मीना गुर्जर
कुमारवयीन मुलांच्या वाचनगरजा ध्यानात घेऊन ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे मराठीतील दहा वैविध्यपूर्ण आणि कसदार कादंबऱ्यांच्या संक्षिप्त आवृत्त्यांचे दोन संच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कुमारवयीन वाचकांच्या दृष्टीने मराठीत नावीन्यपूर्ण असलेल्या या कादंबरीमालेवर ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ची मोहोर उमटली आहे. या संक्षेप-मालेतील साहित्यकृतींवर टाकलेला दृष्टिक्षेप..




गेली ६५-७० वर्षे मुलांसाठी कथा-कवितांची आणि मुलांची आवड, छंद ओळखून इयत्तेनुसार चित्रकलेची अनोखी पुस्तके प्रकाशित करणारे ‘ज्योत्स्ना प्रकाशन’ आणि ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ यांनी आता कुमार गटातील १४-१५ वर्षांच्या मुलांसाठी एक उल्लेखनीय प्रकल्प हाती घेतला आहे. कुमारवयीन मुलांसाठी आपल्याकडे फारसे कादंबरीलेखन झालेले नाही. या मुलांना बालवाङ्मय नकोसे वाटते आणि मोठय़ांच्या साहित्याशीही त्यांची नाळ जुळत नाही. नेमकी हीच गोष्ट हेरून या प्रकल्पात उत्तम, दर्जेदार कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण केले आहे.
प्रकल्पात पाच-पाच कादंबऱ्यांचे दोन संच प्रसिद्ध झाले आहेत. ऐतिहासिक, सामाजिक, ग्रामीण, वैज्ञानिक अशी वर्गवारी. वेगळे विषय. काळ वेगवेगळा. परिसरही वेगळा.. मुंबई, पुणे, कोकण, अमेरिका, कोल्हापूर असा विस्तृत. कादंबऱ्यांमधील काळ जसा वेगळा तसाच कादंबरीलेखनाचा काळही वेगवेगळा. लेखकही वेगवेगळ्या काळातले. १९१३ च्या ‘वीरधवल’पासून १९८३ च्या ‘देवांसि जिवे मारिलें’पर्यंतच्या विस्तीर्ण काळातल्या या कादंबऱ्या आहेत. नायकही एकसाची नाहीत. पण यांत उत्कंठावर्धकता ही समान गोष्ट आहे. हे संक्षिप्तीकरण लेखकाची शैली, बाज सांभाळत, मूळ गाभ्याला धक्का न लावता केले आहे. निवेदनात भाषेचे वैविध्य असल्यामुळे त्या- त्या बोलीतील अनोळखी व कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत. कथेचा सारांश व मूळ लेखकाची थोडक्यात माहितीही दिली असल्याने त्या लेखकाच्या अन्य साहित्याकडेही वाचक वळू शकतो.
परदेशात गाजलेल्या पुस्तकांची कुमार गटासाठी संक्षिप्त आवृत्ती प्रसिद्ध होते. आपल्याकडे आता या पुस्तकांच्या निमित्ताने हा नावीन्यपूर्ण प्रयोग होतो आहे. वाचनसंस्कृती वाढावी म्हणून असे प्रकल्प व्हायला हवेत. संक्षिप्त आवृत्ती आवडली तर मुलेच काय, पण प्रौढही उत्सुकतेपोटी मूळ कादंबरीकडे वळतील. कारण यातील काही कादंबऱ्या दोन-तीन पिढय़ांपूर्वीच्या असल्यामुळे त्या अनेकांना अनोळखी असतील.
डॉ. कीर्ती मुळीक यांनी शंकर पाटील यांच्या ‘टारफुला’चे संक्षिप्तीकरण केले आहे. कोल्हापूरचा परिसर.. दऱ्याखोऱ्या, कडेकपारी आणि घळी, दरडींनी वेढलेले गाव. तिथले गावपातळीवरचे राजकारण आणि सत्तासंघर्ष! सत्ता हातात आल्यावर सुरुवातीला नीतीने आणि धाडसाने वागून बंडखोरांचा बीमोड करणारा दादा पाटील, त्यानंतर मात्र सत्तेच्या जोरावर जुलूम-जबरदस्ती करून दहशत निर्माण करतो.
‘टारफुला’ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही तगून राहणारी, जोमाने वाढणारी वनस्पती! सत्ता ही अशीच अन्यायाचे रूप घेऊन फोफावत राहते आणि चांगली रोपे सुकत जावीत तशी सद्वर्तनी माणसेही या जुलमाखाली भरडली जातात. तीन पिढय़ांची ही कहाणी. गावातल्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यातले राजकारण, दत्तकासाठीची स्पर्धा, जमिनीची पळवापळवी, सुडातून होणाऱ्या खुनांची मालिका या सर्वाचे भेदक दर्शन या कादंबरीत घडते. ‘टारफुला’ मूल्यव्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकतं. शेवटी मात्र केरूनानांच्या मुलींच्या रूपाने स्त्रीशक्तीच्या रूपांचं दर्शन घडवून एक अनपेक्षित वळण आणले गेले आहे.
‘वीरधवल’ ही नाथमाधव यांची जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीची अद्भुतरम्य कादंबरी. हिचा संक्षेप डॉ. कल्याणी हर्डीकर यांनी केला आहे. कट-कारस्थाने, राजे, सरदार, गढी, तळघरे, गुहा, चोरवाटा, चमत्कार, मदत करणारे पिशाच्च, जन्मरहस्य अशा गोष्टींनी नटलेली, वाचकाला पुढे पुढे वाचण्यास प्रवृत्त करणारी ही कलाकृती. कल्पनारम्य असली तरी तीत दुष्कृत्यांचा, दुर्जनांचा अंत आणि सत्याचा, सज्जनांचा विजय होतो. उत्तम संस्कार, साहस आणि मूल्ये पाळून दिलेली लढत यामुळे यातला नायक वीरधवल मनावर ठसा उमटवतो.
‘आनंदी गोपाळ’ ही आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी. श्री. ज. जोशी यांनी लिहिलेली. तिचा संक्षेप आसावरी काकडे यांनी केला आहे. या कादंबरीत साधारण १५० वर्षांपूर्वीचा काळ चित्रित झाला आहे. बाईंच्या नवव्या वर्षांपासून (लग्नापासून) ते मृत्यूपर्यंत १३ वर्षांचा अवकाश त्यात आहे. रूढींनी जखडलेल्या समाजातील एक स्त्री- जिला अक्षरओळख करून घ्यायचीही मुभा नाही, ती सनातनी समाजाविरुद्ध जाऊन त्याकाळी अनुचित समजला जाणारा समुद्रप्रवास व परदेशगमन करून अमेरिकेत शिक्षण घेते. तिथे डॉक्टर होते. एकीकडे पती गोपाळराव तिने डॉक्टर व्हावे म्हणून धडपड करतात, तर दुसरीकडे भारतात राहूनही तिच्या खाण्या-पिण्यावर, पोशाखावर तिखट नजर ठेवून निर्बंध घालतात. त्यांच्या विक्षिप्त स्वभावाचा आनंदीबाईंना अंदाजच येत नाही. त्यामुळे सतत त्यांच्या वागण्याचा ताण, पैशाचे अपुरेपण, खडतर अभ्यास, प्रतिकूल हवामान, रूढी-धर्म पाळण्याचे बंधन. तरीही त्या यश प्राप्त करतात. पण त्याकरता त्यांना मोल द्यावे लागते.. शरीराचे, प्राणांचे. या कथेत हॅमिल्टन, कार्पेटरमावशी, गोपाळराव आदींचे सुरेख व्यक्तिचित्रण आहेच; पण काळही प्रमुख पात्र बनून समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे वाचक नक्कीच मूळ कादंबरी आणि त्यांचे चरित्र वाचायला प्रवृत्त होईल. आनंदीबाईंच्या कर्तृत्वाचा जेवढा अभिमान वाटतो, तितकेच त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, गोपाळरावांचे चमत्कारिक वागणे आणि काळाची विपरीत गती यामुळे मन विषण्ण होते.
‘इंधन’ ही हमीद दलवाई यांची वास्तवाचे प्रांजळ चित्रण करणारी कादंबरी. तिचे संक्षिप्तीकरण नंदा सुर्वे यांनी केले आहे. आत्मचरित्रात्मक पद्धतीचे हे निवेदन आहे. लेखकच नायकाद्वारे बोलतो आहे. त्यामुळे नायकाचे संवेदनशील अंत:करण वाचकापुढे उघड होत राहते. आपल्या गावाबद्दल, समाजाबद्दल प्रामाणिक ओढ, सत्याचा पाठपुरावा, न्यायाची चाड त्याला आहे. पण त्याला कोणी समजून घेत नाही. ना त्याच्या धर्माचे लोक, ना गावकरी. तो समोरच्यांच्या श्रद्धेचा आदर करणारा आहे. पण त्याचे पुरोगामी विचार, झुगारलेली धार्मिकता कोणालाच पटत नाही. अहंकार, जमिनीची मालकी यामुळे हिंदू गावकरी आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होते. आधी सामंजस्याने नांदणाऱ्या या लोकांसाठी धर्म ही बाब जणू ‘इंधन’ बनते. कुणबी, बौद्ध, कुळवाडी असे सारेच पेटून उठतात. हा संघर्ष थांबवण्यात नायक असमर्थ ठरतो. हतबल होतो. तो कृश, आजारी असणे, परिस्थितीवर तोड काढू न शकणे यामुळे ‘नायक’ या कल्पनेला धक्का बसतो. पण तरीही त्याचे प्रांजळपण, गावकऱ्यांबद्दलची त्याची तळमळ, सुमतीच्या इतके जवळ जाऊनही त्याचे निर्मळ राहणे, वडील, भाभीबद्दल त्याला आतून वाटणारे ममत्व, त्याचे पुरोगामी, समतोल विचार या सर्वामुळे हा धीरोदात्त नायक मनात घर करतो.
‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही गो. नी. दांडेकर यांची एका आगळ्यावेगळ्या नायकाची कहाणी. याचा संक्षेप त्यांचीच मुलगी डॉ. वीणा देव यांनी केला आहे. खरे तर भाक्रा-नांगल येथे सतलज नदीवर बांधल्या गेलेल्या धरणाची ही कहाणी! पण जीवनरामचे सगळे आयुष्य जोडले गेले आहे या धरणाशी. कल्पित नायक आणि वास्तवातले धरण यांची छान सांगड घातलेली ही उत्कंठावर्धक कादंबरी आहे. ‘जीवन’ या शब्दाचे ‘पाणी’ आणि ‘आयुष्य’ हे दोन्ही अर्थ इथे कथानायकाला लागू पडतात. नायक कल्पित असला तरी असे कष्ट, इंजिनीयिरगचे शिक्षण घेणे, जीवतोड मेहनत आणि सगळे आयुष्य या प्रकल्पासाठी वाहून घेणे- असे असल्याशिवाय महान कार्य सिद्धीस जात नाही. तेव्हा असा जीवनराम असणारच असा विश्वास वाटतो. धरण बांधताना येणाऱ्या अडचणी, नोकरशहांची अडवणूक, जीवलगांचे झालेले मृत्यू त्याला रोखू शकत नाहीत. मात्र सहचारिणीची समंजस साथ त्याला आहे. वैभवाच्या मागे न लागता राजासाबना दिलेल्या शब्दाचे पालन करणे हेच जीवितध्येय असलेला जीवन त्याच्या विलक्षण कर्तृत्वाने प्रेरक ठरतो.
पतीने दिलेल्या शब्दाखातर जीवनला आजीवन दरमहा मानधन देत राहणाऱ्या राणीसाहेब, मित्राच्या शब्दाखातर फक्त पेन्शनवर आयुष्य काढून या धरणाच्या कामात साथ देणारे त्याचे दोस्त, ज्याच्या मनात ही कल्पना आली ते ब्रिटिश अधिकारी सिडनॅम, गुणग्राहक राजासाब, तत्त्वनिष्ठ जोगेंद्र अशा अनेक व्यक्तिरेखा यात रंगवल्या आहेत.
‘हर्णे-दापोलीचा दीपस्तंभ हरपला..’ असे श्री. ना. पेंडसे यांच्या निधनानंतर म्हटले गेले, इतका हा परिसर त्यांच्याशी अभिन्न होता. हा परिसर हीच जणू त्यांची ओळख होती, अस्तित्व होते. ‘एल्गार’, ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’, ‘रथचक्र’ आदी कादंबऱ्यांमधून या प्रदेशाची ओळख त्यांनी वाचकांना करून दिली होती. ‘लव्हाळी’तून जुने गिरगाव, ‘कलंदर’मधून जुने दादर आणि ‘ऑक्टोपस’मधून आधुनिक मुंबई हाही परिसर त्यांनी चित्रित केला आहे. एकूणच त्यांच्या कादंबऱ्यांतून ‘प्रदेश’ एखाद्या व्यक्तिरेखेइतकाच महत्त्वपूर्ण आणि पात्रांच्या जीवनाशी निगडित असतो. मातीच्या कणाकणाला आणि पाण्याच्या थेंबाथेंबाला ते रूप देतात. ‘हत्या’ ही त्यांची कादंबरीही त्यास अपवाद नाही.
‘हत्या’ म्हणजे हनुमंत करोंदकर. खरे तर एक शाळकरी मुलगा. मामलेदार असलेल्या त्याच्या वडिलांवर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होऊन त्यांना एक वर्षांची शिक्षा होते. त्या काळात शाळा सोडून तो हॉटेलात काम करून घर चालवतो. इथे त्याची ओळख भुत्याशी होते. पण त्याच्यामुळेच हत्याला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागते. त्यातून सुटका होते तीही भुत्यामुळेच. पोलिसांनी कितीही मारहाण केली तरी तो हत्याचे नाव घेत नाही. कुठल्याच मूल्यकल्पनांशी, शिक्षणाशी, संस्कारांशी सुतराम संबंध नसताना तो ठाम राहतो, कारण भुत्याजवळ मैत्री हा एक अमूल्य ऐवज आहे आणि तो त्याचे प्राणपणाने जतन करतो. आपल्या मुलाने कितीही धुडकावले तरी त्याला सोडवण्याची खटपट करणारे आजोबा, नायकाचे सर्व गुण असणारा सदुकाका, आपल्या पदाचा गर्व झालेले बाबा.. अशा अनेक व्यक्तिरेखांनी ही कादंबरी विणली गेली आहे. या कादंबरीचा संक्षेप डॉ. ज्योत्स्ना आफळे यांनी केला आहे.
हत्याकडे जिवलगांनी संशयाने पाहिले. परिस्थिती नेहमीच त्याच्या विरोधी राहिली. त्या प्रदेशातल्या जीवनपद्धती, संस्कृतीमुळे सतत हेटाळणी होऊन दुखावला गेलेला हत्या. त्याची सुखदु:खे, व्यथा यांचे चित्रण यात आहे. पण त्या परिस्थितीत तो धाडसी निर्णय घेतो. तो मुंबईला येतो. यापुढचा त्याचा प्रवास दादरचा आहे. हे संक्षिप्त रूप वाचून मूळ कादंबरी वाचावीशी वाटेलच, पण त्याचा पुढचा भाग ‘कलंदर’ही वाचायची उत्सुकता वाटेल.
‘पाणकळा’चे लेखक र. वा. दिघे यांचे नावही प्रादेशिक ग्रामीण कथा-कादंबऱ्यांशी जोडलेले आहे. याचे संक्षिप्तीकरण माधुरी तळवलकर यांनी केले आहे. ग्रामीण जीवनातील शोषितांच्या समस्यांचे मूळ असते त्यांच्या अज्ञान आणि दारिद्रय़ात! त्याचा फायदा घेणारे गावातले रंभाजी पाटीलसारखे सत्ताधारी, राजमल मारवाडय़ासारखे सावकार, त्यांना दुष्कर्मात साथ देणारी महादू नारायणसारखी चौकडी आणि शिवरामसारखा पोलीस अधिकारी आणि त्यामुळे आणखीनच खचणारा शेतकरीवर्ग. शोषितांच्या अज्ञानावर वार करून त्यांना आरोग्य, स्वच्छता, शेतीचे नवे प्रयोग यांबद्दल जागृत करणारा, मुंबईहून केवळ याच आस्थेपोटी आलेला आनंदराव. त्याला साथ मिळते भुजबा, पारू, गहनाजी, जानकी या सद्वर्तनी माणसांची!
रंभाजी पाटील आणि त्याचा दृष्कृत्य करणारा गोतावळा आणि ज्या भिल्लांनी रंभाजीच्या सांगण्यावरून आपली घरे जाळली त्यांनासुद्धा आपल्या जवळचे सगळे धान्य देणारी भुजबा- आनंदरावाची मदत करणाऱ्यांची फळी यामुळे हा संघर्ष आणि त्या-त्या व्यक्तिरेखा अतिशय समर्थपणे उभ्या राहिल्या आहेत. जिवाला जीव देणाऱ्या भिल्लांचे जीवन यात रंगवले आहे. भिल्लांना याची जाणीव होऊन ते शरण जातात. रंभाजीलाही उपरती होते. दंडकारण्य परिसरातील सजलपूर गावच्या पार्श्वभूमीवर राया, रैना, सोनी हा प्रेमाचा त्रिकोण आणि राया-सोनीची प्रेमकथा हाही एक धागा गुंफला गेला आहे आणि साथीला आहे निसर्ग!
‘देवांसि जिवे मारिलें’ लक्ष्मण लोंढे आणि चिंतामणी देशमुख या जोडीने ही वैज्ञानिक कादंबरी लिहिली आहे आणि तिचे संक्षिप्तीकरण अंजली कुलकर्णी यांनी केले आहे. ‘मी कोण?’ या सनातन प्रश्नाइतकेच मानवजातीला असलेले कुतूहल म्हणजे हे अफाट विश्व! त्याचे अनंतपण, त्याच्या अथांगपणाचा ठाव न लागणे, त्यांच्या आदि-अंताबद्दलचे गूढ आणि मग ‘आपल्याशी संवाद साधणारी जीवसृष्टी या विश्वात कुठेतरी असेल का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न!
भारतातील शास्त्रज्ञ विद्याधर वाचस्पतींना अकस्मात संदेश येऊ लागतात. तो संदेशच आहे हे जाणवणे, तो उलगडण्याचा प्रयत्न करताना समजते की, एक प्रगत जीवसृष्टी खरोखरीच आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आहे. त्यानंतर हा प्रश्न वरच्या पातळीवर जाऊन त्यात जगातील दोन महासत्ता सामील होतात. वाचस्पतींना जाणीवपूर्वक दूरच ठेवले जाते. शास्त्रज्ञ, सत्ताधारी यांच्यात सर्व पातळीवर चर्चा, ऊहापोह होतो. येणारे प्रगत परग्रहवासी पृथ्वीचा संपूर्ण नाश ताबडतोब करतील किंवा ते गिनिपिगसारखा आपला वापर करून शोषण करत राहतील, अशा मतांपासून ‘अधर्म आल्यावर मी परत येईन’ या उक्तीनुसार ते देव असून आपले कल्याण करायलाच येत आहेत, या मतापर्यंत अनेक शक्यतांवर विचारविमर्श होऊन शेवटी- परग्रहावरील ते यान उद्ध्वस्त करावे असा निर्णय महासत्ता घेतात. यात सुलभ रीतीने अनेक वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. परग्रहावरून संदेश येणे ते यान नष्ट होणे या कालावधीत मानवी मनाचे कंगोरे, वाचस्पतींचे प्रांजळपण, बुद्धी आणि कष्ट, राजकारण्यांची व महासत्तांची स्पर्धा, श्रेय मिळवण्याची धडपड, अवकाशातील थरार आणि शेवटी रक्षक म्हणून येणाऱ्या देवांना नष्ट केल्यामुळे वाचस्पतींना येणारे वैफल्य, त्याचबरोबर आता सूड म्हणून त्यांच्याकडून आपला विनाश होईल याचे दाटून आलेले भय, स्वत:पेक्षाही पुढच्या पिढीची वाटणारी काळजी अशा भावभावनांची आंदोलने यात आहेत.
य. बा. जोशी लिखित ‘सूर्यमंडळ भेदिले’ या पानिपतच्या युद्धावर आधारीत कादंबरीचे संक्षिप्तीकरण आरती देवगावकर यांनी केले आहे. उत्कर्षांच्या कळसाला चढलेले मराठेशाहीचे वैभवशाली भविष्य या युद्धामुळे अंधारले. कोण हरले, कोण जिंकले यापेक्षा दोन्ही पक्षांची अपरिमित हानी झाली. धन-संपत्तीबरोबरच तालेवारांच्या प्राणांची आहुती युद्धाने घेतली. चिल्लर, खुर्दा किती गेला याची गणतीच नाही. हे युद्ध का घडून आले, कसे झाले, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले होते, डावपेच कसे लढवले गेले, जिवाची बाजी लावून कोण लढले, अहंकाराचे बळी कोण झाले, फितुरीला कोणी स्वीकारले.. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांतून ही कादंबरी गुंफली गेली आहे. हा विषयच असा रोमहर्षक आहे, की शेवट माहिती असूनही त्यातली रंजकता अजिबात कमी होत नाही.
खंडाळ्याचा घाट कसा बनला, हा खरे तर एक क्लिष्ट तांत्रिक विषय. त्यातच तत्कालीन इतिहासाचे दाखले, तारखा, उद्घाटनाचा प्रसंग, घाट बनवताना वापरले गेलेले तंत्रज्ञान हा सगळा भाग त्यामुळे एखाद्या अहवालासारखा रूक्ष बनायला हवा. परंतु शुभदा गोगटे यांच्या हाती हा विषय आल्यावर त्यातून ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’सारखी रंगतदार कादंबरी निर्माण होते.
नेहमीसाठीच अद्भुत नगरी असलेल्या मुंबईला अलिबागहून आल्यानंतर नारायणचे बावचळणे, पुढे त्याचे आगीनगाडीवर प्रेम जडणे, लिहिणे-वाचणे-पूजापाठ करणाऱ्या घरातून येऊनही यंत्राशी नाते जुळणे, त्याकरता घरच्यांशी दुरावा येणे, सुखासीन नोकरी सोडून साध्या मजुराचे काम करणे, आपल्या हुशारीने त्या कामात वाक्बगार होणे.. या त्याच्या विकासाबरोबरच खंडाळ्याच्या घाटाचेही हळूहळू बनत जाणे, त्यातल्या अडचणी, कधी रोगांच्या साथीमुळे तर कधी बोगदा खचल्यामुळे होणारे माणसांचे मृत्यू, कधी निसर्गाचे रौद्र दर्शन तर कधी आल्हाददायक रूप!
या सर्व घटनांच्या बरोबरीनेच ब्रिटिश काळ, त्यांचे अधिकारी, मुंबईच्या नारायणच्या घरातले सनातनी वातावरण, तत्कालीन रीती, पद्धती, पोशाख, संस्कृती, त्याच्या पत्नीचा होणारा छळ.. पुढे तीही त्याच्याबरोबर खंडाळ्याला येऊन प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने राहते.
कर्जत ते खंडाळा लोहमार्ग बनवतानाची तांत्रिक माहिती आणि इतिहासाच्या नोंदींमुळे जी अस्सलता आली आहे त्यामुळे नारायण आणि त्याचा जीवनप्रवास ही एक सत्य घटना वाटायला लागते. सह्यद्रीच्या कुशीतला निसर्ग आणि माणूस- हे दोन तुल्यबळ योद्धे समोरासमोर उभे ठाकून परस्परांना आव्हान देत आहेत. कधी याची, तर कधी त्याची सरशी होते. त्यामुळे एक रोमहर्षक सामना पाहिल्याचा थरार अनुभवाला येतो. या कादंबरीचे संक्षिप्तीकरण चंचल काळे यांनी केले आहे.
सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे राहुल देशपांडे यांनी रेखाटली आहेत. नव्या पिढीला मराठीतील गाजलेल्या साहित्यकृतींची ओळख करून देऊन त्यांची मराठी साहित्य व वाचनाशी पुन्हा नाळ जोडण्याच्या दृष्टीने कादंबऱ्यांच्या संक्षिप्तीकरणाचा हा प्रयत्न स्वागतार्हच म्हणावा लागेल!
संच १ मूल्य पृष्ठे
‘टारफुला’ १००/- १०९
‘वीरधवल’ १२५/- १३४
‘आनंदी गोपाळ’ १२५/- १४४
‘इंधन’ १००/- ७९
‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ १००/- ८७
संचाची मूळ किंमत – ५५० रुपये, सवलतीत – ४०० रुपये.
संच २
‘पाणकळा’ १००/- ९२
‘देवांसि जिवे मारिले’ १००/- १०४
‘हत्या’ १००/- ८०
‘सूर्यमंडळ भेदिले’ १००/- १०१
‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ १६०/- १६०
संचाची मूळ किंमत -५६० रुपये, सवलतीत – ४०० रुपये.
meenagurjar1945@gmail.com