सईंनी जागवली ‘सय’
‘लोकरंग’मधील (३० मार्च) सई परांजपे यांच्या लेखाने अनेक आठवणी जाग्या झाल्या. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘ईस्ट-वेस्ट कल्चरल असोसिएशन’तर्फे आम्ही  पॅरिस आणि कोग्नॅक या ठिकाणी फ्रेंच कुटुंबात ४-५ आठवडे राहिलो होतो. त्या वेळी नेहमीच्या प्रसिद्ध ठिकाणांहून वेगळ्या इतर अनेक दुर्मीळ, ऐतिहासिक महत्त्वाच्या, पण ‘टुरिस्ट स्पॉट’ नसणाऱ्या अशा काही जागा आम्हाला आवर्जून दाखवल्या होत्या. सईंनी केलेल्या नाटय़गृहांच्या, नाटय़प्रयोगांच्या सुंदर वर्णनामुळे त्या जादुई दिवसांची आठवण झाली आणि माझी ‘जी ले दोबारा’ अशी अवस्था झाली.
या लेखाच्या उत्तरार्धात वसंताच्या आगमनाने मोहोरलेल्या पॅरिसचं वर्णन तर अगदी लाजवाब आहे. जन्मजात असलेली अंगभूत रसिकता, सौंदर्यासक्ती, नावीन्याची ओढ असलेल्या कलासक्त फ्रेंच माणसांना वसंताची जादूची छडी खरंच आणखीनच सुंदर, तरुण व धीट बनवते. फुटपाथवर कॅफेमध्ये बसून दिसणारं वाहतं सौंदर्य काय किंवा लक्झेम्बर्गच्या वा कोणत्याही बागेतील इकडेतिकडे चोहीकडे दिसणाऱ्या प्रेमपुराचे वा ‘ऊ-ला-ला’ या तारुण्यसुलभ सहज उद्गारातील मौजमजा तंतोतंत वर्णन करताना सई यांचा मिस्कीलपणा दाद देण्याजोगा आहे. रसिल्या, रंगील्या पॅरिसचं हे शब्दचित्र उत्तरोत्तर चढत्या श्रेणीने अधिकच रंगत गेले आहे. सईंच्या सहज स्वाभाविक आणि उत्स्फूर्त लेखनशैलीमुळे या साऱ्या आठवणी छान माहितीपूर्ण व रंगतदार झाल्या आहेत. सुंदर, अभिरुचीपूर्ण नाटके, सिनेमे व गजरा यांसारखे प्रसन्न कार्यक्रम देणाऱ्या सई परांजपे खूप मोठय़ा कालावधीनंतर या लिखाणामधून पुन्हा भेटल्यामुळे खूप आनंद झाला.
– सुषमा साने

कार्यकर्त्यांचे प्राक्तन चटका लावून गेले..
संजय पवार यांचा ‘तिरकी रेघ’ सदरातील ‘कार्यकर्त्यांनी पालख्या उचलणे बंद करावे’ हा लेख (३० मार्च) म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांचे व्यक्तिचित्रण वाटावे असा आहे. त्यातील प्रसंगांचे उल्लेख आणि नेत्यांबरोबरच्या संभाषणाचे नमुने पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील नारायण (लग्नकार्यात दिवसभर राबून दुर्लक्षित राहिलेला) किंवा सखाराम गटणे (एखाद्या व्यक्तीमुळे अति भारावून गेलेला) यांची आठवण करून देतात. नारायण किंवा गटणे यांच्या ‘स्वामिभक्ती’चा कोणी हुशारीने गरफायदा तरी घेत नव्हते. परंतु सामान्य कार्यकर्त्यांचा नेत्यांकडून कसा ‘वापर’ करून घेतला जातो याचे वर्णन मात्र चटका लावून गेले. छगन भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा वकील, उद्योगपतीचा; म्हणून नेत्यांचा मुलगा नेता होणे यात काही गर नाही, हे मान्य केले तर जातीव्यवस्था आणि चातुर्वण्र्य यालाही आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. आता जुन्या जाती आणि वर्ण बदलून ही नवी वर्णव्यवस्था आली आहे असे समजावे. पूर्वीही लोहारकाम, सुतारकाम किंवा पौरोहित्य करणाऱ्याचा मुलगा वडिलांचे कार्यकौशल्य पाहत मोठा होत असे आणि ते तसेच आत्मसात करून आणि त्यांच्याच अनुभवाचा आणि पुण्याईचा फायदा मिळून आपले बस्तान बसवीत असे. सर्वच पक्षांतील निष्ठावान कार्यकत्रे एकत्र आले तर त्यांचे हे शोषण सहज थांबू शकते. पण दुर्दैवाने तसे काही होणार नाही. फासेपारध्याच्या गोष्टीप्रमाणे जाळ्यात अडकलेली सगळी कबुतरे जर एकत्रपणे ठरवून उडाली तर ती जाळ्यासकट सहज उडून जाऊ शकतात. पण प्रत्यक्षात तसे कधीही होत नाही. तेव्हा निष्ठावान कार्यकर्त्यांचे प्राक्तनही कधी बदलेल अशी शक्यता दिसत नाही.
– प्रसाद दीक्षित, ठाणे.

आजचे कार्यकर्ते पक्के ‘व्यवहारी’ असतात!
‘कार्यकर्त्यांनी पालख्या उचलणे बंद करावे’ ही ‘तिरकी रेघ’ वर्तमान राजकीय क्षेत्रावर यथायोग्य टिपण्णी करणारी आहे. मात्र, आजचे राजकीय पक्षांतील कार्यकर्ते पूर्वीच्या कार्यकर्त्यांसारखे भोळाभाबडे राहिलेले नाहीत, हे सत्य डोळ्याआड झाल्यासारखे वाटले. आज समस्त राजकीय पक्षांत संसद, विधानसभेची तिकिटे एकतर बोली लावून दिली जातात किंवा घराणेशाहीत वाटली जातात हे उघड गुपित आता कार्यकर्त्यांनाही माहीत झाले आहे. त्यामुळे तिकिटाची अपेक्षा सामान्य कार्यकर्ता करतच नाही. जास्तीत जास्त ‘नेमण्यात’ येणाऱ्या नगरसेवकपदाचा लाभ झाला तरी ते खूश होतात. पण सध्या राजकारण हा पूर्णवेळ धंदा झाल्याने निवडून आलेल्या आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडून विविध सरकारी कामांची कंत्राटे किंवा गेलाबाजार ‘एसईओ’पद कार्यकत्रे मिळवतात आणि त्यात खूश राहतात. विविध निवडणुकांमध्ये कार्यकत्रेही कमावतात, हे तर सर्वानाच माहीत आहे. मुळात विचारसरणी आवडली म्हणून पक्षकार्यकत्रे होणारे आता हाताच्या बोटांवर  मोजण्याइतपतच सापडतील. भरपूर फायद्यासाठी पक्षात येणारे या ना त्या मार्गाने स्वत:चा फायदा करून घेतात. त्यामुळे पालखी वाहायला आता कार्यकत्रे सापडतील का, असाच प्रश्न आहे.  
माया हेमंत भाटकर, मुंबई.