01 March 2021

News Flash

सात पिढय़ांचा अनवट, प्रदीर्घ प्रवास

रंगनाथ पठारे हे मराठी साहित्यविश्वातील एक सुप्रतिष्ठित लेखक. कादंबरीकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

श्रीपती ते देवनाथ या सात पिढय़ांतील पठाऱ्यांची ही कहाणी. आरंभी त्या, त्या काळाचा इतिहास देऊन नंतर सात नायकांच्या नात्यागोत्यांचे, स्त्रीपुरुष संबंधांचे आणि सामाजिक परिस्थितीचे चित्रण करणे असा आकृतिबंध कादंबरीने स्वीकारला आहे.

डॉ. अंजली सोमण – anjalisoman1947@gmail.com

रंगनाथ पठारे हे मराठी साहित्यविश्वातील एक सुप्रतिष्ठित लेखक. कादंबरीकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या १३ कादंबऱ्या आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत, पण या लेखनात कुठेही साचेबंदपणा किंवा शिळेपणा नाही. प्रत्येक कादंबरी जीवनाचे वेगळे क्षेत्र शोधणारी. व्यक्ती आणि समाज यांचा परस्परांशी असणारा संबंध चिंतनशील पद्धतीने मांडणारी. त्याचवेळी स्वत:सिद्ध सामाजिक नतिक भूमिकेच्या मागे नम्रपणे उभी राहणारी. ‘रथ’ कादंबरीत त्यांनी ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा वेध घेतला. ‘चक्रव्यूह’मध्ये विद्यापीठातील राजकारण मांडले, तर ‘ताम्रपट’ या दीर्घ कादंबरीत सत्तास्पर्धा, सहकारी संस्था, जातीयवाद अशा समकालीन प्रश्नांना कवेत घेतले. ‘ताम्रपट’ला १९९४ साली साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन यथोचित सन्मानित केले. लघुकथेला त्यांनी चिल्लर वाङ्मयप्रकार मानले नाही. उलट, रूढ कथेपेक्षा वेगळ्या, प्रायोगिक, तरीही आशयसंपन्न कथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या प्रतिभेचे बहुआयामित्व साहित्यसंभारातून सिद्ध झाले आहे.

‘सातपाटील कुलवृत्तान्त’ ही त्यांची ७९६ पृष्ठांची भारदस्त कादंबरी अलीकडे प्रसिद्ध झाली आहे. कादंबरीलेखनात वेगळ्या वाटेने जाणारा हा प्रयत्न आहे.

‘प्रत्येक कादंबरी ही आत्मचरित्रात्मक असते. सातपाटील कुलवृत्तान्त लिहिण्याचा प्रयत्न मी गेली २० वष्रे करत होतो,’ असे पठारे यांनी या कादंबरीविषयीच्या एका मुलाखतीत सांगितले आहे. वि. का. राजवाडय़ांनी संपादित केलेल्या ‘महिकावतीची बखर’मध्ये त्यांना पठारे या जातीची माहिती कळली आणि त्यांचा शोध घेणे सुरू झाले. अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरी साम्राज्यावर पहिली स्वारी केली तिथून- म्हणजे इ. स. १२८९ पासून कादंबरीचा कालखंड सुरू होतो, तो थेट २१ व्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकापर्यंत येऊन थांबतो. त्या काळात पातेणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पुढे पठारे झालेल्या मराठा घराण्याच्या सात पिढय़ांचा हा इतिहास आहे. ‘सातपाटील’ हे नंतर स्वीकारलेले आडनाव. मूळ नाव लपविण्यासाठी घेतलेले. सातजणांत वाटल्या गेलेल्या पाटीलकीच्या वतनावरून दुसऱ्या पिढीतील साहेबरावाला त्याची पठाण प्रेयसी/ पत्नी आर्याना (आरेना) हिने दिलेले. ७०० वर्षांचे असे उत्खनन करण्यासाठी लेखकापाशी जिद्द लागते, चिकाटी लागते, अभ्यास लागतो आणि प्रातिभस्पर्श असावा लागतो. या साऱ्या गोष्टी पठारे यांच्यापाशी आहेत. त्यांच्या एकत्रीकरणातून ‘सातपाटील कुलवृत्तान्ता’त आशयाचे एक अद्भुत रसायन उभे राहते. इतिहासाशी संदर्भ साधत लेखकाने ही अजब किमया केली आहे.

श्रीपती ते देवनाथ या सात पिढय़ांतील पठाऱ्यांची ही कहाणी. आरंभी त्या, त्या काळाचा इतिहास देऊन नंतर सात नायकांच्या नात्यागोत्यांचे, स्त्रीपुरुष संबंधांचे आणि सामाजिक परिस्थितीचे चित्रण करणे असा आकृतिबंध कादंबरीने स्वीकारला आहे. विस्ताराने हे सारे येत असल्याने वाचकांच्या डोळ्यांसमोर काळाचा पट सरकत राहतो. देवनाथ हा प्रस्तुत कुलवृत्तान्त सांगणारा पुरुष.. म्हणूनच आशयाच्या केंद्रस्थानी असलेला. त्यांचा जन्म १९७० सालचा. फिजिक्स, गणित आणि संख्याशास्त्र हे त्यांचे मूळ अभ्यासाचे विषय. संकोची स्वभाव, लेखक म्हणून घडत जाणे, संगमनेर येथे असलेले वास्तव्य हे सारे तपशील देवनाथचे लेखकाशी असलेले साधम्र्य दाखवतात. लेखकाला ते लपवायचेही नाही.

कुलवृत्तान्ताचा हा पसारा दोन महत्त्वाच्या घटनांमुळे उलगडतो. भारतीय लेखकांच्या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून देवनाथ इंग्लंडला जातो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील चच्रेच्या कार्यक्रमानंतर त्याला रिचर्ड लेसिंग हा ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ भेटतो. त्याची खापर खापर पणजी मऱ्हाटा असल्याचे तो सांगतो. तिने लिहिलेले एक छोटेखानी आत्मवृत्त तो देवनाथच्या हाती देतो. ही स्त्री- भीमबाई म्हणजे दसरत सातपाटील या तिसऱ्या पिढीच्या नायकाला आफिया (आफूबाई) या अफगाण स्त्रीपासून झालेली गोरी, देखणी मुलगी. ती स्टुअर्ट लेसिंग या पोलीस अधिकाऱ्याबरोबर पळून जाते. लेसिंगच्या निवृत्तीनंतर इंग्लंडमध्ये स्थायिक होते. देवनाथला बसलेला दुसरा धक्का म्हणजे ब्लॅकस्मिथ नावाच्या ब्रिटिश लेखकाने सातपाटील घराण्याशी जोडलेले आपले नाते. पाचव्या पिढीतील अफाट आणि साहसी असलेल्या पिराजीने ठेवलेली सुंदर, आकर्षक कोल्हाटीण म्हणजे उल्फी. पिराजीच्या खुनानंतर उल्फी पळून जाऊन अँथनी ब्लॅकस्मिथ नावाच्या कलेक्टरच्या बंगल्यात आसरा घेते. अँथनी तिच्यावर मोहित होऊन तिच्याशी लग्न करतो. नोकरी संपल्यावर स्वदेशी जातो. सुटी घेऊन तो मुंबईला येतो तेव्हा म. फुल्यांना मानणारा राजूशेठ सहाव्या पिढीतील शंभुरावाला घेऊन त्याच्या घरी जातो. सातपाटील या आडनावामुळे धागेदोरे जुळतात. शंभुरावाबरोबर उल्फीने काढलेला फोटोच ब्रिटिश लेखक देवनाथच्या हातात देतो. घराण्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा यातून निर्माण होते. वांबोरीचे निवृत्त शिक्षक माणिक गुरुजी सातपाटील घराण्याची निजामशाहीतील माहिती देतात. नाशिकच्या मित्रामार्फत त्र्यंबकेश्वरच्या गुरुजींकडे आरेनराव आणि जानराव या सातपाटलांनी केलेल्या कालसर्प शांती, नारायण नागबळी या व्रतांचे उल्लेख सापडतात. घराण्याची पाळेमुळे शोधण्याची ऊर्मी वेगवान होते. खराडी, करंजे, साल्पी या गावांचा शोध घेतला जातो.

साहेबराव आणि आरेनाबाई यांना शिवरामबाबांनी दिलेल्या विठोबा-रखुमाईच्या पितळी मूर्ती देवनाथच्या घरात असतात. सात पिढय़ांना जोडणारे सूत्र (मोटिफ) म्हणून त्या कादंबरीत काम करतात.

सात पिढय़ांचा वृत्तान्त मांडताना पठारे यांनी विस्तीर्ण अवकाश पेलून धरला आहे. गावगाडा, त्यातील वेगवेगळ्या जातींचे परस्परांशी असलेले संबंध, विवाहविधी, स्त्री-पुरुषांमधील गुंतागुंतीची नाती यांचे या कादंबरीत दर्शन होते. शेती, ओसाड जमिनी, निसर्ग यांच्याशी गावांचे असलेले निकटत्व ध्यानात येते. निजामशाही/ आदिलशाहीपासून पेशवाई आणि ब्रिटिश काळापर्यंत मराठा तरुणांत असलेली युद्धखोर रग, त्यांनी आणलेल्या लुटी, युद्धकाळात भेटलेल्या स्त्रिया इत्यादी माहिती चक्रावून टाकते. व्यक्तींबद्दलची विविधता तर अपरिमित. बदलत्या काळाबरोबर मूळ स्रोत तेच राहिले तरी वातावरण बदलत जाते. आरंभीच्या काळात चक्रधर, ज्ञानेश्वर यांचे उल्लेख येतात. नंतरच्या काळात सामाजिक सुधारणांचे, त्यातून कळत-नकळत ग्रामीण भागांत होणाऱ्या बदलांचे चित्रही कादंबरीत उमटते. काही तपशील आणि स्वभावविशेष अनेक पिढय़ांमधून आविष्कृत होताना दिसतात. नायक उंच, तगडे, गोरेगोमटे आणि पाचूसारखे हिरवे डोळे असलेले. प्रणय आणि शृंगारात स्त्रिया पुढाकार घेतात. सातपाटील पुरुषांबरोबर पळून जाताना त्या स्वत:च पुढची बरीचशी व्यवस्था करतात. त्यांचा हात धरल्यावर मात्र पुरुष साहसाने पुढील सर्व संकंटांना तोंड देतात. रहस्यमय, अद्भुतरम्य वातावरण पहिल्या तीन टप्प्यांवर बऱ्याच वेळा दिसते. उदा. लाल रुमालाखाली दडलेली संदुक गुप्तपणे गणिकेकडे नेणे/आणणे. स्वसंरक्षणासाठी स्त्रियांनी शय्यागृहाखालील बळदात लपणे किंवा पुरुषवेश करून घोडय़ावरून पलायन करणे. पण तो काळ आणि ते वातावरण बघता हे स्वीकारावे लागते. योगायोग आणि असंभाव्य घटना यांचीही गाठ पडते. वानगीदाखल पुढील दोन प्रसंग- युद्धातून पळून जाणाऱ्या दसरतचा चेहरा झोरावरसारखा असणे आणि अब्दालीच्या फौजेने त्याला अफगाणिस्तानात घेऊन जाणे (पृ. ३३३), किंवा डोक्यावर हात ठेवून प्रत्येकाच्या मेंदूतले सारे वाचण्याचे ज्ञान आफूबाईपाशी असते. पिराजीच्या डोक्यावर हात ठेवून या पोराचा वंश सातासमुद्रापार जाईल असे ती म्हणते. (पृ. ४३८) पुढे उल्फी पिराजीचा मुलगा जालन याला घेऊन साहेबाबरोबर इंग्लंडला जाते. पण अशा तर्कापलीकडील घटिकांचे पाय पठारे बळकटपणे वास्तवाशी जोडतात.

इतिहास, घटना आणि तपशील यांची पुनरावृत्ती बऱ्याच ठिकाणी झाली आहे. वाचत असताना ती खटकते. अतिदीर्घ परिच्छेद आकलनात अडथळा आणतात. मजकुरावर कलापूर्ण हात फिरवून सारे थोडय़ा संक्षेपाने मांडले असते तर लेखन अधिक चित्तवेधक झाले असते. नाव ‘सातपाटील कुलवृत्तान्त’ असले तरी ही कादंबरी आहे याची जाणीव अनेक प्रसंगांत सुटल्यासारखी वाटते.

एका घराण्याच्या निमित्ताने लिहिलेली असली तरी ही मराठा समूहाची, त्यातील स्थित्यंतरांची कादंबरी आहे. पण मराठा मानसिकतेतून, मराठा जाणिवेतून तिचे लेखन झालेले नाही. लेखक जातीय जाणिवेच्या पल्याड आहे. अनेक टप्प्यांवर आपल्या घराण्याचा शोध घेताना जाती, धर्म, मानवी नाती आणि मानवांचे समूह एकमेकांत मिसळले गेले आहेत याचे त्याला भान येते. सात पिढय़ांचा इतिहास शोधताना हिंदू-मराठे, पठाण, अफगाण आणि इंग्रज या चार वंशांचे एकत्रीकरण झाल्याचे लक्षात येते. स्वत:च्या जातीचा अभिमान बाळगणारे, तिच्या शुद्धतेची ग्वाही देणारे हिंदू बघितले की त्याचा फिजुलपणा लेखकाला स्पष्ट दिसतो. स्वत: मराठा असण्याचा व्यापक अर्थ उलगडत जातो. नव्या वैश्विक जाणिवेच्या प्रकाशातच लेखक स्वत:कडे बघू लागतो. त्यामुळे कादंबरी समृद्धतेकडे वाटचाल करते.

कादंबरीची शैली मुख्यत: निवेदनात्मक आहे. साधी, सोपी, ओघवती असलेली पठारे यांची भाषा कधी काव्यगर्भ होते, तर कधी चिंतनशील बनते. कादंबरीची सुरुवात आणि शेवट तत्त्वचिंतनानेच झाला आहे. ‘देवावर विश्वास नसतानाही देवनाथला धार्मिक विधी करायचा आहे. आई वडिलांनी सांगितले म्हणून..’ हे आरंभीच्या तत्त्वचिंतनात सांगितले जाते. ‘अज्ञाताला सलाम करण्याच्या प्रेरणेतून हे सारे घडले. पूर्वजांचे बरेच काही अज्ञात होते. चरित्राचे तपशील जोडत आणि काही धागे जुळवत आपण हे लिहिले,’ अशी नम्र भूमिका शेवटच्या तत्त्वचिंतनात व्यक्त होते. ‘सातपाटील कुलवृत्तान्त’ला ही भूमिका वेगळ्या उंचीवर  नेऊन ठेवते. कल्पित आणि सत्य यांचा आगळावेगळा गोफ कादंबरीत विणला जातो.

जाता जाता एक सांगावेसे वाटते की, ही कादंबरी वाचताना भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीची आठवण येते.

‘सातपाटील कुलवृत्तान्त’- रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, पृष्ठे- ७९६,

मूल्य- ८०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 7:00 am

Web Title: marathi book review satpatil kulavruttant dd70
Next Stories
1 ध्येयवादी स्त्री-डॉक्टरचे विलक्षण अनुभव
2 दखल : लॉकडाऊनमधील हृदयद्रावक कथा
3 कोव्हिड लसीकरण विज्ञानाशी तडजोड नको!
Just Now!
X