६९ च्या डिसेंबरमध्ये बीएस्सीची परीक्षा झाली. सहा महिने आता मोकळे म्हणून ‘एक झुलता पूल’ परत एकदा लिहून काढली आणि सत्यकथेकडे सवयीनं पाठवून दिली. कारण आधीच्या ‘मेमरी’, ‘सामना’, ‘भजन’ या माझ्या एकांकिका सत्यकथेतच छापून आल्या होत्या. पण मोकळा वेळ मिळण्याचं चिन्ह दिसेना. कारण lok02पीडीएला जब्बार पटेलनं विजय तेंडुलकरांचं ‘अशी पाखरे येती’ हे नाटक मिळवून दिलं होतं. हे नाटक तसं तेंडुलकरांनी लिहून तीन-चार वष्रे झाली होती. व्यावसायिक निर्माते ते घेऊ की नको, अशा मन:स्थितीत होते. कारण हे नाटक धंदा करेल की नाही, याची खात्री त्यांना वाटत नव्हती. अखेर हे नाटक तेंडुलकरांनी जब्बारला दिलं. कारण त्याआधी जब्बारने तेंडुलकरांचं ‘कळावे, लोभ नसावा, ही विनंती’ हे नाटक ६५-६६ मध्ये बी. जे. मेडिकल कॉलेज आर्ट सर्कलतर्फे राज्य नाटय़स्पध्रेत केले होते आणि त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. हे नाटक म्हणजे मूळच्या ‘ऌं२३८ ऌीं१३’ या जॉन पॅट्रिक या अमेरिकन नाटककाराच्या १९४५ मधल्या नाटकाचे भाषांतर. या नाटकावर त्याच नावाचा हॉलीवूडचा सिनेमाही ४९ मध्ये येऊन गेला होता. त्यात नंतर (१९८१-८९ दरम्यान) अमेरिकेचे अध्यक्ष झालेले रोनाल्ड रेगन आणि पॅट्रीशिया नील यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
तेंडुलकरांच्या ‘बळी’ आणि ‘भेकड’ या एकांकिका जब्बारने केल्या होत्या. त्यामुळे ‘अशी पाखरे येती’ हे नाटक तेंडुलकरांनी सत्यदेव दुबेला न देता जब्बारला दिले. त्यामुळे दुबे वैतागला होता. नंतर नेहमी त्याच्या बोलण्यात हे नाटक हातातून गेल्याची खंत तो गमतीत बोलून दाखवत असे. नंतर त्याने हे नाटक िहदीत केलं. तसा तेंडुलकरांच्या नाटकाशी माझा संबंध फग्र्युसनमध्येच ६७ साली माधव वझेमुळे आलेला होता. त्याचे असे झाले की- माधव फग्र्युसनची एकांकिका पुरुषोत्तम करंडकसाठी बसवत होता. आणि ती होती तेंडुलकरांची मूळची श्रुतिका म्हणून लिहिलेली दोन-पात्री, स्त्रीप्रधान संहिता.. ‘ओळख’! यातलं मुख्य पात्र ‘निर्मला’ हिची भूमिका कल्पना भालेराव (देवळणकर) करत होती. त्यात काम करणारा नट आजारी पडला म्हणून प्रयोग चार दिवसांवर आलेला असताना त्याच्याऐवजी माधवने मला काम करायला लावले. माझं सगळं लक्ष पाठांतर करण्यावर होतं. प्रयोग पार पडला आणि आमची एकांकिका स्पध्रेत चक्क दुसरी आली.
तेंडुलकरांच्या लिखाणाशी माझा प्रथम प्रत्यक्ष संबंध आला तो ‘ओळख’ या श्रुतिकेमुळे. ती लिहीत असताना तेंडुलकरांच्या डोळ्यांसमोर रंगमंचीय अवकाश नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त श्राव्य अवकाश होता.. श्रोता होता. श्रोत्यांसाठी म्हणून त्यांनी जे लिखाण केलेलं होतं ते आम्हाला आता मंचित करायचं होतं. त्यांची जी भाषा होती त्याच्याशी मी परिचित नव्हतो. त्यामुळे ते मंचित करताना माझी अडचण व्हायला लागली. किंवा तेंडुलकरांच्या भाषेचा जो बाज होता, त्याच्याशी मी समरस होऊ शकत नव्हतो. कारण रंगमंचाच्या दृष्टीने लिहिलेला तो बाज नव्हता. तो श्रुतिकेतून ऐकण्यासाठी लिहिलेला बाज होता. ‘ओळख’ या एकांकिकेची सुरुवात तेंडुलकरांनी अशी केलेली आहे..
सूत्रधार : ‘‘साल १९५२. पावसाळ्यातील एक संध्याकाळ. पावसाची एक सर नुकतीच पडून गेलेली आहे. (हे रंगमंचावर दिसणं शक्यच नाही. पावसाची एक सर नुकतीच पडून गेलेली आहे हे कसं दाखवायचं? कारण आपला रंगमंच खोटा आहे. मुद्दाम केलेला आहे. तो भातुकलीचा खेळ आहे. पण यात त्यांनी निवेदन वापरलं आणि ते कोणीतरी म्हणणार असावं.) आभाळ अद्याप ढगाळलेलंच आहे. कदाचित काही वेळाने आणखी एखादी सर येईल. सगळं वातावरण कुंद वाटतं आहे. या धूसर आणि उदास वातावरणात मुंबईच्या उपनगरातील अनेक रेल्वे स्टेशनांपकी कुल्र्याचं स्टेशन. (कोळशाच्या इंजिनाची प्रदीर्घ शिट्टी कर्कशपणे ऐकू येत दूर जाते.)
लांबवरून एक लोकल थांबत गेल्याचा आवाज येऊ लागतो.. दूर जातो. या कुल्र्याच्या स्टेशनावरला चेंबूर-मानखुर्द लाईन गाडय़ांचा प्लॅटफॉर्म….दोन व्यक्ती निमूट बसल्या आहेत. एक आहे स्त्री आणि दुसरा पुरुष. बाकाच्या दोन टोकांना ही दोघं अंग चोरून बसली आहेत..’’
त्यानंतर आपल्याला कळत जातं, की तरुणी गाडीची वाट बघत असते. पलीकडे दुसरा एक तरुण बसलेला आहे. तोही गाडीची वाट बघत असतो. त्यात गंमत अशी, की कदाचित त्यांची ओळख असावी किंवा नसावी. तो तरुण तिचा वेध घेत तिच्या मागे मागे आलेला आहे. अनोळखी असल्यासारखा तिथे बसलेला आहे. त्यांचा संवाद सुरू होतो.
तो : एक्सक्युज मी, पुढची गाडी कितीला आहे? (किंचित स्तब्धता.)
ती : कुठं जायचंय तुम्हाला?
तो : (घुटमळून, गोंधळून)  आं.. आपलं बोरीबंदरला.
ती : (शांतपणे) मग प्लॅटफॉर्म चुकलात तुम्ही. बोरीबंदरकडे जाणाऱ्या गाडय़ा त्या तिकडच्या प्लॅटफॉर्मवर येतात.
तो : (ओशाळल्यासारखा) असं का?
ती : (तीक्ष्णपणे) पळा की लवकर- गाडी येईल इतक्यात.
तो: (फारसा हलत नाही) नाही- मला तशी घाई नाही.
ती : (अधिक तीक्ष्णपणे) मग कितीला आहे म्हणून का विचारता आहात?
तो : सहज.. (किंचित थांबून- काहीशा दिलगिरीदर्शक आवाजात अगदी हळू) रागावलात़्ा वाटतं?
ती : (खदखदून) निर्लज्ज! रिकाम्या चौकशा करताना वाटत नाही काही? कशासाठी बसला आहात मघापासून इथं?..
..या संवादावरून आपल्याला हळूहळू उमजून यायला लागतं, की ती एक जरा प्रौढ, लग्न न झालेली, नोकरदार स्त्री आहे. तो पुरुषही प्रौढ, अविवाहित आहे. दोघांची ओळख आहे; पण ती ओळख तिला नाकारायची आहे. म्हणून ते कदाचित ओळख नसल्याचा खेळ खेळत आहेत. कारण जर भावनेच्या भरात ती त्याला चुकून ‘हो’ म्हणाली तर तिची पंचाईत होईल. कारण तिचं घर तिच्या पशावर अवलंबून आहे. घरासाठी तिला स्वत:कडे दुर्लक्ष करणे भाग आहे. दोघंही परिस्थितीनं गांजलेले आहेत. असा हा १९५२ मध्ये लिहिलेला कनिष्ठ मध्यमवर्गीय मामला.
माझी अडचण तालमीत अशी व्हायची, की हे जे वरचे संवाद आहेत ते मला खोटे वाटायचे. पण त्यातल्या तेंडुलकरांनी दिलेल्या रंगसूचना- ‘शांतपणे, तीक्ष्णपणे, अधिक तीक्ष्णपणे, इ.’ या मात्र एकदम खऱ्या, नाटकापेक्षा सिनेमाच्या जवळच्या वाटायच्या. वरच्या संवादाच्या छोटय़ा नमुन्यात एकूण आठ-नऊ रंगसूचना आहेत. त्या नेमक्या आणि अचूक आहेत. पण मला त्या भूमिकेत जाणं वगरे जमत नव्हतं. मूळचे श्रुतिकेसाठीचे- म्हणजे रेडिओ या माध्यमासाठी लिहिलेले हे संवाद म्हणताना प्रत्यक्ष मंचावर जो अभिनयासाठी लागणारा अवकाश लागतो, तो त्यात मला मी नाटकात नवीन असल्याने उमजत नव्हता. हे सगळं सिनेमाच्या जवळचं आहे असं मला वाटायचं. ‘ओळख’ ही एकांकिका आम्ही केली. पण मी ती आंधळेपणाने रेटली. नुकताच नाटकात आलेलो. त्यामुळे प्रश्न विचारायचा संकोच व्हायचा. पुढच्या वर्षी- म्हणजे ६८ मध्येही तेंडुलकरांची अशीच दुसरी दोनपात्री, स्त्रीप्रधान श्रुतिका- ‘काळोख’ केली. त्यातही असाच अनुभव आला. योगायोगाने ‘काळोख’ला देखील पुरुषोत्तम स्पध्रेत दुसरा नंबर मिळाला. कल्पना देवळणकरला अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. तेंडुलकरांच्या दोन एकांकिकांमधून ‘संहिता ते प्रयोग’ असा प्रवास करूनही मला समाधान काही मिळालं नव्हतं. काहीतरी हुकतंय असं सारखं वाटायचं. काय, ते मात्र नेमकं उमगत नव्हतं. आपल्याला नाटकात सूर सापडत नाहीये. त्यामुळे सारखी माझी चिडचीड व्हायची.
पण त्यावर लवकरच उतारा सापडला. कारण तेंडुलकरांनी ‘अशी पाखरे येती’ हे नाटक जब्बारला दिलं. जब्बारची पीडीएतर्फे राज्य नाटय़स्पध्रेसाठी नाटक दिग्दíशत करण्याची ही दुसरी खेप. ६८-६९ दरम्यान जब्बारने प्रथम इंगमार बर्गमन (१९१८-२००७) या जगप्रसिद्ध स्वीडिश नाटय़-चित्रपट दिग्दर्शकाच्या ‘द मॅजिशियन’ (१९५८) या चित्रपटाच्या पटकथेवर आधारित नाटक ‘जादूगार’ या नावाने केले होते. त्याची संहिता अनिल जोगळेकरची होती. पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने झाल्यावर शासनाने स्पर्धा त्या वर्षी बालगंधर्वमध्ये आयोजित केली होती. या नाटकासाठी अनिलने त्याच्या एका उद्योजक मित्राकडून सरकता रंगमंच तयार करून घेतला होता. स्वत: भालबा केळकर, श्रीराम खरे, जब्बार आणि अन्य बरेच- असा संच. नवेकोरे थिएटर. ‘जादूगार’ हे अत्यंत अवघड वळणाचं नाटक. ‘मेलडी मेकर्स’च्या सुरेंद्र अकोलकरने सिंथ वापरून वेगळ्या प्रकारचे संगीत ध्वनिमुद्रित केले होते. सायन्स म्हणजेच अंतिम, की त्यापलीकडेही काही जादू असू शकते? मुळात जादू अशी असू शकते का? जादूगार असणाऱ्याचा खरा चेहरा कोणता? जादूगार लोहचुंबक वापरून काही व्याधी दूर करू शकतो का? असा काहीसा गंभीर आणि कोडी घालणारा विषय होता. एकूण नाटकाचा विषय, त्याचे सादरीकरण, सरकता रंगमंच यांची भट्टी काही जमली नाही आणि नाटक सपशेल पडले. नाटक तर पडलेच; पण सरकत्या रंगमंचाची सवय नसल्याने अंधारात सरकत्या मंचाला अडखळून कलाकारही िवगेत अक्षरश: धडाधड पडत होते. काहींच्या हातापायांना अंकाच्या मध्ये बँडेज बांधावं लागलं. एकूण ‘जादूगार’ या नाटकाला बालगंधर्वची नवी वास्तू काही लाभली नाही. त्यामुळे सगळे कलाकार हिरमुसले होऊन बसले होते.
अशा वातावरणात अचानक वाऱ्याची झुळूक यावी तसे तेंडुलकरांचे ‘अशी पाखरे येती’ हे नाटक मुंबईला जाऊन जब्बार घेऊन आला आणि लगेच त्याचे उत्तम वाचनही जब्बारनी केले. उत्तम बेतलेलं, एकदम जमून आलेलं हे नाटक. नमुन्यादाखल सुरुवातीचा उताराच बघा :
(दर्शनी पडदा वर जातो. रंगमंचावर एक साधा, एकरंगी पडदा. फिक्का निळा असल्यास चांगला. अरुण सरनाईक (चित्रपटातला नव्हे!) हा चाळिशीचा एक बऱ्यापकी देखणा, पण जून इसम हसतमुखाने रंगमंचावर उभा आहे. अंगात रंगीत बुशशर्ट, गडद रंगाची पँट, खाकोटीला एअरबॅग.. ही तट्ट.)
अरुण : (प्रसन्नपणे प्रेक्षकांना) नमस्कार. खूप दिवसांनी भेट झाली. काय म्हणतात वहिनी? बालबच्चे ठीक? छोटं आता मोठं झालं असेल नाही? खूप गोड पोर! ते.. इन्क्रिमेंट अखेर तुम्हाला मिळालं का हो? आणि जागेचा प्रश्न? तूर्त सुटल्यासारखा आहे, पण गरसोयी आहेत? छान. नाही, नाही.. गरसोयी छान नाहीत, जागेचा प्रश्न सुटल्यासारखा आहे, हे छान. शरीर तिथे व्याधी आणि जागा तिथे गरसोयी- असायच्याच. जागेचा प्रश्न काय बिकट बनलाय! हो ना. त्यात फ्लू. फ्लूतून कधी उठलात? अजून जरासे अशक्तच दिसता. शक्तीच भरत नाही! या रेशनच्या अन्नात काही दम आहे म्हणता? गुरांचा कडबासुद्धा सकस असेल, तुलनेने. (उसासत) हुं ..काय या देशाचं होणार, कळत नाही. (उजळत) आठवतं तुम्हाला? आठवतं का? आपण मागे भेटलो होतो तेव्हा मी अगदी हेच म्हटलं होतं- की, या देशाचं काय होणार ते कळत नाही. अगदी तस्संच होतंय. काना-मात्रेचा फरक नाही. अंदाज अचूक ठरतोय की नाही आपला? काय हो? तेच वाईट आहे. वाईट अंदाज सहसा चुकत नाहीत..
वरचा ‘ओळख’ श्रुतिकेचा संवाद- आणि हा नाटकातला.. सरळ प्रेक्षकांशीच बोलणारा. फारशा रंगसूचना नसलेला हा संवाद नटाला, त्याच्या अभिनयाला अवकाश देणारा. बोलणं खुलवत खुलवत विषयाला भिडणारा हा संवाद त्यावेळी एकदम पटला. ‘अशी पाखरे येती’ची दोन वाचनं मी ऐकली. एक जब्बारने केलेलं आणि दुसरं मुहूर्ताच्या वेळी स्वत: तेंडुलकरांनी केलेलं. या दोन्ही वाचनाच्या पद्धती अत्यंत भिन्न होत्या. जब्बारच्या वाचनानं डोळ्यासमोर प्रयोगच उभा राहिला, तर तेंडुलकर नाटक चांगलं वाचीत; पण त्यातून प्रयोग पुढे येत नव्हता. अगदी संथगतीने ते वाचीत. नाटकातील अरुण सरनाईक ही मुख्य व्यक्तिरेखा जब्बारच करणार होता. ती व्यक्तिरेखा या नाटकाच्या नाटय़ांतर्गत लयीचा कणा आहे. तो जब्बारने अत्यंत नजाकतीने सांभाळला. हे पात्र एकाच वेळी शेजारच्या पात्रांशी आणि समोरच्या प्रेक्षकांशीही बोलतं. हे मिश्रण जब्बार अफलातूनपणे करीत असे. नाटकात त्याचे सरूबरोबरचे अनेक हळुवार प्रसंग आहेत. त्या प्रसंगांची हळुवार असण्याची आस जपत, त्यांच्या समरसतेला धक्का न लावता त्या प्रसंगातून किंचित अलिप्त होत प्रेक्षकांशी त्या घडत असलेल्या प्रसंगावर भाष्य करून परत त्या हळुवार प्रसंगात शिरायचं, हे जब्बार लीलया करीत असे. दिग्दर्शनही त्याचेच होते. त्याची ही भूमिका तेव्हा खूपच गाजली. दिवंगत अभिनेत्री शांताबाई जोग यांनी तर ‘रसरंग’ या त्यावेळच्या लोकप्रिय साप्ताहिकात ‘जब्बारच्या रूपात महाराष्ट्राला नवा राजेश खन्ना मिळाला आहे,’ असे लिहून आम्हाला चेष्टा करायला एक कोलीतच दिलं होतं. का माहीत नाही, पण त्यानंतर मात्र जब्बारने कधी अभिनय केल्याचं दिसत नाही.
‘अरुण सरनाईक’ हे सुरुवातीला ४०-४५ वर्षांचे असणारे पात्र- नंतर नाटकाच्या पहिल्या पाच-सहा पानांत २५ वर्षांचे होते आणि नाटकाच्या शेवटी परत ४०-४५ वर्षांचे होते. हा अरुण एका अनोळखी, अलिबागमधल्या एका मध्यमवर्गीय घरात घुसतो. त्या चौकोनी कुटुंबात एका काकूबाई असलेली, दिसायला सामान्य असलेली सरस्वती- सरू ही १८-१९ वर्षांची मुलगी असते. आपल्या सामान्य दिसण्यामुळे न्यूनगंड आलेल्या सरूच्या मनात अरुण आपल्या खेळकर व्यक्तिमत्त्वाचा वापर करून आत्मविश्वास जागृत करतो. त्याच्या अशा वशीकरणाने ती त्याच्या प्रेमात पडणार हे कळत असूनसुद्धा अरुण तिला सांगून आलेल्या मुलाला- विश्वास कीर्तनेला पसंत कर, असे सांगतो. पण ती आता धीट झाली आहे. तिला ती हळूहळू सापडतीय. सरू त्या मुलाला ‘नाही’ म्हणते. आपण अरुणच्याच प्रेमात असल्याचं ती सांगते. ते ऐकून अरुण चक्रावतो. त्याला ती जोखीम वाटते. आणि ती जबाबदारी घेण्याची त्याची कुवत नसते. त्याला सडाफटिंग राहण्यातच मजा वाटत असते. हे सगळं नाकारून तो तडकाफडकी त्या घरातून बाहेर पडतो. त्या सामान्य कुटुंबात हलकल्लोळ माजतो. नाटकात सरूचा भाऊ बंडा हा नियमित संघात जाणारा दाखवला आहे. तो नेहमी ‘सरू, कर्तव्यापुढे भावना येता कामा नयेत’ किंवा ‘मी शिवा महालेकडे जाऊन येतो. दोन दिवस शाखेवर आलेला नाहीये तो..’ अशा टाईपची वाक्ये म्हणतो. शेवटी अरुण पुन्हा ४०-४५ वर्षांचा होऊन प्रेक्षकांच्या समोर येत गोष्ट पुरी करतो. नंतर आपल्याला कळतं की, सरूचं शेवटी त्या मुलाशीच लग्न होतं. मग अरुण प्रेक्षकांत बसलेल्या एका छोटय़ा मुलाला त्याचं नाव विचारतो. तो नाव सांगतो- ‘अरुण विश्वास कीर्तने’! सरूने तिच्या मुलाचं नाव ‘अरुण’ असं ठेवलंय. म्हणजे जणू सरू त्या प्रयोगाला हजर आहे आणि तिच्या साक्षीनेच हा जीवनपट उलगडत गेलाय. अरुण त्या मुलाला स्टेजवर बोलावून चॉकलेट देतो आणि प्रत्येक मोक्याच्या वेळी कच खाणारा, जबाबदारी घेण्यास कचरणारा ‘हॅम्लेट’ वृत्तीचा नाटकाचा नायक कायमची एक्झिट घेतो. ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती’ या गाजलेल्या भावगीताचे स्वर ऐकू येतात (हे गाजलेले गीत जब्बारने सुधीर मोघेच्या आवाजात संगीतसाथीशिवाय रेकॉर्ड करून घेतले होते.) आणि पडदा पडतो.
असे हे मस्त, एकदम जमून आलेले, मूळच्या ‘रेनमेकर’ (१९५०) या एन. रिचर्ड नॅश यांच्या इंग्रजी नाटकावर आधारित नाटक; आणि त्याचा तितकाच प्रभावी प्रयोग. या तीन अंकी नाटकाचे केवळ चटया वापरून इचलकरंजीच्या डॉ. वल्लभ मर्दा या जब्बारच्या वर्गमित्राने केलेलं कल्पक नेपथ्य. जब्बार (अरुण सरनाईक), कल्पना देवळणकर (सरू), मोहन आगाशे (वडील), मीना पुराणिक-बापये (आई), विद्याधर वाटवे (विश्वास), दिलीप जोगळेकर (बंडा), प्रसाद कुलकर्णी (सरूचा मुलगा) यांचा अभिनय. हे नाटक राज्य नाटय़स्पध्रेत अंतिम फेरीत पहिले आले. स्पध्रेतली सर्व पारितोषिके मिळाली. तर बंडाचे काम करणाऱ्या दिलीप जोगळेकरचे नावही नंतर ‘बंडा’च पडले. पीडीएने नोव्हेंबर ७० पासून वर्षभरात महाराष्ट्रात सर्वत्र त्याचे १०८ प्रयोग केले. नाटक चांगलेच लोकप्रिय झाले. दिवसाला तीन-तीन हाऊसफुल्ल प्रयोग होत असत. हौशी नाटय़संस्था असूनही उत्पन्न चांगले होत होते. नाटकाची सर्व रंगमंच व्यवस्था बघणाऱ्यांमध्ये मी होतो. समर नखाते पण होता. नंतर काही प्रयोग आम्ही प्रकाशयोजनादेखील सांभाळली.
अशा रीतीने तेंडुलकरांचा ‘ओळख’ ते ‘अशी पाखरे येती’ असा ‘संहिता ते प्रयोग’ हा अभ्यासक्रम माझ्या वाटय़ाला माधव वझे आणि जब्बार पटेल यांच्यामुळे आला. नाटकनिर्मितीच्या सर्व अंगांची जवळून ओळख झाली. पण दरम्यान असं झालं की, ‘एक झुलता पूल’ या माझ्या एकांकिकेची संहिता असंख्य खुणा करून ‘सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धन यांच्याकडून साभार परत आली.
सतीश आळेकर – satish.alekar@gmail.com

set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
college girl commit suicide over love affair
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना
ssc recruitment 2024 career in staff selection commission jobs under the staff selection commission
नोकरीची संधी : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मधील संधी
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?