07 March 2021

News Flash

लताबाई… एक हृद्गत!

प्रख्यात कवयित्री व लेखिका शान्ता ज. शेळके यांचा अप्रकाशित, रसाळ लेख.. लतादीदींच्या ( उद्या, २८ सप्टेंबर) वाढदिवसानिमित्ताने!

लता मंगेशकर. वय वर्षे अवघे ९१. भारतीय जनमानसावर गेली आठ दशके अधिराज्य गाजवणारा स्वर-चमत्कार!

लता मंगेशकर. वय वर्षे अवघे ९१. भारतीय जनमानसावर गेली आठ दशके अधिराज्य गाजवणारा स्वर-चमत्कार! त्यांच्या सहवासात वेचलेले विलक्षण क्षण उलगडणारा प्रख्यात कवयित्री व लेखिका शान्ता ज. शेळके यांचा अप्रकाशित, रसाळ लेख.. लतादीदींच्या ( उद्या, २८ सप्टेंबर) वाढदिवसानिमित्ताने!

ते पंचेचाळीस साल असावे. मी पुण्याहून मुंबईला आले होते आणि आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकात काम करत होते. एके दिवशी अत्रेसाहेब मला म्हणाले, ‘‘आज रात्री आपण विनायकरावांच्या घरी लताचे गाणे ऐकायला जाणार आहोत. तुला मी आमच्याबरोबर घेऊन जाईन.’’

मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघत राहिले तेव्हा ते हसून म्हणाले, ‘‘विनायकराव म्हणजे मास्टर विनायक. आणि लता ही मास्टर दीनानाथ यांची मुलगी.. फार गोड गाते ती!’’

मास्टर विनायक, मास्टर दीनानाथ.. दोन्ही नावे मला माहीत होती. दीनानाथांना कधी बघण्याचा योग आला नव्हता. लताचे नाव मात्र कानावरून गेले होते. माझ्या मनात कुतूहल, औत्सुक्य निर्माण झाले. रात्रीच्या कार्यक्रमाची मी वाट पाहू लागले.

विनायकराव तेव्हा शिवाजी पार्कला आचार्य अत्रे यांच्या निवासस्थानाजवळच राहत होते आणि लताबाई व मीनाताई या त्यांच्याकडे मुक्कामाला होत्या. त्यांची आई व इतर भावंडे खानदेशात थाळनेर इथल्या त्यांच्या आजोळी राहत असत. रात्री आम्ही तिथे गेलो. बाहेरचा छोटासा हॉल. जेमतेम २०-२५ माणसे बसतील एवढाच. आणि तेवढीच माणसे तिथे होती. तो एक घरगुती मेळावा होता. हॉलच्या मध्यभागी थोडय़ाशा उंच बैठकीवर लता बसली होती. पांढरीशुभ्र साडी, सडसडीत बांधा, कोवळा चेहरा, बुद्धिमत्तेचे निदर्शक असलेले अतिशय तीव्र, चमकदार डोळे आणि पाठीवर खूप जाड लांबसडक दोन वेण्या. लताला बघताच मनात आपुलकीचे भाव निर्माण झाले. त्या दिवशी ती काय गायली मला नीटसे आठवत नाही. प्रथम एखादी शास्त्रीय बंदिश तिने गायिली असावी. आणि नंतर एक-दोन नाटय़गीते. त्यात ‘शूरा मी वंदिले’ हे एक गाणे होते. लताचा पातळ, धारदार, विलक्षण गोड आणि सुरेल असा आवाज मात्र हृदयाला खोलवर स्पर्शून, विद्ध करून गेला. मला गाण्यातले फारसे काही कळत नाही. तरीही लताचे गाणे ऐकताना आपण फार अद्भुत, सुंदर असे काहीतरी ऐकत आहोत इतके मात्र खचितच वाटले. ही लहानशी, सडसडीत बांध्याची आणि अतिशय गोड आवाजाची मुलगी भविष्यकाळात एक अलौकिक गानसम्राज्ञी होणार आहे, चित्रपटसृष्टीत अत्युच्च मानाचे स्थान पटकावणार आहे आणि देशातच नव्हे, तर परदेशातही भारताचे नाव गाजवणार आहे, हे तिचे उज्ज्वल भविष्य मात्र त्या रात्री कुणालाही जाणवले नसेल!

त्यानंतर पाश्र्वगायिका म्हणून लताबाई काम करू लागल्या. त्यांनी गायिलेली गाणी प्रत्यही कानावर येऊ लागली. ‘महल’, ‘बरसात’ यासारख्या चित्रपटांतली त्यांची गाणी अतोनात गाजली आणि ‘लता मंगेशकर’ या नावाभोवती एक देदीप्यमान वलय निर्माण होऊ लागले. मी यावेळी माझ्या उद्योगात मग्न होते. लताबाईंचे कुटुंब, चित्रपटांचे क्षेत्र, त्यांची ध्वनिमुद्रणे, गाणी हे सारे माझ्यापासून शेकडो मैल दूर होते. त्यांची पुन्हा कधी भेट होईल असे मला वाटले नव्हते.

पण ती झाली. आणि तीही योगायोगाने. मध्यंतरी विनायकरावांचे निधन झाले होते आणि मंगेशकर मंडळी आता नाना चौकात नाना शंकरशेठ यांच्या वाडय़ात राहायला आली होती. लताबाईंचा कामाचा व्याप आता खूपच वाढला होता. याच सुमाराला विनायकरावांच्या कंपनीतले लताबाईंचे पूर्वीचे सहकारी दिनकर पाटील आणि माधव शिंदे या दोघांनी मिळून ‘रामराम पाव्हणं’ हा चित्रपट काढायचे ठरवले. कथा, संवाद दिनकरराव यांचे होते आणि गीतलेखन पी. सावळाराम आणि मी अशा अगदी नवशिक्या गीतकारांकडून त्यांनी करवून घेतले होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन लताबाई करणार होत्या. काही गाणीही त्याच गाणार होत्या. मला नंतर असे कळले, की पाटील आणि शिंदे यांनी जेमतेम पैशांची जमवाजमव करून चित्रपट काढायचे ठरवले होते. त्यांची ती अडचण जाणून लताबाई आपल्या या पूर्वीच्या सहकाऱ्यांच्या मदतीला पुढे आल्या होत्या आणि एक पैसाही न घेता आपल्या अत्यंत कार्यव्याप्त अशा वेळापत्रकातून सवड काढून ‘रामराम पाव्हणं’ला संगीत द्यायचे त्यांनी कबूल केले होते. गीतकार म्हणून त्यावेळी त्यांच्याबरोबर काही काम करता येईल असे मला वाटले. पण तशी संधी आली नाही. रिहर्सल्स, रेकॉर्डिग यांनाही मला हजर राहता आले नाही. लताबाई मात्र दिनकररावांच्या घरी एकदा भेटल्या. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा धीर मला झाला नाही. मी इतकेच म्हटले, ‘‘तुमची गाणी मी नेहमी ऐकते. ‘सखी री सुन बोले पपीहा उस पार’ हे गाणे मला फार आवडले.’’ माझे बोलणे ऐकून त्या इतकेच म्हणाल्या, ‘‘आवडले का?’’ आणि हसल्या.

‘रामराम पाव्हणं’ला लताबाईंनी गोड चाली दिल्या होत्या. त्यातले ‘मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले’ हे चित्रपटासाठी लिहिलेले माझे पहिलेच गीत. त्याची चाल लताबाईंनी दिलेली असावी, इतकेच नव्हे तर ते गायलेही त्यांनीच असावे.. हा माझ्या आयुष्यातला मला एक भाग्ययोग वाटतो. पुढच्या काळात मी त्यांच्याबरोबर भरपूर काम केले. माझ्या गाण्यांना त्यांनी चाली दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी गायलेली माझी कोळीगीते, गणपतीची गाणी अतिशय लोकप्रिय झाली. तरीदेखील ‘रामराम पाव्हणं’मधले त्यांनी गायलेले जे माझे पहिलेच गाणे- त्याचे अप्रूप मला आजही वाटते.

नंतर ६०-६२ सालचा काळ. आता मी ‘नवयुग’मधली नोकरी सोडून दादरच्या रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत होते आणि मराठी चित्रपटांमधून थोडे थोडे गीतलेखन करू लागले होते. एके दिवशी आशाबाई माझे गाणे गाणार होत्या व त्यासाठी मी बॉम्बे लॅबोरेटरीत गेले होते. पण काही कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. रेकॉर्डिग रहित झाल्यामुळे मी घरी जायला निघाले होते. तेवढय़ात तिथले प्रमुख रेकॉर्डिस्ट शर्माजी मला म्हणाले, ‘‘आप जा रही है? अब लताजी का रेकॉर्डिग होनेवाला है। इनका गाना नहीं सुनोगी?’’

लताबाईंचे रेकॉर्डिग होणार आहे म्हटल्यावर ते ऐकण्याचा मोह मला आवरेना. मी थांबले. तेवढय़ात लताबाई आल्या. मी पुढे होऊन त्यांना म्हटले, ‘‘तुम्हाला आठवत नसेल कदाचित, मी शान्ता शेळके.’’ त्या हसल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘मला आठवतं ना.. शान्ताबाई, ‘रामराम पाव्हणं’ची गाणी तुम्ही केली होती! आणि ते दिनकररावांचं पिक्चर होतं!’’

मी आश्चर्यचकित झाले. मधल्या काळात लताबाई कलाकार म्हणून कितीतरी मोठय़ा झाल्या होत्या. इंडस्ट्रीत त्यांचे नाव विलक्षण गाजत होते. त्यांनी नुकतीच गायिलेली ‘कोहिनूर’, ‘होनाजी बाळा’ या चित्रपटांतली गाणी सतत कानावर येत होती. आणि माझी त्यांची पूर्वीची ओळख अगदीच जुजबी होती, तरीही त्यांनी माझे नाव, पूर्वपरिचय ध्यानात ठेवला होता. मला नुसते ओळखूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी जिथून त्या गाणार होत्या त्या आतल्या रेकॉर्डिग रूममध्ये मला नेले. मला कॉफी दिली. उषाबरोबर माझी ओळख करून दिली आणि त्यांच्या अगदी जवळ बसून त्या दिवशीचे त्यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी ऐकले! माझ्या दृष्टीने तो अतिशय रोमांचक, चित्तथरारक असा अनुभव होता. ते गाणे संगीत दिग्दर्शक चित्रगुप्त यांचे होते आणि त्याचे शब्द होते.. ‘आधी रात खनक गया मोरा कंगना..’ गाणे संपल्यावर लताबाईंचा निरोप घेऊन मी निघाले; तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘ओव्यांचा साध्या, सरळ शब्दांत अर्थ सांगणारी ‘ज्ञानेश्वरी’ची एखादी प्रत आहे का? ती मिळू शकेल का?’’

‘‘साखरे महाराजांची ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ आहे. ती यादृष्टीने तुम्हाला आवडेल असे मला वाटते.’’ मी म्हणाले.

‘‘ती कुठे मिळेल? मला अशी ‘ज्ञानेश्वरी’ हवी आहे.’’ त्यांनी सांगितले. त्यावर मी त्यांना साखरे महाराजांची ‘ज्ञानेश्वरी’ मिळवून देण्याचे अभिवचन दिले आणि काही दिवसांनी ती प्रत त्यांच्या घरी पोहोचती केली.

त्याच सुमाराला केव्हातरी मीनाताईंचे लग्न झाले. त्याचे आमंत्रण लताबाईंनी स्मरणपूर्वक मला पाठवले होते. असा आमचा परिचय हळूहळू होत चालला आणि मग ‘सूनबाई’ या चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी त्यांनी कुणाबरोबर तरी मला घरी बोलावून घेतले. गीतलेखनाचा अद्याप मला फारसा सराव झालेला नव्हता. ‘सूनबाई’ चित्रपटासाठी प्रसिद्ध बंगाली संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी हे संगीत देणार होते. त्यांच्या काही बंगाली गाण्यांच्या चालींवरून मला गाणी करायची होती. मला ते काम खूप अवघड वाटले. ‘मंगेशकर’ या नावाचा दबावही मनावर होता. पण स्वत: लताबाई, त्यांची भावंडे, स्वत: सलिल चौधरी साऱ्यांनीच मला सांभाळून घेतले आणि मग फारशी जिकीर न होता ‘सूनबाई’ची गाणी सहजपणे माझ्या हातून लिहून झाली. यानिमित्ताने लताबाईंच्या पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’मधल्या प्रशस्त घरी मला अनेकदा जावे लागले. हळूहळू सर्वाशी ओळखी झाल्या आणि मनावरचे दडपण कमी कमी होत गेले. हे घर खूप अनौपचारिक आहे, इथली मंडळी साधी आणि प्रेमळ आहेत, आपल्याला आवडण्यासारखी आहेत याची लवकरच मला जाणीव झाली. औपचारिक परिचयाचे, व्यावहारिक संबंधांचे घनिष्ठ स्नेहात पर्यवसान झाले. पुढे मी त्या घरात गीतलेखनाचे भरपूर काम केले. अनेक गाणी लिहिली. स्वत: लताबाईंनी ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘मोहित्यांची मंजुळा, ‘तांबडी माती’ अशा चित्रपटांसाठी माझ्याकडून गाणी लिहून घेतली. पुढे हृदयनाथ यांच्याबरोबर तर कितीतरी गाणी करण्याची संधी मला मिळाली. कोळीगीते, गणपतीची गाणी त्यांच्याबरोबर मी लिहिली. इतकेच नव्हे तर मीनाताई, उषाताई, आशाबाईंचा मुलगा हेमंत यांच्या संगीत दिग्दर्शनाखालीही मी गीतलेखन केले. प्रथम केवळ कामासाठी आणि कामापुरतीच मंगेशकरांच्या घरी जाणारी मी- नंतर काम नसतानाही भेटीच्या, गप्पांच्या, गाणी ऐकण्याच्या लोभाने तिथे वारंवार जाऊ लागले. माझा संकोच मावळला. अवघडलेपण दूर झाले. आणि बघता बघता मी त्या घरातलीच जणू एक होऊन गेले..

या काळात लताबाईंनी मला अतिशय जिव्हाळ्याने, आपुलकीने वागवले. त्यांच्याशी जसजशी जवळीक निर्माण होत गेली, तसतसे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांच्या इतर आवडीनिवडी मला कळू लागल्या. गाणे हा त्यांच्या सर्वाधिक प्रेमाचा, चिंतनाचा, अहर्निश ध्यासाचा विषय होता. पण त्याखेरीज इतर अनेक गोष्टींत त्यांना रस असल्याचे माझ्या ध्यानात येऊ लागले. साहित्य ही त्यांच्या आवडीची गोष्ट आहे. गडक ऱ्यांच्या आणि सावरकरांच्या नाटकांत मा. दीनानाथांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांच्या- विशेषत: गडक ऱ्यांच्या नाटकांशी या सर्वच भावंडांचा बालपणापासून संपर्क आलेला आहे. लताबाईंनी तर एकदा ‘भावबंधना’त लतिकेची भूमिकाही केलेली होती. त्यामुळे गडक ऱ्यांच्या नाटकांतले अनेक संवाद त्यांना पाठ असत आणि त्यांचा त्या प्रसंगोचित मार्मिक वापरही करत. एखादा अपरिचित माणूस भेटीला येऊन खूप सलगीने बोलू लागला तर धुंडिराजाच्या शब्दांत त्या हळूच विचारत, ‘‘आता हे कोण बरे?’’ किंवा एखादी बाई पहिल्या भेटीतच आढय़तेने बोलू लागली, आपला बडेजाव सांगू लागली तर महेश्वरांच्या शब्दात त्या थट्टेने म्हणत, ‘‘काय अवदसा डोळ्यादेखत थापा मारते आहे!’’ ‘राजसंन्यासा’तली सुंदर गाणी त्यांना मुखोद्गत असल्यास नवल नव्हते; पण त्या नाटकातली पल्लेदार, अलंकारिक भाषणेही त्या अनेकदा म्हणून दाखवीत.

तशी इतरही जुन्या नाटकांतली कितीतरी गाणी लताबाईंना ज्ञात आहेत. पुढे पुढे त्या अनेकदा मला आपल्याबरोबर रेकॉर्डिगला नेऊ लागल्या. मीही कॉलेजचे टाइमटेबल सांभाळून त्यांची अनेक ध्वनिमुद्रणे जवळून ऐकण्याचा आनंददायक अनुभव घेतला. रेकॉर्डिगला जाता-येताना लहर लागली तर त्या अशी गाणी अगदी आवडीने म्हणून दाखवायच्या. त्यामध्ये ‘सौभद्रा’तील ‘पांडुनृपती  जनक जया’, ‘अरसिक किति हा शेला’ किंवा ‘सं. संशयकल्लोळा’तील ‘सुकान्त चंद्रानना’, ‘मृगनयना रसिक मोहिनी’ ही गाणी असत.

गडक ऱ्यांच्या नाटकांतील दीनानाथांनी अतिशय लोकप्रिय केलेली ‘शूरा मी वंदिले’, ‘चंद्रिका ही जणू’ किंवा ‘रवि मी चंद्र कसा’ यांसारखी गाणी थेट वडिलांच्या शैलीत म्हणताना त्यांना मोठा आनंद वाटत असे. साथीला वाद्ये नाहीत, समोर श्रोते नाहीत अशा अवस्थेत केवळ स्वत:च्या निर्भर आनंदासाठी लताबाईंनी गायिलेली ती गाणी माझ्या आजही स्मरणात आहेत.

ही तर सारी गाजलेली आणि सर्वश्रुत गाणी. पण अगदी बालवयात ऐकलेली किंवा आजोळी असताना आजीकडे पाठ केलेली गीतेही लताबाईंच्या तोंडून मला ऐकायला मिळाली आहेत. सांगलीला त्यांच्या घरासमोर एक भिकारीण येत असे. तिच्या तोंडून ऐकलेले ‘जाईजुईच्या झाडाखाली फुलांचा भडिमार गं’ हे गाणे त्याच्या गोड चालीमुळे आजही लताबाईंना चांगलेच आठवते. आजीच्या तोंडून ऐकलेली कितीतरी पारंपरिक गाणी लताबाईच नव्हे, मीनाताई, उषाताई यांच्या तोंडूनही सतत ऐकायला मिळत. ‘कुठे तुझे पंचपती दाविगे मला’ हे कीचकाचे किंवा पांडव वनवासात असताना त्यांच्याकडे दुर्वास ऋषी आपले ६० सहस्र शिष्य घेऊन आले, त्यावेळचे ‘दोन प्रहर रात्र झाली ऋषी आले भोजना। निद्रिस्त आम्ही होतो त्यांनी केली गर्जना’ ही गाणी लताबाईंना आजही आवडतात. पाठ येतात. इतकेच नव्हे, तर बालपणी आजीच्या तोंडून ऐकलेली खानदेशी भाषेतली ‘मेरे छलके जो घूम गये ढूंढ जमादार’सारखी गमतीदार लोकगीतेही त्यांच्या छान स्मरणात आहेत. स्वत: चित्रपटांना संगीत देताना त्यातल्या काही गाण्यांच्या चालीचा लताबाईंनी कलात्मक वापर केला आहे.

लताबाईंच्या लोकविलक्षण पाठांतराचा आणखी एक भाग म्हणजे जुनी धार्मिक गीते. रामदासांचे ‘मनाचे श्लोक’ किंवा त्यांचे ‘मारुतिस्तोत्र’ ऐन पारंपरिक चालीत त्या अतिशय गोड गातात. ‘घरे सुंदरे सौख्य नाना परीचे। परी कोण जाणेल हे अंतरीचे’ किंवा ‘भजनरहित रामा सर्वही जन्म गेला। स्वजनजन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला’ अशा ओळी लताबाईंच्या तोंडून ऐकताना त्यातले सारे कारुण्य, अगतिकता, माणसाचे एकाकीपण खोल ठसत जाई आणि हे सारे त्यांनी कधी पाठ केले असेल असा प्रश्न मनात उभा राही.

मी लताबाईंच्या घरी वारंवार जाऊ लागले तो काळ खरे तर त्यांच्या खूप कामाचा होता. त्यांच्याइतकी कामात व्यग्र असलेली व्यक्ती मी क्वचित पाहिली असेल. पण त्यातही वेळात वेळ काढून त्या साहित्याशी ठेवता येईल तेवढा संपर्क ठेवीत. कोल्हापूरला गेल्या म्हणजे जाताना बरोबर पुस्तके नेत आणि तिथे निवांत वाचन करीत. मराठीइतकेच- किंबहुना थोडे अधिक त्यांचे हिंदी वाचन असे. एकदा आम्ही शरदबाबूंच्या साहित्याबद्दल बोलत होतो. मी त्यांना मामा वरेरकर यांनी केलेले अनुवाद वाचण्याविषयी सुचवले, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘शान्ताबाई, मी हिंदी अनुवादांमधून शरदबाबूंचे सारे साहित्य वाचलेले आहे!’’

शरदबाबू लताबाईंचे फार आवडते लेखक. तशी रवींद्रनाथांची अनेक बंगाली गीते त्यांनी ध्वनिमुद्रित केली आहेत. पण शरदबाबू गद्य लेखक असूनही त्यांच्या कथा-कादंबऱ्या लताबाईंनी अगदी मन लावून बारकाईने वाचलेल्या आहेत असे त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवत राही. त्यातले संदर्भ, व्यक्तिरेखा लताबाईंच्या बोलण्यातून अनेकदा प्रकट होत.

एकदा त्यांच्याबरोबर कलकत्त्याला जाण्याची संधी मला मिळाली. सनातन मुखर्जी या बंगाली गृहस्थांनी लताबाईंच्या गाण्याचा कार्यक्रम तिथे ठरवला होता आणि लताबाईंची व त्यांच्या सर्व परिवाराची उतरण्याची व्यवस्था त्यांनी चौरंगी विभागात नव्यानेच उघडलेल्या ‘स्ट्रँड’ नावाच्या एका पंचतारांकित आलिशान हॉटेलात केली होती. हॉटेल अतिशय सुंदर होते. पण लताबाई मला म्हणाल्या, ‘‘खरे सांगू का? मला इथे चुकल्या चुकल्यासारखे वाटते!’’

‘‘का बरे?’’ मी आश्चर्याने प्रश्न केला.

‘‘हे हॉटेल तर सुंदर आहे!’’

‘‘ते खरे.’’ लताबाई म्हणाल्या, ‘‘पण आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा कलकत्त्याला आले आहे तेव्हा मी इथल्या ‘ग्रँड हॉटेल’मध्येच आवर्जून उतरलेली आहे!’’

‘‘त्या हॉटेलचं एवढं काय वैशिष्टय़ आहे?’’ मी कुतूहलाने प्रश्न केला. त्यावर किंचित हसून लताबाई म्हणाल्या, ‘‘शरदबाबूंची ‘विप्रदास’ वाचली आहे ना तुम्ही? त्यातली वंदना आणि तिचे वडील कलकत्त्याला येतात तेव्हा ते या ग्रँड हॉटेलमध्ये उतरतात. त्यामुळे मला या हॉटेलबद्दल विशेष आपुलकी वाटते.’’

लताबाईंचे ते बोलणे ऐकून शरदबाबूंच्या साहित्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाची मजेदार साक्ष मला पटली. असाच आणखी एक प्रसंग.. त्यावेळी दूरदर्शनवर शरदबाबूंच्या ‘श्रीकान्त’वरची मालिका सुरू झाली होती. ‘श्रीकान्त’वर लताबाई अनेकदा बोलत. तेव्हा त्या ही मालिका नक्की बघत असतील असे मला वाटले. पण मी त्यांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘नाही. मी ‘श्रीकान्त’ मालिका बघत नाही, बघणारही नाही.’’

‘‘का बरे?’’ मी अतिशय आश्चर्याने प्रश्न केला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘शान्ताबाई, ‘श्रीकान्त’ ही माझी फार आवडती कादंबरी आहे. श्रीकान्त आणि राजलक्ष्मी यांना माझ्या मनात विशिष्ट जिव्हाळ्याचे स्थान आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना तिथे काही व्यक्तिमत्त्व, रंगरूपही मिळालेले आहे. दूरदर्शनवरच्या नट-नटय़ांची कामे सुंदर होत असतील, पण मला माझ्या मनातला श्रीकान्त, ती राजलक्ष्मी यांची माझ्यापुरती असलेली चित्रे बिघडवायची नाहीत. म्हणून मी त्यांच्यावरची मालिका बघत नाही!’’

लताबाईंचे ते विवेचन मला मार्मिक वाटले. त्याचबरोबर कथा-कादंबऱ्यांतल्या आपल्या आवडीच्या व्यक्तिरेखा आणि नाटकात किंवा रूपेरी पडद्यावर त्यांना दिली जाणारी रूपे यांच्यामधल्या नात्यासंबंधी काही वेगळा बोध मला झाला. नंतर त्या विषयावर मी एक लेखही लिहिल्याचे मला आठवते.

लताबाईंना बंगाली साहित्याची बरीच माहिती आहे. बंगाली भाषेत त्या उत्तम बोलू शकतात. हृषिकेश मुखर्जी, सलिल चौधरी यांच्याशी बंगालीत गप्पा मारताना मी त्यांना ऐकले आहे. अनेक बंगाली गीते त्यांनी ध्वनिमुद्रित केली आहेत. इतकेच नाही तर गेली कित्येक वर्षे त्या बंगालीतल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका होत्या. रवींद्रनाथांची अनेक गीते त्यांनी गायिली आहेत. इतकेच नव्हे तर सलिल चौधरी यांनी माझ्या कोळीगीतांचा बंगालीत अनुवाद केला तेव्हा ती गाणीही लताबाई आणि हेमन्तकुमार यांनीच ध्वनिमुद्रित केली होती. सलिल चौधरी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांची बंगाली गीते गाताना मी ते ध्वनिमुद्रण ऐकलेले आहे. बंगाली साहित्याचे लताबाईंचे ज्ञान कधी कधी अचानक प्रकट होत असे. एकदा मी त्यांना कवी रेंदाळकर यांची ‘अजुनि चालतोच वाट’ ही कविता वाचून दाखवली. कविता लताबाईंना आवडली. पण  त्यांनी मला विचारले,

‘‘शान्ताबाई, या कवीला बंगाली येत होतं का?’’

‘‘येत होतं!’’ मी आश्चर्याने प्रश्न केला, ‘‘का बरे?’’

‘‘मी तुम्हाला विचारले ते अशासाठी, की बंगालीत अशाच आशयाची ‘रानार’ म्हणून एक कविता आहे. ‘रानार’ म्हणजे ‘रनर’ म्हणजेच ‘पोस्टमन’! गंमत म्हणजे ही कविता मी ध्वनिमुद्रितसुद्धा केलेली आहे!’’ लताबाई म्हणाल्या.

मी चकित झाले. रेंदाळकरांच्या कवितेसंबंधी एक वेगळाच तपशील मला मिळाला होता. त्याचबरोबर लताबाईंची रसिकता, काव्याची त्यांची चोखंदळ जाण आणि त्यांची तल्लख स्मरणशक्ती यांचाही मला अनपेक्षित प्रत्यय आला होता.

बंगालीइतकेच संस्कृतचेही लताबाईंना आकर्षण वाटते. हे कळले तेव्हा मी आवडणारी संस्कृत सुभाषिते त्यांना सांगू लागले. त्या परदेश प्रवासाला गेल्या तेव्हा काही सुभाषितांचे मराठी अनुवाद करून ती वही मी त्यांना दिली होती. ही सर्व भावंडे लहान असताना त्यांच्या वडिलांनी मुलांचे उच्चार निर्दोष व्हावेत म्हणून एक संस्कृत गुरुजी त्यांना शिकवायला ठेवले होते. त्यांनी काही सोपे श्लोक, स्तोत्रे मुलांकडून पाठ करवून घेतली होती. पुढे उर्दू गीते ध्वनिमुद्रित करावी लागली तेव्हा आपले उर्दूचे उच्चार साफ व्हावेत म्हणून लताबाईंनी एका उर्दू शिक्षकाची नेमणूक केली होती. त्यांना त्या ‘मास्टरजी’ म्हणत. भगवद्गीतेच्या अध्यायांचे ध्वनिमुद्रण करताना तर लताबाई एखाद्या विद्यार्थिनीसारख्या गो. नी. दांडेकरांच्या समोर बसत आणि अप्पा त्यांच्याकडून गीतेतील शब्दांचे उच्चार घटवून घेत.

एकदा लताबाई म्हणाल्या, ‘‘शान्ताबाई, शंकराचार्याच्या ‘सौंदर्य लहरी’ काव्याबद्दल मी खूप ऐकलं आहे. कधीतरी ते ध्वनिमुद्रित करण्याची माझी इच्छा आहे. ‘सौंदर्य लहरी’ कुठे मिळेल का?’’

मी ‘सौंदर्य लहरी’ हे नाव ऐकले होते. पण प्रत्यक्ष ते काव्य कधी मला बघायला मिळाले नव्हते. आता लताबाईंनी त्या काव्याची चौकशी केल्यानंतर माझेही कुतूहल जागृत झाले. मी ते काव्य त्यांना मिळवून दिले. स्वत:ही थोडेबहुत वाचण्याचा प्रयत्न केला. पुढे काय झाले मला कळले नाही. ‘सौंदर्य लहरी’ ध्वनिमुद्रित करण्याचा लताबाईंचा विचार नंतर मागे पडला असावा. एक मात्र खरे, की आपली व्यावसायिक ध्वनिमुद्रणे सांभाळून केवळ विशिष्ट कवींबद्दलच्या उत्कट प्रेमामुळे लताबाईंनी अशी वेगळी ध्वनिमुद्रणे कितीतरी केली आहेत. ‘शिवकल्याणराजा’, मीरेची गाणी, गालिबच्या ‘गझला’, भगवद्गीतेचे दोन अध्याय आणि ज्ञानदेवांच्या विराण्या- लताबाईंच्या या सर्व गीतांना अपरंपार लोकप्रियता मिळाली. ‘मीरा’ आणि ‘गालिब’ या ध्वनिमुद्रिका तर अप्रतिम आहेतच; तेच ज्ञानदेवांच्या विराण्यांबद्दलही म्हणता येईल. या साऱ्या ध्वनिमुद्रणांना मला हजर राहता आले याचा मला आजही फार आनंद वाटतो आणि त्यावेळी लताबाईंनी मला मीरेच्या काव्याचा, गालिबच्या गझलांचा जो अर्थ समजावून सांगितला त्याने माझ्या काव्यविषयक जाणिवेत कितीतरी भर पडलेली आहे याचा मला प्रत्यय येतो.

आज मागे वळून पाहिले तर मंगेशकरांबरोबरच्या- विशेषत: लताबाईंबरोबरच्या आपल्या त्या मैत्रीचा काळ किती सुंदर होता हे ध्यानात येते. लताबाईंच्या घरातही त्याकाळी अनेक घटना घडत होत्या. त्यांची ध्वनिमुद्रणे जवळजवळ रोज चालू होती. राज कपूर, सिप्पी, चोपडा अशा मातब्बर निर्मात्यांच्या जोडीने सामान्य निर्मात्यांच्या चित्रपटांसाठीही त्या गात होत्या. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, सलिल चौधरी, आर. डी. बर्मन.. अशा कितीतरी जुन्या-नव्या संगीत दिग्दर्शकांबरोबर त्या कामे करत होत्या. त्यांचा पहिला परदेश प्रवास, चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचा २५ वर्षांच्या वाढदिवसाचा सोहळा, शासनाकडून ‘पद्मभूषण’ पुरस्काराची प्राप्ती, हृदयनाथचे लग्न, त्यांच्या मुलांचे जन्म, वाढदिवस, अनेक कौटुंबिक समारंभ आणि जाहीर सत्कार.. येई तो दिवस भरगच्च काम घेऊन येई आणि अपेक्षित आनंदाचा लाभ करून देई. मी केवळ एक कौटुंबिक मैत्रीण. पण या साऱ्या खाजगी आणि जाहीर कार्यक्रमांत लताबाईंनी मला जिव्हाळ्याने सामावून घेतले. त्यांनीच केवळ नव्हे, तर साऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी मला आपले मानले. माझ्या अवघड काळात मला आधार, दिलासा दिला. त्या आठवणी आजही मनात कायम आहेत. त्यांनी आपल्याला किती संपन्न आणि समृद्ध केले, या जाणिवेने हृदय भरून येत आहे.

पंचाऐंशी साली माझे मुंबईचे राहणे अचानक संपुष्टात आले आणि मी पुण्याला येऊन स्थायिक झाले. तरी मुंबईत जडलेले हे नाते अजूनही अबाधित राहिले आहे. आजही लताबाई, त्यांची भावंडे अधूनमधून पुण्याला येतात. आमच्या घरापासून जवळच असलेल्या ‘श्रीमंगेश सोसायटी’तल्या घरी उतरतात. मी त्यांना भेटायला जाते. सुरुवातीचे अवघडलेपण थोडय़ाच वेळात दूर होते आणि सुरू होतात गप्पा, जुन्या-नव्या आठवणी, विनोद, चेष्टामस्करी, जिव्हाळ्याने केली जाणारी माझी विचारपूस आणि चहा-खाणे हेदेखील.. जुन्या प्रेमाचा नवा प्रत्यय नवा आनंद घेऊन येतो. मन सुखावते.
(शैला दातार यांच्या संग्रहातून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 6:15 am

Web Title: lata mangeshkar unpublished article of shanta shelke dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : ऑलिम्पिक, क्रिकेट आणि व्यंगचित्रं
2 विश्वाचे अंगण : जीवनाशी घेती पैजा..
3 या मातीतील सूर : ‘प्रभो शिवाजीराजा..’
Just Now!
X