भ्रष्ट व्यवस्था बदलणे गरजेचे!

‘लोकरंग’(१२ ऑगस्ट)मधील ‘सारे काही बोलाचेच’ हा गिरीश कुबेर यांचा अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वावर व त्यांच्या आंदोलनाबाबत मांडलेला लेखाजोखा आवडला. अण्णा हजारे यांनी भ्रष्ट व्यवस्था बदलण्याबाबत जे जनआंदोलन केले व त्यांद्वारे लोकपाल विधेयक सरकार दरबारी पोहोचले आहे.

‘लोकरंग’(१२ ऑगस्ट)मधील ‘सारे काही बोलाचेच’ हा  गिरीश कुबेर यांचा अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वावर व त्यांच्या आंदोलनाबाबत मांडलेला लेखाजोखा आवडला.
अण्णा हजारे यांनी भ्रष्ट व्यवस्था बदलण्याबाबत जे जनआंदोलन केले व त्यांद्वारे लोकपाल विधेयक सरकार दरबारी पोहोचले आहे. तसेच राज्यांतील लोकायुक्त यांच्या नियुक्तीबाबतही काही सकारात्मक/ नकारात्मक वातावरण यावर झालेले आहे. अलीकडच्या आंदोलनाला योग्य प्रतिसाद सरकारने दिला नाही. म्हणून टीम अण्णांनी  त्यांची टीम रद्द केली आहे व राजकारणात उतरून याचा सामना करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय योग्य आहे व जनतेने ७५ टक्के त्याचा पाठिंबा दर्शविला आहे. भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी लोकशाही मार्गाने मुकाबला करणे केव्हाही योग्यच आहे. त्यासाठी स्वतंत्र पक्ष – संघटना उभी करणे हेही क्रमप्राप्त आहे. परंतु अशी यंत्रणा उभी करण्यासाठी व त्याचे पुढारीपण कोण करणार असा प्रश्नही त्यांच्यापुढे आहे.
आज भारतात अनेक विचारवंत आहेत. त्यापैकी गांधी विचारांचा आग्रह धरणारेही अनेक ख्यातनाम विचारवंत आहेत; ज्यांना भ्रष्ट व्यवस्था बदलाबाबत खूप काही वाटते. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली असतानाही देश सुराज्य आणू शकत नाही. आजही अनेक खेडय़ांत विकासगंगा पोहोचलेली नाही, ही वस्तुस्थिती विचारात घेता व गावपातळीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत जी भ्रष्ट व्यवस्था वाढत चाललेली आहे, त्याचा मुकाबला करणे आता गरजेचे वाटते. अण्णांना याची तळमळ आहे. ती सुधारण्याची हीच वेळ आहे असे वाटते. योगायोगाने याचवेळी अडवाणींनीही येत्या निवडणुकीत तिसरी आघाडी येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांच्यावर पक्षांतून टीका होत असली, तरी लोकशाही वाचविण्यासाठी यापुढील काळात – सर्वच विचारवंतांनी गांधीवादी कार्यकर्ते यांनी एकाच मंचावर येऊन-याबाबत विचारमंथन केले पाहिजे. त्याशिवाय भ्रष्ट व्यवस्थेमुळे-महागाईला प्रोत्साहन न मिळता-आपली वाट सुराज्यकडे वळली पाहिजे. अण्णांनीही या दृष्टीने त्याच्या कार्यकर्त्यांनी-टीम अण्णा सदस्य, कोअर कमिटी साऱ्यांनीच विचार केला पाहिजे. आता बोलाचे सोडून विचारमंच व विचारवंतांची भूमिका याकडे लक्ष दिले पाहिजे.
– शरदचंद्र जोशी,  पिंपरी

म्हणून सौर दिनदर्शिका  लोकप्रिय झाली नाही
१९ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मध्ये प्रसिद्ध झालेला विश्वास गुर्जर यांचा ‘सौर अधिक चांद्र’ हा भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेसंबंधी माहिती देणारा लेख वाचला. लेख अभ्यासनीय व वाचनीय आहे. भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार असलेली ऋतू व महिने यांची सांगड योग्य आहे व त्यानुसारच वसंतादी ऋतू प्रत्ययास येतात, त्यामुळे त्यानुसार ऋतू मानण्यास हरकत नाही. परंतु ही भारतीय सौरगणना जास्त प्रचलित न होण्यामागे जी दोन मुख्य कारणे असावीत ती म्हणजे या दिनदर्शिकेनुसार व आपल्या चांद्रमासानुसार महिन्यांची नावे सारखीच असल्यामुळे एकाच महिन्याची चांद्रमासाची तिथी व सौर दिनदर्शिकेची तारीख या दोघांमुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच हे सर्व महिने बदलताना सायन पद्धतीनुसार रवि राशी बदलतो. परंतु भारतीय पंचांगकर्त्यांनी निरयन पद्धत स्वीकारल्यामुळे त्या तारखेला आकाशात प्रत्यक्ष काही बदल होत नाही. ज्याप्रमाणे चांद्रमासानुसार चंद्राचा आकार कमी-जास्त होतो. त्यामुळे ही सौर दिनदर्शिका पंचांगाशी मिळतीजुळती नसल्यामुळे लोकप्रिय होऊ शकली नाही.
– गोपाळ दसरे, पुणे

शास्त्रसंमत कालगणनाच हवी!
विश्वनाथ गुर्जरांचे ‘सौर अधिक चांद्र’  वाचले’ अन् ‘सौर कालगणनेचा स्वीकार केवळ राष्ट्रीय म्हणून नव्हे तर शास्त्रीय म्हणूनही व्हायला हवा’ हे लेखक महोदयांचे विचार पटले.
बहुविधतेच्या या देशात अनेक कालगणना प्रचलित आहेत. इसवीसनाच्या ७८ व्या वर्षी ‘शालिवाहन शक’ सुरू झाले. इसवीसनापूर्वी ५७ व्या वर्षी ‘विक्रम संवत’ (फिस्कल इयर) व्यापारी वर्ष सुरू झाले, महंमद पैगंबराच्या मक्केहून मदिनेला स्थलांतर झालेल्या दिवसापासून (१६ जुलै ६२२) मुसलमानांचा ‘हिजरीसन’ सुरू झाला. याचप्रमाणे ‘फसलीसन, बंगालीसन’, शिवाजी महाराजांचा इ.स. १६७४ पासून सुरू झालेला ‘शिवभक्त’ इ. स. पूर्व ५४३ या बुद्ध निर्वाणापासूनची वैशाखी पौर्णिमेला सुरू झालेली ‘बुद्ध कालगणना’ याखेरीज युधिष्ठिरांचा ‘इंद्रप्रस्थशक’, ‘नागार्जुनशक’, ‘कल्कीशक’ इत्यादी कालगणना विविध धर्मियांकडून मानल्या गेल्या.. पाळल्याही गेल्या. हे वेगळे- पण कशासाठी? सौर दिनदर्शिका खगोलीय घटनांशी जुळणारी असून चांद्र-सूर्य कालगणनांच्या जुळणीमुळेच केवळ सणांचे नाते विशिष्ट ऋतूमानाशी जपणे आपणास शक्य होते. तसेच या जुळणीमुळेच भारतीय पंचांगातील ‘अधिकमास’, क्षयमास, तिथिक्षय, वृद्धीतिथी इत्यादी संकल्पना वापरून पुढील वर्षांचा ‘चंद्रोदय’ आपण अचूक सांगू शकतो.
इसवीसनाची कालगणना येशुख्रिस्ताच्या ‘नामकरण’ दिवसापासून ख्रिस्ती लोकांनी मानली, अन् जगभर हीच कालगणना मुख्यत्वे सुरू असली तरी देशाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जी ‘सौरकालगणना’ स्वीकारली, ती शास्त्रीय तसेच राष्ट्रीय दर्जाची मानून तिचाच स्वीकार केला जावा’ ही लेखक महोदयांनी मांडलेली भूमिका योग्यच म्हणावयास हवी!
– कीर्तिकुमार वर्तक, वसई

‘रंगसंग’ सदर वाचनीय
विजय केंकरे यांचे हे सदर फार वाचनीय असते. आम्हाला इ१ं६िं८ वर किंवा लंडनमध्ये ही नाटके प्रत्यक्ष बघता आली नाहीत तरी हे सदर त्यांची ओळख चांगलीच करून देते. अगदी आपण ऑडीटोरियममध्ये बसून बघतो आहोत असेही वाटते. तसेच नाटकाकडे चिकित्सक दृष्टीने कसे बघावे हे ही शिकवून जाते.
लता रेळे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Letters letters to editor