अनुराग कश्यप

अतिवास्तववादी, काहीशी भडक वाटणारी त्याची शैली. मुळात तोही तसाच असावा, थोडासा तापट, सोईचं न बोलता थेट भिडणारा समस्यांना आणि आयुष्यालाही.. रंगभूमी ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश दिग्दर्शक ही त्याची संघर्षमय वाटचाल अनुभवलेल्या अभिनेता – नाटय़ दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी ‘लोकसत्ता गप्पां’ची सुरुवात करतानाच त्याचं यथोचित वर्णन केलं, ‘रागातही अनुराग असावा..’ अगदी तसाच प्रामाणिकपणे केलेल्या सिनेमाला न्याय मिळत नाही म्हणून रागावणारा, तरीही सिनेमावरचं प्रेम जपणारा, काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.

Suraj revanna brother of Prajjwal Revanna
प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार? आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल
Influence of Saturn and Mars the fortunes of these three zodiac signs
नवी नोकरी, भरपूर पैसा; शनी-मंगळाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: पाद्यपूजा..
we the documentry maker
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :‘कान’ महोत्सवापर्यंत नेणारा प्रवास…!
Never Ignore These Changes In Your Mole On Skin Priyanka Chopra Brother in Law Kevin Jonas Skin Cancer
प्रियांका चोप्राच्या दिराला त्वचेचा कर्करोग; तीळ व चामखिळाच्या ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, पाहा लक्षणे
epf death claim if account person dies How to withdraw PF amount after death pf withdrawal form 20 submission documents needed
एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पीएफ खात्यातून पैसे कोणाला मिळतात? काढण्याची प्रक्रिया काय आहे? घ्या जाणून….
female figures on stage
‘ती’च्या निर्णायकतेचे कवडसे
Stock market, share market, Stock market boom or recession, bullish market, bearish market, lok sabha election impact on stock market, stocks, nifty finance article,
शेअर बाजारात तेजी येणार की मंदी? निकालानंतर बाजारावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे?

सिनेमाच्या माध्यमातून आपण जग बदलू शकतो, असा एक भ्रम माझ्या मनात कायम असायचा. पण आता त्याबाबत कसलाच हट्टाग्रह राहिलेला नाही. माझ्या सिनेमांतून आणि समाजमाध्यमांतून सद्य:स्थितीबाबत कायम सत्य व्यक्त केल्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला. पण त्यातून माझा चित्रपटविषयक दृष्टिकोन अधिक व्यापक होत गेला. आपल्याला जे वाटतं त्याची अभिव्यक्तीच करायची नाही का? तर तसं  नाही- आजूबाजूची राजकीय – सामाजिक परिस्थिती कठीण आहेच, पण मला सिनेमातून अभिव्यक्त होण्याची संधी नाकारली गेली तरीही सिनेमे करत राहिलं पाहिजे, व्यक्त होत राहिलं पाहिजे.. अशी एक वेळ नक्की येईल जेव्हा तुमचे सिनेमे स्वीकारले जातील. जगभरात अवघड परिस्थिती होती. त्या अवघड काळावरचे चित्रपट हे त्यानंतरच तयार झाले आणि स्वीकारले गेले. वानगीदाखल बोलायचं तर जर्मनीतील ज्यूंच्या छळहत्यांवरील (होलोकॉस्ट) कितीतरी सिनेमे हे या घटनेच्या कैक वर्षांनंतर बनले आहेत. तसंच एका वाईट संघर्षमय आणि अवघड काळातून बाहेर पडल्यानंतर आपला सिनेमाही समृद्ध होईल.

माझ्या चित्रपटातील दृश्ये, संवाद यांतून लैंगिकतेची केलेली मांडणी, हिंसक दृश्ये, नकारात्मक व्यक्तिरेखा हा सगळा भडकपणा असल्याचं मला मान्य नाही. माझा सिनेमा गडद- काळा (डार्क) असल्याचा आरोप करणाऱ्यांनी जगभरातील चित्रपट पाहिले, तर त्यापुढे माझे सिनेमे सौम्य वाटू लागतील. माझा सिनेमा काळा नाही, तर बॉलीवूडचा चित्रपट ‘गुलाबी’(पिंक) आहे. हे गुलाबी चित्रपट पाहण्याचीच सवय असलेल्या प्रेक्षकांना माझे सिनेमे भडक वाटू शकतात.

हेही वाचा >>> बांगलादेश आणि स्थलांतर : नव्या उत्तरांचा शोध..

 ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधील लैंगिकता प्रतीत करणारे संवाद आणि दृश्ये पाहताना अनेकदा प्रेक्षक हसतात, पण मुळात तो विनोद आहे किंवा द्वयार्थी संवाद आहेत म्हणून ते हसत नाहीत. ज्या गोष्टी आपल्या समाजात उघडपणे बोलता येत नाहीत, त्या गोष्टी पडद्यावर पाहताना त्यातलं सत्य प्रत्येकाच्या मनात पोहोचतं, त्यांना ते माहिती असतं आणि म्हणून ते हसतात. तीच गोष्ट नकारात्मक व्यक्तिरेखांबाबत आहे. माणूस एकतर चांगलाच किंवा वाईट असतो असं नाही. मला त्या ‘मधल्या’ अवस्थेतील म्हणजेच ‘ग्रे’ व्यक्तिरेखा अधिक भावतात. सिनेमाची शैली वा अमुक एक कथा हे सगळं एका रात्रीत घडत नाही. कित्येक वर्षांचा अभ्यास आणि प्रत्येक गोष्ट चुकतमाकत सरावाने शिकण्याचा प्रयत्न, तुम्हाला भेटलेल्या व्यक्ती, त्यांचा सहवास, अनुभव, निरीक्षणे या सगळय़ाचा तो परिपाक असतो. सतत सजग राहून त्या गोष्टी आपल्यात मुरवत राहिल्या पाहिजेत. चिंतन आणि मंथनातूनच तुमची कलाकृती आकाराला येत असते. यशस्वी सिनेमा दिग्दर्शक होण्यासाठी अन्य कुठला गुरुमंत्र नाही. सतत तयारीनिशी सिनेमा बनवण्याचा प्रयत्न कराल तर तो अयशस्वीच ठरतो. सगळय़ा पद्धतीची जुळवणी करून आणि फक्त यशाच्या शक्य-अशक्यतांना पडताळून केलेल्या बांधेसूद पटकथा नेहमी वाईट चित्रपटरूपात दिसतात. लोकांना तुमच्या सिनेमातून वेगळं काही सापडायला हवं. सध्या प्रदर्शित झालेल्या सगळय़ा अमेरिकी चित्रपटांत आशयाच्या बाबतीत प्रेक्षकांना नवल करायला लावणारी पटकथा ही ‘बार्बी’ या सिनेमाची होती. एका बाहुलीला घेऊन तुम्ही काय कथा सांगणार.. मात्र त्याच चित्रपटाला सर्वाधिक यश मिळालं. यातून काय लक्षात आलं तर साचेबद्ध विचारांतून उत्तम सिनेमा होऊ शकत नाही. मी एक कथाकार आहे. उद्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वा अन्य राजकीय-सामाजिक परिस्थिती-अडचणींमुळे सिनेमा माध्यमासमोर आव्हान उभं राहिलं तरी मी लोकांना कथा सांगण्याचं कोणतं ना कोणतं माध्यम शोधून काढेनच.

प्रत्येक गोष्टीत संधी असते

तुम्हाला आयुष्यात वेगवेगळय़ा टप्प्यांवर कुठल्या प्रकारची माणसं भेटतात? त्यावर तुमचं आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाणार हे ठरतं. महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षांनंतर मी जर सोनिक सिन्हा नामक व्यक्तीला भेटलो नसतो तर.. म्हणजे त्या काळी मी थोडा हरवलेलो होतो, आयुष्यात नेमकं काय करावं हे काहीच कळत नव्हतं. तो मला म्हणाला, ‘मी नाटकाच्या तालमीसाठी चाललो आहे. तू चल माझ्याबरोबर.’ तो तसं म्हणाला नसता तर मला नाटक सापडलं नसतं. प्रत्येक गोष्टीत संधी असते. नाटक नसतं सापडलं तर मी सांस्कृतिक केंद्रात विविध भाषिक सिनेमे पाहण्यासाठी पोहोचलो नसतो. तसंच मी जर गो. पु. देशपांडेंचं ‘सत्यशोधक’ नाटक केलं नसतं तर कधीच मुंबईत आलो नसतो. मुंबईत येऊन जाणार कुठे? मी अक्षरश: रेल्वे स्टेशनवरून सामान घेऊन नाटकासाठी पृथ्वी थिएटरला पोहोचलो होतो. त्याच वेळेला सेंटॉर हॉटेलच्या बाजूच्या गल्लीत असलेल्या वडापाववाल्याशी हिंदीत बोलत असताना मला महेंद्र जोशींनी पकडलं आणि त्यांच्याबरोबर पृथ्वीला घेऊन आले. मधु राय यांचं ‘पानकोर जाके नाके’ नावाचं नाटक होतं, त्यात त्यांनी कलकीची भूमिका मला अशी देऊ केली. पुढे नाटकाच्या तालमी सुरू असतानाच दिग्दर्शक महेंद्र जोशी यांचं अचानक निधन झालं. त्यांच्या स्मृतीनिमित्त जो पाच दिवसांचा नाटय़महोत्सव झाला त्यात जेवढय़ा छोटय़ा भूमिका होत्या त्या सगळय़ा मला मिळाल्या. तिथून मी मकरंदला (देशपांडे) भेटलो. त्याच्याबरोबर नाटक करता करता मी श्रीराम राघवन आणि शिवम नायर यांना भेटलो. कधी कधी माझ्या मनात विचार येतो, नशिबाने माझी भेट जर शिबू मित्रांसारख्या दिग्दर्शकाशी किंवा इतर कोणत्या वेगळय़ा शैलीच्या दिग्दर्शकांशी झाली असती तर मला वाटलं असतं तोच सिनेमा आहे, मी त्याच पद्धतीचे सिनेमे केले असते. तसंच जर योगायोगाने माझी गाठ मकंरद देशपांडेसारख्या नाटककाराशी किंवा महेंद्र जोशींसारख्या नाटककाराशी पडली नसती तर कदाचित प्रायोगिक रंगभूमी काय मला कधीच कळलं नसतं. कारण ते वय खूप परिणाम करणारं असतं, तुमच्यावर लोकांचा त्या वयात खूप प्रभाव पडतो. त्या वेळी मी कधी डाव्या विचारसरणीचा असायचो तर कधी एकदम मुक्तविचारी बनायचो. दरदिवशी मी एक नवीन रूप धारण केलेलं असायचं. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की अशा लोकांना भेटलो ज्यांनी माझ्या आयमुष्याला आकार दिला. शिवम नायरमुळे मी मनोज वाजपेयीला, मनोजमुळे रामगोपाल वर्माना भेटलो. रामगोपाल वर्माना मी माझा अखेरचा मार्गदर्शक मानतो. हे सगळे माझ्या आयुष्यात गुरुस्थानी राहिले आहेत.

हेही वाचा >>> हा फक्त चित्रपट नाही..! 

प्रामाणिकपणाचा कळस..

‘ब्लॅक फ्रायडे’ हा खूप प्रामाणिकपणे केलेला चित्रपट आहे. मुळात मुंबईत ९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा मी तिथे नव्हतो. त्यामुळे माझ्या हातात एका अप्रकाशित पुस्तकाचं हस्तलिखित आणि सेबॅस्टियन म्हणून वकील होते- ज्यांनी नंतर ‘ब्लॅक फ्रायडे’वर खटला केला होता- त्यांच्या ‘व्हॉइसेस’ या पुस्तकाचं हस्तलिखित असे जे काही तपशील होते ते प्रामाणिकपणे पडद्यावर  आणणं याचं थोडंसं दडपण मनावर होतं. मी कुठेतरी या घटना चुकीच्या पद्धतीने तर मांडणार नाही ना ही भीती माझ्या मनात होती. आणि त्या वेळचा आमचा प्रामाणिकपणा इतका पराकोटीचा होता की त्या नादात आम्ही खूप मूर्खासारख्या गोष्टीही केल्या. जिथे जिथे घटना घडल्या तिथे प्रत्यक्ष जाऊन चित्रीकरण करायचं असं आम्ही ठरवलं होतं. ते करताना प्रत्यक्षात काय अडचणी येऊ शकतील याचा विचारच आम्ही केला नव्हता. त्या प्रक्रियेतून आमची प्रगतीही झाली. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष श्रीवर्धनला जाऊन आरडीएक्स एका बोटीतून आणून दुसऱ्या बोटीत कसे ठेवले गेले याचं चित्रीकरण केलं. चित्रण झाल्यानंतर पडद्यावर पाहात असताना हे जाणवलं की हेच चित्रीकरण मी वर्सोव्यात केलं असतं तरी असंच दिसलं असतं. पण इमानदारीने काम करायचं हे इतकं डोक्यात पक्कं होतं की जे जिथे घडलं तिथेच आम्ही चित्रीकरण केलं आणि त्यात निर्मात्याचं नुकसानही बरंच झालं. त्यातून ज्या गोष्टी मला समजल्या, मी जे शिकलो ते मी आजही अमलात आणतो.

‘ब्लॅक फ्रायडे’ आणि फिल्ममेकिंगचे धडे..

आम्हाला झवेरी बाजारमध्ये चित्रीकरण करायचं होतं. १९९३ मधलं झवेरी बाजार २००३ मध्ये तसं उरलं नव्हतं. सॅटेलाइट चॅनेल्स आले होते. मोबाइल आले होते. मुंबईच्या क्षितिजावर तोर्पयच मोठमोठी होर्डिग्ज झळकली होती. रस्त्यावर लोक मोबाइल घेऊन चालत होते. झवेरी बाजार म्हणजे अव्याहत व्यापार सुरू असलेला परिसर.. चित्रीकरणासाठी ते बंद कसं करणार? आम्ही चित्रीकरण करण्याची एक वेगळीच शैली त्या वेळी विकसित केली. आम्ही पूर्ण सिनेमॅटोग्राफी अ‍ॅक्ट अभ्यासला. सार्वजनिक जागेवर चित्रीकरण करताना कॅमेरा जमिनीवर नसेल तोवर तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही हे समजलं. मग पहिला नियम ठरला, कॅमेरा जमिनीवर येणार नाही. दुसरा प्रश्न होता कॅमेरा छतावर ठेवला तर सगळंच वरच्या अँगलने दिसणार आणि गाडीत ठेवला तर गाडीच्या दोन्ही बाजू बंदिस्त असल्याने तो विस्तृत पैस कॅमेऱ्यात येणार नाही. मग आम्ही ‘नॅशनल जिऑग्राफिक’चे काही व्हिडीओ पाहिले की ते प्राण्यांचं चित्रीकरण कसं करतात? आम्ही झूम लेन्सवर काम करायला सुरुवात केली, त्यातही पहिल्या मजल्यावरून चित्रीकरण केलं तर ते योग्य वाटेल. मग आम्ही पहिले चित्रीकरणाची जागा ठरवायचो, कॅमेऱ्याची जागा निश्चित करायचो. आम्ही कोणाला कळू न देता चित्रीकरण करायचं म्हणून एकमेकांशी इशाऱ्यांमध्ये बोलायला शिकलो. रस्त्यावर कुठलीही परवानगी न घेता चित्रीकरण कसं करायचं? हातात फार साधनं नसताना कसं करायचं हे सगळं आम्ही तिथून शिकलो. ज्या बाल्कनीत कॅमेरा ठेवायचा तिथे पाचशे रुपयांत परवनागी घेतली की लोकेशन मिळून जायचं. कलाकारांना आम्ही मुख्य जागी ठेवायचो. तुम्ही अभिनय करा, झूम लेन्सवर कॅमेरा ते पकडेल असं त्यांना सांगितलेलं असायचं. एक माणूस गुपचूप त्यांच्या बाजूला उभं राहून आवाज रेकॉर्ड करायचा आणि चार-पाच असिस्टंट गर्दीत असायचे जे लोकांवर लक्ष ठेवायचे, कोणी मोबाइल काढलाच तर त्यांना धक्का द्यायचे जेणेकरून मोबाइल खाली पडेल आणि कॅमेऱ्यात येणार नाही. कुठलीही परवानगी न घेता गर्दीच्या जागी चित्रीकरण करण्यात आम्ही तरबेज झालो.

सर्जनशीलतेला मारक व्यवस्था

आज सगळय़ा गोष्टी पेपरवर हव्यात असा अट्टहास असतो. ‘सत्या’ करत असताना आमच्याकडे सत्या मुंबईत आला, सत्या भिकूला भेटला.. अशा दोन दोन ओळी असायच्या. ज्या दिवशी चित्रीकरण असेल त्या दिवशी आम्ही ते दृश्य लिहायचो. गोष्ट सांगण्याचा प्रकार पूर्वापार असाच असायचा. गोष्टी सांगता सांगता त्या आपण बनवत जायचो. लेखकांचं लेखकांना लक्षात यायचं. आता ते शक्य नाही, कारण आमची व्यवस्थाही आमच्या हातात राहिलेली नाही. आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये पटकथा घेऊन जातो तेव्हा ते विचारतात, दिग्दर्शकाची मांडणी काय असेल? दिग्दर्शकाला हा चित्रपट का बनवायचा आहे? का? काय.. बनवायचा आहे म्हणून आहे. हे सगळं ज्यांनी चित्रपटासाठी पैसा लावला ते मागत नाहीत. तर त्या स्टुडिओ नामक व्यवस्थेतून उभ्या राहिलेल्या नोकरशाहीला त्यांच्या वरिष्ठांना उत्तर देण्यासाठी हव्या असतात. मी असं कधीच काही लिहून देऊ शकत नाही, त्यासाठी मी एक माणूस ठेवला आहे. या सगळय़ा गरजेच्या गोष्टी आहेत म्हणून त्या केल्या जात नाहीत.

हेही वाचा >>> अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉरएव्हर..

इंडस्ट्री व्यावसायिकांची..

सिनेमा उद्योग सुरुवातीपासूनच ९५ टक्के व्यावसायिकांची आहे, केवळ ५ टक्के लोक इंडस्ट्रीत असे आहेत ज्यांना स्वत:चं मत आहे, ते ठोस भूमिका घेतात, काही घडलं तर त्याबद्दल बोलायला हवं असा विचार करणारे फार थोडे आहेत. यात काही चुकीचं नाही. ते ५ टक्के लोकही पुढे जाऊन अशा परिस्थितीत सापडतात की ते न बोलण्याचा पर्याय निवडतात. किंवा त्यांना असं काही बाजूला टाकलं जातं की ते बोलूच शकत नाहीत. काहींनी शांतच राहायचं ठरवलं आहे. आमच्यासारखे काही आहेत जे बोलत राहतात, पण त्याचे परिणाम काय होत आहेत हे लक्षात येईपर्यंत.. माझ्या मुलीला त्याचा त्रास होतोय   हे लक्षात आल्यानंतर मी बोलायचं थांबवलं. माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा माझी मुलगी महत्त्वाची आहे.

माणूस म्हणून जगू या..

दिग्दर्शक म्हणून माझं भविष्य याबद्दल मी विचार करत बसत नाही. मी नास्तिक आहे. त्यावर टीकाही होते. पण लहानपणापासून मी वाराणसीत इतक्या धार्मिक गोष्टी पाहिल्या आहेत की त्यापासून लांब राहणेच मला बरे वाटते. एक सिनेमा संपला की पुढचा इतकाच विचार मी करतो.  मी खूप आशावादी आहे. नवनव्या गोष्टी शोधणं, नवनवे चित्रपट करणं, काहीतरी चांगलं मिळत राहील, गोष्टी नक्कीच चांगल्यासाठी बदलतील असं मला वाटत राहतं. अमुक एक पंथ, विचारधारा यापलीकडे एक माणूस म्हणून जगूया असं मला वाटतं.

माझी काम करण्याची पद्धत जुनीच..

माझ्या परिचयातील चांगले चित्रपटकर्मी स्वत: चुका करत सिनेमा बनवायला शिकले. हल्ली तर सगळेच सिनेमा स्कूलमध्ये जाऊन शिकतात. पण नव्वदच्या काळात मी ज्यांचे सिनेमे बघत मोठा झालो ते कुठल्याही सिनेमा स्कूलमध्ये गेले नव्हते. मीही त्यांच्यासारखाच प्रत्येक गोष्ट सरावाने शिकलो. संकलन प्रत्यक्ष करत शिकलो, यंत्रांनी सगळय़ा गोष्टी करणं मला अजूनही शक्य होत नाही. मी आजही हाताने लिहितो, टाइप करणं मला जमत नाही. प्रत्येक गोष्ट मी हाताने करतो. त्यामुळे नवी पिढी जेव्हा येते समोर तेव्हा कित्येक वेळा मी थोडासा मागे होतो. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू देतो, मात्र माझी काम करण्याची पद्धत जुनीच आहे.

त्या वेळी सेन्सॉरचा राग यायचा..

प्रथितयश दिग्दर्शकांपेक्षा नवोदितांच्या सिनेमात खूप गोष्टी पाहायला मिळतात. हळूहळू काय होतं, आपण भ्रष्ट होत जातो. सुरुवातीला मला सेन्सॉरचा राग यायचा, तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर, सचोटीवर शंका कशी घेऊ शकता? आज मला माहिती आहे, ते बिचारे नोकरी करतायेत. मला आता अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे बरोबर लक्षात आलं आहे. म्हणजे पटकथा गुंतागुंतीची असेल तर मी ती वकिलांना पहिल्यांदा वाचून दाखवतो. मी पकडला जाणार नाही अशा पद्धतीने संवाद-पटकथा मांडणी कशी करायची याचा माझा विचार पक्का झाला आहे. आतासारखी अवघड परिस्थिती नसती तर ‘ब्लॅक फ्रायडे’सारखे चित्रपट करू शकलो असतो असंही मला वाटत राहतं.

हेही वाचा >>> ‘अ केस फॉर ओपनहायमर’

शून्यातून उभा राहिलेला चित्रपट

‘ब्लॅक फ्रायडे’ सिनेमा नंतर घडला. आधी ‘आज तक’साठी जी सहा भागांची मालिका करायची होती त्याचा दिग्दर्शक आदित्य भट्टाचार्य आणि लेखक मी होतो. ऐनवेळी ‘आज तक’ने माघार घेतल्यानंतर आदित्यनेही पुढे जायला नकार दिला. मी या चित्रपटाच्या लेखनात भावनिकदृष्टय़ा खूप गुंतलो होतो. त्या वेळी मी विधू विनोद चोप्रांशी भांडण करून ‘मिशन कश्मीर’ अर्धवट सोडून आलो होतो. आणि मी सगळय़ांशी भांडून, सगळं सोडून बसलो होतो. तो टप्पा असा होता आयुष्यातला की, त्या वेळी थोडा जास्त आदर्शवादी दृष्टिकोन होता माझा.. आणि आदर्शवादी असलं की सिनेमाशी छेडछाड करता येत नाही. त्या वेळी मी इतका गुंतलो होतो की त्यात मला सिनेमा दिसत होता. मी आदित्यचा खूप आभारी आहे. एकतर दिग्दर्शनातून त्याने माघार घेतली आणि त्यानेच तारीक अन्सारी वगैरेंना पटवून दिलं की, मी त्याचा सिनेमा पाहिला आहे. त्याने हस्तिलिखितं अभ्यासून कथा केली आहे तो दिग्दर्शन करू शकतो. मला सिनेमा करायची संधी मिळाली, पण तारीक अन्सारींचं म्हणणं होतं हा सिनेमा आम्ही करू शकणार नाही. आम्ही वर्तमानपत्र चालवतो, आमच्याकडे सिनेमाची निर्मिती करण्याएवढा पैसा नाही. मग सिनेमाचं बजेट हे कॅननुसार ठरलं. ३०० कॅनमध्ये आम्हाला चित्रीकरण पूर्ण करायचं होतं. आमची बाकी सगळी तयारी पूर्ण होती, पण आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मग आहे त्या पैशांत चित्रीकरण करतानाही आम्हाला प्रत्यक्ष त्या लोकेशनला जाऊन चित्रीकरण करायचं होतं.

हजार कोटींचा सिनेमा माझा नाही..

हजार कोटींचे चित्रपट मी कधीच करणार नाही, मी त्या शर्यतीतून बाहेर पडलो आहे. जे लोक मोठे चित्रपट करतात, त्यांचं नुकसानही मोठं असतं. माझ्या सिनेमाचा प्रेक्षक वेगळा आहे. शुक्रवार-शनिवारी प्रदर्शित होणाऱ्या हजार कोटींच्या सिनेमाचा प्रेक्षक आहे तो त्या सिनेमाची वाट बघत असतो. तो माझा प्रेक्षक नाही आणि शेवटी जे माझा सिनेमा बघत नाहीत असं वाटतं तेच त्यांना वेळ मिळेल तेव्हा माझा सिनेमा बघतात.

(शब्दांकन : रेश्मा राईकवार)

lokrang@expressindia.com