अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

माणूस आणि निसर्ग यांचं नातं सहज, सेंद्रिय आणि जैविक आहे. ती उपजत प्रेरणा आहे. नंतर हजारो वर्षांनी माणसाच्या आयुष्यात यंत्र आलं आणि यंत्राशी नातं जोडताना माणूस अवघडून गेला. ध्वनी वाढवून देणारा ध्वनिक्षेपक त्या काळातील कित्येक गायकांना त्रासदायक वाटत होता. नंतर येत गेलेल्या प्रत्येक यंत्रामुळे येणारी कृत्रिमता माणसांना सहन होत नव्हती. दूरध्वनीमुळे एकमेकांशी दूरदूरच्या अंतरावरून बोलण्याची सोय झाली तरी ते संभाषण अनेकांना निर्जीव वाटत होतं. त्यामुळेच बा. सी. मर्ढेकर यांनी

लक्ष मनांच्या इंद्रगुहांत भटकणारा तो चंद्र…!
moon cave discovery, NASA, human settlements, space research center, Lunar Reconnaissance Orbiter, Mare Tranquility, human habitation, cosmic rays protection, solar emissions, meteoroid strikes, stable temperature, long-term lunar missions, water ice, lunar volcanoes, underground movements, astronaut safety, research base
संशोधन केंद्रे, मानवी वस्त्या… चंद्रावर गुहेचा शोध मानवासाठी महत्त्वाचा का ठरणार?
pl Deshpande, sunita Deshpande
हरिश्चंद्राची बहीण.. : औदार्याचा विलक्षण अनुभव
Rice lovers we this hack that claims it can help counter diabetes how it works and what can be the possible risks one can avoid must read
भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? मधुमेही रुग्णांसाठी ठरेल का धोक्याची घंटा? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
tadoba andhari tiger project ticket
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तिकीट घोटाळा: ठाकूर भावंडांना नेमका कुणाचा आशीर्वाद?
side effects of vitamin c
‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Sunita Williams
किडनी स्टोन ते कर्करोगाची शक्यता; अंतराळातील मुक्काम वाढल्याने सुनीता विल्यम्स यांच्यासमोर कोणती आव्हाने?
embracing fear, How Fear Shapes Progress, How Fear Guides Us, How Fear Guides Us to Safety, fear as a teacher, fear, chaturang article,
‘भय’भूती : डर परम गुरु!

‘त्रुटित जीवनी, सुटी कल्पना,

ट्रिंग ट्रिंग जैसा, खोटा नंबर

सलग जुळेना, एक भावना

हलो हलोला हलकट उत्तर’

असं म्हणून ठेवलं होतं. (आता दृक्श्राव्य भेट ही सर्रास झाली असली तरी ती प्रत्यक्ष भेटीचा आनंद देऊ शकत नाही.) ऋत्विक घटक यांनी १९५८ साली ‘अजांत्रिक’ चित्रपटात टॅक्सीचालक बिमलचे त्याच्या मोटारीवरील निस्सीम प्रेम दाखवलं आहे. इतर कुठलेही लागेबांधे नसणाऱ्या बिमलचा ती मोटार हीच साथीदार, मित्र होती. तो सतत तिला सजीव कल्पून तिच्याशी वागत असतो. त्याने तिचं ‘जगद्दाल’ असं नामकरणही केलेलं असतं. एकंदरीतच बिमल हा एका दयनीय भ्रमात रममाण होऊन जगतो आणि हेच ऋत्विक घटक यांचं यािंत्रकीकरणाविषयीचं मानवी भाष्य मानलं गेलं. काही वर्षांपूर्वी ‘कागज के फूल’, ‘काचेचा चंद्र’ अशा विशेषणांनी कृत्रिमतेला हिणवलं जात असे. परंतु आता आपलं आयुष्य अधिकाधिक कृत्रिमतेनं व्यापलं जात आहे. निसर्गाचा आभास निर्माण करणारा सभोवताल हा सर्वत्र प्रस्थापित होत असून तो आपल्या अंगवळणी पडत चालला आहे.

आपण जितके निसर्गापासून तुटत जातोय, तितके आभासी मार्गानी निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते का? प्रत्येक माणसाला निसर्गाविषयी आतून ओढ असते. अबोध मनात त्याबद्दल आंतरिक बंध असतात. त्याला समाजमानसशास्त्रज्ञ व भाष्यकार एरिक फ्रॉम यांनी ‘जीवाकर्षण’ (बायोफिलिया) म्हटलं होतं. या संकल्पनेचा जीवशास्त्रज्ञ डॉ. एडवर्ड विल्सन यांनी विस्तार केला. ‘‘सर्व संस्कृती व सर्व प्रकारच्या समाजांतील कला, नीती, भावना व व्यवहार यांतून निसर्गाविषयीचं प्रेम, आदर व आकर्षण व्यक्त होतं,’’ असं ते म्हणतात. जन्मल्यापासूनच माणसात गोष्टी, गाणी यांतून निसर्गाशी जवळीक रुजवली जाते. थोडक्यात- निसर्गाकर्षण हे आपल्यात जनुकीय व आनुवंशिकच आहे. परंतु आधीच्या पिढीच्या मानाने त्यापुढील प्रत्येक पिढीचे निसर्गाशी असलेले बंध तुटत चालले आहेत. इतकंच नाही तर आपण बालपणी पाहिलेला निसर्गदेखील तरुणपणात दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पिढीला निसर्गाचा विसर पडत चालला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘मानवाचा निसर्ग व तंत्रज्ञानाशी संबंध’ या विषयाचे प्रो.पीटर कान्ह हे या प्रक्रियेला ‘पर्यावरणीय स्मृतिभ्रंश’ (एन्व्हायर्नमेंटल अ‍ॅम्नेशिया) असं संबोधतात. इथून पुढे काय? तर- तंत्रज्ञानयुक्त निसर्गाची निर्मिती व वापर वाढत आहे. आपण या नवीन परिस्थितीशी जुळवून घेत आहोत आणि ‘हा रस्ता अटळ आहे. त्यामुळे त्याचा उगाच बाऊ नको,’ असं अनेक जण म्हणतात. तर प्रो. कान्ह हे ‘तारतम्य बाळगा’ असं सांगत आहेत.

२००५ मध्ये आलेल्या मायकेल फेबर यांच्या ‘फॅरनहिट ट्विन्स’ या कथासंग्रहातील ‘द आईज ऑफ द सोल’ या कथेचा आरंभ असा आहे.. संध्याकाळची वेळ होती. थकून आलेली जिनेट चहाचा कप घेऊन खिडकीपाशी गेली. नेहमीप्रमाणेच नवरा-बायकोच्या भांडणात मोठमोठय़ा आवाजात रणकंदन चाललं होतं. रक्तबंबाळ झालेली बाई काठी घेऊन दारुडय़ाला बडवत असावी. हा आवाज ऐकून तिचा मुलगा म्हणाला, ‘‘आधी खिडकी बंद कर पाहू. ही खिडकी उघडायची सोयच नाही.’’

असेच काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी वस्तूची विक्री करणारी एक महिला त्यांच्याकडे आली. ‘‘बाई, आम्ही सुंदर दृश्यं दाखविणारी पर्यायी खिडकी बसवून देतो. त्याचं हे मोफत प्रात्यक्षिक!’’ तिच्या मदतनीसानं खिडकीबाहेर तेवढय़ाच आकाराचा पडदा बसवला आणि जिनेटच्या हाती रिमोट कंट्रोल देत म्हणाला, ‘‘आता चालू करा.’’ तिने विचारलं, ‘‘काय?’’ ती विक्रेती महिला हसत म्हणाली, ‘‘अहो, रिमोटची कळ दाबा.’’ जिनटेनं कळ दाबताच तिचं घर रंगांची उधळण करणाऱ्या, फुलांनी बहरलेल्या एका अप्रतिम, भव्य उद्यानातच गेलं. मोठमोठय़ा शिळांमधून सुखावणारा धबधबा कोसळत होता. निळ्या आकाशात पक्ष्यांच्या थव्याचा मुक्त संचार चालला होता. भटकण्यासाठी रस्ता न देता पायवाट केली होती. कृत्रिमतेचा लवलेशही नसणारी ही बाग म्हणजे निसर्गाचा चमत्कार होती. जिनेट खिडकीच्या जवळ गेली तसे सर्व आवाज अजून स्पष्ट ऐकू येऊ लागले. तिनं विचारलं, ‘‘हे किती वेळ दिसेल?’’ महिला म्हणाली, ‘‘अहो, नेहमीच.. कायमस्वरूपी हे असंच दिसत राहणार. तुमच्या मनात आलं तर तुमच्या आवडीनुसार दृश्य ठरवू शकता, बदलू शकता.’’ जिनटेनं ती ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ दाखविणारी ‘नवी खिडकी’ विकत घेऊन टाकली.

भविष्यातील कल्पनाचित्र रंगवताना फेबर यांनी तांत्रिक निसर्ग दाखवणारी ही खिडकी तयार केली आहे. हवाहवासा, हवा तसा निसर्ग पाहायची सोय करणारी ही खिडकी आहे. शिवाय ही वास्तव काळातील (रिअल टाइम) आहे, आधीच ‘नोंदवलेली’ (रेकॉर्डेड) नाही. तुमच्या इच्छेनुसार सूर्योदय, सूर्यास्त, विहरणारे पक्षी, फुलांवरील भुंगे.. जे पाहिजे तसं दृश्य दिसण्याची व्यवस्था त्यात करता येईल. वास्तवातील जगाकडे  पाहायचं नाकारून आभासी जग दाखवणारी ही नवी खिडकी आहे.

प्रो. कान्ह यांनी प्रयोग करण्यासाठी त्या कल्पिलेल्या खिडक्या तयार करून घेतल्या. त्या घरात व कार्यालयात बसवून विविध वयोगटांतील स्त्री-पुरुषांच्या वर्तनाचं विश्लेषण केलं. ते म्हणतात, ‘‘जिथे निसर्ग उपलब्धच नाही तिथे आभासी निसर्गाचा परिणाम चांगला साधला जातो. परंतु त्यालाही मर्यादा आहेत. अपवादात्मक परिस्थितीतच त्याचा वापर केला जावा, हे लक्षात घेतलंच पाहिजे. आभासी निसर्ग हा काही वास्तवातील निसर्गाला पर्याय नाही.’’

निसर्ग आणि माणूस यांच्यातील फारकत वरचेवर तीव्र होत चालली आहे. हा बदल आपल्याला विलक्षण त्रासदायक ठरत आहे. आपल्या मनावर व शरीरावर निसर्गापासून पारखे होण्याचे खोल परिणाम होत आहेत. पर्यावरण विनाशामुळे अबोध मन ग्रासून जात आहे. पण हे आपल्या लक्षात येत नाही. कित्येक व्यक्तींच्या मनात बदललेल्या पर्यावरणामुळे भयगंड (इकॉलॉजिकल फोबिया) निर्माण होत आहे. आपल्याच घरामधली ‘स्पेस’ काहींना खटकत राहते. ती अर्थपूर्ण वाटत नाही. म्हणून त्रिमिती भित्तिचित्रांपासून (थ्री-डी वॉपलेपर) कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व आयुधांनिशी घराची अंतर्गत सजावट वारंवार बदलून नावीन्य मिळवण्याचा ध्यास घेतला जातो.

तरीही आपण आपल्याच घरात दूरचे पाहुणे असल्याचा त्रास होतच राहतो. स्वत:पासून आणि जगापासून तुटल्याची भावना कुरतडत राहते. मग ती दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू झाला. पुढे आकाश व चांदण्यांचा भास निर्माण करणारं छतही मिळू लागलं. निसर्गातील पाहिजे असणारी प्रत्येक गोष्ट आपल्या घरात भासमान होऊ लागली. भ्रामक निसर्गाचा प्रसार व विक्री ही कॉर्पोरेट कंपन्यांची गरज असल्यामुळे ही बाजारपेठ वाढवणं त्यांना सोपं होत गेलं.

वास्तविक हा भ्रम वा ही दांभिकता आपण स्वत:हूनच आपलीशी करत गेलो आहोत. वास्तुकलेतील तत्त्वज्ञ लॉरी बेकर यांनी त्यातील व्यंग हेरलं होतं. १९९० च्या सुमारास ‘वास्तुकला आणि सत्य’ या व्याख्यानातून त्यांनी  विचारलं होतं, ‘‘वीट वा दगडाची भिंत बांधून काँक्रीट थापायचं आणि मग त्यावर वीट वा दगड आहेत असं भासवण्यासाठी रंगवून घ्यायचं, किंवा भिंतीवर हुबेहूब निसर्गचित्राचा कागद लावायचा, ही निसर्गदृष्टी अगम्य आहे. वीट असो वा दगड; त्यांचा रंग, पोत व त्यांचं रूप एवढं सुंदर व वैविध्यपूर्ण असताना त्यांना लिंपणं म्हणजे सत्य झाकणं नाही का? परंतु असा खोटेपणा आपल्याला प्रिय झाला आहे.’’ पावलोपावली पर्यावरणाचा विचार करून निसर्ग जपणाऱ्या बेकर यांना आपली वाट आणि चाल वेळीच लक्षात आली होती.

एकविसाव्या शतकात पाऊल टाकल्यापासून यंत्रमानवाच्या सुधारित अवतारांचा शोध सुरू झाला. हेच तंत्रज्ञान घेऊन रोबोयुक्त पाळीव प्राणी बाजारात दाखल झाले. सोनी कंपनीनं ‘आयबो’ हा स्वायत्त (ऑटोनॉमस) यंत्रश्वान आणला. तो दिसायला धातुरूप असला तरी त्याला अंतर, ध्वनी, कंपन, दाब यांचं संवेदनाज्ञान होतं. तो गुलाबी चेंडूशी खेळू शकत असे. तेवढं रंगज्ञान असल्यामुळे तो चेंडू हुडकू शकत असे. आनंद झाल्यावर त्याचे डोळे हिरवे, तर राग आल्यावर लाल होत असत. त्याची उपेक्षा केल्यावर तो केकाटत असे, तर कुरवाळल्यावर तो आनंदी स्वर काढत असे. संवेदकांची (सेन्सर) हालचाल करून त्याच्या भावभावनांचं नियंत्रण करण्याची सोय होती. त्यामुळे यंत्रश्वानांचा खप वाढू लागला आणि अनेक कंपन्या त्याचं उत्पादन करू लागल्या. मग यांत्रिक मांजरदेखील आलं. खऱ्याखुऱ्या पाळीव प्राण्यांचं खाणंपिणं, हिंडवणं, स्वच्छता, आजारपण अशी केवढी तरी उस्तवार करावी लागते. त्या कशाचीही यात गरज नाही. कुठलीच मागणी न करणारा यांत्रिक प्राणी हा एकटेपणा घालविण्यासाठी माणसांचा मित्र होऊ लागला. कित्येक बालकांचा तो साथी झाला. बौद्धिकदृष्टय़ा आव्हानात्मक तसंच स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांना त्यांच्याशी खेळण्यात सुरक्षित वाटू लागलं. त्यांचं बोलणं वाढू लागलं. ते परस्परसंवाद करू लागले. मानसशास्त्रज्ञ त्याचं विश्लेषण करू लागले. याच काळात सेवा-शुश्रूषा करणारे रोबोसेवकही उपलब्ध झाले. कित्येक एकटय़ा, एकाकी वृद्धांना ते हवेच होते. सध्याच्या करोनाकाळात अशा यंत्रसेवकांची मागणी वाढू लागली आहे.

आता दुरूनच बाग पाहता येते व त्यात कामही करता येतं. १९९५ च्या सुमारास ‘सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी’मधील शास्त्रज्ञ व कलावंतांनी यंत्रमानवांच्या साहाय्यानं आंतरजालावरील सार्वजनिक दूरउद्यान (टेलीगार्डन किंवा टेलीरोबोटिक कम्युनिटी गार्डन) सुरू केलं. दूरउद्यान हे उद्यान व आंतरजाल यांचं मिश्रण आहे. मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) रचल्यासारखं. त्यात कोणीही दुरून बागकाम करू शकतो.  झाडं लावणे, पाणी घालणे, त्यांची वाढ पाहणे हे सारं काही करता येतं. पाहण्यासाठी त्रिमिती सुविधा असल्याने बागेला कोणत्याही बाजूने पाहण्याचा आनंद घेता येतो. नऊ वर्षांत एक लाख लोकांनी या दूरउद्यानाला भेट दिली, तर त्या बागेचे दहा हजार सभासद झाले.

निसर्गाशी पूर्णपणे फारकत घेऊन यंत्रांनी ताबा मिळवला तर मानवी जीवनाचं काय होईल? १९०९ साली ई. एम. फोस्टर यांनी लिहिलेल्या ‘द मशीन स्टॉप्स’ या कथेत याचं चित्रण केलं होतं. जमिनीवर राहणं अशक्य झाल्यामुळे भुयारात एकमेकांपासून पूर्णपणे अलग राहणाऱ्या या माणसांना सर्व प्रकारच्या सुखसोयी कळ दाबताच मिळत आहेत. फक्त एकमेकांना भेटायचं नाही. ती माणसे केवळ श्राव्य अथवा दृक्श्राव्य माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधतात. संपूर्ण मानवजात ही त्यांनीच तयार केलेल्या एका विशाल यंत्राच्या आज्ञेत आहे. कोणीही प्रवास करीत नाही. ते अनावश्यक वा अशिष्टपणाचं मानलं जातं. त्यातील दोन पात्रे- तरुण कुनो व त्याची आई वॅश्टी हे जगातील दोन टोकाला राहत असतात. हा बंडखोर कुनो एकदा यंत्राची नजर चुकवून पृथ्वीतलावर जाऊन आला आहे. तिकडेही माणसं आहेत हे यंत्राला समजल्यावर कुनोला बेघर करण्याची तंबीही मिळालेली असते. तो स्काइपसदृश्य माध्यमातून म्हणतो, ‘‘मला तुला समक्ष पाहायचं, भेटायचं व बोलायचं आहे. या सततच्या यंत्रांचा मला वीट आला आहे. काय हे बंदिस्त, बेचव, निर्थक आयुष्य! कुठल्याही संवेदना नाहीत.. भावभावना नाहीत.’’ अखेरीस ते जगनियंत्रक यंत्रच बिघडून कोसळतं आणि पुन्हा माणूस एकदा निसर्गाशी नातं जोडायला निघतो. या कथेला १११ वर्षे उलटून गेल्यावर आज ही कथा काल्पनिक ठरवायची की भविष्यवेधक, हे प्रत्येकाच्या मनोविश्वावर अवलंबून आहे.

प्रो. कान्ह  यांनी ‘टेक्नॉलॉजिकल नेचर : अ‍ॅडाप्टेशन अँड द फ्यूचर ऑफ ुमन लाइफ’ या  पुस्तकात तंत्रज्ञानयुक्त निसर्गाशी मानवी जुळवणुकीची अनेकांगी चिकित्सा केली आहे. त्यात ‘द मशीन स्टॉप्स’ या कथेचा संदर्भ देऊन ‘‘उत्क्रांतीच्या ओघात आपण निसर्गाशी जुळवून घेत आलो आहोत, हे खरं असलं तरी वास्तवातील निसर्गाचा विध्वंस करून तंत्रज्ञानयुक्त निसर्गाशी जुळवून घेणं, हे काही मानवजातीसाठी योग्य ठरणार नाही,’’ असा इशारा प्रो. कान्ह देतात.

पैसा व त्यातून तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे भ्रामक निसर्ग निर्माण करण्याचे हे यत्न पाहताना निसर्गाशी एकरूप झालेले आदिवासी आठवत राहतात. आदिवासींच्या कलांमधून निसर्गजीवन व कला यांच्यात अद्वैत साधलं जातं. त्यांच्या कलांमधून वनस्पती, पक्षी व माणूस सगळेच एकत्र संयोगीपणाने नांदताना दिसतात. त्यामुळे त्यांची चित्रं असोत,नृत्य वा गाणं- ती एक सहज व नैसर्गिक अभिव्यक्ती असते. त्यामुळेच ती शतकानुशतके टिकून राहते आणि मनाला भिडते. निसर्ग व निसर्गाशी सेंद्रिय नातं असणारे आदिवासी  हे दोन्ही ‘विकासा’त अडसर झाल्यामुळे आज नकोसे झाले आहेत. दुसरीकडे कृत्रिमतेचं साम्राज्य पृथ्वी पादाक्रांत करीत आहे. ही जाणीव वैज्ञानिक व कलावंतांना खूप आधीपासून होत असून ते सातत्यानं व विविध पद्धतीनं त्याबद्दल सांगतही आहेत.

१९४६ साली जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘प्लेझर स्पॉट्स’ या निबंधात भविष्यकाळात आनंदप्राप्तीसाठी पर्यटनस्थळे कशी सजतील याचा अदमास वर्तवला होता. सर्व काही नैसर्गिक वाटावं असा हुबेहूब कृत्रिम निसर्ग तयार केला जाईल, याचं बरंच वर्णन करून अखेरीस ऑर्वेल म्हणतात, ‘‘तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अक्षरश: पर्वत हलवता येऊ शकतो. ध्रुवांवरील बर्फ वितळवून आणि सहारात सिंचन करून, हवामानात बदल घडवून आणणं शक्य आहे. या शक्यता वास्तवात येऊ शकतात. आपल्या सभोवतालच्या भौतिक विश्वासाठी शोधमोहीम घेणारा माणूस स्वत:च्या आत जाऊन, स्व शोधण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न करीत नाही. ऐषोराम व आनंद बळकावण्यासाठी चाललेल्या पराकाष्ठेतून माणूस स्वत:च्या विवेकाचा विनाश करीत आहे.’’

१९८५ साली ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने संगणक चालविणारी खिडकी आणली आणि पाहता पाहता ती जगातील संगणकधारकांसाठी अत्यावश्यक खिडकी झाली. एकंदरीत काळाच्या ओघात आजूबाजूचा निसर्ग नष्ट होत गेल्यावर त्याद्वारे आभासी निसर्ग दाखविणारी खिडकी घराघरात जाऊन बसेल. निसर्गविनाशाचा वेग वाढत जाईल तसतसे आभासी निसर्गाचे नवनवे अवतार निर्माण होत राहतील. मात्र, त्यातून कान्ह यांनी सांगितल्यानुसार, या कृत्रिम निसर्गाचा अपवादात्मक वापर होईल की पर्यावरणीय स्मृतिभ्रंशाची महासाथ येईल? प्रत्येकाला याचा निर्णय करावा लागेल. ऑर्वेल यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘प्रत्येकाने आतला आवाज ऐकून निवड करावी. आपल्याला कोणता निसर्ग हवा आहे.. अस्सल की आभासी?’