News Flash

लोकसंस्कृतीवर नागर संस्कृतीचा नांगर 

डॉ. सरोजिनी बाबर जन्मशताब्दी लोकसाहित्य संमेलनाचे उद्घाटन आज, १ सप्टेंबर रोजी होत आहे.

डॉ. सरोजिनी बाबर जन्मशताब्दी लोकसाहित्य संमेलनाचे उद्घाटन आज, १ सप्टेंबर रोजी होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणातील संपादित भाग..

मौखिक वाङ्मयाची परंपरा ही फार प्राचीन आहे. किंबहुना मौखिक वाङ्मय हीच अभिजात साहित्य परंपरेची जन्मदात्री आहे. हे वास्तव ध्यानात घेऊन लोकवाङ्मयाच्या आणि एकूणच लोकपरंपरेच्या गंभीर अभ्यासाला सर्व जगभर सुरुवात झाली ती मुख्यत: गेल्या शतकात. महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि  विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा कालखंड  लोकसाहित्याभ्यासाचा उदयकाळ होता असं म्हटलं पाहिजे.

या काळातले द्रष्टे विचारवंत लोकपरंपरेकडे वळले, त्यामागे संस्कृतीतलं मौखिक धन वेचावं, उजेडात आणावं ही प्रेरणा होतीच; पण लोककलाप्रकारांचं बळ स्वातंत्र्यलढय़ासाठी जनजागृतीच्या मागे उभं राहावं अशीही प्रेरणा होती. ही बहुजनांची परंपरा होती. म्हणून बहुजनांच्या हृदयाला हात घालण्याचं सामथ्र्य याच परंपरेकडे होतं. हे ओळखून महाराष्ट्रातला सजग स्वातंत्र्योत्सुक वर्ग लोकवाङ्मयाकडे आणि लोककलांकडे वळला.

कीर्तन-प्रवचन ही इथली पारंपरिक प्रचार माध्यमं. त्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर त्यासाठी झाला. शाहिरी कविता मेळ्यांमधून गाजू लागली. पौराणिक नाटकं समकालाचा संदर्भ सांगू लागली. लोककथांना सूचकतेचं सामथ्र्य प्राप्त झालं. अभिजात रंगभूमीवर नाटकाचा उदय झाला तोच मुळी लोककलाप्रकारांचा आधार घेऊन.

एकीकडे लोकपरंपरा ही लोकसंपर्काचं आणि जनजागृतीचं प्रभावी मध्यम म्हणून पुढे येत असतानाच आणखी एका उद्दिष्टाची जोड त्याला मिळाली. स्त्रियांच्या उत्थानासाठी त्या काळी जे वेगवेगळे प्रयत्न सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत चालू होते, त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी लोकपरंपरा कामी आली. मध्ययुगातल्या सर्वार्थाने शोषित, वंचित, निराधार स्त्रियांनी तिच्याच आधाराने थोडा श्वास घेतला होता. तिचं महत्त्व ध्यानात आलं तेव्हा हे मौलिक धन उजेडात आणलं पाहिजे असं जाणत्यांना वाटू लागलं.

त्यांच्याच उत्तेजनानं स्त्रीगीतं संकलित करण्याची सुरुवात झाली. या संकलनाच्या कामात राजवाडे, शंकरराव दाते, ना. गो. चापेकर, नांदापूरकर, साने गुरुजींपर्यंत अनेकांचं नामस्मरण जसं केलं पाहिजे, तसंच ‘मानसगीतसरोवर’ या नावाने तीन भागांत स्त्रीगीतं संकलित करणाऱ्या बेळगावच्या कृष्णाबाई गाडगीळ, ‘स्त्रीगीतरत्नाकर’ संकलित करणाऱ्या पार्वतीबाई गोखले आणि पुढे कमलाबाई देशपांडे, मालतीबाई दांडेकर आणि इतर स्त्रियांचं स्मरणही केलं पाहिजे.

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या संकलन कार्याचा विचार या कालपटावर करता येईल. एका बाजूला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात सक्रिय सहभाग घेणाऱ्या अत्यंत मोजक्या स्त्रियांपकी एक म्हणून त्यांची नोंद केली पाहिजे आणि दुसरीकडे त्यानिमित्ताने निर्माण झालेल्या राजकीय संबंधांचा परिपाक म्हणून त्यांच्याकडे चालत आलेल्या लोकसाहित्य समितीच्या सक्षम अध्यक्ष म्हणूनही त्यांच्या श्रेयाची नोंद घेतली पाहिजे. १९६१ ते १९९३ या ३२ वर्षांच्या दीर्घ या शासकीय समितीचं नेतृत्व करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकांच्या सहकार्याने मौखिक परंपरेचं धन त्यांनी मोठय़ा प्रमाणावर वेचून आणलं. ‘रानजाई’सारख्या द्क्श्राव्य कार्यक्रमांमधून त्याला लोकप्रियता मिळवून दिली. साध्यासुध्या सामान्य माणसांना त्यांच्याजवळच्या लोकधनाचं मोठेपण समजावलं; आणि मान्यवर अभ्यासकांची जोड घेऊन लोकसाहित्याच्या अभ्यासाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. शासनाच्या पाठबळानं आणि अनेक उत्साही संकलकांच्या साहाय्यानं त्यांनी जे लोकसंचित जमा केलं, त्यातून पुढे उत्तरकालीन अभ्यासकांच्या कामाची संदर्भभरणी झाली.  त्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचा काळ. या काळात विशेषत: १९६० नंतर जगभरातच लोकविद्येच्या अभ्यासाला पुन्हा नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली; आणि दलितांकडे, स्त्रियांकडे तशीच लोकसंचिताकडे पाहण्याचीही नवी दृष्टी मिळाली. ही दृष्टी घेऊन काम करणाऱ्या दुर्गाबाईंनंतर तारा भवाळकर, तारा परांजपे या जशा आहेत तशाच मिथकांच्या, जनजीवनाच्या, सांस्कृतिक मूलाधारांच्या नव्या आलोकात लोक-नागर परंपरांचा विचार करणाऱ्या प्रतिमा इंगोले, जयंती नायक, शैला लोहिया, सिसिलिया काव्‍‌र्हालो, कविता महाजन आणि इंदिरा संतांसारख्या आणखीही काही लेखिका आणि अभ्यासक स्त्रिया आहेत.

लोकसंस्कृतीच्या पुरुष अभ्यासकांपेक्षा एक वेगळा, सहृदय,आस्थेचा आणि स्त्री-जीवनाविषयीच्या समजुतीचा जो अंत:स्वर गेल्या ५० वर्षांतल्या आम्हा लेखक-अभ्यासक स्त्रियांपकी बऱ्याच जणींच्या मांडणीत आणि विवेचनात आहे तो मला महत्त्वाचा वाटतो. दुर्गाबाईंनी तर महाराष्ट्रातल्या लोकसाहित्याच्या अभ्यासाची शास्त्रीय पायाभरणीही केली आणि लोकसंस्कृतीच्या अनेक लहान-मोठय़ा विधांकडे आपले लक्ष वेधून घेत या अभ्यासाविषयीची आपली दृष्टीही समृद्ध आणि व्यापक केली.

मुळात दुर्गाबाई आदिवासी लोकजीवनाचा आणि नंतर व्यापक लोकसंस्कृतीचा अभ्यास करायला लागल्या तो काळच पाहा ना! १९३०-३५ चा काळ. त्या काळात विशी-पंचविशीतली तरुण मुलगी उठते आणि मध्य प्रदेशातल्या आदिवासींमध्ये हिंडून त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करायला लागते, ही गोष्ट नुसत्या धाडसाचीच नव्हे, तर अपूर्वाईचीही वाटते. पण स्त्री-पुरुष भेदांच्या पलीकडे अभ्यासक म्हणून जाण्याची ताकद दुर्गाबाईंमध्ये होती; आणि तरीही बायकांचं जगणं समजून घेण्याची उत्कटता आणि पिंडधर्मातूनच आलेली सहानुभूतीही त्यांच्याकडे होती. म्हणून एकूण लोकसाहित्य आणि संस्कृतीचं आलोडन तर त्यांनी केलंच, पण त्याच्या जोडीनं त्यांनी बायकांकडून सांभाळल्या गेलेल्या कितीतरी कलांचं, हस्तोद्योगांचं आणि मौखिक वाङ्मयाचं महत्त्व आपल्या लक्षात आणून दिलं. त्यांचा आणखी एक मोठा विशेष म्हणजे लोककलावंत स्त्रियांविषयी त्यांना असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या प्रश्नांविषयी जाणवणारी कळकळ. लोककलावंतांची- त्यातही कलावंत बायांची जगण्याची लढाई दुर्गाबाईंना महत्त्वाची वाटत आली; आणि ती महत्त्वाची होतीच!

अ. भा. दलित नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद तमाशा कलावंत विठा भाऊ नारायणगावकर यांना मिळालं तेव्हा बोलताना त्यांनी आपल्या भाषणात मांडलेला एक मुद्दा खरोखरच फार महत्त्वाचा आहे. तो केवळ तमाशा कलावंतिणींच्या बाबतीतलाच नाही, तर एकूणच लोकपरंपरेतल्या कलावती बायकांच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. त्यांनी जीवनधर्म म्हणून स्वीकारलेली, निष्ठेनं सांभाळलेली त्यांची कला आणि त्या कलेसाठीच जगणाऱ्या त्या कलावती यांना मात्र समाजात प्रतिष्ठा नाही. त्यांच्या वाटय़ाला अवहेलना आहे, दु:ख आहे, उपेक्षा आणि गौणत्व आहे. पण तीच कला त्यांच्यापासून तोडून घेऊन नागर संस्कृतीनं उचलली तर तिला एकदम प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, मान्यता आहे आणि वलयही आहे. लोकसंगीत हे तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. एखादी गुलाबबाई नौटंकीवाली आज तुम्हा-आम्हाला फारशी माहीतही नाही. १९५० ते ६० च्या दरम्यान एच. एम. व्ही.नं तिच्या आठ रेकॉर्ड काढल्या आणि तिची गाणी उचलून पुढे सिनेमावाल्यांनी व्यवसाय केला. ‘नदी ना रे ना जाओ, श्याम पैंया पडू’ हे ‘मुझे जीने दो’ या चित्रपटातलं गाणं किंवा ‘पान खाओ सय्या हमारो’ हे ‘तिसरी कसम’ चित्रपटातलं गाणं जिच्याकडून उचललं गेलं त्या गुलाबबाईला ना त्या गाण्याचं कुठं श्रेय मिळालं, ना ते उत्तर भारतातल्या लोकसंगीताला मिळालं, ना तिच्यासारख्या खेडय़ापाडय़ांतल्या अनाम कलावंत बायकांना मिळालं. हे सिनेमे गाजले. गाणी गाजली. गुलाबबाई नौटंकीवाली मात्र बाजूलाच राहिली.

अर्थात् ही प्रक्रिया काल-आजची नव्हे. लोकपरंपरेचा हात धरून चाललेल्या इथल्या संतपरंपरेच्या प्रभावानंतर गेल्या पाच-सहा शतकांमध्ये हळूहळू इथल्या लोकपरंपरेला पर्यायी अशी एक बुद्धिजीवी परंपरा बळकट होत गेली. ब्रिटिश राजवटीत नव्या ज्ञान-विज्ञानाशी परिचयाची संधी मिळालेल्या अभिजनांनी ती अधिक बळकट केली. या परंपरेनं बहुजन समाजाशी आणि लोकपरंपरेशी असलेली आपली नाळ तोडली आणि चित्र, संगीत, नाटक या कलांच्या स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाल्या. व्यक्तिवादाचा उदय झाला आणि क्रमानं आत्यंतिक व्यक्तिवादाकडं सरकणाऱ्या नव्या अभिजन परंपरेनं समूहाशी असलेलं जैविक नातंच संपुष्टात आणलं.

लोकपरंपरेत व्यक्तिविशिष्टता नाही. आपापल्या व्यक्तिगत वैशिष्टय़ांसकट निर्मितीत सहभागी होत समूहजीवन घडवणं, सुंदर करणं, अर्थपूर्ण करणं ही लोकसंस्कृतीत सहज, स्वाभाविक घडणारी प्रक्रिया असते. किंबहुना, तिथे जे जे घडतं ते कुणा एका व्यक्तीचं नसतंच, म्हणून तर तिथल्या निर्मितीवर कुणा एकाचं नाव नसतं, कुणा एकाची मुद्रा नसते.

लोकसंस्कृतीतलं हे जे ‘सगळ्यांचं होणं’ आहे, ते नागर संस्कृतीत नाहीसंच झालं आहे. समूहस्वर लावण्याची कलांची ताकद अभिजनांमधून क्रमानं उणावत गेली आहे. त्याचं एक कारण म्हणजे जगण्याशी असलेला कलांचा संबंध तुटत गेला आहे. लोकसंस्कृतीचं एक व्यवच्छेदक लक्षण हे होतं की, कला- सगळ्याच कला या जगण्यातच अंतर्भूत होत्या, जगण्याचा स्वाभाविक भाग होत्या. त्यामुळे जगण्याशी त्यांची सेंद्रिय एकात्मताच होती. विज्ञानाच्या वाढीबरोबर जगण्याचे तुकडे करून आपण सूक्ष्मतेकडे जाऊ लागलो खरे; आणि लहान लहान तुकडय़ांच्या ज्ञानाचं मोठय़ा प्रमाणावर विशेषीकरणही (स्पेशलायजेशन) करू लागलो खरे; पण त्यातून समग्रतेनं जगणं आणि समग्रतेनं समजून घेणंच संपत चाललं.

शिवाय यामुळं आपलं जगणं इतकं स्वत:पुरतं होत गेलं की इतरांच्या जगण्याशी आपलं काही देणंघेणंच उरलं नाही. त्यामुळे माणसाचे बृहत्तर जीवनाचे संदर्भ आटत गेले. मानवी जीवनाखेरीजचं जीवन हा आपल्या आस्थेचा, कुतूहलाचा विषय राहिला नाही. प्रदूषणाचे भयंकर प्रश्न त्यातूनच निर्माण होत गेले, हे आज जाणती माणसे समजू शकतील. प्राण्यापाखरांसकटची, किडा-मुंग्यांसकटची सृष्टी, कल्पनेचं जग, निसर्गाची गूढं, अतिभौतिकाचं जग, स्वप्नं, कोडी, अद्भुतरम्यता- लोकसंस्कृती या सगळ्यांसकटची संस्कृती होती. आणि त्यातही स्त्रिया निर्मितीच्या अंगानं जगण्याच्या जास्त जवळ होत्या.

निर्माण करणं हे बाईच्या आतच स्वाभाविकपणे आहे म्हणून की काय, लोकसंस्कृतीकडे पाहिलं तर बायकांच्या सर्व कला जगण्यातून उगवलेल्या, जगण्याला सजवणाऱ्या आणि जगण्याचा अनुवाद करणाऱ्या आहेत. भिंती, जमीन, चुली, अंगण सारवणं असो, त्यावर चित्र रेखाटणं असो, भरतकाम-विणकाम करणं असो, वस्त्र विणणं असो, स्वयंपाकाचे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करणं असो, टोपल्या आणि इरली बनवणे असो- या सगळ्या कला बाईच्या जगण्याचा एक भाग होत्या. तिनं रंगवलेली चित्रं म्हणजे भिंतीवर तिनं केलेली जगण्याची पुनर्रचनाच होती. तिनं दळता-कांडताना गायलेली गाणी म्हणजे तिच्या आंतरिक जगण्याचा पुनरुच्चारच होता.

चीनमध्ये म्हणे काहीशे वर्षांपूर्वी जेव्हा बायका सर्व प्रकारच्या बंधनांतच जगत होत्या, तेव्हा त्यांनी खास त्यांची (बायकांची) अशी एक चित्रभाषा तयार केली होती. ‘नान शू’ या नावाची भाषा. सणासमारंभांना, विशिष्ट प्रसंगांना भांडय़ांवर, कपडय़ांवर स्त्रिया जी चित्रं काढत, जी सजावट करत, जी नक्षी रंगवत त्यात या भाषेतून त्या एकमेकींशी बोलत, निरोप पाठवत, संवाद करत. हा दृक्-संवाद त्यांच्यासाठी जगण्याच्या मोलाचा होता. दुर्गाबाईंनी काही आदिवासी जमातींमधल्या बायकांच्या चित्रांतले संकेत सांगितले आहेत. एकूणच चित्रांमधून, गाण्यांमधून, नृत्यांमधून समृद्ध जीवनाशय निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात सहजात होती. या बायकांनी सहज, साधं, रोजचं काम करताना कलेच्या मूलभूत सौंदर्यतत्त्वांचे हात किती गोडव्यानं धरले होते! यांच्या अंगभूत लयी, यांच्या देहाची वळणं, यांच्या भाषेचे हेल.. बायकांनी दृक्श्राव्य सौंदर्याचं एक रसरसतं जगच निर्माण केलं. खरं तर बायकांचं रूपाचं भान, लय, ताल आणि गतीचं भान, नादाचं भान आणि अर्थाच्या नाजूक वळणांचं भान खरोखर आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे.

लोकपरंपरेतलं जवळजवळ ७० % मौखिक वाङ्मय हे स्त्रियांनी निर्माण केलेलं आहे. त्यात ओव्या आहेत, गाणी आहेत- फेराची आहेत, खेळांची आहे, श्रमांची आहेत, देवदेवतांची आहेत. शिवाय कहाण्या आहेत, कथा आहेत. अनेक शतकं दडपलेल्या, दु:ख भोगणाऱ्या, श्रमणाऱ्या अशा बायकांनी लोकपरंपरेच्या मुठीत जे जे सारलं आहे, ते मी तर म्हणेन- भारतीय स्त्रीच्या जीवनसत्त्वाचं माणिक आहे. बाईच्या कलांमधून तिचं जगण्याविषयीचं शहाणपणही व्यक्त झालं आहे.

बाईजवळ आयुष्याच्या स्वीकाराची एक जबरदस्त ताकद आहे. तिचा गोतावळा, त्याच्याशी असलेले तिचे भावबंध, तिचं घर, परिसर, तिचे विचार, तिच्या भावना- एकूण तिच्या जगण्याचं दस्तावेजीकरण म्हणजे तिच्या गोष्टी, तिची गाणी, तिची ओवी, तिच्या म्हणी आणि वाक्प्रचारही! सबंध मध्ययुगीन वाङ्मय एका बाजूला संपन्न अशा भक्तिसाहित्यानं भरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांच्या समृद्ध अशा मौखिक निर्मितीनं भारलेलं आहे. या स्त्रियांजवळ जगण्याला तोंड देण्याची जी धिटाई आहे, जो आत्मविश्वास आहे किंवा जी चतुराई आहे, त्यानं आपण अक्षरश: अवाक् होतो, इतकं ते जोरकस आणि सच्चं जीवनदर्शन आहे.

आज दुर्दैवानं आपण मौखिक वाङ्मयाच्या परंपरेपासून दुरावलो आणि किती मोठय़ा जगण्याला बळ देणाऱ्या गोष्टींना वंचित झालो, हे आपल्या लक्षातही येत नाही. वस्तुत: उच्चारित शब्दांची परंपरा ही भारतीयांची एक दीर्घजीवी, मुख्य आणि प्रभावी अशी साहित्य परंपरा! उच्चारित शब्दांना समूहाची पाश्र्वभूमी असते. एकमेकांमध्ये संवादाचं, विश्वासाचं एक सूत्र असतं. लिखित परंपरेतला लेखक एकाकी असतो आणि वाचकही एकाकी असतो. मौखिक परंपरेचं असं नाही. हृदयसंवादाचा त्या परंपरेतला प्रभाव साक्षात असतो. अनक्षरत्व किंवा निरीक्षरत्व म्हणजे अज्ञान नव्हे. उलट, स्मरणशक्तीचं महत्त्व संपुष्टात आणणारी लिखित शब्दांची दुनिया माणसाचे ऐंद्रिय संवेदनांच्या द्वारा ज्ञान प्राप्त करण्याचे मार्गच बिनमहत्त्वाचे ठरवत चालली आहे.

आपल्या रोजच्या जीवनाचा विचार केला तरी पाहा ना.. पाठांतरे संपली. पाढे संपले. तोंडी हिशेब गेले. कथा-गीतं हरवली. मनी-मुखी रेंगाळतील अशा कविता हरवल्या. माणसांना गोष्टी सांगता येईनाशा झाल्या. शब्दांशी जोडलेलं ठेक्यांचं, नादांचं, गतीचं, भाषेच्या डौलांचं जे भान- ते भानच नाहीसं झालं. शब्द फक्त अर्थाशी जोडलेला राहिला. असं होता कामा नये असं वाटणारी जागरूक माणसंही दिसेनाशी झाली.

बायकी भाषा म्हणून जिला हिणवलं गेलं त्या भाषेनं आपल्याला, आपल्या प्रमाण भाषेला केवढी लवचीकता, ताकद आणि केवढा रसाळपणा दिला आहे याचा थोडा विचार तरी करून पाहा! भ्रष्टतेपासून दूर ठेवत भाषेला जिवंत ठेवलं ते चार भिंतींमधल्या बायकांनी. म्हणून तर आदिवासी भाषा आणि बोलीचे अभ्यासक असं आवर्जून नोंदवतात की, या बोली अधिक शुद्ध स्वरूपात सापडतात त्या बायकांच्या तोंडी.

एकीकडे साक्षरतेचे प्रमाण वाढत असताना वास्तविक आजही देशात निरक्षरांची संख्या फार मोठी आहे आणि त्यांना शिकवला जाणारा शब्द आता सांस्कृतिक संदर्भ छाटलेला, वैविध्याला अवसर नसलेला आणि वाढीच्या जीवशास्त्रीय प्रक्रियेपासून तुटलेला शब्द आहे. आणि छोटय़ा छोटय़ा लोकसमूहांच्या बोलींचं भवितव्य काय, हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. कलांच्या नागरीकरणाचे प्रश्न जसे गुंतागुंतीचे आहेत तसेच भाषांच्या प्रमाणीकरणाचे प्रश्नही गुंतागुंतीचेच आहेत. आणि माणसाच्या जगण्याशी असलेला त्यांचा बंध मध्यवर्ती ठेवूनच त्या गुंत्याचा विचार करण्याची आणि सोडवणुकीचे मार्ग शोधण्याची गरज आहे.

भाषिक प्रश्नाइतकाच महत्त्वाचा आणखी एक प्रश्न समकालीनतेचा आहे. केवळ स्त्रियांच्या संदर्भात विचार केला तरी आजवर स्त्रियांचं म्हणून जे वाङ्मय होतं, ज्याला कमलाबाई देशपांडे (साहित्यसम्राट न. चिं. केळकरांची कन्या आणि सातारच्या कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका) या ‘अपौरुषेय वाङ्मय’ म्हणाल्या होत्या, ते आपापल्या काळातल्या स्त्री-जीवनाचं प्रतिबिंब धरणारं वाङ्मय होतं. ते कधी आपल्या काळातल्या जीवनधारणांशी संवादी होतं, कधी त्याचा शांत स्वीकार करणारं होतं, कधी अमान्य गोष्टींविषयीचा राग व्यक्त करणारं होतं आणि कधी परखड, थेट, बंडखोरही होतं.

बाईच्या देहाशी तिला घट्ट जखडून टाकणाऱ्या व्यवस्थेला तिचं तरल मन कळत नाही आणि तिच्या देहाचा ताबाही उपभोगासाठी पुरुष स्वत:कडेच घेत राहतो. लोकपरंपरेचा हात धरणाऱ्या संत स्त्रियांनी या वस्तुस्थितीचा अतिशय स्पष्ट आणि धीट उच्चार केलेला आहे. ज्याला आपण कौटुंबिक बलात्कार म्हणू त्याचा उच्चार एखाद्या बहिणाबाईंच्या अभंगरचनेत आपल्याला दिसतो तेव्हा आपण थक्क होतो आणि लोकपरंपरेतील एखादी धीट देवदासी संक्कवा आपल्या शेजेवर येणाऱ्या देवालाही जेव्हा दुराचारी म्हणून स्पष्ट हिणवते तेव्हाही आपण अवाक् होतो.

आज सतत घडत असलेल्या वेगवेगळ्या वयाच्या स्त्रियांच्या विटंबनेच्या, विनयभंगाच्या, बलात्काराच्या घटना वाचत असताना बायकांनी रूढी-प्रथांमध्ये अनुभवलेलं दाहक वास्तव नव्यानं धगधगून उठतं असं वाटतंय. प्रश्न तसेच आहेत.. स्त्रीचा विचार फक्त देहापुरता करण्याचे, तिला उपभोगासाठी वापरण्याचे आणि पुरुषसत्ताक समाजात तिच्या वाटय़ाला कायम भीती आणि असुरक्षितता ठेवण्याचे! त्यावरही उपाय आहेत. बाईनं स्वत:पुरते शोधलेले. स्वत:ला ओळखण्याचे, स्वत:चं बळ वाढवण्याचे, दुबळेपणा दूर ठेवण्याचे.

‘तिखट आम्ही लेकी, जशी तेज तलवार खाली पा पाप्या, ठेव नजर भुईवर?’ असं धीटपणे पुरुषाला बजावणाऱ्या आणि आधाराचे हात सुटले तरी ज्योतिषाचा किंवा मांत्रिकाचा आश्रय नाकारून ‘आता माझा मले जीव’ असं म्हणणाऱ्या बायकांनी लोकपरंपरेतला स्त्रीशक्तीचा अंत:स्वर उंच आणि जिवंत ठेवला आहे. कष्ट करणारी, मेहनतीचा कंटाळा नसलेली, कुटुंबावर प्रेम करणारी, जगाच्या व्यवहाराकडे सजगपणे पाहणारी, अस दु:खांना लहान बाळांसारखी स्वीकारणारी आणि चिवटपणे आयुष्याला तोंड देत आपल्या मुलाबाळांसकट संसाराची नाव पलथडी लावणारी एक शहाणी, जिद्दी, लढाऊ आणि कणखर अशी स्त्री लोकपरंपरेत दिसते.

सध्या निरनिराळ्या मालिकांमधून दिसणाऱ्या बहुतेक नटव्या, मूर्ख, दुबळ्या वा क्रूर आणि हिंसक स्त्रियांना मार्गावर आणण्यासाठी, उथळ मनोरंजनाच्या हौसेमधून त्या मालिकांमध्ये गुंतलेल्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यासाठी लोकपरंपरेतल्या या शहाण्या आणि ताठ कण्याच्या बायकाच पुढे आल्या पाहिजेत असे वाटते.

शेवटी माणदेशातल्या एका कर्तबगार आणि सेवाभावी अशा एका कार्यकर्त्यां बाईचा अनुभव सांगून मी थांबणार आहे. चेतना सिन्हा हे नाव मला वाटतं आपल्यापकी निदान काही जणांना परिचित असेल. माणदेशाचा विकास घडवण्यासाठी ग्रामीण महिलांच्या संघटनेचा आणि सबलीकरणाचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या चेतना सिन्हा. त्यांनी म्हसवडला ‘महिला ग्रामीण बँक’ सुरू केली आहे, ‘महिला बिझनेस स्कूल’ चालवलं आहे. ग्रामविकासाच्या अनेक कल्पना तिथे प्रत्यक्षात आणल्या आहेत. आíथक स्थर्याबरोबरच बायकांना एकमेकींच्या साथीनं प्रगतीच्या वाटेवर चालण्याच्या आनंदाची ओळख करून दिली आहे.

एकदा स्वत:बद्दल बोलताना एका जाहीर समारंभात त्या म्हणाल्या होत्या, ‘मी मूळची मुंबईची. संघर्ष वाहिनीत काम करणारी. माझ्या कार्यकर्त्यां मित्रानं- विजयनं मला लग्नाबद्दल विचारलं. विजय मूळचा माणदेशातला. त्याला मी म्हटलं की, माझ्या काही अटी आहेत. खरं तर एक मोठी यादीच होती माझ्या अटींची. मी म्हटलं होतं की, मी जशी आहे तशीच तुझ्या गावात येईन. मी जीन्स घालणं सोडणार नाही. कापलेले केस वाढवणार नाही. विजयनं सगळं मान्य केलं आणि लग्नानंतर मुंबईला राहणारी, उच्चशिक्षित, आधुनिक, स्वतंत्र स्त्री चेतना विजयच्या गावात राहायला आली. पण मी पाहिलं की, घरात माझी सासू होती. नवऱ्यामागे आपल्या मुलांना मोठं करून, घरचा व्यवसाय, शेती सांभाळून त्या एवढय़ाशा गावात माझी तरुण विधवा सासू वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत जगण्यात पाय रोवून खंबीरपणानं उभी राहिली. तिचं धाडस आणि तिची कर्तबगारी काही महिन्यांतच मला कळली आणि स्वतंत्र, समर्थ स्त्रीची माझी कल्पना कशी अपुरी होती आणि केस कापण्याच्या, जीन्स घालण्याच्या माझ्या आधुनिकतेच्या अटी किती निर्थक होत्या, हे मला कळून चुकलं.’ अभिजात परंपरेचं आणि लोकपरंपरेचं नातं मला चेतना सिन्हा आणि तिच्या सासूबाईंसारखं वाटतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:11 am

Web Title: sarojini babar aruna dhere mpg 94
Next Stories
1 पुढच्या वर्षी लवकर या!
2 शांता-दुर्गा..
3 जगण्याच्या विखंडतेचे विरूप दर्शन
Just Now!
X