुलांचा बौद्धिक विकास, सामाजिक-भावनिक तयारी, वाचन-लेखनाची आवड निर्माण होणं इत्यादीचा समावेश होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:28 am

Web Title: article treating asars survey report abn 97
Next Stories
1 ‘पूर्व-प्राथमिक’चेही कंत्राटीकरण?
2 हास्य आणि भाष्य : बाळासाहेबांची ‘जत्रा’
3 इतिहासाचे चष्मे : जादुई स्मृतींचे वास्तव
Just Now!
X