News Flash

रफ स्केचेस  : माझ्यात मी

पेंटिंग्ज पुन्हा दिसतील किंवा नाही याची चुटपुट उरात असतेच.

|| सुभाष अवचट

जहांगीरमधील उजव्या बाजूच्या तिन्ही गॅलरींत माझी भिंतीवर पन्नासेक पेंटिंग्ज डिस्प्ले झाली आहेत. त्यांना साजेशी प्रकाशयोजनाही झाली आहे. आणि माझ्याच प्रदर्शनात मी एकटाच बसलेलो आहे. २००५ साली जुलै महिन्याचा अखंड पाऊस मुंबईभर आहे. त्याची मला सवय आहे. माझी अनेक प्रदर्शनं अशाच पावसाळी महिन्यांत झालेली आहेत. या पावसाळ्याचा धाक इतरांसारखा चित्रकारांनाही असतो. त्यामुळे अशा दिवसांत प्रदर्शन करायला ते फारसे धजावत नाहीत. त्यामुळे जहांगीरचं बुकिंग सहजतेनं मिळतं. नाहीतर तीन-चार वर्षे रांगेत उभं राहावं लागतं. अशा पावसाळ्यात प्रेक्षक, बायर्स, प्रसिद्धी माध्यमं तेथे डोकावतील का, अशी धाकधूक असते. मला ती कधीच नव्हती. चार- पाच वर्षांत झालेलं हे काम प्रदर्शित व्हावं, एवढंच ते कारण असावं.

पण पाऊस थांबलाच नाही. त्या पूर्ण आठवडाभर त्याने उसंत घेतली नाही. २००५ साली मुंबई बुडाली. बंद… विस्कळीत झाली. मी फोर्टमधील माझ्या डॉक्टर मित्राच्या घरी मुक्कामाला होतो. कोणीही या प्रदर्शनाला येऊ शकलं नाही आणि मी एकटाच माझीच चित्रं पाहत तेथे आठवडाभर होतो. माझा मित्र माझ्यासाठी डबा, चहा घेऊन यायचा. पण ती रिकामी गॅलरी पाहून त्याला झालेलं दु:ख त्याच्या डोळ्यात दिसायचं! आशावाद नावाची एक जादू असते. त्यामुळे पाऊस थांबेल, वाहतूक सुरू होईल, सारे येतील, पूर्वी प्रदर्शनात झाल्यासारखी परत एकदा ही गॅलरी तुडुंब भरेल, जादू होईल या भरवशावर मी तेथे बसून वाट पाहायला लागलो.

माझ्या प्रदर्शनात मीच पुढचा आठवडाभर एकमेव प्रेक्षक होतो. खरं पाहता मीच पेंट केलेली ही चित्रं पाहताना माझ्यातला मी वेगळा होत गेलो. अरे, हे पेंटिंग मी कधी केलं? या विस्मयाचा मला पहिला धक्का मिळाला. स्टुडिओमध्ये सतत मी काम करत असतो. तयार झालेली पेंटिंग्ज भिंतीला पाठमोरी करून ठेवलेली असतात. ती सुलटी करून मी पुन:पुन्हा पाहत नाही. त्यात नवीन पेंटिंग करताना रिपीटेशनचा धोका उद््भवतो. आपलाच जुना चेहरा आरशानं पुन्हा पाहावा इतकं बोअरिंग असतं ते! किंवा त्याच त्याच प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन नवीन टुरिस्टना सांगताना गाईडचा जसा कोंडमारा होतो!

मित्राला सारखं वाईट वाटत होतं. त्याला प्रश्न पडलेला, की मी पुढचे दिवस एकट्यानं कसा काढणार? रेल्वे बंद. रस्ते पाण्याखाली. गावातून, शहरातून, इतर राज्यांतून प्रदर्शन पाहायला येणारे तसेच माघारी गेलेले. त्यांचे फोन येऊ लागले. पण मी नियमितपणे गॅलरीत जाऊन दिवसभर बसत असे. पहिल्या दिवशी प्रदर्शनात उत्साह हा असतोच. मित्र, नातेवाईक, शेजारी तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतात खरे, पण चित्रं विकली जात नाहीत. नंतरच्या दिवसांत परत उत्साहात चित्रकार गॅलरीत येतात- की आजच्या दिवसात तरी काहीतरी घडेल. सात-आठ तास गॅलरीत बसणं ही म्हणजे सरांनी शिक्षा म्हणून बेंचवर उभे केल्यासारखी असते. नंतर मरगळ सुरू होते. पण ते प्रत्येक दिवशी येतात. प्रदर्शन संपेपर्यंत. कारण चित्रकाराचं अनेक वर्षांचं ते काम असतं. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे पाहत राहणं, भटाच्या छोट्या कपातला चहा पिणं यात दिवस संपतात. पण हीच आशावादाची जादूगिरी असते.

आता माझ्या यावेळच्या प्रदर्शनात अनेक प्रश्न या पावसाने सोडवले आहेत. एक म्हणजे प्रेक्षक येणार नव्हते. बायर्सही नाहीत. भटाचा चहाही नाही. पण अशा या वेळी मी आनंदात होतो; कारण मी स्वत:बरोबर अगदी एकटा बसणार होतो. पण मी एकाकी अजिबात नव्हतो. लहानपणापासून एकटा, एकाकी, एकांतवास या शब्दांचा माझ्या मनात लवलेशही नव्हता, अथवा त्याची व्याख्याही मला आजपर्यंत समजलेली नाही. बहुतेक पुढेही समजणार नाही. अनेक वर्षं मी स्टुडिओमध्ये असाच एकटा काम करीत आलो आहे. माझ्याबरोबर सोबतीला कोणी असतं तरी काय फरक पडला असता? टिळक रोडच्या स्टुडिओमध्ये अनेक मित्र, लेखक, डिरेक्टर्स, अ‍ॅक्टर्सचा गराडा असायचा; पण मी मात्र पेंटिंगमध्येच गुंतलेलो असायचो. त्यांचा मला त्रास व्हायचा नाही. स्विच ऑफ होणं मी नकळत शिकलो होतो.

प्रदर्शनाचा खेळ मांडायला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. नवीन चारेक वर्षांची तयारी करावी लागते. पहिली वर्षे तर काय करायचं यातच जातात. कॅन्व्हासेस, रंग विकत घेण्यातच अर्धा जीव टांगणीला असतो. अनेक कॅन्व्हासवर प्रयोग करत करत अचानक एक धागा हाताशी लागतो आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये तो विचारांचा गुंता अलगद मोकळा होत जातो. त्या आनंदी प्रोसेसमध्ये अनेक वर्षं निघून जातात. खरं तर हीच मनातली प्रदर्शनाची वेळ असते! मग नवरीला नटवण्यासाठी जसं सारं घर शालू, दागदागिन्यांच्या खरेदीसाठी धावपळीत असतं तसंच पेंटिंग्जचं फ्रेमिंग, फोटोग्राफी, निमंत्रणं, कॅटलॉगची गडबड, फोनाफोनी सुरू राहते. नंतर पेंटिंग्जचं ट्रान्स्पोर्ट, हॉलचं लायटिंग, पेंटिंग्जचा डिस्प्ले, ओपनिंग डेच्या वाइन-चीजच्या तयाऱ्या हा वेगळाच धिंगाणा असतो. आणि पंच लाइन म्हणजे पुढचे आठ दिवस प्रदर्शनात अवघडून बसणे ही होय. रात्री घरी आलो की सारं घर पोरकं वाटू लागतं. बहीण लग्न करून सासरी गेली की जसं घर पोरकं वाटतं तशा रिकाम्या भिंती, त्यावरचे बुटके खिळे दिसू लागतात. इतक्या वर्षांची त्या पेंटिंग्जची आपली जवळीक संपते. ती पेंटिंग्ज पुन्हा दिसतील किंवा नाही याची चुटपुट उरात असतेच.

दिवसभर बाहेर सतत आणि अहोरात्र पाऊस होता. पुराची भीती वाटते; पण पावसाची नाही! माझ्या येरझारा गॅलरीत चालायच्या. नंतर मी खुर्चीत बसायचो. काही दिवसांतच मला जाणवलं, की आता या चित्रांचीच मला सोबत आहे. एक-एक चित्र पाहताना मला त्यामध्ये नवीन जागा सापडू लागल्या. कदाचित मीच माझ्या चित्रातून माझ्याकडे पाहतो आहे असे भास होऊ लागले. त्या पेंटिंग्जच्या सीरिजचं नाव होतं- परंपरा! परंपरेतल्या पेंटिंगमध्ये उन्हात फिरणारे साधूही आतल्या आपापल्या गुहेत परत जाऊ लागलेत. त्यांच्यावरच्या डोंगराच्या माथ्यावर ढग दाटून येऊ लागलेत. कधी वाटे की, ही गॅलरी माझा स्टुडिओ आहे. खुर्चीत बसून बसून माझे डोळे मिटले जात. माझ्या आतल्या मनातल्या आठवणींची उजळणी आपोआप सुरू होई. प्रवासात भेटलेल्या शिक्षकांच्या, कधी अरुण कोलटकरच्या कवितेच्या, अपरात्री उघड्या माळरानावर आकाशातल्या असंख्य तारकांच्या मच्छरदाणीत झोपलेल्या रात्रींच्या, श्रावणात पाऊस थांबल्यावर गावाबाहेर देवदर्शनाला जाताना पाऊलवाटेवर आईच्या धरलेल्या मऊ हातांच्या, वडाच्या आडोशाला मैत्रिणीच्या घेतलेल्या ओल्या किसच्या, लाटांबरोबर मनमुक्त डान्स करणाऱ्या इसा डोरा डंकनच्या, न्यूयॉर्कच्या गॅलरीत व्हिन्सेट व्हॅन गॉगच्या चित्रासमोर मी पहिल्यांदा उभा होतो त्या वेळी धडकणाऱ्या हृदयातील स्पंदनांच्या, मेळघाटात एका पंजाने गाईची मान तोडून, दातात पकडून तिला फरफटत नेणाऱ्या वाघाच्या शक्तीच्या आणि त्याच्या चपळतेच्या, गोहातीमधल्या त्या पतंगाएवढ्या आकाराच्या आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या, अपरात्री मैफल संपल्यावर पहाटे मला घरी ड्रॉप करायला आलेल्या राशिद खानने बिल्डिंगच्या पायऱ्यांवर बसून ऐकवलेल्या पुरिया धनश्रीच्या, भर दुपारी घाटात ढगफुटीने दरीत बेफाम कोसळणाऱ्या वळवाच्या पावसाच्या, माझ्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये बिछान्यात पडलेल्या कॅन्सरग्रस्त मुलीच्या निष्पाप हास्याच्या! आठवणी हा तुमचा वैयक्तिक चॉइस आहे. बाळाला अंघोळ घातल्यानंतर त्याच्या अंगाला येणाऱ्या सुगंधासारख्या त्या असतात. दिवस-रात्रीचे मनोरे इथं अधांतरी होतात. येथे एकाकीपणा वगैरेचे स्पर्श नसतात. सुरईत तरंगणारी जीवनातील आनंदयात्रा असते. त्या दिंडीत सामील व्हायला मला स्टुडिओनं शिकवलं. या दिंडीत स्पर्धा, समज, गैरसमज आदी गोष्टी तुम्हाला रस्त्यात भेटत नाहीत. कोठलंही आक्रीत नाही, घाई नाही.

एकटेपणात किती क्रिएटिव्हिटी दडलेली असते. मी पाहतो जो-तो स्वत:पासून दूर पळत असतो. माझे अनेक मित्र आहेत, ते सुट्टीतसुद्धा सकाळ झाली की आवरायचं, बूट चढवून घराबाहेर पळायचं. कोठे जातात ते? लॉकडाऊनमध्ये अशा लोकांचं घरात बसून पार माकड झालं असेल. माझी आत्या, मावशा विचारत होत्या- अगदी काळजीनं, ‘अरे, तुझी मुले परदेशी गेलीत… अगदी एकटा पडला असशील ना?’ मी उत्तर द्यायचो, ‘घंटा! मी अजिबात एकटा वगैरे नाही. मी आनंदात आहे!’ मित्रांच्या टोळक्यात माझा सर्वात जास्त उडाणटप्पूपणा चालतो आणि स्टुडिओत एकटा असतानाही. ‘मिसिंग यू’ हेही असंच अद्भुत जादूगिरीचं वाक्य आहे. अनेकांना एक भ्रम असतो, की बायको, मैत्रीण, मुलगी, नातू त्यांना मिस् करताहेत. खरं तर हे उलट असतं. तुम्ही नसताना सारे आपापल्या आनंदात असतात. एकट्या, शांत बसलेल्या माणसाला अनेक जण ‘काय झालं रे?’ विचारून त्रास देत असतात. देवळासमोर उभ्या असलेल्या गाईला कावळे जसे त्रास देतात.

त्या गॅलरीतल्या खुर्चीत मी किती दिवस बसलो, तो वेळ केव्हा कसा गेला, हे माहिती नाही. स्टुडिओतल्या बैठकीचा परिणाम… माझ्याच मनातल्या माझ्याशी संवाद करणं, हे सूत्र त्यात असावं. माझेच किती वेगळे चेहरे त्यात दडून बसलेले आहेत हे शोधत राहणं. त्यात आठवणींच्या किती दालनांचे दरवाजे अजून उघडावयाचे आहेत? पण मला घाई नाही. दलाई लामांची गोष्ट मला येथे आठवली. त्यांना कोणी परदेशी स्त्री-वैमानिक भेटायला आली. तिनं खूप मोठं अंतर कमी वेळात पार करून विक्रम नोंदवला होता. तिची ही गोष्ट ऐकून दलाई लामा तिला म्हणाले, ‘तुला लवकर पोहोचायची एवढी घाई का होती?’

माझं छोटं गाव दुपारी आळसावलेलं असायचं. रस्त्यावर सावलीला धुळीत बसलेली, गावानं सांभाळलेली दोन-चार कुत्री सोडली तर सारं चिडीचूप असायचं. वाड्यांची, घरांची दारे लोटलेली असायची. कोपऱ्यापासल्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत चारा चघळत उभ्या असलेल्या दोन-चार बकऱ्या सोडल्या तर अख्ख्या गावावर कडक उन्हाचे पहारे असायचे. प्रत्येक घराच्या दरवाजाबाहेर उभा राहून मी मित्रांना हाका मारायचो. कुठलाही आवाज येत नसे. तेव्हा वेशीतून नदीकडे जाणाऱ्या उतारावर चालत जाताना बंद गोठ्यातल्या म्हशीचंच हंबरणं मला ऐकू यायचं. नदीत फतकल मारून शांत बसलेल्या म्हशीच्या पाठीवरचा कावळा ओरडत उडून परत तेथेच बसायचा. पलीकडे नदीच्या तटावरच्या झाडीतही कोणती हालचाल नसायची. सारा सुन्न परिसर असायचा. या सुन्नपणात गुणगुणणारा एक आवाज असतो- परग्रहावरून येणाऱ्या अनोळखी संदेशासारखा. तेथे मला कोठलाही एकाकीपणा कधी जाणवला नाही. जाणवला असलाच, तर कदाचित तो पसरलेल्या रणरणत्या उन्हामुळे बंद दरवाजाच्या आत लपला असावा.

आपण ठरवतो ते ऐकू येतं. ठरवतो तेच दिसतं. जसा समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या गावकऱ्यांना समुद्र दिसत नाही. लहानपणापासून एकटेपणा, एकाकीपणा, एकांतवासाची व्याख्या मला कधी समजली नाही. त्यावरची चर्चा म्हणजे उन्हाळ्यात स्वेटर घालून हिंडण्यासारखं आहे. ज्याच्या-त्याच्या मनाची ही एकांकिका बनू शकते.

आणि पाऊस थांबला. मुंबई रुळावर आली. पण त्या रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. माझा डॉक्टर मित्र आणि त्याची बायको यांच्याबरोबर मी गॅलरीत आलो तेव्हा गॅलरी तुडुंब भरलेली होती. मित्र खूश झाला खरा, पण मला चुकल्यासारखं वाटत होतं. मी त्या खुर्चीकडे पाहिलं. इतके दिवस मी तिच्यात बसून काढले. गर्दीमुळे मला माझी पेंटिंग्ज दिसत नव्हती. एव्हाना गुहेतले सारे साधू परत आपापल्या जागेवर उन्हात येऊन पेंटिंगमध्ये उभे झाले असावेत. शरयू दफ्तरी, प्रफुल्ला डहाणूकर मला भेटल्या. त्या हळहळत होत्या. त्यांचं म्हणणं असं की, ‘तुझ्यावर अन्याय झालाय. हेच प्रदर्शन आपण एनजीएमएमध्ये कंटिन्यू करू.’ मी म्हणालो, ‘हो, हो!’ पण मी दमलो होतो. मला माझ्या घरी, माझ्या स्टुडिओमध्ये जायचं होतं. संपावं हे प्रदर्शन. एकदाचा गाजावाजा बंद करावा. उघडावा सवडीनं प्रतिभेचा दरवाजा. हीच माझी स्थिती होती. नेहमीप्रमाणे टेम्पो आला. सारी पेंटिंग्ज परत माझ्या स्टुडिओकडे निघाली. माझे ते नवरा-बायको मित्र खरंच उदास झाले होते. मी त्याला चीअर अप् करताना म्हणालो, ‘अरे, पेंटिंग्ज म्हणजे काय नाशवंत भाजीपाला आहे का? ती दीर्घायुष्य घेऊनच जन्माला येतात. चला, शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि चीअर्स करू!’ त्याची बायको म्हणाली, ‘तुझी कमाल आहे! तुझं काही कळतच नाही.’

खरं तर माझं मलाच काही कळत नाही.

Subhash.awchat @ gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 12:06 am

Web Title: rough sketches me in me akp 94
Next Stories
1 मॉडेर्ना-फायझर लशींची कूळकथा
2   मोकळे आकाश… : कावळे आणि करोना
3 थांग वर्तनाचा! : शॉर्टकट नको, विवेक हवा!
Just Now!
X