|| मकरंद देशपांडे

आज नवीन नाटकाची रंगीत तालीम आहे आणि मी जुन्या नाटकांबद्दल लिहितोय. आणि आता ते किती मौलिक होतं, हे लिहायचंय. खरं तर आपण जे नवीन करतो ते आपल्याला जास्त आकर्षक आणि कलात्मक वाटतं. पण ‘जुनं ते सोनं’ या म्हणीनुसार आणि नाटक या माध्यमाच्या मूलभूत गरजेनुसार जुन्या ‘लैला’ या नाटकाला (प्रयोग) आता जिवंत करू या. कारण नुसतं नाटकच नाही, तर नाटकाची आठवण हासुद्धा प्रयोगच आहे. आणि तो यशस्वी करायचा मनस्वी प्रयत्न करणं हा एका रंगकर्मीचा प्राण नसला, तरी कर्तव्य मात्र आहे.

‘लैला’ या नाटकात एक ‘नाटककार’ (नाटकातील एक पात्र) आहे. हे नाटक म्हणजे या नाटककाराचा आपल्या ‘लैला’ या नाटकाकरिता त्याने लिहिलेल्या मजनू या पात्रासाठी सुयोग्य लैलाचा शोध आहे. त्या नाटककाराबद्दल एक माहिती अशी, की तो स्वत: अविवाहित आहे आणि त्याचे स्टेटस सिंगल  आहे.

लैला ही शिवाजी पार्कच्या (मदान) आसपासच्या बिल्डिगमधील एका बिल्डिगच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारी, अतिशय सरळ आणि बुळचट, पण अप्रतिम सतार वाजवणारी मुलगी. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून सतारीचे बोल ग्राउंडवर पोहोचतात आणि विनोद जाधव नावाचा फलंदाज त्या बोलांनी वेडा होऊन सिक्सर मारतो आणि बॉल तिच्या बाल्कनीची काच फोडतो. एवढी ड्रॅमॅटिक आणि पोएटिक कल्पना केली नाटककाराने; पण ती लैला विनोदला भेटायला खाली उतरायलाच तयार नाहीए. कारण तिचा रोमान्स हा तिसऱ्या मजल्यावरून होता. तिला घामट्ट क्रिकेटरला खाली येऊन मिठी मारायची नव्हती. आणि याचा त्रास नाटकातील नाटककाराला होतो. त्यानं लिहिलेला मजनू अशा लैलाला बदलायची मागणी करतो. नाटककार आपण लिहिलेल्या मजनूची विनवणी ऐकतो आणि लैलाला नाटकातून काढतो. नाटककार त्याच्या कापलेल्या पात्रांना एका खाटिकाला देतो. लैला स्वत:ला घरात बंद करून घेते.

मग अनतिकरीत्या- म्हणजे आधीची लैला असतानादेखील नाटककार आपल्या रोमिओसाठी बांद्रा परिसरातील ‘मिस इंडिया’ होऊ पाहणारी दुसरी लैला लिहितो. जी हजरजबाबी, बोल्ड आणि ब्यूटिफुल आहे. तिला स्त्रीचे हक्क माहिती आहेत. पण तिच्यासमोर रोमिओ फारच शॉक्ड.. आणि त्यामुळे गप्पच आहे. नाटककाराला या वेळी आपल्या रोमिओचा खूप राग येतो. पण रोमिओ लिहून पूर्ण असल्यामुळे लैलालाच बदलणं सोयीस्कर असतं. तरी त्याही लैलाला रिप्लेस करायचं ठरतं आणि पहिल्याच लैलाला परत आणायचं ठरतं. पण मग तिला आधी मोच्याकडे (पादत्राणे बनवणारा) पाठवून नंतर पुन्हा नाटकात आणायचं ठरतं. तर दुसऱ्या लैलाला खाटिकाकडे पाठवायचं ठरतं.

मोची आणि खाटीक हे नाटककाराचे प्रतीकात्मक ‘उजवे आणि डावे हात’ आहेत. पण उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू न देणारा नाटककाराचा स्वभाव असल्यामुळे मोची आणि खाटीक नेमकं काय करतात, हे नंतर कळतं.

तिसरी लैला ही अशी कल्पिली गेली- जिला जीवनाचा अनुभव आहे, जी आध्यात्मिक आणि  भटकी आहे. रोमिओला ती खूप आवडते, कारण तिच्यात त्याला स्त्रीची सगळी रूपं दिसतात. ती त्याला भेटते गोव्याला. पण मग तिच्या स्वभावाप्रमाणे ती हिमालयात निघून जाते. पहिल्यांदा रोमिओ विरहाने वेडा होतो. नाटककाराला खरं तर हाच मेलोड्रामा अपेक्षित होता. पण रोमिओच्या आत्मघातकी हरकतींमुळे तो पुन्हा पहिल्या लैलाला परत आणायचा प्रयत्न करतो. पण तिचं आणि मोची यांचं नातं मोच्याने तिच्या सांगण्यावरून स्वतशी शिवून घेतलं. आणि खाटिकानं तर दुसऱ्या लैलाशी लग्नही केलं. ती खऱ्या अर्थाने ‘मिसेस इंडियन’ झाली.

या धक्क्यातून नाटककार स्वत:च सावरू शकत नाही, कारण त्याने निर्माण केलेला रोमिओ हा स्वत: नाटककारच आहे. नाटककाराला आपल्या लिखाणावर प्रेम करता आलं, पण वास्तवात स्त्रीबरोबर संवाद साधता आला नाही. त्यामुळे त्याची ही पंचाईत झाली. आता उपाय एवढाच होता, की नाटककारानं जीवनात लग्न करावं किंवा नाटकातल्या रोमिओनं आत्महत्या! नाटककार त्यातनं मार्ग काढताना आपल्यातल्या रोमिओला ‘सॅक्रिफाइस’ करतो.. म्हणजे त्याला वेडा होऊ देतो आणि स्वत:चं लग्न टाळतो आणि लैलाला मजनूच्या वेडेपणासाठी जबाबदार ठरवतो.

हे नाटक विसावं शतक संपताना लिहिलं. वाटलं, एकविसाव्या शतकात प्रेम करता येत नाही म्हणून शेवटी मजनू हा लैलाला जबाबदार ठरवणार, या दृष्टिकोनातून ‘लैला’ नाटक लिहिलं गेलं.

३१ डिसेंबर १९९९ ला रात्री अलिबागला पार्टीला गेलो होतो. बरेच मित्र-मत्रिणी आणि रस्त्यावरून गाडीत फिरणारी प्रेमी युगुलं पाहून वाटलं की, २००० साल काही तासांतच सुरू होणार. ते सुरू होईल तेव्हा नेमकं काय चित्र असेल या प्रेमाचं? की प्रेम आणखीन अनिश्चित असेल? की प्रेमापेक्षा प्रेमव्यक्ती निवडण्यात वेळ जाईल? बरेच प्रश्न मनात डोकावले. आणि २००० साल सुरू झाल्याचा ठोका वाजल्यावर घडय़ाळाचे दोन्ही काटे बरोबर आले आणि मनात ‘लैला’ हे नाटक सुरू झालं..

या नाटकाचं कास्टिग ही एक विचार करण्याची गोष्ट होती. कारण नाटककार आणि रोमिओ हे दोघे साधारण ‘यंग अ‍ॅण्ड ओल्ड’ असा एकच माणूस वाटायला पाहिजे होते. अगदी दिसणं सारखं नसलं तरी त्याच्या दिसण्याचा आणि असण्याचा आभास निर्माण करणारे हवे होते. सुधीर पांडे यांना नाटककार केलं तेव्हा ते म्हणाले ‘‘यह गजब हो गया, क्योंकि अपने लिए सुटेबल  लैला तय करना वैसे मुश्किल काम है. उससे अच्छा लैला तय करके सुटेबल हो जाना चाहिए.’’ मी ‘‘वाह!’’ म्हटलं. आणि आता नाटककार सुधीरजींचा रोमिओ शोधायचा तर नट असा हवा होता, की त्याच्यात एक स्वत:चा आत्मविश्वास हवा; पण तो समोरच्याला मूर्खपणा वाटावा असा. आणि मला भेटला श्रेयस पंडित- जो स्वतला मार्लन ब्रॅन्डोपेक्षा (फिल्म ‘गॉडफादर’चा नट) कमी समजत नव्हता. आणि मुख्य म्हणजे खरंच चांगला नट आणि त्याला ईगोसुद्धा होता! वाह! मला रोमिओ मिळाला.

पहिली लैला ही सतार वाजवणारी असं लिहिल्यामुळे आता संगीत विद्यालयात जावं लागणार की काय असं वाटत असतानाच एक अतिशय शॉर्ट पॅन्ट घातलेली त्रिशला भेटली. तिच्या बोलण्यात विदेशी अ‍ॅक्सेंट होता. पण ती म्हणाली, की ती सतार वाजवते. मला खरंच वाटलं नाही. मी तिच्या घरी गेलो. तिला सांगितलं की सतार वाजवून दाखव आणि तिनं सतार वाजवली. आता प्रश्न होता तिच्या अ‍ॅक्सेंटचा. तुम्हाला गंमत वाटेल, पण तिच्या हिंदी बोलण्यात  अ‍ॅक्सेंट नव्हता. तेव्हा असं वाटलं की- काही कास्टिग रंगभूमी करते, कारण तिला नाटक घडवायचं असतं.

दुसरी लैला मिस इंडिया, मिस वर्ल्डची स्वप्नं पाहणारी. त्याकाळी मी काही वेळा रात्री हॉलिडे इन् (जुहू) हॉटेलात २४ ७ ७ खुल्या असणाऱ्या कॅफेमध्ये बसून लिहायचो. तर दुसरी लैला लिहिताना मला आठवली कश्मिरा शाह. मी तिला फोन केला तर ती मला म्हणाली की, मी आत्ता येते. तुझ्या दुसऱ्या नाटकात घेतलं नाहीस तर मी जबरदस्ती शिरणार. आणि ती मध्यरात्री आली. तिला मी काही प्रश्न विचारले. त्यांची उत्तरं तिनं दिली आणि तो दुसऱ्या लैलाचा पहिला सीन झाला (ती प्रश्नोत्तरे)! याआधी ‘मीनाकुमारी’ केलेलं असल्यामुळे ती नाटकवेडी झाली होतीच.

तिसरी लैला मला साधारण अगदीच वेगळ्या मनोवस्थेची हवी होती. मी पृथ्वी कॅफेमध्ये बसलेलो असताना दोन वेगळ्याच मुली मला दिसल्या. डोक्यावर खूप कमी केस, नाक-कान टोचलेल्या आणि खूपच आनंदी. ईशा आणि दिशा अशा दोघी बहिणी. दिशा ऑस्ट्रेलियाला जाणार होती. ईशा सध्या मुंबईत होती. जुजबी हिंदी बोलू शकणारी, पण छान डोळे आणि खूप भ्रमण केलेली. तिला मी विचारलं की, ‘तू नाटकात काम करशील का?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तू करवून घेतलंस तर करीन. फक्त मला भ्रमण करायची सवय असल्यानं तुला ‘हो’ म्हणायला भीती वाटतीये. चुकून प्रयोगाच्या आधी मी गेले तर..?’ मी म्हटलं, ‘तो चान्स मी घेतो.’ कारण मला एवढा विश्वास होता की, एवढं भ्रमण करणाऱ्या व्यक्तीला नाटकाच्या विश्वात एकदा आलं की रमायला वेळ लागणार नाही. कारण तालीम ते प्रयोग ही यात्रा थकवणारी आणि थकवा दूर करणारीसुद्धा आहे.

मोच्याच्या भूमिकेत अफलातून विजय मौर्य आणि खाटिकाच्या भूमिकेत लाजवाब अनिल यादव हे माझे हक्काचे दोन नट घेतले. यांना बोलवा आणि ते न विचारता दिलेली भूमिका एक नंबर वठवणार!

या नाटकात नेपथ्यात एक गंमत केली होती. पहिली लैला तिसऱ्या मजल्यावर राहते. तर ती दाखवताना मी फक्त एक फुटाची लेव्हल- ज्याला छोटी बाल्कनी, छोटे छोटे वाळत घातलेले कपडे आणि खाली न जाता भाजी वगरे वर आणण्यासाठी सोडलेली दोरी.. हे पाहून प्रयोगाला बसलेल्या ग्रेट दिना पाठक (रत्ना पाठकच्या आई) म्हणाल्या, ‘‘मकरंद, तुमने तो तिसरा माला पांच फूटसेही दिखाया!’’ त्या अख्ख्या सीनमध्ये खूप हसल्या.

त्यांच्याबद्दल लिहिताना त्या अगदी माझ्यासमोर जिवंत झाल्या आहेत. त्यांची आणखीन एक आठवण.. मी काही कामानिमित्त नसिरुद्दीन शाहंच्या घरी गेलो होतो. तिथं नसिर, रत्ना, त्यांची मुलं हिबा, ईमाद आणि दिनाजी होत्या. त्या नसिरच्या परफॉर्मन्सबद्दल बोलत होत्या. त्यांचा संवाद खूप साधा आणि समजणारा होता. उगाच मोठे मोठे शब्द नाहीत. पात्र वाटणं किंवा न वाटणं, भाव दिसणं किंवा दाखवता न येणं.. सगळं बोलणं एवढं साधं. त्यांनी जुनं पारशी स्टाईलचं थिएटर केलंय असं रत्नाच्या बोलण्यात मी ऐकलंय. पण नवीन प्रयोग बघायला त्या आल्या होत्या, हेही तितकंच खरं.

जय साधेपणा! जय भ्रमण!

जय नाटक! जय पाठक!

mvd248@gmail.com