अरुणा अन्तरकर lokrang@expressindia.com

राज कपूर आणि देव आनंद हे दिलीपकुमारचे समकालीन. म्हटले तर प्रतिस्पर्धी. दोघांचे चेहरे दिलीपकुमारपेक्षा आकर्षक. तरीही त्यांच्यापेक्षा दिलीपकुमार सरस ठरला. याचं कारण दिलीपकुमारचं प्रभावी व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरचा उदंड आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि सहृदयता यांचं विलक्षण मिश्रण त्याच्या चर्येत होतं. त्याचबरोबर एक प्रकारचं कर्तेपण आणि आश्वासकता त्याच्यात होती. तो जन्मजात ‘लीडर’ होता.

या जगात येणारा मर्त्य जीव एक दिवस इथून जायचाच असतो. हे ज्ञात होण्यासाठी धर्माच्या किंवा तत्त्वज्ञानाच्या शिकवणीची गरज नसते. तो अनुभवच असतो. महत्त्व जाण्याला नसतं, जाणारा कोण असतो, याला असतं. जाणाऱ्याचं नाव दिलीपकुमार असेल तर डझनावारी मृत्युलेख लिहून निर्ढावलेलं मन हलतं आणि वृत्तपत्रांच्या किंवा चॅनेलच्या त्याच्याबद्दलच्या  बातम्यांतली अक्षरं धूसर होतात. खरं म्हणजे देव आनंद गेला तेव्हाच दिलीपकुमारबद्दल अशी बातमी वाचण्याची मनाची तयारी केली होती. तरीही मेंदूची दटावणी झुगारून डोळ्यांनी दगा दिला.

दिलीपकुमार, मीनाकुमारी, देव आनंद यांना चाहते नसतात.. भक्त असतात. रूपेरी पडद्याच्या सीमा ओलांडून ते तुमच्याशी नातं जोडतात. तुमच्या जीवनाचा नव्हे, तुमचं जीवन- निदान जगण्याचं कारण बनून जातात. स्वातंत्र्योत्तर काळात उगवलेल्या कलाकारांच्या त्या पिढीनं भारतीय प्रेक्षकाला तारुण्य जगायला शिकवलं.

त्याआधीच्या चित्रपटांत नायक देशासाठी आणि नायिका पती/ प्रियकर आणि कुटुंब यांच्यासाठी जगायच्या आणि मरायच्या. देशाच्या पारतंत्र्याच्या बेडय़ा तुटल्या तेव्हा देशातले स्त्री-पुरुष एकमेकांवर प्रेम करायला आणि दुहेरी अर्थी एकमेकांवर जीव टाकायला/ मरायला मोकळे झाले. देशासाठी ‘शहीद’ होणारा दिलीपकुमार मग ‘मेला’, ‘दीदार’, ‘अंदाज’मध्ये प्रेयसीसाठी कधी जीव, तर कधी डोळे कुर्बान करू लागला. (आठवा : ‘दीदार’, ‘यहुदी’)

पुरुष चाहते एखाद्या नायिके च्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचा मनोरथ बऱ्याचदा तिच्या शय्यागृहापर्यंत पोचतो. स्त्री-चाहत्यांच्याही अशाच आपल्या नायकाबद्दल रोमँटिक अपेक्षा असतात. त्यांच्या प्रेमस्वप्नात त्या कोणत्या तरी किल्ल्यात कैद झालेल्या असतात आणि मग त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या स्वप्नातला राजकुमार घोडय़ावर स्वार होऊन त्यांची सुटका करायला येतो. किंवा एखाद्या असहाय, विकल क्षणी ज्याच्या खांद्यावर मान ठेवता येईल, किंवा शारीरतेचा स्पर्श न होता ज्याच्या बाहुपाशात विसावता येईल असा पुरुष त्यांना हवा असतो. पुरुष! नर नव्हे! दिलीपकुमार हा आमच्या पिढीतला तसा राजकुमार, असा पुरुषोत्तम होता. त्याच्या प्रेमात, त्याच्या स्पर्शात स्त्रीबद्दलचा आदर जाणवायचा. प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला स्पर्शाची गरजही पडत नसे.

‘फूटपाथ’मधील एक प्रसंग इथे आठवतो. तिथे तो आणि त्याची ती (मीनाकुमारी) एका चाळीत राहत असतात आणि त्यांच्या भेटीगाठी चाळीतल्या जिन्यातच होतात. त्याला जेव्हा बऱ्यापैकी पैसे मिळू लागतात तेव्हा तिच्यासाठी घरकुल उभारण्याचं स्वप्न तो पाहू लागतो. जिन्यातल्याच एका भेटीत तो अगदी हळुवार स्वरात याबद्दल बोलतो. तिला जवळ घेण्याची अनावर इच्छा त्याच्या नजरेतून ओसंडत असते. पण ते शक्य नसतं. तेव्हा ती बसलेल्या पायरीच्या वरच्या पायरीवर तो हात टेकवतो. त्या हात टेकवण्यातून आणि नजरेतल्या ओढाळपणानं त्याला जे व्यक्त करायचं होतं ते उत्कटतेनं व्यक्त होतं. संवादफेकीचा प्रभू म्हणून त्याची ख्याती होती. पण अनेक चित्रपटांतले असे प्रेमाचे प्रसंग त्यानं नजरेनंच सजीव केले.. अविस्मरणीय केले.

‘नया दौर’मध्ये पोटापुढे लाचार आणि दुबळ्या झालेल्या टांगेवाल्याची दैना तो पोटतिडकीनं बोलून दाखवतो. ‘मुगले आझम’मध्ये प्रेमाला विरोध करणाऱ्या बापाविरुद्ध बंड करताना ‘बाप का भेस पहनकर शहेनशहा बोल रहा है..’ म्हणून उपहास करतो. ‘कौन कंबख्त बरदाश्त करने के लिए पिता है?’ असा तारस्वरात एका दमात सवाल करणारा देवदास ‘अब तो यही अच्छा लगता है- कुछ भी अच्छा न लगे..’ ही जीवनाबद्दलची विरक्ती विझलेल्या मलूल स्वरात उघड करतो.

हे सगळेच क्षण काळजाचा ठाव घेणारे असतात. पण हाच देवदास पित्याच्या मृत्यूनंतर केवळ एक जनरीत म्हणून सांत्वनासाठी येणाऱ्या नातलगांना काही न बोलता फक्त हाताच्या इशाऱ्याने सांगतो की, तिकडे (म्हणजे रडणाऱ्यांकडे) जा. तेव्हा त्याच्या नजरेत उमटलेला उपहास जास्त परिणामकारक असतो, बोलका असतो.

‘मशाल’मध्ये त्याचं घर उद्ध्वस्त करणारा धनदांडगा भांडवलदार त्याला ते सगळं भरून देण्याची तयारी दाखवतो (अर्थात सशर्त!) तेव्हा पत्रकाराच्या रूपातला दिलीपकुमार त्याच्याकडे एकटक बघत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर पीळ दिसत असतो आणि डोळे आग ओकत असतात.

‘मशाल’मधला सर्वोत्तम प्रसंग म्हणजे नायकानं मरणासन्न पत्नीच्या मदतीकरिता फोडलेला टाहो! त्याबद्दल दुमत होऊच शकत नाही. पण हा आक्रोश व्यर्थ ठरतो. कुणाचीही मदत मिळत नाही आणि नायकाच्या पत्नीचा तडफडत प्राण जातो. तो अवाक् होतो. त्याच्या नजरेत शून्यता येते. ते पाषाण मौन आपल्या हृदयात जणू तीक्ष्ण शस्त्र भोसकतं.

पाषाणालाही पाझर फोडेल असं ते दृश्य एकाच ‘टेक’मध्ये पूर्ण करावं अशी‘मशाल’चे दिग्दर्शक यश चोप्रा यांची इच्छा होती. साठी पार केलेल्या आणि बायपास सर्जरी झालेल्या या नटसम्राटावर ताण येऊ नये, ही वत्सल काळजी त्या इच्छेत होती. दिलीपकुमारनं ते लांबलचक दृश्य एका झटक्यात केलंदेखील. पण काही तांत्रिक गफलतीमुळे ते दृश्य कॅमेऱ्यात उमटलंच नाही. आणि त्या दृश्याचं पुन्हा एकवार चित्रण झालं. ‘अर्धा तास विश्रांती घेऊन काम करू या’ ही चोप्रांची सहृदय सूचना दिलीपकुमारनं मान्य केली नाही. याउलट, प्रसंगाचा जमलेला मूड जाऊ नये म्हणून ते दृश्य लगेच करावं असा त्यानं आग्रह धरला आणि मग त्याच भावावेगानं, त्याच आर्त उत्कटतेनं त्यानं ते दृश्य पुन्हा एका दमात पूर्ण केलं.

ही किमया करून दाखवणाऱ्या दिलीपकुमार नामक अभिनय चमत्काराकडे अभिनयाचं प्रशिक्षण नव्हतंच. पेशावरमधला सनातनी खानदानी मुस्लीम कुटुंबात जन्मलेला महंमद युसुफ सरवर खान हा तरुण वयात मुंबईला आल्यावरसुद्धा सिनेमा बघत नव्हता. पोटापाण्यासाठी ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये तो काम मागायला गेला तेव्हाही कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचीच त्याची इच्छा होती. भारतीय सिनेरसिकांचं सुदैव म्हणून ‘बॉम्बे टॉकीज’च्या सर्वेसर्वा आणि त्या काळातल्या नामवंत अभिनेत्री देविकाराणी यांनी त्याला अभिनय करण्याची नोकरी दिली. ती पत्करण्याखेरीज पर्याय नाही असं लक्षात आल्यावर दिलीपकुमारनं स्वत:च स्वत:चं प्रशिक्षण सुरू केलं. ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये तेव्हा अशोककुमारच्या चित्रपटाचं काम चालू होतं. महंमद युसुफ खान दिवसभर अशोककुमारचं निरीक्षण करायचा आणि संध्याकाळी इंग्रजी किंवा हिंदी चित्रपट बघायचा. स्वाभाविक अभिनय कसा करायचा याचा धडा तो अशोककुमार आणि हॉलिवूडचे काही नायक यांच्यापासून शिकला. चांगला अभिनय करायचा असेल तर काय टाळलं पाहिजे, हे तो तत्कालीन हिंदी हिरोंकडून शिकला. एकलव्याच्या निर्धारानं त्यानं अभिनयकला अवगत करून घेतली आणि महंमद युसुफ खान ‘दिलीपकुमार’ बनला. आणि मग.. दिलीपकुमार म्हणजे अभिनयाचा मानदंड! दिलीपकुमार म्हणजे अभिनयाचं संस्थान, विद्यालय, विद्यापीठ.. हे सारं काही! दिलीपकुमार म्हणून मिळालेलं सिंहासन त्यानं सलग वीस-तीस वषर्ं टिकवलं. सर्वाधिक (आठ वेळा) फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम त्यानं केला. आयुष्यातली शेवटची वीस वर्षे तरी तो पडद्यापासून आणि सार्वजनिक जीवनापासून दूर होता तरी त्याचा दबदबा कायम होता. अलीकडची आठ-दहा वर्षे तर त्याच्या हॉस्पिटलमध्ये येण्या-जाण्याचाच उल्लेख होत होता. पण तो होत होता; आणि ती पहिल्या पानावरची बातमी होती. हा त्याचा महिमा होता.

तो मिळवण्यामागे त्याचं केवळ बावनकशी अभिनयकौशल्य अथवा त्याचं सोन्यासारखं नशीब नव्हतं, तर ज्या अशोककुमारकडून त्यानं अभिनयाचे धडे घेतले, त्याच्यापेक्षाही तो मोठा झाला. अशोककुमारचं अभिनयसामर्थ्यही श्रेष्ठ दर्जाचं होतं. तरीही नायक म्हणून किंवा चरित्रनट म्हणून त्याचा दिलीपकुमारइतका बोलबोला झाला नाही.

राज कपूर आणि देव आनंद हे दिलीपकुमारचे समकालीन नट. म्हटले तर प्रतिस्पर्धी. दोघांचे चेहरे दिलीपकुमारपेक्षा आकर्षक. तरीही त्यांच्यापेक्षा दिलीपकुमार सरस ठरला. त्याचा प्रभाव अधिक पडला. आणि तिकीट खिडकीवरचं यशही त्याला अधिक मिळालं.

याची मुख्य कारणं म्हणजे एक तर दिलीपकुमारचं प्रभावी व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरचा उदंड आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि सहृदयता यांचं विलक्षण मिश्रण त्याच्या चर्येत होतं. त्याचबरोबर एक प्रकारचं कर्तेपण आणि आश्वासकता त्याच्यात होती. तो जन्मजात ‘लीडर’ होता. बारसं असो, बारावं असो, विवाह समारंभ असो की कुठे आग लागलेली असो; हा पुढे सरसावून सूत्रं हाती घेणार! जबाबदार, परिपक्व दिसणारा हा माणूस बघताक्षणी छाप उमटवून जायचा. पडद्यावर आणि पडद्यामागेही त्याचा इतरांशी लगेच संवाद सुरू व्हायचा. आणि तो सुरू झाला की हा कुठेही नायकच ठरायचा. लीडर आणि हिरो- दोन्ही! त्यामुळे चेहऱ्यावर नायकाचा रुढार्थी गुटगुटीतपणा आणि गोंडसपणा नसला तरी तोच भाव  खाऊन जायचा. जोडीला त्याचं ते प्रसन्न, उमदं हसू, लखलखित गोरा रंग (त्याची झळाळी तर फोटोमध्येही जाणवते.) आणि घनदाट केसांमधून हळूच नजर चुकवून बाहेर पडलेली केसांची बट! ही त्याच्या चेहऱ्याची वैशिष्टय़ं होती आणि ते त्याचं वैभवही होतं. सजणीने आपल्या सख्यासजनाच्या रूपाचं गुणवर्णन करणं आपल्या रूपेरी पडद्यावरच्या आर्य संस्कृतीत बसत नाही. बायकांना वेळ तरी कुठे मिळतो म्हणा दिवसभर सख्याच्या रूपसंपदेचं चिंतन करायला? ते चिंतन करणं आणि मग त्याचं वर्णन करणं नायकाच्या बाबतीत समाजमान्य असतं. पण दिलीपकुमार नावाच्या अद्वितीय नायकानं हिंदी चित्रपटाला ही परंपरा मोडायला भाग पाडलं. ‘उडे जब जब जुल्फे तेरी, कवाँरियों का दिल मचले’ अशी प्रेयसीकडून (वैजयंतीमाला) जाहीर ‘कॉम्प्लिमेंट’ मिळवणारा दिलीपकुमार हा पहिलाच नायक असावा. त्याच्या स्त्री-चाहत्यांचं मनोगत व्यक्त करणारं हे गाणं (चित्रपट : ‘नया दौर’) त्या जमान्यात डोक्यावर घेतलं गेलं. आमच्या हातात असतं तर आम्ही या गाण्याचं राष्ट्रगीत.. किमान शाळेचं प्रार्थनागीत तरी.. केलं असतं. काय त्या गाण्यात त्याचे केस उडाले आहेत! उगीच का याच्यापेक्षा निम्म्या वयाची सायरा बानू शालेय वयातच त्याच्यावर फिदा झाली! (पुढे ती त्याची पत्नी आणि शेवटच्या आजाराच्या काळात तर त्याची आई झाली. संसारात ती त्याच्यापेक्षा मोठी ठरली. तिला आणि कृष्णा कपूर यांना बॉलिवूडच्या सीता आणि द्रौपदीच म्हटलं पाहिजे.)

उपजत अभिनयगुण दिलीपकुमारनं सतत अभ्यासाच्या बळावर कल्पवृक्षासारखं उंचावत नेले. कुशल चित्रकारानं चित्राच्या एकेका भागात रंग भरावेत, तसा हा जातिवंत नट. प्रत्येक दृश्यावर त्याची पकड असायची. ‘कोहिनूर’सारख्या पोशाखी चित्रपटातसुद्धा त्यानं ‘मधुबन में राधिका नाचे रे’ची रागदारी मैफील रंगवली. (केवळ ते एक गाणं रंगवण्याकरता तो सतार शिकला.) याच चित्रपटातल्या ‘जरा मन की किवडिया खोल, सैयां तोरे द्वारे खडे’ या गाण्यात तो वेशांतर करून येतो आणि प्रेयसीला आपली ओळख पटावी म्हणून ‘सैंया तोरे द्वारे खडे’ या समेवर उजवा खांदा हलवतो. त्या क्षणाची रंगत, त्याची प्रसन्नता शब्दांत पकडणं अशक्य आहे. नंतर तेच आरशाचं अफलातून दृश्य! हा नेमका व्हिलनच्या (जीवन) तावडीत सापडतो. रिकाम्या आरशासमोर उभ्या असलेल्या मद्यधुंद व्हिलनच्या समोर तो उभा राहतो आणि त्याच्या हालचालींची नक्कल करून आरशाचा भास निर्माण करतो. अद्भुत, अफलातून अशी सगळी विशेषणं त्या दृश्याचं वर्णन करायला अपुरी आहेत. पुढे अमिताभनं हे दृश्य उचललं आणि ‘मर्द’मध्ये तसंच्या तसं नकललं. ‘पैगाम’, ‘गंगा जमुना’ वगैरे चित्रपटांतली अशी उत्तमोत्तम दृश्यंसुद्धा!

देशाच्या लोकजीवनाशी तो परिचित होता आणि समरसही झालेला होता. म्हणून तर वैयक्तिक जीवनात सूटबूटवाल्या साहेबी संस्कृतीत राहणारा आणि कॉलेज शिक्षण घेतलेला हा नायक धोतर आणि पांढरा सदरा या वेशात सहज वावरायचा. ‘सुख के सब साथी, दुख में ना कोई’ (‘गोपी’) हे गाणं एखाद्या ग्रामीण भक्ताच्या तल्लीनतेनं साकार करायचा. ‘नया दौर’मध्ये टांगेवाला म्हणून विश्वासार्ह वाटायचा. आणि रांगडा कामगार म्हणूनही स्वीकारला जायचा. त्यानं नेहमी दर्जाला महत्त्व दिलं. भाराभर चित्रपट केले नाहीत. ‘प्यासा’सारख्या काही चित्रपटांपासून ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाला नकार देण्याचं धैर्य त्याच्यापाशी होतं. त्याचे हे निर्णय बरे की वाईट, चूक की बरोबर, हे मुद्दे अलाहिदा. एका वेळी एकच चित्रपट आणि तो केल्यानंतर दोन-तीन वर्षे नवा चित्रपट नाही, ही त्याची आचारसंहिता होती. ‘पाहू रे किती वाट?’ अशी चाहत्यांची कासाविशी व्हायची. पण दुर्मीळ, दुर्लभ दर्शनयोगामुळे त्याचे चित्रपट तुफान चालायचे. ‘राम और श्याम’ या चित्रपटाच्या ‘सीता और गीता’ अन् ‘चालबाज’ या नायिकाप्रधान आवृत्त्याही गाजल्या.. म्हणजे पाहा!

‘राम और श्याम’नंतर दिलीपकुमारला निवृत्तीचे वेध लागले. बिमल रॉय, मेहेबूब यांच्यासारख्या दिग्दर्शकांची उणीव त्याला तीव्रतेने भासत होती. सायरा बानूच्या आग्रहाखातर त्यानं नंतर डझनभर चरित्र भूमिका केल्या. पण ‘मशाल’ आणि ‘शक्ती’ वगळता त्याच्या इतर चित्रपटांमध्ये दम नव्हता. अमिताभबरोबरचा ‘शक्ती’प्रदर्शनाचा सामना जिंकल्यावर हा नटसम्राट थांबला असता तर एका देदीप्यमान कारकीर्दीचा यथायोग्य समारोप झाला असता. पण ट्रॅजेडी किंगला ही ट्रॅजेडी टाळता आली नाही. शेवटी नियतीच्या मनात असतं तेच घडतं. एरवी जीवनाच्या शतकाला फक्त दोन धावा कमी असताना हा महानायकांचा नायक बाद का व्हावा?

पडद्यामागील दिलीपकुमार..

पडद्याइतकाच पडद्यामागच्या जीवनात दिलीपकुमारच्या वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दिसायचा. त्याच्या मनावर महात्मा गांधींचा पगडा होता. त्याच्यावर बायपास सर्जरी करण्याची वेळ आली तेव्हा बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांप्रमाणे तो परदेशी जाणार असा लोकांचा अंदाज होता. पण दिलीपकुमारनं निर्धारपूर्वक ही  शस्त्रक्रिया स्वखुशीनं भारतातच केली. ‘माझा इथल्या डॉक्टरांवर विश्वास आहे..’ हे त्यानं जाहीर केलं. त्याचे डॉक्टरही महाराष्ट्रीय होते- डॉ. गोखले! त्यांच्याच मुलानं (नितीन) दिलीपकुमारवर अखेपर्यंत उपचार केले. डॉ. गोखले (सीनियर) यांच्या आग्रहावरून दिलीपकुमारनं एका वैद्यकीय समारंभाचं अतिथीपदही भूषवलं. तिथे हा काय बोलणार, अशी चेष्टाही झाली. पण तिथेही वैद्यकीय जगाच्या अद्ययावत प्रगतीची दखल घेणारं उत्तम भाषण करून दिलीपकुमारनं बाजी मारली. लता मंगेशकर यांच्या लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमाचं त्यानं केलेलं निवेदन लताच्या कार्यक्रमाइतकंच गाजलं.