आज आपण २०१२ला निरोप देत आहोत. अप्रिय घटनांचे झाकोळ घेऊन वर्ष सरते आहे. या वर्षांने खूप लाडके नेते, अभिनेते, समाजासाठी आदर्श ठरलेल्या व्यक्ती काळाच्या पडद्याआड नेल्या. खूप पडझड झाली. निसर्गही कोपला, पण मला अस्वस्थ करतेय ते नैतिकतेचे अध:पतन. भ्रष्टाचार होताच, पण तोच आता राजमान्य महामार्ग होतोय का अशी भीती वाटू लागली आहे. ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार’ हे आजवर फक्त ऐकले होते, तो धोंडा आज आपण उरावर घेतला आहे. सारा समाजच आत्मकेंद्रित झाला आहे. दुसऱ्याचे दु:ख पुसायला तर वेळ नाहीच, पण दुसऱ्याला झालेल्या दु:खाचे कारण आपला लोभीपणा आहे हे मान्य करण्याचे सौजन्यही शिल्लक उरलेले नाही. ही शेवटची पडझड विलक्षण वेगाने होते आहे. त्यातून उमटणारे पडसाद अस्वस्थ करणारे आहेत. कुठे गँगरेप, कुठे जबरी हल्ले, कुठे आत्मघात, तर कुठे प्रत्यक्ष जन्मदात्यांचाही खून.. समाज ढवळून निघतो आहे. हालहाल असहय़ होते आहे आणि अमृतकुंभाची आस आहे.
‘तुझे आहे तुजपाशी; परंतु जागा चुकालाशी’ अशी ही आपली अवस्था आहे. इतरांसाठी वेळ नाही, इतरांच्या दु:खाचे फारसे सोयरसुतक नाही. पण स्वत:साठीही विचार करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. मग साहजिकच अविचारातून कृत्ये घडत आहेत आणि आपण फक्त प्रायश्चित्त किंवा शिक्षेच्या विचारात गुरफटून पडत आहोत. नीतिमत्ता खालावयाला सुरुवात झाली तो काळ फार जुना होता. देशासाठी विचार करावयाची वृत्ती स्वातंत्र्य मिळाल्यावरच लयाला गेली. देशासाठी लढणारा, हौतात्म्य पत्करणारा सैनिक जन्मावा, पण शेजाऱ्याच्या घरात. माझा चिरंजीव यू.एस.ला जाण्यातच आम्ही धन्यता मानली. यू.एस., युरोपने दारे बंद करायला सुरुवात केल्यावर आम्ही पूर्वेचा विचार करू लागलो, पण इथे मी काय करू शकतो हा विचार आमच्या मनाला फारसा शिवला नाही हेच खरे!
राजकारणावर बोलणे हा जन्मसिद्ध हक्क होताच, पण ती टीका करताना आम्ही उत्तम Armchair politicians झालो. त्यापलीकडे जाऊन कृती करताना आमचे मध्यमवर्गीय ‘सुशिक्षित’ संस्कार आड आले. राजकारणातही अडचणी येतात, संतुलन ठेवणे सोपे नसते हे समजून घेण्याची प्रगल्भता आम्ही दाखवली नाही.
सीमेवर कुडकुडणाऱ्या आमच्या जवानांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकून न ऐकल्यासारख्या करून आम्ही आमच्या सायंकाळच्या धारावाहिक कार्यक्रमात स्वत:ला गुंग ठेवतो. इन्कम टॅक्स भरताना तो कमीत कमी होण्यासाठी प्रयत्नशील राहतो. आमचे राष्ट्रप्रेम आता फक्त सिनेमा सुरू होण्यापूर्वी पडद्यावर दिसणाऱ्या तिरंग्याच्या सन्मानार्थ उभे राहण्यापुरते सीमित झाले आहे. खिलाडूपणे स्पर्धेतील पराभव मान्य करणे आता आम्हाला जमत नाही. ‘मला नाही मिळाले, तर मी त्याचा नाश करेन.’ ही पराकोटीची द्वेषभावना सार्वत्रिक झाली आहे. ही विकासाची विषारी फळे आहेत असेही म्हणता येणार नाही. पण हा विकास आणि विवेक यातील विसंवाद आहे, हेच खरे.
२०१२ला निरोप देताना गरज आहे ती अंत:र्मुख होण्याची. स्वत:पलीकडे दुसऱ्याचा विचार करण्याची. आजच्या देशात खूप काही आहे. प्रत्येकाची गरज भागविण्यापुरते. प्रत्येकाची हाव-चोचले पुरविण्याइतके नाही. पण ते तर कुबेराकडेही नसेल. तेव्हा सुजलेल्या श्रीमंतीच्या पाठी धावण्याऐवजी २०१३ मध्ये आपण सशक्त, सक्रिय अस्तित्वाचा विचार करू या.
२०१२ ने खूप काही हिरावून घेतले. २०१३ मध्ये काही कमावण्याचा संकल्प करू या आणि त्याला नैतिक अधिष्ठान देऊ या. (समाप्त)