06 August 2020

News Flash

प्रसिद्धी, पॉप आणि पु. ल.!

आजच्या कॉलेजच्या पोरांचं गाणं ‘रॉक’ असेल, तर माझ्या वयाच्या आसपासच्या (आणि ते पस्तीस आहे!) पोरांचं कॉलेजमधलं गाणं हे ‘पॉप’ होतं.

| September 7, 2014 06:43 am

आजच्या कॉलेजच्या पोरांचं गाणं ‘रॉक’ असेल, तर माझ्या वयाच्या आसपासच्या (आणि ते पस्तीस आहे!) पोरांचं कॉलेजमधलं गाणं हे ‘पॉप’ होतं. नव्यानेच भारतात आलेला तो एम. टी. व्ही.- व्ही. टी. व्ही., त्यावरची निरंतर पळणारी चित्रं, कमीत कमी जाहिरातींसह सदा चालू असलेले ते व्हिडीओ अल्बम्स, ते वेगळ्याच विश्वामधले गायक-गायिका आणि त्यांचं ते अद्भुत, निराळं जग. ते परकं जग माझ्या पिढीपर्यंत बहुधा या चॅनेल्समुळेच पहिलं पोहोचलं असावं. ना तेव्हा मोबाइल होते, ना इंटरनेट. आजच्या पाळण्यातल्या पोरानं ‘स्काईप’वरून अमेरिकेमधल्या काका- मामा- आत्या- मावशीचं घर दहादा बघितलेलं असतं! ‘बेवॉच’सारख्या मालिकांमुळे हवाईचा समुद्रकिनारा तरुणांनी दहादा टी.व्ही.वर बघितलेला असतो. पण आमच्या मित्र-मैत्रिणींच्या कंपूनं हवाईचा तो निळा-सावळा सागरतीर पाहिला तो एम. टी.व्ही.वर.. ग्लेन मेडेरीऑसच्या गाण्यात. ‘Nothingls gonna change my love for you…’ ग्लेन गाऊ लागला.. मैत्रिणीचा हात हातात घेऊन, त्या किनाऱ्यावर चालता चालता. इकडे आमच्याही  स्वप्नील आशा पल्लवित झाल्या. मागे सॅक्सोफोन वाजतो आहे.. गाण्याची लय कशी निवांत आहे. ग्लेन सौम्यपणे आर्जव करीत म्हणतोय : ‘Hold me now, touch me now, I don’t want to live without you.’ उतरत जाणारा तो सूर्य आता समुद्राला टेकलाय. सारी हवा कशी प्रसन्नतेचा शिडकावा करीत चालली आहे. आमच्या डोळ्यांवर काही ‘थ्री-डी’ चष्मे नाहीएत; पण तरी आम्ही जणू स्वत:च हवाईच्या त्या किनाऱ्यावर असल्याचं कसं बरं भासतंय? मागे गोव्याच्या किनाऱ्यावरचे बाकीबाब तथा बा. भ. बोरकर जणू उभे राहून म्हणताहेत : ‘हवा पावसाळी, जरा रात्र काळी..’ सारा आसमंत जणू प्रेमाच्या वाटेनं निघालाय. तो देखणा ग्लेन त्याच्या उमद्या आवाजानिशी सुरतपाक युवतीकडे कटाक्ष टाकतो आहे.

..कट् टू २०१४! लेखाच्या निमित्तानं अस्मादिक गुगलवर ग्लेनची माहिती काढताहेत. आजच्या घडीला ग्लेन ‘मेरीनॉल स्कूल्स’ या नावाजलेल्या हवाईतल्याच शाळेचा उपप्राचार्य आहे. त्याची पीएच. डी. पुरी होत आली आहे. संगीतामधली नव्हे; तर शिक्षण क्षेत्रामधली! त्याला दोन मुलं आहेत. आणि तो अधूनमधून कविता, गीतं लिहितो. मी हताश होतो आहे. ‘गुगल’नं मला धोका दिला आहे. माझ्या तरुणाईच्या स्वप्नांचा एक तुकडाच ‘गुगल’नं ही माहिती देऊन तोडला आहे! असो. हे वर्तमान मला विसरायला हवं. ग्लेन हा हवाईमध्ये शाळाचालक असूच शकत नाही. त्यानं मैत्रिणीबरोबर त्या किनाऱ्यावर सतत फिरत राहायला हवं. ‘पॉप’- ‘पॉप’ म्हणजे असंच असतं ना? एक प्रतिमा असते.. सुरांनी घडवलेली.. लाखो माणसांनी अंगी बाणवलेली. आणि मग ती प्रतिमा आहे, हे साऱ्यांनी विसरायचं असतं. रेकॉर्ड कंपन्यांचा त्यातच फायदा आहे. तुमचा-आमचा फायदा हाच, की आपली स्वप्नं अबाधित ठेवली जाताहेत!

तशा तर पॉप संगीताच्या अनेक व्याख्या आहेत. पण त्याचा हेतू अगदी सरळ-स्वच्छ आहे. आपलं गाणं लाखो-करोडो लोकांपर्यंत पोचवणं, हा साऱ्या पॉप संगीताचा पहिला हेतू! तोच आद्यहेतू आहे. ‘पॉप’ संगीत म्हणजे ‘पॉप्युलर संगीत’ असंच मानलं जातं. ते एक प्रकारे खरंही आहे. पण या दोन्ही संज्ञा इतक्या निरनिराळ्या तऱ्हेनं वापरल्या जातात, की बस रे बस! समीक्षेच्या एका टप्प्यावर अमेरिकेत जॅझ, रॉक, कंट्री, हिपहॉप या साऱ्यांनाच ‘पॉप’ संगीत किंवा ‘पॉप्युलर संगीत’ या सदरात गणलं जायचं. (भारतात पुष्कळदा अजूनही गणतात!) मग कालांतरानं दोन संज्ञांना वेगळे अर्थ प्राप्त झाले. ‘पॉप्युलर संगीत’ म्हणजे काही केवळ पॉप संगीत नव्हे. तसे तर सारेच संगीतप्रकार ‘पॉप्युलर’ असतात. आजही ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ला खचाखच गर्दी असते. आणि मुंबई-कोलकात्यामध्ये जॅझची तिकिटं हातोहात खपतात. ‘पॉप्युलर संगीता’मध्ये जे जे प्रसिद्धीस येतं त्याचा समावेश होतो. ‘पॉप’मध्ये जे जे प्रसिद्धीस येऊ शकतं त्याचा अंदाज बांधत त्या दिशेनं संगीतनिर्मिती केली जाते.

रॉय शुकरसारखा संगीतज्ञ म्हणूनच म्हणतो, ‘It is a music produced commercially for profit, as a matter of enterprise; not art.’ (पॉप संगीत ही कला नव्हे, तर उद्योजकता आहे; व्यावसायिक नफा मिळवण्याकरिता कार्यरत असलेली!) फिलीप टॅगनं ‘पॉप’ची व्याख्या करताना चार लक्षणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे पॉप हे जनांकरिता निर्मिलं जातं. दुसरं वैशिष्टय़ हे की, शास्त्रीय संगीतासारखं ते लिखित नसतं, तर त्याचं जतन आणि संवर्धन मौखिक परंपरेनं केलं जातं. (शास्त्रीय संगीत म्हणजे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत- जे लिहिलेलं असतं.) खेरीज ती कला नसते; विक्रीजन्य गोष्ट असते. चौथं स्वरूप हे की, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये.. ‘It should sell as much as possible.’ – खूप खपल्या पाहिजेत गाण्याच्या रेकॉर्डस्! फिलीप टॅगच्या हुशारीविषयी किंवा त्याच्या मार्क्‍सवादी मतांविषयी मला काही आक्षेप नाहीत; पण आश्चर्य असं वाटतं की, या मोठय़ा व्याख्येत पॉप संगीत हे असं सगळं भांडवलशाही वगैरे असलं तरी मूलत: सर्जनशील आहे, हे कुठे आलेलंच नाही! एखादी विक्रीजन्य गोष्ट तयार करायलाही सर्जनशीलता लागते. गाण्याच्या क्षेत्रात तर ती कितीतरी अधिक लागणार, हे उघड आहे. तीन-चार मिनिटांचं एक गाणं- जे जगातल्या नाना देशांतल्या, नाना भाषिक, भिन्न सांस्कृतिक पाश्र्वभूमीच्या लाखो-करोडो लोकांचा आणि त्यांच्या सांगीतिक अभिरुचीचा ल. सा. वि. – म. सा. वि. काढून बनवायचं, हे येरागबाळ्याचं काम नाही. आणि मग ज्याला ते जमतं, तो स्टार होतो. मरीया कॅरे, मॅडोना, जस्टीन बिबर, सेलिन डीऑन, मायले सायरस, ख्रिस ब्राऊन यांच्या बातम्यांनी आज भारतीय वर्तमानपत्रं भरून गेलेली असतात. या पॉप-स्टार्सची लफडी, व्यसनं, आर्थिक गणितं, बंगले, फॅन्सचे कंपू या साऱ्यांनी- विशेषत: इंग्रजी वृत्तपत्रांच्या पुरवण्या भरगच्च भरतात. पुष्कळदा त्या बातम्यांमध्ये हिणकस म्हणावं असंही असतं. नसतो तो त्या- त्या पॉप-स्टारला कधीकाळी भेटलेला आणि जन्मावर व्रण उमटवून गेलेला सर्जनाचा तापलेला चटका!

सर्जनाचं वरदान आणि शाप या चक्रातून कुठल्याच कलाकाराची सुटका नसते. पॉप-स्टारही त्याला अपवाद नाहीत. प्रसिद्धीच्या स्वैर घोडय़ावर स्वार झालेल्या या पॉप-आयकॉन्सचं जगणं आणि गाणं आपण आता काही आठवडे बघणार आहोत. एकेकाचं गाणं आणि जगणं हा एकेका सिनेमाचा विषय ठरू शकतो- अशी ती आयुष्यं आहेत. शेवटी ‘पॉप’- ‘पॉप’ म्हणजे काय? महत्त्वाकांक्षा.. सर्वदूर पोचण्याची; आपली कला पोहोचविण्याची! आणि मग त्या महत्त्वाकांक्षेच्या पुरात कधी तरायची, कधी वाहवत जायची; कधी बुडायची!  मग येते बातमी- मायकेल जॅक्सनच्या भकास, विषयासक्त मृत्यूची, किंवा व्हीटने ह्य़ूस्टनच्या आत्महत्येची! तो फ्रँक सिनात्र गातो आहे न्यूयॉर्कविषयी.. तिथल्या महत्त्वाकांक्षेविषयी..

‘न्यूयॉर्क.. न्यूयॉर्क..’

kStart spreading the news, Ilm leaving today.

I want to wake up in a city that never sleeps.

If I can make it there, I make it anywhere.

I want to be part of it; New York! New York!l

(सांगा जाऊन साऱ्यांना- मी सोडला माझा आज गाव

उठेन अशा शहरात.. जे कधीच झोपत नाही राव

जर का तिथे घुमली, तर पोचेल माझी कुठेही हाक

न्यूयॉर्क! न्यूयॉर्क! बनून राहीन तुझाच भाग!)

 

सर्वत्र हाक घुमवण्याची ही गायकाची विजिगीषु वृत्ती म्हणजे पॉप संगीत! पॉप संगीताची माझी व्याख्या ही अशा तऱ्हेची.. त्यातल्या सर्जनाला न अव्हेरणारी अशी आहे!

पॉपचं वळण हे मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. पु. लं.चं बहुतांशी लिखाण हे उत्तम ‘पॉप अ‍ॅक्ट’ म्हणून बघता येईल. रेखा साने- इनामदारांनी पु. लं.च्या लिखाणावर अतिमाधुर्याचा आरोप केला खरा; आणि त्यात तथ्यही आहेच.. पण पॉपच्या नजरेतून पाहिलं तर ते चित्र उत्तम ठरू शकेल; आणि ‘ऑथेंटिक’ही! ‘पॉप’ची आणि पु. लं.च्या डीस्कोर्सची अनेक लक्षणं समान आहेत : तेच अफलातून अल्पाक्षरत्व, मोजकेपणा, जनाभिरुची ओळखण्याचा वकूब; तीच तंत्रशुद्धता आणि कसदार उपयोजने, उत्तम प्रसिद्धीतंत्र आणि कार्यक्षम मॅनेजर्स (सुनीताबाई!)-

पु. लं.ची मध्यममार्गी पात्रं आणि पॉपचा मधला, बिनकटकटीचा, बिनबंडखोर रस्ता यांत साम्य आहेच!

कुणी सांगावं, पु. लं.नी तेव्हा इंग्रजीत संगीतिका रचल्या असत्या तर ब्रॉडवेवर फ्रँक सिनात्रसह ‘बटाटय़ाच्या चाळी’सारखी एखादी ‘स्मिथस् अपार्टमेंट’ उभी राहिली असती आणि पॉपच्या जगानंही पु. लं.सारखा परका, भारतीय, बिन-गोरा कलाकार स्वीकारला असता. कारण पॉपला बाकीच्या संगीतप्रकारांपेक्षा एक भाषा आणखीन कळते : प्रसिद्धीची!                                                                         

ashudentist@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2014 6:43 am

Web Title: fame pop and p l deshpande
टॅग Marathi
Next Stories
1 गाणं आणि बॉम्ब
2 शनाया ट्वेनचा स्त्रीवाद
3 ‘सांग, पुरेसं नाही हे सारं?’
Just Now!
X