दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आलेल्या आणि सोविएत युनियनच्या विघटनानंतर जगातील एकमेव महासत्ता असा लौकिक असलेल्या अमेरिकेची सद्यस्थिती प्रत्यक्षात बडय़ा घरचे पोकळ वासे असल्याचा प्रत्यय ‘झोके अमेरिकेचे’ या डॉ. अनंत लाभसेटवार यांचे नवे पुस्तक वाचून येतो. शीर्षकात झोके हा शब्द वापरण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात त्यात पदोपदी अमेरिकन जीवनशैलीतील धोके लेखकाने नमूद केले आहेत.
‘दुरून डोंगर साजरे’ तशी भारतासारख्या विकसनशील देशामधून अमेरिकेतील जीवन म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग वाटत असले तरी तो आभास असल्याचे लेखकाने या पुस्तकातील विविध लेखांमधून दाखवून दिले आहे. कोणतेही साम्राज्य दीर्घकाळ टिकत नाही, अमेरिकाही त्यास अपवाद नाही. या गर्भश्रीमंत देशातही बरेचजण दारिद्रय़ रेषेखाली आहेत. फरक इतकाच की सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे त्यांना दारिद्रय़ातही माणूस म्हणून जगता येतं, पण त्याची फार मोठी किंमत येथील शासनाला चुकवावी लागते. अशी गरिबी पोसण्यासाठी अमेरिका दरवर्षी ७५० अब्ज डॉलर खर्च करते. आपण नेहमी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या गोष्टी करतो. प्रत्यक्षात आता कॅलिफोर्निया प्रांत भकास झाला असून त्याला कोकणची अवकळा आली आहे. २००८ मधील जागतिक मंदीच्या फेरीत सर्वात जास्त नुकसान अमेरिकेचे झाले. त्या धक्क्य़ातून हे राष्ट्र अद्याप सावरलेले नाही. जवळपास २५ टक्के जणांचे गृहकर्ज घराच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे अनेकांनी आपल्या घराच्या किल्ल्या बँकांकडे सुपूर्द करून गृहकर्ज भरणे बंद केले. आपल्याकडे ऋण काढून सण साजरे करू नये, अशी म्हण आहे. अमेरिकेत ऋण काढल्याशिवाय आला दिवस साजरा करताच येणार नाही, अशी स्थिती आहे. २०११ मध्ये अध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन हजार अब्ज डॉलर इतके राष्ट्रीय कर्ज घेतले. चीन आणि जपान हे दोन देश अमेरिकेस कर्ज देतात. अत्यंत भोगलोलुप प्रवृत्तीमुळे अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. परिणामी जागतिक चलन म्हणून प्रचलित असणारा डॉलरही डळमळीत झाला आहे. साम्यवादाला नावे ठेवणाऱ्या व भांडवली मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या अमेरिकेतील ६० टक्के जनतेला सरकारकडून कोणता तरी शिधा मिळतो. गरिबांना फुकट आरोग्य विमा आणि ज्येष्ठ व अपंगांसाठीच्या जनकल्याण योजनांवर जगात सर्वाधिक खर्च अमेरिका करते. अर्थसंकल्पातील २० टक्के भाग केवळ या योजनांसाठी खर्च होतो. या योजनांबाबत सरकारची अवस्था ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी झाली आहे. पुरेशी मिळकत नसल्याने या देशातील ४५ टक्के जनता कर भरत नाही. उर्वरितांवर मात्र सरकार भरमसाठ कर आकारते. त्यामुळे कर भरणारे आणि न भरणारे असा एकाच देशातील दोन वर्गामध्ये अमेरिकेत शीतयुद्ध सुरू आहे. कारण ठरावीक उत्पन्नापेक्षा जास्त आवकेपैकी सर्वाधिक ३९.५ टक्के उत्पन्न कर अमेरिकन नागरिकाला भरावा लागतो.
अस्थिर नोकऱ्यांमुळे अमेरिकेत सरकारच्या वतीने बेरोजगारी भत्ता दिला जातो. भत्त्याची रक्कम मूळ वेतनाच्या ७० ते ९० टक्के असू शकते. मदतीची मुदत ३३ आठवडे असली तरी मध्यंतरीच्या काळात मंदीमुळे तेवढय़ा काळात अनेकजण नोकरी मिळविण्यात अयशस्वी झाल्याने ती ९९ आठवडय़ापर्यंत वाढविण्यात आली. तरीही गेल्या वर्षी २१ लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. कोणतेही कष्ट न करता भत्ता मिळत असल्याने आयतोबा वृत्ती बोकाळली आहे. अमेरिकेतील विस्कटलेली लग्नसंस्था, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबव्यवस्था याचा ओझरता परिचयही या पुस्तकातून घडतो. एकूणच भारतापेक्षा अमेरिकेत जास्त पावसाळे काढलेल्या डॉ. लाभसेटवार यांनी मांडलेले अमेरिकेचे हे चित्र ‘आहे मनोहर तरी, गमते उदास’ या पठडीतले आहे.
‘झोके अमेरिकेतले’ – डॉ. अनंत लाभसेटवार, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे- २१४, मूल्य- २५० रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2014 रोजी प्रकाशित
बडय़ा घरचे पोकळ वासे
दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आलेल्या आणि सोविएत युनियनच्या विघटनानंतर जगातील एकमेव महासत्ता असा

First published on: 25-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review article 01