|| अंजली चिपलकट्टी

‘एक रुका हुआ फैसला’ (मूळ : ‘12 Angry Men’) हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? (नसेल पाहिला तर जरूर पाहा.) ‘कन्फर्मेशन बायस’ आणि ‘अ‍ॅफेक्ट’चा हा सिनेमा एक उत्तम नमुना आहे. एक मुलगा त्याच्या बापाच्या खोलीत सुरा हातात असलेल्या अवस्थेत सापडलेला असतो आणि अर्थातच खुनाचा आरोप त्याच्यावर असतो. बारा ज्युरींना तो दोषी आहे की नाही याचा निर्णय करायचा असतो. त्यापैकी अकरा ज्युरी तर ‘त्यानेच खून केला आहे’ याबाबत आधीच पटलेले असतात; पण बारावा ज्युरी मात्र त्याबद्दल साशंक असतो. या खटल्याच्या निर्णयाच्या रात्री त्यांच्यात झालेली घनघोर चर्चा म्हणजेच हा सिनेमा! ज्युरींपैकी अनेक जण स्वत:च्या वेगवेगळ्या ‘बायस’मुळे त्या मुलाविरुद्ध असतात. एका वृद्ध ज्युरीला आपल्या मुलानं सांभाळायचं नाकारलेलं असतं. आजकालची मुलं कशी उद्धटच असतात असं दुसऱ्याला वाटत असतं. तर कुणी ‘मेजॉरिटी’च्या विरुद्ध कशाला जायचं असं वाटणारे; तर कुणी पटकन् प्रभावाखाली येणारे. काही घाबरट, तर काही आक्रमक… स्वत:चं मत अहंकारामुळे बदलायला तयार नसणारे. या सर्व भावना मनात वागवून निर्णयाप्रत येणं यालाच आपण मागच्या लेखात ‘अ‍ॅफेक्ट’ (affect) असा शब्द वापरला होता. सिनेमात सर्वांना भावतं ते म्हणजे वरकरणी दिसणारे पुरावे आणि पूर्वग्रह यांच्या प्रभावाखाली न येता कोऱ्या मनाने खटला हाताळणारा तो बारावा ज्युरी आणि त्याचा सत्याजवळ जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न! आपणही त्याच्यासारखाच विचार करतो असं आपणा सर्वांनाच वाटत असतं. तो तसा करता आला पाहिजे, हे मात्र बरोबर! कोणत्या बातमी/ माहितीमुळे आपण वैतागतो, आनंदतो किंवा त्या बातमीकडे दुर्लक्ष करतो याबाबत स्वत:कडे एक-दोन आठवडे लक्ष ठेवा, म्हणजे तुमचे ‘अ‍ॅफेक्ट’ तुम्हाला कळतील.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?

तर मुद्दा असा की, गेल्या दहाएक वर्षांत समाजमाध्यमांचा वापर वाढल्याने माहितीचे जे प्रचंड लोट आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यातली काही माहिती आपल्या मत/ धारणांवर प्रभाव पाडण्यासाठीच बनवलेली असते. विशेषत: अशी माहिती- जी आपल्या भावनांना छेडते. आपली मतं कोणी ‘मॅन्युप्युलेट’ करू नये आणि ती तथ्यावर आधारित असावी असं वाटत असेल तर काही ‘क्रिटिकल थिंकिंग’ करणाऱ्या माणसांनी तयार केलेलं हे ‘बलोनी (baloney) डिटेक्शन किट’ वापरायला हवं.

१) यातला पहिला कळीचा मुद्दा आहे- ‘कन्फर्मेशन बायस’ कसा टाळायचा, हा. मात्र, हा उपाय ‘सांगायला सोपा… करायला अवघड’ आहे. जी माहिती आपल्यापर्यंत येते, ती सहजपणे न स्वीकारता त्याविरोधी मतं/ पुरावे काय आहेत हे जाणून घ्यायचं. विशेषत: ही माहिती जर आपल्याला ‘आवडणारी’ असेल, तर अधिकच सावध होऊन हे करायचं. विज्ञानात याला ‘फॉल्सिफिकेशन’चं तत्त्व असं म्हणतात. विज्ञानात एखादी थिअरी सिद्ध करायची असेल तर थिअरीला बळकटी देणारे पुरावे द्यावे लागतात, आणि हे पुरावे फक्त स्वत:च नाही, तर दुसऱ्यांनीही तपासून दृढ करावे लागतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विरोधी पुरावे आहेत का, हे शोधण्यावर विशेष भर असतो. अशी कोणती निरीक्षणं/ पुरावा मिळाला तर सिद्धांत चुकीचा ठरेल याचाही अंतर्भाव या थिअरीत करावा लागतो. असं का बरं?  सिद्धांत खरा ठरेल अशी निरीक्षणं पुरेत की! ते तर करायचंच; पण विरोधी पुरावेही शोधायचे. ते जर मिळाले नाहीत तरच थिअरी योग्य असं मानतात.

एक अगदी सोपं उदाहरण घेऊन पाहू. समजा, तुम्हाला असं सिद्ध करायचंय की, सर्व राजहंस पांढरे असतात… तर तुम्ही कोणती निरीक्षणं करायचा प्रयत्न कराल? तुम्ही पांढऱ्या राजहंसांच्या शोधात फिरत राहिलात आणि तुम्हाला एक कोटी पांढरे राजहंस जरी दिसले तरी तुमची सिद्धता पूर्ण होईल का? याच्या उलट तुम्ही पांढरे सोडून इतर कोणत्या रंगाचे राजहंस दिसतात का याचा शोध घेणं जास्त सयुक्तिक ठरेल, नाही का? म्हणजे दरवेळी पांढऱ्या रंगाचा राजहंस दिसला की, ‘बघा, माझा सिद्धांत कसा खरा!’ असा दावा तुम्ही करत राहिलात, तरी  केवळ एक वेगळ्या रंगाचा राजहंस तुमचा दावा खोटा ठरवू शकतो! म्हणजेच तुम्ही तुमचा सिद्धांत खोटा ठरेल अशा निरीक्षणांच्या शोधात राहूनही ती मिळाली नाहीत तरच तुमचा सिद्धांत चांगला. म्हणजे दृढीकरण करत राहणाऱ्या निरीक्षणांपेक्षा विरोधी निरीक्षणं (counter evidence) शोधणं जास्त महत्त्वाचं ठरतं.

तुम्हाला एक स्मार्टफोन खूप आवडलाय आणि कंपनीच्या वेबसाइटवर तर कंपनी त्याचे गुणच अधिक ठळकपणे सांगते. मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवून फोन घेता, की त्या फोनबाबत इतर वेबसाइटवर रिव्ह्यूज् बघता? त्यातही फोनचे दोष कोणी सांगितलेत का, हे बघताच ना? तसंच आपलं मत बनवतानाही विरोधी मतं किंवा निरीक्षणं मुद्दामहून शोधून लक्षात घ्यायला हवीत… त्या राजहंसाच्या गोष्टीसारखी! विरोधी पुरावे दिसले तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या मतात/ धारणेत फेरफार करण्याचे धाडस त्यासाठी दाखवावं लागेल. राजहंसाबाबत आपलं मत बदलायला कदाचित आपल्याला फार त्रास होणार नाही; पण आपल्या मनाच्या तळाशी खोलवर रुतलेल्या भावनिक धारणा बदलायला मात्र धाडस लागतं. त्यासाठी ऊर्मीही तयार होत नाही, याचं कारण एकदा तयार झालेलं मत बदलणं हे आपल्याला ‘स्व’वर हल्ला झाल्यासारखं वाटतं! म्हणूनच सिस्टिम-१ परस्परविरोधी माहिती समोर आली तर अशीच माहिती स्वीकारते- ज्यामुळे आपल्याला ‘बरं’ वाटतं आणि आत्मविश्वासाला धक्का पोहोचत नाही. पण स्वत:च्या मत/ धारणांशी जे जुळतं तेच सत्य आहे असं समजणं म्हणजे आत्मविश्वास नाही. स्वत:च्या विचारक्षमतेवर विश्वास ठेवून खुद्द स्वत:ला ‘बायस’ आहे का हे तपासणं, आपल्या धारणांना प्रश्नचिन्ह लावणं म्हणजेच ‘सेल्फ डाऊट’ची क्षमता! याला खरी मनाची ताकद लागते. ‘सेल्फ डाऊट’ म्हणजे स्वत:वर शंका घेणं नसून, उलट स्वत:च्या क्षमता वाढवणं आहे. आपली धारणा चुकीची असू शकते असा छोटा झरोका मनात उघडा ठेवणं म्हणजेच ‘सेल्फ डाऊट’! पण ज्या धारणांना केंद्रस्थानी ठेवून आपण अनेक कृती केलेल्या असतात, ते सगळं कवडीमोल होईल याची आपल्याला भीती वाटते. आपण जपलेल्या अस्मितेवर तो मोठा आघात ठरू शकतो. म्हणूनच ‘अस्मिते’ला मध्ये न आणता आणि ‘स्व’वर आघात न होऊ देता धारणा बदलण्याची लवचीकता जोपासणं आवश्यक असतं. ‘सेल्फ डाऊट’ हाताळायला जमला तर आत्मविश्वास वाढतो. किंबहुना, ‘सेल्फ डाऊट’ हे मजबूत आत्मविश्वासाचे लक्षणच ठरतं.

२) दुसरा मुद्दा आहे ‘अ‍ॅफेक्ट’चा. कोणतेही भावनिक आवाहन असणारे सिनेमे, सीरिज, जाहिराती, भाषणे आपल्याला ‘आपोआप’ आवडतात. न्यूरोमार्केटिंग ही मार्केटिंग शाखा खास मेंदूला कसं गंडवायचं यावरच काम करते. एक साधा नियम आपण पाळला तर या ‘अ‍ॅफेक्ट’पासून आपण आपल्याला वाचवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचं (नेता/ गुरू/ प्रचारक) बोलणं ऐकून आपण ‘प्रभावित’ झालोय असं लक्षात आलं की लगेच सावध व्हायचं आणि त्याने प्रभावित न झालेल्या माणसाला ‘मित्र’ मानून त्या बोलण्यातील दोष काढायला सांगायचं. ते दोष ऐकताना अस्वस्थ न होता मुद्दे नमूद करावेत. नंतर त्या दोन्हीचं अलिप्त राहून मूल्यमापन करावं. त्यातील तथ्यांची तपासणी जरूर करावी. विशेषत: कुणी जर द्वेष पसरवणारी माहिती देत असेल आणि ती आपल्याला पटत असेल तर आपण लगेचच सावध व्हायला हवं.

३) माहितीचा अपुरेपणा आणि विश्वसनीयता याबाबत खूप सजग असणं आवश्यक आहे.  आपण साबण, कपडे, फर्निचर निवडताना जेवढे चिकित्सक असतो त्यापेक्षा जास्त काळजी गाडी, इन्शुरन्स, डॉक्टर निवडताना घेतो. आणि सामाजिक/ आर्थिक धोरणं निवडताना? ज्या सामाजिक, आर्थिक धोरणांचा आपल्यावर आत्ता थेट आणि दूरगामी परिणाम होतोय त्याविषयी आपल्याला फार त्रोटक माहिती असते. उदा. आपली शिक्षणव्यवस्था चांगली का नाही? शिक्षणावर प्रगत देशांच्या तुलनेत आपण किती खर्च करतो? माहिती अधिकाराचं खच्चीकरण का करण्यात आलं? निवडणूक रोख्यांची माहिती गोपनीय का? कोणत्या सेवा खासगी आणि कोणत्या सार्वजनिक याचं संतुलन सरकार कसं ठरवतं?

पण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत मात्र मेंदू शॉर्टकट घेतो, कारण आपल्याला खूप कमी माहिती असते. आपल्या सिस्टिम-१ ला अपुरी माहिती मिळाली तर ती अनेक ठिगळं जोडून जुगाड निष्कर्ष काढणारच. गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी आवश्यक माहिती, पुरावे सहजपणे मिळत नाहीत. अशा वेळी साशंक राहणं ही भूमिका योग्यच. परंतु मेंदूला संभ्रमावस्थेत ठेवणारी अशी अपुरी माहिती का मिळते? महत्त्वाच्या सामाजिक/ आर्थिक धोरणांबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध नसणं या परिस्थितीचाही समाचार घ्यायला हवा. खरं तर सामाजिक धोरणं यशस्वी व्हावीत आणि आपले हक्क जपले जावेत यासाठी जनतेला विश्वासार्ह माहिती देण्याचं काम अनेक तज्ज्ञ, संस्था करतात. उदा. कॅग, रिझर्व्ह  बँक, माहिती अधिकार आयोग, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, निवडणूक आयोग, न्यायसंस्था वगैरे. पण अशा संस्थांची स्वायत्तता जपणं आणि त्यांच्यावर सरकारचा दबाव/ हस्तक्षेप नसणं आवश्यक आहे. अनेक वेळा गोपनीयतेचा आधार घेऊन माहिती दडवली जाते. माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कितीतरी जणांचे खून झाले आहेत, हे लक्षात घेतले तर सत्य लपवणं राजकारणी लोकांना किती गरजेचं असतं हे लक्षात येईल. खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी काम करणारी जिगरबाज माध्यमं, शोधपत्रकार यांना म्हणूनच लोकाधार मिळणंही आवश्यक आहे.

४) सायकल चालवण्याचं तंत्र एकदा शिकलं की ती चालवणं अंगवळणी पडतं. तसंच ठरवून सराव केला तर प्रश्न विचारणं, चिकित्सक होणं ही ‘आंतरिक’ सवय बनू शकते. मात्र, प्रश्न कोणाला विचारावेत याबाबत दुजाभाव नको, तर अलिप्तता हवी.

मानवी वर्तनाची, मेंदूच्या विज्ञानाची गाडी राजकारणापर्यंत घसरली असं वाटून कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी स्वत:च्या ‘बायस’चा जरूर शोध घ्यावा. कारण मानवी वर्तनावर/ धारणांवर मार्केटचा, माध्यमांचा आणि राजकारणाचा कसा प्रभाव आहे हे आपण जाणतो. स्वत:चं स्वातंत्र्य आणि निकोप जगण्याचा हक्क शाबूत ठेवण्यासाठी हे प्रभाव कसे ओळखावेत हाच या लेखमालेचा हेतू आहे. कोणती कंपनी, कोणत्या पक्षाचं सरकार हे महत्त्वाचं नाही, पण ते आपल्या हक्कांवर गदा आणत नाही ना, हे दूरदृष्टीने बघणं एक नागरिक म्हणून आज गरजेचं बनलं आहे. अर्थात ज्यांना तथ्यापर्यंत जायचं आहे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. ज्यांना सत्य आपल्याला ‘कळून’ चुकले आहे असं वाटतं त्यांना जागं करणं तसंही अवघड. ते बौद्धिक कोलांटउड्या मारत, विवेकाची तोडमोड करत, आपल्याला ‘बायस’ नाही असं म्हणत सतत समेवर येताना मात्र ‘ठरावीक’ बाजूने बोलत राहतात. ते बघणं मनोरंजक असतं.

anjalichip@gmail.com