23 January 2021

News Flash

भावना आणि रोगप्रतिकारशक्ती

१९७० ते ९० या दशकांमध्ये आरोग्यविषयक ‘मनोकायिक’ (Psychosomatic Medicine) ही शाखा अस्तित्वात आली.

मनोद्भव शारीरिक विकारांमध्ये काही अल्सर्स, काही तऱ्हेचे अस्थमा, काही डोकेदुखी, कंबरदुखी अशा अनेक आजारांचा समावेश झाला.

डॉ. आनंद नाडकर्णी – anandiph@gmail.com

१९७० ते ९० या दशकांमध्ये आरोग्यविषयक ‘मनोकायिक’ (Psychosomatic Medicine) ही शाखा अस्तित्वात आली. मनोद्भव शारीरिक विकारांमध्ये काही अल्सर्स, काही तऱ्हेचे अस्थमा, काही डोकेदुखी, कंबरदुखी अशा अनेक आजारांचा समावेश झाला. जागतिकीकरणानंतर प्रामुख्याने शारीरिक असलेल्या मधुमेहापासून ते कॅन्सपर्यंतच्या आजारांवरील भावनिक प्रभावावर संशोधन झालं आणि त्यावरील उपचार पद्धतीत विचार आणि भावनांना पूर्वीपेक्षा महत्त्वाचं स्थान मिळू लागलं.

चार दशकांपूर्वी जेव्हा मी मनोविकारशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा मानसिक आजारांवर उपलब्ध असलेली औषधे खूपच मर्यादित होती. काही विशिष्ट रुग्णांसाठी आम्ही एक इंजेक्शन वापरायचो. त्याचं नाव होतं ‘इंजेक्शन आर.’ एकंदरच जनमानसावर त्यावेळी ‘सुई’ लावली की बरं होणार, या धारणेचा पगडा जास्त होता. तर या रुग्णाची Common profile अशी असायची.. निम्न मध्यमवर्गातील सासुरवाशीण. छोटय़ा गावातून लग्न होऊन मुंबईला आलेली. कामगार वस्तीतला संसार. आर्थिक तंगी. दोन-तीन मुलं. खुराडय़ातलं एकत्र कुटुंब. भावनिक कोंडमारा आणि शारीरिक परिश्रमांचा प्रचंड वापर. तर अशा स्त्रीच्या मानसिक तणावाचं रूपांतर कधी कधी शारीरिक लक्षणांमध्ये व्हायचं. वेदना व्हायच्या. दुखीने कळवळायची बाई. शरीराच्या तपासण्या नॉर्मल. पण मन मोकळं करायला जागा नाही.

परळच्या केईएम हॉस्पिटलमधल्या आमच्या बाह्य़ उपचार विभागात ती आली की आम्ही तिच्या नैराश्याचं निदान करायचो. गोळ्या सुरू करायचो. आमचे सर सांगायचे, ‘‘नातेवाईकांना बाहेर बसवून या बाईंशी बोल. तिच्या व्यथा ऐकून घे. तिला फुकटचे सल्ले देऊ नकोस. आणि मग गोळ्यांबरोबर एक इंजेक्शन देणार आहोत असं सांग. हे नेहमीचं टॉनिक नाही, अँटिबायोटिक नाही, तर हे आहे मन:स्ताप काढून टाकणारं, Remove करणारं आर इंजेक्शन! त्यामुळे असं होईल की पंधरवडय़ाने नवरा तिला फॉलोअपला घेऊन येईल आणि तुझ्या नैराश्यविरोधी गोळ्यांचा डोसही कमी लागेल. गोळ्यांना संवादाचं बळ मिळायला हवं.’’

मी सरांचं ऐकलं आणि तसं घडू लागलं. योग्य रुग्णाला योग्य पद्धतीनं हाताळलं की फरक पडायचा. या प्रकाराला म्हणतात- ‘प्लासिबो’! म्हणजे औषधाच्या औषधी गुणधर्माशिवायच अपेक्षित गुण येणं. आमच्या त्या ‘इंजेक्शन’मध्ये डिस्टिल्ड वॉटर असायचं. आपला विश्वास असलेल्या डॉक्टरने डोकेदुखीवर कॅल्शियमची गोळी दिली तरी फरक पडतो. खरं तर सर्व ‘औषधी उपचारांना’देखील हे भावनिक अंग असतंच. दोन अमर अशी वैद्यकीय वचने आहेत.. All Doctors Treat, Some Doctors Heal… उपचार तर सर्व डॉक्टर करतात, पण त्यातले काही जणच आजाराचं निवारण करतात, रुग्णाला बरं करतात. आणि दुसरं वाक्य : Doctor is the Greatest Placebo. सगळ्यात मोठा रोगनिवारक डॉक्टरच असतो. थोडक्यात काय, तर भावनिक व्यवहाराला फक्त मानसिकच नव्हे, तर सर्वच आजारांच्या उपचारांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. शरीर आणि मनाचं नातं आपण गृहीत धरतो आणि जाणिवेच्या पलीकडे लोटतो. पण आवडत्या पदार्थाच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते. प्रेमात पडल्यावर शरीरावर रोमांच फुलतात आणि प्रेयसीच्या वडलांसमोर उभे राहिल्यावर अंगावर शहारा येतो. भीतीने पोटात गोळा येतो. संतापाने ब्लड प्रेशर वाढते. किती उदाहरणे द्यावीत. सर्व प्राचीन उपचार पद्धतींमध्ये शरीर आणि मनाचं अद्वैत सांगितलं आहे. आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकशास्त्रानं प्रथम पत्करला तो जीववैद्यकीय- म्हणजे बायोमेडिकल दृष्टिकोन. पण त्यानंतर म्हणजे १९६० च्या दशकापासून शरीर-मनाचं नातं, संयोग, संतुलन, संवाद यांकडे विज्ञानाचं लक्ष गेलं.

या संदर्भामध्ये महत्त्वाचे ठरलं नॉर्मन कझीन्स या पत्रकार, संपादकाचं योगदान. असाध्य अशा ‘अँकीलोझिंग स्पॉन्डेलेटिस’ या आजारातून त्यांनी स्वत:च्या प्रयोगांनी आणि ‘निवारक’ डॉक्टरांच्या मदतीने स्वत:ला ‘बरं’ केलं. या विषयावरचा त्यांचा शोधनिबंध एका प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाने छापला. त्यानंतर त्यांचे ‘अ‍ॅनाटॉमी ऑफ इलनेस’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. १९७८ पासून ते कॅलिफोर्निया विद्यापीठात वैद्यकीय इतिहास आणि नीती या विषयाचे प्राध्यापक बनले. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातून ‘बरं’ होण्याच्या अनुभवावर त्यांनी ‘द हीलिंग हार्ट’ नावाचे पुस्तक लिहिले. या प्राध्यापकांच्या प्रभावाखाली शरीर-मन संयोगी वैद्यकशास्त्राचे अनेक प्रयोग झाले. पुढे त्यातून एक ज्ञानशाखा निघाली. तिचे नाव ‘सायको न्युरो इम्यूनॉलॉजी.’ मन-मेंदू आणि रोगप्रतिकारशक्ती.

१९७० ते १९९० या दशकांमध्ये मनोकायिक म्हणजे Psychosomatic Medicine ही शाखा अस्तित्वात आली. मनोद्भव शारीरिक विकारांमध्ये काही अल्सर्स, काही तऱ्हेचे अस्थमा, काही डोकेदुखी, कंबरदुखी अशा अनेक आजारांचा समावेश झाला. जागतिकीकरणानंतर प्रामुख्याने शारीरिक असलेल्या- मधुमेहापासून ते कॅन्सपर्यंतच्या आजारांवरील भावनिक प्रभावावर संशोधन झालं. आणि उपचार पद्धतीमध्ये विचार व भावनांना पूर्वीपेक्षा महत्त्वाचं स्थान मिळू लागलं. एकविसाव्या शतकामध्ये ‘डायनॅमिक स्कॅन्स’ उपलब्ध झाल्यामुळे भावना चक्क ‘रेखता’ येऊ लागल्या. भावनिक अनुभवांचा ‘मेंदुवर्णपट’ दिसू लागला. आणि या साऱ्या संशोधनाने वेगळीच गती घेतली. मेंदुविज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशा विविध शाखा एकत्र आल्या.

१९८१ च्या जून महिन्यापासून अधिकृतपणे एचआयव्ही- एड्सची साथ सुरू झाली. या आजाराच्या निमित्ताने भावना आणि रोगप्रतिकारशक्ती याविषयीचे संशोधन सुरू झाले. एचआयव्हीमध्ये महत्त्वाचा मानला गेलेला CD4 काऊंट आणि भावनिक आंदोलनं यांचा परस्परसंबंध सांगणाऱ्या प्रयोगांना सुरुवात झाली. त्याचबरोबर स्थिर भावनिकता आणि वैचारिक समतोल निर्माण झाल्यावर या पेशींचे प्रमाण योग्य झाले. या उपचारांमध्ये योगाभ्यासापासून ते CBT म्हणजे विचार-वर्तनपरिवर्तन उपचार पद्धतींचा समावेश होता. यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, मानसिकता आणि ‘व्हायरल’ दुखण्यामधली ‘रिकव्हरी’ यांचं नक्की नातं आहे. पण तरीही अजून ही गोष्ट सिद्ध व्हायची होती- की भावना आणि रोगप्रतिकारशक्तीचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘T’ प्रकारच्या पांढऱ्या पेशी यांचं नातं आहे. या विषयातला एक विलक्षण प्रयोग डॉ. रिचर्ड डेव्हिडसन यांनी विसकॉन्सीन विद्यापीठात केला. प्रयोगासाठी निवड झालेल्या मंडळींचे दोन गट केले गेले. एका गटाला त्यांच्या जीवनातल्या दु:खद घटनांची ‘आळवणी’ करण्यात गुंतवले गेले. यासाठी संवाद, चिंतन, प्रतिमा, लिखाण अशी साधनं वापरली गेली. दुसऱ्या गटाला त्यांच्या जीवनातल्या उत्कृष्ट कालखंडाची जाणीवपूर्वक ‘उजळणी’ करायला सांगितली गेली. आता ‘आळवणी’ गट आणि ‘उजळणी’ गट या दोघांचे या प्रक्रियेतील गतिशील स्कॅन्स काढण्यात आले आणि मेंदूतील दु:खद आणि सुखद भावनांची वर्णपट रेखाटने मिळाली. त्यानंतर या दोन्ही गटांना इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्ल्यूवरचे व्हॅक्सिनेशन दिले गेले. म्हणजे व्हायरल आजारावरचीच लस. आणि त्या गटांचा Antibody Response मोजला गेला. तर ‘आळवणी’ आणि ‘उजळणी’ गटाच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये शास्त्रीय दृष्टीने लक्षणीय फरक आढळला. सुखद भावना आणि लसीला मिळणारा जोमदार प्रतिसाद यांचं नातं होतं. लस म्हणजे एका प्रकारे मूळ आजाराची प्रतिआवृत्ती असते, ही गोष्ट महत्त्वाची.

Realistic optimism म्हणजेच वास्तववादी आशावाद ही भावनिक आणि वैचारिक अवस्था व तिची वर्तनामध्ये दिसणारी अभिव्यक्ती यावर एक ‘मापन साधन’ शास्त्रज्ञांनी तयार केले. कसोटीच्या कालखंडामध्ये कमी गांगरणं, प्राप्त परिस्थितीचा मनोमन स्वीकार करून त्यावर पर्याय काढणं, संभाव्य परिणामांचे ‘महाभयंकरीकरण’ करून हतबल न होणं असे अनेक गुणविशेष या साधनात अंतर्भूत होते. पुन्हा या समुदायाची रोगप्रतिकारशक्ती रक्तातील घटकांद्वारे मापली गेली. आणि त्यांना सर्दीच्या व्हायरसचा संसर्ग ‘करवण्यात’ आला. ज्यांना सर्दी झालीच नाही किंवा किरकोळ झाली असा गट आणि ज्यांना त्रासदायक सर्दी झाली असा गट यांच्या आशावादाच्या पातळीत लक्षणीय फरक आढळला. अशा अभ्यासगटांमध्ये इतर संवेदनशील घटक सारखेच राहतील अशी खबरदारी घेतली जाते. या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. शेल्डन कोहेन (कार्नेजी मेलॉन युनिव्हर्सिटी) यांच्या अभ्यासानुसार, भावनिक आधार देणारे आणि व्यक्तीविकासाला पोषक असे नातेसंबंध असणारे आणि नसणारे या गटांमध्ये सर्दीचे प्रमाण वेगवेगळे आढळले. ज्यांची ‘सामाजिक आधाररचना’ सक्षम नव्हती त्यांच्यामध्ये सर्दी होण्याची शक्यता चक्क ४.२ पटीने जास्त आढळली. डॉ. मार्टिन सेलिगमान या अभ्यासकाने एचआयव्ही रुग्णांचे अनेक अभ्यास केल्यावर काढलेला निष्कर्ष महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी धूम्रपान सोडणं, चौरस आहार, अनुरूप व्यायाम या तीन लोकप्रिय घटकांइतकाच प्रभाव ‘प्रयत्नवादी आशावाद’ या गुणवैशिष्टय़ाला दिला आहे. ‘तुमच्या भावनांची जाण आणि भान तुमच्याच हातात आहे. तुमच्या भावना बदलू शकतात. तुम्ही त्यांना वळण लावू शकता. तुमची आजची भावनिक उजळणी ही उद्याची भावनिक सवय आणि परवाची सहजवृत्ती आहे हे विसरू नका..’ असं ते म्हणतात.

याचा अर्थ असा की, आजाराला दूर राखण्यासाठी आणि आजार झालाच तर त्याचे स्वरूप सौम्य ठेवण्यासाठी भावनिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. गमतीची गोष्ट म्हणजे या क्षेत्रातले अनेक प्रयोग ‘व्हायरस’संबंधाने येणाऱ्या आजारांतच झालेले आहेत. संपूर्ण सजीव सृष्टीची रचना कशी आहे, हे थोडक्यात समजून घेऊ. ‘जीव’ म्हणजे Life ज्या क्षणी निर्माण होते, त्या क्षणी भोवतालच्या वास्तवाबरोबरचं त्याचं नातं सुरू होतं. या वास्तवातून येतात विविध उत्तेजना.. सुखद आणि दु:खद.. जगण्याच्या मूळ सत्त्वाला मदत करणाऱ्या किंवा आव्हान देणाऱ्या! या साऱ्या उत्तेजनांना सजीव दुहेरी प्रतिसाद देतो.. अंतर्गत आणि बाह्य़ अशा दोन्ही स्वरूपांचा. अंतर्गत प्रतिसाद असतो पांढऱ्या पेशींच्या पातळीवरचा. या पेशींचेही विविध गट आहेत. काही पेशी योद्धय़ाचे- म्हणजे सैनिकांचे काम करतात. काही पेशी आलेल्या आव्हानाचे रूपांतर ‘पेशीअंतर्गत स्मृतीं’मध्ये करतात; ज्यायोगे असे आव्हान परत आले तर साजेशी प्रतिक्रिया देता यायला हवी. तेव्हा प्रत्यक्ष त्यावेळी Pathogen विरुद्धचे- म्हणजे व्हायरसविरुद्धचे युद्ध लढले जात असते आणि भविष्याची आखणीही होत असते. म्हणजे अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती दोन्ही पातळ्यांवर काम करते. प्रत्यक्ष लढाईत यश मिळो- न मिळो, भविष्यासाठीची रचनाही सुरू असतेच. म्हणजे या रचनेला युद्ध (War) आणि लढाई (Battle) यांतला फरकही कळतो.

हाच फरक मेंदूच्या पातळीवर कळवून देण्याचं काम भावना करतात. म्हणून या पांढऱ्या पेशी आणि भावनाकेंद्रातील मज्जापेशी यांना म्हटलं आहे- ‘Mirroring Sisters.’ समोरच्या आव्हानाला तात्काळ प्रतिक्रिया देणाऱ्या भावनाही निर्माण होतात आणि लांब पल्ल्याच्या आखणीला आवश्यक अशा भावनाही निर्माण होतात. या दोन गटांना आपण आदिम भावना (Primitive Emotions) आणि प्रगत भावना (Productive Emotions) असं म्हणू. त्या अनुक्रमे लिम्बिक सिस्टिम आणि कॉर्टेक्स (Cortex) इथून स्फुरण पावतात असं स्थूलमानाने म्हणता येईल. ज्याप्रमाणे अंतर्गत रचना पेशीपातळीवर आव्हानाचा मुकाबला करते, तसेच बाह्य़ पातळीवर वर्तनाच्या द्वारा ही भावनिक रचना काम करते. म्हणूनच त्यांचा एकमेकांवर प्रभाव असतो.

जर भावनिक नियोजन उत्तम आणि सक्षम असेल तर त्याचा प्रभाव अंतर्गत रोगप्रतिकारशक्तीवर तितकाच जोमदारपणे होतो. भावनिक अस्थिरता निर्माण झाली की Noradrenaline, Dopamine, Serotonine अशा जीवरसायनांमध्ये जे असंतुलन होतं त्याचा थेट प्रभाव आतल्या Immune System वर- म्हणजे रोगप्रतिकारशक्तीवर होतो. अशा अवस्थेत जर आसमंतात कोणताही संसर्ग असेल तर त्याचा प्रभाव होण्याची शक्यता जास्त. आता असेही प्रयोग चालू आहेत की शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘Chemical Boosters’चा वापर चिंता आणि नैराश्याच्या आजारात करता येईल का? तो विषय तूर्तास बाजूला ठेवू.

शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की, सर्वसाधारणपणे वय वर्षे तीस ते पन्नास या वयोगटामध्ये शारीरिक आणि भावनिक आरोग्याला धक्का देणाऱ्या घटना जास्त गतीने आणि जास्त प्रमाणात घडतात. म्हणून चिंता, नैराश्य अशा भावनिक आजारांसोबतच शारीरिक रोगप्रतिकारशक्तीवर आघात करणारे आजारही याच वयामध्ये होतात. समजा, एखाद्याला विषाणूचा संसर्ग झाला तर त्याच्या पांढऱ्या पेशी कार्यरत होताना Fever म्हणजे ‘ताप’ येईल असे पाहतात. त्यामुळे ‘Sickness’ ही जाणीव होते. या लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी, हुरूप आणि उत्साह जाणं असे प्रकार झाल्याने माणूस बिछान्यात पडून राहतो. त्यामुळे एक तर विश्रांती मिळते आणि दुसरं म्हणजे संसर्ग रोखला जातो. (लक्षणं दिसताक्षणीच मदत घेऊन क्वारंटाइन करण्याचे फायदे!) आता हा Sickness Response सुरू झाला की भावनांवर जबाबदारी असते आतल्या पांढऱ्या पेशींना बळ देण्याची. आपल्या मनात तीन प्रकारचे विचार येतील असे संशोधकांनी सांगितले आहे..

Reactive Thoughts- प्रतिक्रिया.

Rational Thoughts- प्रतिसाद (अनुरूप) देणारे.

Ruminative Thoughts- रवंथ करणारे.

यामध्ये आपण तिन्ही तऱ्हेच्या विचारांच्या ‘येण्यावर’ कंट्रोल नाही करायचा. आल्यावर निवड करायची ती अनुरूप विचारांची. ते कसे आणि कोणते, याची यादीच आपण या लेखाच्या शेवटी करणार आहोत. असं झालं तर आपण आजारातून बाहेर पडण्याची क्रिया गतिमान होते.

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांवरचे काही अभ्यासनिबंध आहेत. त्यातल्या एका पाहणीमध्ये रुग्णांचे दोन गट केले गेले. एका गटाला दहा आठवडय़ांचा ‘Mindfulness based CBT’ म्हणजे विचारपद्धती आणि ध्यान यांचा संयोग असलेली पद्धती नीट शिकवली गेली. हा होता ‘उजळणी’ गट. दुसऱ्या गटाला असे ज्ञान आणि माहिती देणारी एक दिवसाची कार्यशाळा घेतली गेली. हा होता ‘आळवणी’ गट. कॅन्सरशी युद्ध खेळणाऱ्या पेशींची साखळीबद्ध पाहणी केल्यावर लक्षात आलं की ‘उजळणी’ गटाचा Immune Response खूपच प्रभावी ठरला.

कोणताही ‘आजार’ अंतर्गत रोगप्रतिकारशक्तीला धडे देत असतोच आणि त्याच वेळी आजारी पडणं म्हणजे ‘आजारपण’ भावनिक शक्तीला धडे देत असतं. पण भावनिक शक्तीला तीन पर्याय उपलब्ध असतात. निवड करण्याचं ‘स्वातंत्र्य’ असतं. प्रतिक्रियात्मक विचार जास्त झाले तर अति प्रमाणात तीव्र वर्तन घडेल. रवंथ करणारे विचार वाढले तर माणूस स्थितीशीलतेमध्ये खितपत पडेल. आणि अनुरूप प्रतिसाद देणाऱ्या विवेकी विचारांवर जाणीवपूर्वक काम केलं तर आणि तरच तो लढाई आणि युद्ध जिंकेल. लढाई हरला तरीही युद्ध जिंकू शकेल.

अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती टिकवणाऱ्या पांढऱ्या पेशींच्या ‘प्रोग्रॅम’मध्येच स्वयंशिस्त आहे. म्हणून त्या आपलं काम सहसा विनातक्रार करतात. त्यात समस्या निर्माण झाली की त्याचा थेट आजारच होतो. मात्र, भावना आणि विचारांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. न थकता. म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की, आरोग्याकडे नेणारी आणि आरोग्य टिकवणारी नेमकी मनोभूमिका कोणती? आजाराची व्याख्या करणं तुलनेनं कमी कठीण; पण स्वास्थ्याची व्याख्या कशी करायची?

कसोटीच्या प्रसंगातून जाताना, विषाणू साथीच्या उंबरठय़ावर घुटमळताना तुम्ही ‘आनंदी राहा’ हे सांगणं सोपं आहे. पण ही कल्पना शास्त्रीय पद्धतीनं समजून घेणं अगत्याचं. तर Well Being या अवस्थेचे दोन भाग आहेत. एक आहे Hedonism म्हणजे विलासी समाधान. सुविधेचा उपभोग घेताना जे ‘मस्त’ वाटणं असतं ते. कधी आरामात दुलईत गुरफटून, तर कधी मित्र व कुटुंबीयांच्या समवेत आपण मिळवतो ते. हे समाधान बाह्य़ साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं. दुसऱ्या समाधानाचं नाव आहे ‘Eudaimonic’ समाधान म्हणजे अर्थपूर्ण समाधान. हा शब्द अ‍ॅरिस्टॉटलने पहिल्यांदा वापरला. आयुष्याला अर्थ देणारं विकासात्मक ध्येय सापडणं आणि त्यासाठी परिणामांची तमा न बाळगता प्रयत्नांची पराकाष्ठा करणं यातून मिळणारं हे समाधान अधिक सखोल असतं. मानवी मनाला दोन्ही हवी असतात. एक शास्त्रज्ञ म्हणतात, ‘यांचं नातं उंची आणि वजनाप्रमाणे आहे. प्रमाणबद्धता महत्त्वाची. चणीप्रमाणे वजन असावं. वजनाने उपयुक्त राहावं, अडसर बनू नये. असंच संतुलन या दोन समाधानांमध्ये हवं.’

या दोन्ही समाधानांचा समतोल साधला तर आपली Immunity म्हणजे रोगप्रतिकारशक्ती सबळ राहते. आजच्या परिस्थितीमध्ये ही भूमिका अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या पातळीवरसुद्धा! आरोग्याच्या प्रतिबंधक काळजीसोबत उत्पादकता आणि विकासाकडे नेणाऱ्या ध्येयांवर आपल्याला सतत दृढसंकल्प काम करावं लागणार आहे.

डॉ. व्हिक्टर फ्रँकेल या मनोविकारतज्ज्ञांनी स्वानुभवावर आधारित अशी ‘Logotherapy’ नावाची मानसोपचार पद्धती दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित केली होती. ‘लोगॉस’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘Meaningfulness’ अर्थात अर्थपूर्णता. चांगला मराठी शब्द आहे ‘सार्थक.’ Pleasure should not be driven by hollow consumption alone… म्हणजे रिकाम्या, पोकळ चंगळवादाच्या मार्गानेच आनंदाच्या अनुभवाने जायला हवं असं नाही. हे वाक्य कुणा ललित लेखकाचं नाही, तर शास्त्रीय निबंधातलं आहे.

आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामधल्या उपनिषदातल्या ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ या संकल्पनांच्या जवळ जाणारी ही मांडणी आहे. डॉ. अब्राहम मॅसलो यांच्या मानवी गरजांच्या पिरॅमिड रचनेत Esteem needs म्हणजे मानमान्यतेची गरज आणि Actualization म्हणजे आत्मभानाची गरज अशा दोन पायऱ्या सांगितल्या आहेत. मॅसलो यांनी आत्मभानाच्या पाचव्या पातळीवरच्या काही व्यक्तींचा अभ्यास केला. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर या माणसांकडे Goal ‘Beyond their Skin’ होता. म्हणजे स्वयंकेंद्रिततेच्या पलीकडे नेणारं ध्येय सापडलं तर ते अर्थपूर्ण समाधान देतं. असं झालं तर विलासी समाधान आणि अर्थपूर्ण समाधान संतुलित करता येतं. त्यामुळे विचार आणि भावनेला जी स्थिरता येते त्याचा परिणाम थेट पांढऱ्या पेशींच्या कार्यापर्यंत पोहोचतो. आजार रोगजंतूंमुळे होणारा असो की विषाणूद्वारे होणारा; रोगप्रतिकारशक्ती वाढवणं ही त्या आव्हानाला तोंड देण्याची महत्त्वाची पायरी. जितकी रोगप्रतिकारशक्ती उत्तम, तितकी आजारी पडण्याची शक्यता कमी. आजार आला तरी त्यातून चांगल्या पद्धतीनं बाहेर पडण्याची खात्री जास्त. या रोगप्रतिकारशक्तीचे आणि भावनांचे अंगभूत नाते आहे. ते समजून घेतले तर शारीरिक दृष्टीने आरोग्यपूर्ण जीवन आणि मानसिक दृष्टीने अर्थपूर्ण जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे लक्षात येईल.

ज्या नॉर्मन कझीन्सपासून शरीर-मन संबंधांतील संशोधनाला गती मिळाली त्यांचे एक अनुभवसंपन्न वाक्य आता तुमच्यापुढे न्याहाळण्यासाठी ठेवतो आणि थांबतो.

Death is not the greatest loss in life. The greatest loss is what dies inside us while we live… मृत्यू हा जीवनावरचा सर्वात कठोर आघात नव्हे. आपण जगत असताना अंतर्यामीच्या ज्या विकासक वृत्ती मृतप्राय होत जातात, ते खरं तर आपलं सर्वात मोठं नुकसान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 1:15 am

Web Title: emotions and immune system dd70
Next Stories
1 अफसाना लिख रही हूँ.. : ‘ये घर बहोत हसीन है!’
2 सांगतो ऐका : विलक्षण प्रतिभेचे लालभाई मोशाय
3 बुद्धीच्या देशा…
Just Now!
X