21 October 2020

News Flash

अंधारातला नट

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली.

| April 12, 2015 12:18 pm

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली. बंगाली भाषेतलं ‘गंभिरा-गंभिरा’ हे लोककलावंताची कैफियत मांडणारं नाटक, नेपाळी कलावंतांनी सादर केलेलं ‘राशोमान’, अमेरिकन रंगकर्मीनी सादर केलेलं नाटककार युजिन ओनिलच्या फक्त रंगसूचनाचं अफलातून सादरीकरण. या महोत्सवात अल्बर्ट कामूचं ‘कॅलिगुला’ नावाचं एक lok01नाटक बंगाली भाषेत सादर झालं. या नाटकात राजाची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या बंगाली नटानं सगळय़ाचंच लक्ष वेधून घेतलं. कितीतरी दिवसांनी असा ताकदीचा नट पाहायला मिळाला. चांगल्या नटातील ऊर्जा लक्षात आली. पडदा उघडून बंद होईपर्यंत या नटानं संपूर्ण रंगमंच ताब्यात घेतलेला होता. एखाद्या खोपीत वारा घुसतो आणि खोपीचं छप्पर उडवून नेतो, तसं गौतम हलधर नावाच्या या बंगाली नटात पात्र घुसलं आणि तो रंगमंचावर पिसासारखा हलका होऊन तरंगत होता.
प्रयोग संपल्यावर या नटाशी बोलताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. त्या गोष्टीचा या नाटय़प्रयोगाशी काहीही संबंध नव्हता. तर या नटाच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रचंड साधम्र्य असणारी एक व्यक्ती मला आठवू लागली. फक्त डोळय़ातील बुबुळांचा रंग थोडा वेगळा होता. बाकी जुळे भाऊच. दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ फाम्र्युल्यात चपखल बसणारी ही स्टोरी झाली असती. लहानपणी काही कारणांनी दोन भाऊ बिछडतात. एक बंगाली रंगभूमीवर मोठा नट होतो आणि दुसरा रात्री गस्त घालणारा गुरखा होतो. योगायोगाने रात्री नाटकाचा प्रयोग करून नशेत परतणाऱ्या नटाला गुरखा अडवतो. त्यांची भांडणं होतात. प्रचंड मारामारी होते. दोघेही जखमी होतात. या झटापटीत नटाला गुरख्याच्या हातावर गोंदलेलं चिन्ह दिसतं. नट थबकतो. कारण त्याच्याही हातावर असंच गोंदलेलं चिन्ह असतं. अशा प्रकारे बिछडलेले भाऊ अनपेक्षितपणे भेटतात. कथानकात असं काही वळणही आणता आलं असतं. पण ‘कॅलिगुला’ नाटकातील नटाशी दिसण्यात साधम्र्य असणारी व्यक्ती गायब आहे आणि आता असा जुना ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ फाम्र्युला घेऊन कोण सिनेमा करेल, केला तर लोक पाहतील का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा त्या बंगाली नटाशी साधम्र्य असलेल्या व्यक्तीबद्दल बोलणं सोपं आहे.
साधारणपणे आठेक वर्षांपूर्वीची घटना आहे. छोटय़ा गावात फार साहित्यिक-सांस्कृतिक वातावरण नसतं. पण साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील माणसांना भाव मात्र असतो. कारण अशा गावात छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमात एखादा प्रमुख पाहुणा लागतो. कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते. तिथं भाषण करणारे, बोलणारे फार जण नसतात. अशावेळी लोकांसमोर उठून काहीतरी बोलणाराही सन्माननीय ठरतो. प्राध्यापक असणाऱ्यांना तर जगातल्या कुठल्याही विषयावर बोलण्याचा परवानाच असतो. अशा कार्यक्रमाकडे एक अनुभव म्हणूनच बघयला हवं.
असाच एक शेजारच्या खेडेगावातल्या नव्याने उघडणाऱ्या ग्रंथालयाचा कार्यक्रम. मित्र आणि मी कार्यक्रमाला निघालो. कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता म्हणून आम्ही वेळेत पोहोचण्याच्या हिशोबाने निघालो. वेळेत पोहोचलोही. अजून तर कार्यक्रम स्थळी एक-दोघांशिवाय कुणीही नव्हतं. कार्यक्रम रद्द झाला असावा असं वातावरण. सात वाजून गेल्यानंतर एकेकजण येऊ लागला. दरम्यान आम्हाला दोन-तीन वाडय़ात आग्रहाने चहापाण्याला नेण्यात आलं. आता चांगलं अंधारून आलं होतं. साडेआठ वाजले होते. एक टय़ुब व एका पेट्रोमॅक्सच्या प्रकाशयोजनेत कार्यक्रम सुरू होण्याचे चिन्ह दिसू लागले. शेवटी सव्वानऊ वाजता एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. स्वागत समारंभच अर्धा तास सुरू होता. तेच आठ-दहा हार पुन्हा परतून वेगवेगळय़ा गावकऱ्याच्या गळय़ात पडू लागले. उपस्थितांपैकी हार गळय़ात पडला नाही असे फार कमी लोक राहिले. नंतर सरपंचांचं लांबलचक भाषण. मधेच कुठल्या तरी स्थानिक पुढाऱ्याचा सत्कार राहिला, म्हणून थोडा गदारोळ. मग कार्यक्रम थांबवून राहिलेल्या उपेक्षित दोघांचा सत्कार. म्हणजे तेच हार नव्याने खूप ओव्हर्स टाकलेल्या लेदर बॉलची शिवण उसवून जावी तशी गळय़ात पडून-पडून या हारांची झालेली अवस्था. गावातल्या शाळेतील शिक्षकानेही हक्क दाखवत दोन मिनिटे म्हणून बराच वेळ भाषणकला दाखवली. शेरोशायरी सांगणाऱ्या निवेदकाने रात्री ११ वाजता ‘आता आपल्यासमोर येत आहेत शब्दप्रभु.’ अशी उद्घोषणा केली. तेव्हा कुठं आम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली. तेव्हा झोपेला आलेले गावकरी काढता पाय घेत होते. म्हणून आम्ही ग्रंथालयाला शुभेच्छा देऊन खाली बसलो. नंतर एका शेतात दालबाटीच्या जेवणाचा कार्यक्रम. जेवण उरकून आम्ही वापस निघालो तेव्हा रात्रीचा एक वाजलेला होता. मित्राने आमच्या कॉलनीत मला आणून सोडलं आणि तो घरी गेला. रात्रीचे पावणेदोन वाजलेले. मुख्य रस्त्यापासून तीन-चार मिनिटं आत पायी जावं लागायचं. मी निघालो. रात्र पेंगुळलेली. दूरवर कुठे तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज. बसस्थानकावरची स्पष्ट ऐकू येणारी उद्घोषणा. तेवढय़ात काठी आपटण्याचा आवाज. पाठोपाठ शिट्टी. काठीचा आवाज जवळ येऊ लागला. डोक्याला टोपी, हातात टॉर्च, काठी असा गुरखा समोर उभा राहिला. खांबाच्या लाईटखाली तो उभा. खांबावरच्या लाईटचा प्रकाश त्याच्यावरून निथळतोय. त्याने मला हटकले. ‘कहाँ जाते हो’ त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. आवाजात जरब होती. एक तर हा गस्त घालणारा गुरखा नवीन होता. जुना गुरखा गावाकडे निघून गेला आणि त्याच्या जागी हा नवा फिरू लागलाय. त्यामुळे त्याची माझी ओळख नसावी. रात्री-अपरात्री फिरणाऱ्याला हटकणं त्याचं कामच होतं. मीही माझ्या घराकडे निर्देश करीत ओळख दिली. त्यालाही ती पटली. हा गुरखा म्हणजे कुठल्याही हिंदी सिनेमाच्या सेटवर हिरो म्हणून उभं करावा असा देखणा. त्याला सहज छेडलं, ‘ये डंडा लेके इधर क्या घुमते हो, तुम तो फिल्मो मे जाना चाहिये.’ तो जरा लाजला, ‘नही शाबजी. हमको कोन फिलीम मे लेगा’ त्याला अभिनय येत होता की नाही माहीत नाही. पण जाहिरातीत मॉडेल म्हणून तो यशस्वी झाला असता. त्याचा बोलका चेहरा, त्याचं रूपवान असणं मला विचित्र वाटू लागलं. कारण सौंदर्य ही सापेक्ष गोष्ट आहे. तिची तुलना झाली पाहिजे. तिला दाद मिळाली पाहिजे. हा रूपवान तरुण पेशाने गुरखा होता. रात्री सगळे झोपल्यावर अंधारात रखवालीसाठी हा बाहेर पडणार. मग या रूपाला पाहणार कोण? आपण नवा ड्रेस घातला आणि कोणीच नोंद घेतली नाही तर वाईट वाटतं. याउलट नव्या ड्रेसची तारीफ झाली तर पैसे वसूल होतात.
पुढं काही दिवस या हिरोची भेट झाली नाही. अचानक एके दिवशी दुपारी तो घरी आला. दिल्लीतल्या नातेवाईकांसाठी त्याला पैसे पाठवायचे होते. मनीऑर्डर फॉर्म भरून देण्यासाठी तो आला होता. फॉर्म भरला. चहा झाला. तरी तो घुटमळत होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं. त्याचा संकोच लक्षात घेऊन मीच बोललो, ‘‘कुछ कहना चाहते हो?’’ या प्रश्नाचा आधार घेत तो बालू लागला. ‘‘शाबजी, फिलम मे हम जा सकता क्या?’’ हा प्रश्न विचारताना त्याच्या निळसर झाक असणाऱ्या डोळय़ात चमक होती. भुऱ्या रंगाचे लांब केस गोऱ्या चेहऱ्यावर अधिकच उठून दिसत होते. पॉलिथिनच्या कव्हरमध्ये व्यवस्थित आणलेले त्याचे फोटो त्यानं दाखवले. हिरो स्टाईल वेगवेगळय़ा पोजमधले फोटो मी पाहत राहिलो. फोटोवरून हिरो बनण्याचा विचार त्याच्याही मनात रेंगाळत होता असं वाटलं. तो बरंच काही सांगत राहिला. त्याच्या रूपाची त्यालाही जाणीव होती. एवढंच काय, रात्रभर जागरण झाल्यावरही तो सकाळी व्यायाम करायचा. लहानपणी गावातल्या नाटकात त्यानं छोटं कामही केलेलं होतं. त्याच्या भाषेतली गाणी म्हणायचा. काही हिंदी गाणीही त्याला पाठ होती. घरी मुलखाचं दारिद्रय़. पोटासाठी अंधारात काठी आपटत फिरावं लागलं. अंधाराची सवय झाली. दिवसाउजेडीही डोळय़ासमोर अंधार झाला. पुढं तिनेक महिन्यांनी भेटला. दरम्यान मराठी फिल्म इंडस्ट्रीत माझे काही मित्र आहेत असं त्याला कोणीतरी सांगितलं होतं. खरं तर या इंडस्ट्रीत प्रचंड संघर्ष करणाऱ्या मित्रांची परिस्थिती मला माहीत होती. या अंधारातल्या हिरोला मीच खरं ओळखलंय अशी त्याची भावना झालेली. त्यामुळं त्यानं पुन्हा फिल्मचा विषय काढला. सोबत पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले फोटो होतेच. अंधारातून प्रकाशात येऊ पाहणाऱ्या त्याच्यातील अभिनेत्यासाठी मी काय करू शकत होतो? शेवटी या क्षेत्रातील संघर्ष, स्पर्धा, अडचणी, तपश्चर्या असं काय काय सांगण्याचा प्रयत्न केला. तो थोडासा नाराज झाला.
काठी आपटण्याचे, शिट्टीचे आवाज येत राहिले. पण त्याची भेट झाली नाही. चार-पाच महिने गेले. एक दिवस पैसे मागायला आलेला नवीनच गुरखा दिसला. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला आपल्या हिरोबद्दल विचारलं. त्यानं सांगितलं, ‘शाबजी, ओ तो बम्बई चला गया. अब उधऱ्ही काम करेगा’ त्याचं असं अचानक मुंबईला निघून जाणं सूचक होतं. मी सांगितलेला त्याचा भाषेचा प्रश्न इतराच्या खडतर संघर्षकथा त्याला नकारात्मक वाटल्या असतील. म्हणून जाताना मला भेटणं त्यानं टाळलं असावं. या घटनेलाही आता आठेक वर्षे झालीत. इंडस्ट्रीतला संघर्ष मी त्याच्यासमोर आळवला असला तरी अशा संघर्षांतूनच पुढं आलेल्या यशोगाथा मला माहीत आहेत. त्यामुळे नवा सिनेमा पाहत असताना नकळत या अंधारातल्या हिरोला शोधत असतो. काय सांगावं, एखाद् वेळी निळसर डोळय़ांचा हा हिरो, नायिकेसोबत पडद्यावर थिरकतानाही दिसेल. नाही तरी, गौतम हलधर या ताकदीच्या बंगाली नटाला मी अचानक रंगमंचावर पाहिलं होतं. या प्रकाशातल्या नटामुळं एक अंधारातला नट लख्ख दिसला. नट प्रकाशातला असो का अंधारातला असो; त्याच्यातील तडफ जीवघेणी असते. नाटय़गृहात प्रेक्षकातून गायब झालेला प्रकाश अशा अंधारातल्या नटावर निथळायला हवा.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:18 pm

Web Title: caligula by albert camus and actor in the darkness
Next Stories
1 कटिंग
2 बाई संभाळ कोंदण
3 झेंडे
Just Now!
X