विद्रोही साहित्य तसंच समीक्षेच्या प्रांतात महत्त्वाचं लेखन केलेल्या शरणकुमार लिंबाळे यांची ‘रामराज्य’ ही कादंबरी सद्य: कालीन राजकीय पेच, जगण्यातले अंतर्विरोध प्रखरपणे मांडते. विशेषत: भोवताली असलेल्या राजकीय अवकाशातील साठमारी, भ्रष्टाचार, घराणेशाही, दैनंदिन व्यवहारात पायदळी तुडवली जाणारी लोकशाही मूल्ये इ. बाबी कादंबरीत विस्ताराने रेखाटल्या आहेत. सर्वच राजकीय-सामाजिक लाभांपासून वंचित राहणारा इथला दलितवर्ग लिंबाळे यांच्या लेखनविश्वाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. या कादंबरीतून भेटणारी पात्रंही समाजाच्या विविध स्तरांचं जगणं, सांस्कृतिक अभिसरण, आजच्या आधुनिक काळानं निर्माण केलेले नवे पेच, शोषणव्यवस्थेचं बदलत गेलेलं स्वरूप वाचकाच्या डोळ्यापुढे ठेवतात. लिंबाळे यांचं लेखन लक्षवेधी आणि वाचकाच्या मनाची पकड घेणारं असलं तरी शेवटाकडे कादंबरी काहीशी लांबली आहे. सध्याच्या धार्मिक-जातीय तणावांच्या काळात ही कादंबरी सामाजिक आशयाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

दुही, विषमता, भेदभाव यामुळे आज जे विषारी वातावरण बनलेलं आहे, त्याचं यथासांग चित्रण लेखक करतो. झुंडबळी ही आजची एक मुख्य सामाजिक आणि राजकीय समस्या. गोमांस खाण्याच्या संशयावरुन माणसांच्या हत्या केल्या जात आहेत, समाजमाध्यमांवरील अफवांमुळे निरपराधांच्या हत्या होत आहेत. अशा घटनांमध्ये बळी गेलेले बहुतांश लोक मुस्लीम आणि दलित समुदायांतले आहेत. त्यामुळे मुस्लीम आणि दलित समुदायांत निर्माण झालेलं दहशतीचं, भयाचं वातावरण, त्यांच्या जगण्यातली घुसमट हे सारं या कादंबरीतून प्रत्ययास येतं.

‘रामराज्य’ हे कादंबरीचं शीर्षक वेगळ्या संदर्भात अतिशय सूचकपणे लेखकानं वापरलं आहे. रामाप्रमाणे हजारो वर्षांपासून ज्या समाजघटकांना वनवास भोगावा लागला आहे, त्यांच्या स्थितीचं वर्णन करणारा हा शब्द आहे. ‘राम’ या शब्दाभोवती चिकटलेले आजचे राजकीय, धार्मिक संदर्भही त्यात दडलेले आहेत.

‘रामराज्य’ -शरणकुमार लिंबाळे

दिलीपराज प्रकाशन,

पृष्ठे- ३१२, किंमत- ४३० रुपये.