24 November 2020

News Flash

भाषण स्पर्धा

अधिकारी पालवणकरांच्या घरी कार्ड येऊन थडकलं. पाहिलं तर वर ‘श्री’च्या जागी ‘निमंत्रण’ असं लिहिलेलं. दोन्ही बाजूला दांडय़ा. ते मजकूर वाचू लागले.

अधिकारी पालवणकरांच्या घरी कार्ड येऊन थडकलं. पाहिलं तर वर ‘श्री’च्या जागी ‘निमंत्रण’ असं लिहिलेलं. दोन्ही बाजूला दांडय़ा. ते मजकूर वाचू लागले.
‘‘नमस्कार महोदय नमस्कार,
दरवर्षी आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी आमचे शाळेत श्री जगदंबा, अंबाबाई, ग्रामदेवता, मनोदेवता अशा विविध देवतांच्या कृपेकरून विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यात एक स्पर्धा भाषणांची असते. दरवर्षी शाळेतील शिक्षकच परीक्षणाचे काम पाहत होते. तरीसुद्धा, गेली काही वर्षे मुलांकडून पार्शालिटीचे म्हणणे पडत आहे. आपण या गावातील एक मान्यवर आहात. गावाजवळील मोठय़ा कंपनीत कामही करता. त्यामुळे यावेळी बाहेरील परीक्षक म्हणून आपण काम बघण्यास यावे, अशी विनंती मी- मुख्याध्यापक श्री. वाकडे आपल्याला करतो. मुख्याध्यापक कार्यालय नुकतेच अ‍ॅडव्हान्स झाल्याने आपल्याला ईमेलसुद्धा केला आहे.
आपला,
श्री. वाकडे
मुख्याध्यापक,
आमची शाळा, धोंडे. मुक्काम पोस्ट ठोंबे.
खाली तारीख, वार, ठिकाण दिले होते. पालवणकरांच्या ऑफिसच्या सुटीचाच दिवस होता. त्यांनी आधी तशाच दोन-तीन स्पर्धाचे परीक्षण केले होते. गावात स्वत:ची कीर्ती पसरलेली पाहून त्यांना अगदी ‘अहाहा’ झाले. होकार कळवला. आवश्यक ते इतर तपशील सांगितले. ठरलेल्या दिवशी ते गावात पोचले.
‘‘या, या पालवणकरसाहेब या. हॉल वर आहे. तिथेच मुलं बोलतील.’’
हॉल मुलांनी भरलेला. काही शिक्षकही उपस्थित होते. एक व्यासपीठ. आत शिरल्या शिरल्या ‘एक साथ, नमस्ते’चा घोष झाला. एका शिक्षकांनी सुरुवात केली, ‘‘मुलांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पालवणकरसाहेब आज आपल्या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करायला आलेले आहेत. ‘फूल ना फुलाची पाकळी,’ असं प्रत्येक वेळेसच स्वागत करताना म्हणतात. मीही तेच म्हणतो. गुलाब देणाऱ्याने कुस्करा केल्याने मी सरांना गुलाबाच्या पाकळय़ांचा छोटा हार घालतो.’’
हार गळय़ात गेला नाही.
‘‘माझ्या अपेक्षेप्रमाणेच झाले. तो हार सरांच्या गळय़ात जाणार नाही, हे मला माहीत होते म्हणून मी आधीच कात्री आणून ठेवली होती. आता मी तो हार कापतो व बैलाच्या नाकात वेसण घालतात ना, तसा त्यांच्या गळय़ापलीकडे नेऊन बांधतो.’’
पालवणकर त्यांच्याकडे चमकून पाहत राहिले. मुले टाळय़ांचा गजर करीत राहिली.
‘‘सर्वानी खूप तयारी केलेली असेलच. आपण किती तयार आहोत ते सरांना दाखवून देण्याची सुवर्णसंधी आज एकाही विद्यार्थ्यांने गमावू नये. कोण कोणाला चीतपट करतो, हे बघूयाच. अधिक वेळ न घालवता आजच्या जंगी सामन्यांना आपण सुरुवात करू या.
‘‘सर, स्पर्धेचे विषय, नियम व वेळ मी तुम्हाला आधीच कळवले होते. मुलांना हे सर्व तुम्ही सांगितले असेलच. एखादा मुलगा दिलेल्या वेळेपेक्षा पुढे निघून गेल्यास बेल वाजवावी लागेल. एक बेल इथे आणून ठेवा.’’ पालवणकरांनी सांगितले. सरांनी बबन नावाच्या नव्या शिपायाला पिटाळले.
बबन जो पळाला तो बराच वेळ आला नाही. इतका वेळ काय करतोय म्हणून मुख्याध्यापक सर उठणार तेवढय़ात बबन शाळेची मोठी घंटा हातात घेऊन दारात उभा.
‘‘काय रे इतका वेळ? आणि हे काय?’’
घंटा त्या तिथून काढायची आणि आणायची म्हणजे एवढा वेळ लागणारच ना सर.’’ मुख्याध्यापकांनी पालवणकरांकडे एका डोळय़ाने पाहिले. ताबडतोब दुसरा डोळा बबनवर रोखून म्हणाले, ‘‘बावळय़ा, ठेव ती घंटा तिथेच आणि माझ्या टेबलवरची छोटी बेल घेऊन ये. माफ करा हं सर, जरा नवीन आहे मुलगा. ए, गबसा रे पोरांनो. सर, सुरुवात करा. कसं केलंय की, मोठय़ांपासून लहानांपर्यंत असं केलंय.
‘‘ठीक आहे. आधी पाचवी ते सातवी घेऊ, मग तिसरी- चौथी. बोलवा एकेकाला.’’
स्पर्धा सुरू झाली. पाचवी ते सातवीतला मुलगा आला.
‘‘मा. मुख्याध्यापक, अध्यक्ष महान..’’
‘‘महोदय, महोदय’’ सरांनी प्रॉम्प्टिंग केले.
‘‘हां. मा. मुख्याध्यापक, अध्यक्ष महान महोदय, माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे- माझा आवडता खेळ. आपल्या देशात खूप खेळ आहेत आणि हे खेळ खूपजण खेळत असतात. या सर्व खेळांमधून एक खेळ आवडता बनवायचा म्हणजे लई मोठं काम आहे. तरीसुद्धा मी खास भाषणासाठी म्हणून खो-खोची निवड केली आहे. मला खरं म्हणजे मल्लखांब पाहिजे होता. पण दादा म्हणाला की, मल्लखांब खेळायला खूप अवघड अस्तो, त्यावर भाषणपण अवघड जाईल. उगाच काही तरी वाकडंतिकडं झालं तर आठवडाभर खाट धरावी लागंल. तर ‘खो-खो’ हा फार भारी खेळ आहे. नुस्तं पकडापकडी करायची. याला हात लाव, त्याला हात लाव. तंगडी धरायला जास्त नसल्याने मला कधी कधी त्याचा राग येतो. कबड्डीमध्ये मस्त तंगडय़ा धरून ओढता येतं. म्हणून मी असे विचार मांडत आहे की, पुढं आपल्या पंतप्रदानांनी खो-खो आणि कबड्डी हे खेळ एकत्र करून नवा ‘खोबड्डी’ हा खेळ बनवावा व विद्यार्थ्यांना मज्जा येईल असं करावं. फार मज्जा येईल. तसं अजून बोलण्यासारखं खूप आहे, पण परमिशन नसल्याने मी जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ’’
टाळय़ांचा कडकडाट झाला. काही मुलांनी हस्तांदोलन करून अभिनंदन केले, तर काही पोरांनी गुद्दय़ांच्या रूपात शाबासकी दिली. आणखी काहींची भाषणे झाली.
तिसरी ते चौथी गटातला मुलगा आला.
‘‘मा. मुख्याध्यापक, मा. बाई, मा. अंबाबाई, मा. परीक्षक कालवणकरसर, आणखी इतर सर्व माननीय यांना माझा नमस्कार. सर्वाना नमस्कार करूनच मी भाषणाची सुरुवात करतो. तसं आमच्या सरांनी बजावूनच सांगितलं व्हतं. तर आजचा विषय आहे- माझी आवडती कला; ती आहे चित्रकला. चित्रकलेमध्ये खूप मजा येते. परवा आमच्या वर्गातला मुलगा चित्रकलेच्या तासाला झोपला होता. तो झोपलेला असतानाच मी त्याला मिशा काढल्या. नंतर बारकू म्हणला की, ‘‘नुसत्या मिशा कशाला, तोंडही रंगव.’’ मग मी तोंडावर पिवळा रंग देऊन टाकला. बिबटय़ा तर तसा कोणीच पाहिला नाहीये पण मी त्या दिवशी सगळय़ा वर्गाला बिबटय़ा दाखवला.’’
पोरं खिदळली.
‘‘चित्रकला. त्याबद्दल आणखी काय बोलायचं सुचत नाही. वेळ आहे तर मी चंद्रकलेबद्दल सांगतो. चंद्रकला आपल्या शाळेत शिकविली जात नाही. ती फकस्त मला माहीत आहे. ती माझ्या शेजारी राहते. चंद्रकला व मी संध्याकाळी एकत्र खेळतो. कधी कधी तिची आई व माझी आई एकत्र चित्रकला काढतात, आपलं ते हे, तांदूळ निवडतात. परवाच माझ्या एका लांबच्या दादाचं लगीन झालं तेव्हा त्यानं तांदुळातच चित्रं काढली होती. कुणी तरी म्हणालं की, त्यावर नाव लिहितात. याचबरोबर आजच्या बातम्या संपल्या. म्हणजे भाषण संपलं.’’
मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक कौतुकाने पाहात होते. आणखी काहींची भाषणे झाली.
पहिली ते दुसरी गटातील मुलगा आला.
‘‘माझ्या भाषणाचे नाव आहे- माझी आई.’’
‘‘भाषणाचे नाही. विषयाचे.’’ एक शिक्षिका म्हणाल्या.
‘‘माझ्या विषयाचे नाव आहे- माझी आई. माझी आई माझा अभ्यास घेते. अभ्यास झाल्यावरच मला खेळायला सोडते. खेळ झाल्यावर पुन्हा अभ्यास करायला सांगते. डबा करून देते. आणखी खूप काम करते. पायावर मारतेही. कधी कधी हातावर.. अजून काय सांगू बाई?
समोरची पोरं हसू लागली. मुलगा रडवेला झाला.
‘‘ए, कोणी हसायचं नाही रे.’’ मुख्याध्यापक गरजले. सगळे हसण्याचे थांबले.
‘‘सुरू कर रे. जिथे थांबलास तिथूनच सुरू कर. आई खूप मारते. हात झाले, पाय झाले, गाल राहिलाय.’’
पोरं खिदळली.
‘‘मारते.. मारते.. आणि मग..मग..सर.. हा बेडक्यासुद्धा मला मारतो. वणवणकरसरांना मोठा नमस्कार. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो.’’
पोरगा तुरुतुरु पळतच आपल्या जागी जाऊन बसला.
निकाल जाहीर करण्याकरिता पालवणकरांनी थोडा वेळ मागून घेतला. तोपर्यंत चहा-बिस्किटे आली. निकाल जाहीर झाला. मुख्याध्यापकांनी आभार मानताना भाषणे खूपच रोमहर्षक झाल्याचे सांगितले. पालवणकरांनीही ‘परीक्षकांच्या मनोगता’त भाषणे नुसती रोमहर्षकच नाही, तर ऐकताना अंगावर काटा आल्याची पावती दिली. पाचवी ते सातवी गटातील एका मुलाचे ‘पुस्तकांचे महत्त्व’ या विषयावर भाषण फारच प्रभावी झाले होते. पालवणकरांनी भाषण संपल्यावर त्याला उभे राहायला सांगितले आणि विचारले, ‘‘कार रे, पुस्तकांचे महत्त्व या विषयावर तू एवढी छान माहिती कुठून गोळा केलीस?
‘‘सर, सोप्पं आहे. इंटरनेटवरून.’’
पालवणकरांना निमंत्रण वाचताना ‘अहाहा’ झाले होते. हे ऐकताना ‘ओह नो’ झाले.

 केदार पाटणकर – lokrang@expressindia.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2015 12:15 pm

Web Title: elocution competition
Next Stories
1 आकाशवाणी (रेडिओ)
2 ‘आंबेडकर-विवेकानंद’अतात्त्विक अट्टहासी मेळ
3 माँटुकला आनंद!
Just Now!
X