चालता चालता त्यानं
डोईची टोपी चार बोटं मागं ढकलून
वर आभाळाकडं नजर टाकली
ते तसंच होतं
कोळपून पडलेल्या काळीसारखं!
कधीपासून हेच पाहतोय
झाली असतील जणू
युगे अठ्ठावीस
तरी हे आपलं
उभे विटेवरी
कर कटेवरी
ठेवोनिया!
त्याला वाटलं, एकदा लावावा गावाकडं मोबाइल
खपू दे काय खपायचा तो बॅलन्स
तसाही किती राह्यलाय आता बाकी!
चार्जिगपण संपतच आलंय
उरलीय ती एक कांडी
ती तरी किती जपावी?
लावावा मोबाइल
विचारावं- आलं का?
पुंडलिका भेटी परब्रह्म आलं का?
ये म्हणावं आता!
पण तिकडं चार शितोडं जरी पडलं असतं
तरी अवघ्या दिंडीत खणाललं असतंच की रिंगटोन
दिंडय़ा पताका वैष्णव नाचती
असं झालंच असतं की!
जाऊं दे.. वाजायचा तव्हा वाजंल मोबाइल
आरती करणं तेवढं आपल्या हाती..
पड रे बाबा!
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा
बाबा..
पावे जिवलगा.. जय देव जय देव..
आभाळात आता उलघाल माजली होती
दिंडीप्रमुख सांगत होता
‘‘उचला रं पाय
नायतर गाठलंच समजा यानं
मुक्काम काय लांब नाय आता!’’
त्यानं ब्यागीची चेन खोलून
पिवळा रेनकोट काढला
‘‘माऊली, यंदा हे बाकी भारी काम झालं
पार आडवातिडवा आला तरी भिजायचं भ्या नाय
हाहाहा!
दर वारीच्या टायमाला गावात अशी इलेक्शन यायला पायजे,’’
कोण तरी म्हणालं
तो कडू हसला
टाळावर टाळ हाणत मनाशीच म्हणाला
भडवीचं इलेक्शन!
देव सुरवर नित्य येती भेटी
गरूड हनुमंत पुढे उभे राहती..
भडवीचं इलेक्शन!!
काय उपेग त्याचा?
फुसडीला तरी पुरतं का ते?
बायलीच्याहो, इलेक्शन रेनकोट देईल
पण पावसाचं काय?
इथं बाकी दणाणा करतोय जणू आता
मघाधरनं थेंबाट पडतंच आहे
बहुधा जोर वाढणार त्याचा
त्यानं डोक्यावर रेनकोट चढवत
आभाळात पाह्यलं
पड बाबा पड!
इथं पड!
रानात पड, वावरात पड, डांबरीवर पड
कटेवरचे कर सोडून पड
विटेवरचे पाय काढून पड
पड!!
अरे पडत का नाहीस.. वैऱ्या?
दिंडी पाय उचलून मुक्याने मुक्कामी निघाली होती
मधून कोणी हौशी बाई एखादा अभंग गुणगुणत होती
तेवढंच..
न राहवून तो ओठांशी
आरती घोळवू लागला..
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा..
वावरात गाडलेलं बियाणं नजरेत सारखं खुपत होतं
हुंडेक-याकडनं आणलेलं बियाणं
त्याची उधारी..
त्यानं मन दामटलं
रेटून म्हणू लागला..
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती.
केशवासी नामदेव भावे ओवाळती..
जय देव जय देव..
बाजूला कोणी तरी मोबाइलवर बोलत होतं,
‘‘च्यायला, तिकडं मुंबैत मोकार पडला म्हणत्यात
गाडय़ा बंद पाडल्या त्यानं
सालं हे पाऊसपण बाराचं निघालं
त्यालापण शहर पायजेल.. शहर!’’
अप्पाबळवंत balwantappa@gmail.com