|| डॉ. मुकुंद महाजन
सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात त्या शास्त्राचा उदय आणि विकास यांचा विचार अपरिहार्यपणे येतो. राजकीय विचारांचा इतिहास हाही असाच विषय आहे. सामान्यपणे प्रचलित स्वरूपात हा विषय कसा उत्क्रांत होत गेला आणि त्याला शास्त्रीय स्वरूप कालानुक्रमे कसे प्राप्त होत गेले, असे या अभ्यासाचे स्वरूप असते. या मार्गक्रमणेमध्ये ज्या ज्या विचारवंतांनी योगदान दिले आहे, त्यांच्या योगदानाचे परिशीलन केले जाते. हा अशा अभ्यासाचा स्थूल आराखडा असतो. यात महत्त्वाचे योगदान ज्यांनी दिले आहे, त्यांचा सविस्तर अभ्यासही स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रकाशित केला जातो. पण दोन विचारवंतांचा तौलनिक अभ्यास केला जातो, तेव्हा त्यांच्यात काळ, तत्त्वज्ञान, समाजस्थिती आदींमध्ये कमालीचे साम्य तरी असते किंवा कमालीचा विरोध तरी असतो. ‘भांडवलवाद विरुद्ध कल्याणकारी राज्यवाद’ वा ‘भांडवलवाद विरुद्ध नियंत्रित भांडवलवाद’ ही अशी उदाहरणे आहेत.
कौटिलीय अर्थशास्त्राचा काळ इ.स.पूर्व चौथे शतक हा मानला गेला असला, तरी तो प्रकाशात आला इ.स. १९०९ मध्ये. याउलट मॅकिएव्हेली हा १५ व्या शतकातील इटालियन विचारवंत. पण या दोन्ही विचारवंतांच्या विचारांत व दृष्टिकोनांत अनेक साम्यस्थळे शोधणारे आणि भेद दर्शविणारे शोधनिबंध अगणित म्हणावे लागतील इतके प्रकाशित झाले आहेत. असे असूनही या दोघांचा तौलनिक अभ्यास कशासाठी?
या ग्रंथाच्या लेखकाने तुलना वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध होण्यासाठी राजकीय तत्त्वज्ञान आणि राजकीय विचार यांत फरक करून या तुलनेला शास्त्रीय पाया पुरवला आहे. राजकीय तत्त्वे आणि आदर्श, राजकीय कल्पनांची सैद्धांतिक पद्धतशीर मांडणी आणि यातून निर्माण होणारी राजकीय सिद्धांताची संरचना हे राजकीय तत्त्वज्ञानाचे घटक असतात आणि हे कार्य करतो तो तत्त्वज्ञ म्हणवून घेतो, अशी संशोधकाची भूमिका आहे. याउलट, राजकीय व्यवहार आणि प्रत्यक्ष अवलंबिली जाणारी धोरणे यांच्यावरून स्पष्ट होतो तो राजकीय विचार आणि अशा विचारांचा कर्ता म्हणजे राजकीय विचारवंत, अशी वैचारिक स्पष्टता मांडून तत्त्व आणि विचार या संकल्पनांना स्पष्टता देण्यात आली आहे. मुळात हा पीएच.डी.चा प्रबंध असल्याने सामाजिक शास्त्रांच्या संशोधन पद्धतीचा काटेकोर अवलंब अपेक्षित असतो. तसा तो केलेला आहे हे वेगळे तपासून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी राजकीय विचारांची चर्चा आणि त्यांची प्रस्तुतता पाहणे महत्त्वाचे आहे.
भटक्या टोळ्या सोयी पाहून स्थिरावल्या, तेव्हा त्यांच्या वर्तनासाठी नियमनात्मक असे दंडक घालून देणे आवश्यक झाले. सर्व सामाजिक शास्त्रांची मुळे यात दडलेली आहेत. कौटिल्याने मात्स्य न्यायाची सार्वकालिकता विचारात घेतली आहे, तशीच मॅकिएव्हेलीनेही मान्य केली आहे. समाज म्हणून एकत्र राहायचे तर दुर्बलांना संरक्षण देण्याची व्यवस्था आवश्यक ठरते. प्रत्येक व्यक्तीला आपापले कल्याण साधण्याचे स्वातंत्र्य दिले तर समाजाचे कल्याण महत्तम होऊ शकेल, हा (१७ – १८ व्या शतकातील) अभिजात विचारवंतांचा विचार कार्ल मार्क्सने खोडून काढला. त्याच्या मते, एकाचे अन्न दुसऱ्याचे विष असते.
थोडक्यात, असे अनेक प्रश्न निर्माण होत गेले आणि यातून राजकीय विचार विकसित होत गेले. या विकासाचा पाया जगभरात ज्या विविध (सुमारे ४६) संस्कृती (सिव्हिलायझेशन) उदयाला आल्या (आणि ऱ्हास पावल्या) त्यांच्यामधील विचारवंतांनी आणि तत्त्वज्ञांनी घातला. अद्यतन सामाजिक सिद्धांतनाची मुळे इतक्या खोल जाऊन शोधावी लागतात. म्हणूनच प्राचीन भारतीय विचारवंत कौटिल्य आणि प्रबोधन युगाच्या निकट असलेला मॅकिएव्हेली यांच्या विचारांची तुलना प्रस्तुत ठरते. किंबहुना, जागतिक पातळीवरील अनेक संस्कृतींपैकी ग्रीक, रोमन, इजिप्शियन इत्यादींबरोबर भारतीय आणि चिनी विचारवंतांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांच्याबरोबरच कौटिल्य, पाणिनी, वैदिक गणितज्ञ इत्यादी प्राचीन भारतीय पूर्वसूरींचा विचार होणे अगत्याचे मानले जाऊ लागले आहे.
मॅकिएव्हेली आणि कौटिल्य या दोघांनीही राजकीय व्यवहाराचा पद्धतशीरपणे अभ्यास करून राजासाठीच ‘राजनीती’चे नियम घालून दिले आहेत. ‘राजाला उपयुक्त ठरावे असे काही लिहावे असा माझा हेतू आहे.. लिहिताना मागे जाऊन सत्याचा शोध घ्यावा व मगच लिहावे, केवळ काल्पनिकपरिस्थितीच्या आधारावर मी लिहू नये..’ अशी स्पष्ट भूमिका मॅकिएव्हेलीने नमूद केली आहे. कौटिल्यानेही आपली भूमिका स्पष्ट करताना स्वच्छ शब्दांत सांगितले आहे-
‘सर्वशास्त्राण्यनुक्रम्य प्रयोगमुपलभ्य च।
कौटिल्येन नरेन्द्रार्थे शासनस्य विधि: कृत:।।’
सर्व शास्त्रांचा धांडोळा घेऊन आणि प्रत्यक्ष प्रयोगांच्या द्वारा (विचारांची) सत्यता पडताळून पाहून मगच राजांसाठी म्हणून शासनाच्या कारभाराची पद्धती कौटिल्याने तयार केली आहे.
उभय विचारवंतांचे राष्ट्रवाद, धर्म, राजकारण व नीती, कायदा व न्याय, सैन्य व युद्धनीती, लोकप्रशासन अशा प्रमुख विषयांबाबतचे विचार या पुस्तकात बारीकसारीक तपशिलांसह चर्चिले आहेत. या दोन्ही विचारवंतांच्या प्रशासनविषयक सूचना आणि व्यावहारिक पातळीवरील सावधानता यांची चर्चा वाचल्यावर त्यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षणाबद्दल अचंबा वाटतो. उदाहरणार्थ, दुपारी झोपा काढणाऱ्यावर लक्ष ठेवावे; कारण रात्री तो काही गुन्हेगारीत गुंतलेला असू शकतो. उन्हाळ्यात वणवे लागतात, नगरातही आगी लागतात म्हणून रांजण भरून कोठे कसे ठेवावेत, याच्या सूचनाही कौटिल्याने केलेल्या आहेत. सर्वस्वी वस्तुनिष्ठ विचार केल्यामुळे युद्धात सर्व काही समर्थनीय ठरते, यावर दोघेही ठाम आहेत; मात्र धार्मिक दृष्टिकोनामुळे कौटिल्याच्या ठायी साधनशुचितेचा थोडाफार विचार आढळतो. विषयनिहाय दोघांचेही दृष्टिकोन दर्शविणारे परिशिष्ट जोडल्यामुळे तुलनेच्या पुष्टय़र्थ लेखकाने घेतलेली ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ ही भूमिका बिनतोड आहे.
स्वातंत्र्यलढा चालू असताना जनतेच्या अस्मितेला आणि उपक्रमशीलतेला खतपाणी घालण्यासाठी प्राचीन भारतातील साहित्य, व्यापार, उद्योग यांचे भरमसाठ कौतुक करण्याची अहमहमिका लागली. ‘राम पुष्पक विमानातून लंकेहून अयोध्येला आले’ असा ‘शोध’ अनेकांनी लावला. अशी पुष्कळ उदाहरणे सांगता येतील. प्रस्तुत ग्रंथात मात्र अतिरेकी अभिनिवेश टाळून ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ हे पथ्य लेखकाने कटाक्षाने आणि सांगूनसवरून पाळले आहे. मात्र, परिशिष्टातील आणि इतरही मजकुरातील कंसात दिलेल्या इंग्रजी प्रतिशब्दांची स्पेलिंग तसेच कौटिल्याच्या संस्कृत उद्धरणांतील शब्द पुढील आवृत्तीत तपासून पाहायला हवेत असे वाटते. कारण रूढ संज्ञा वेगळ्या अर्थाने कौटिलीय साहित्यात वापरल्या गेल्या आहेत. उदा. ‘नागरिक प्रणिधि:’ यातील नागरिक म्हणजे आजचा महापौर!
सोप्या आणि ओघवत्या भाषेत लिहिलेल्या कठीण विषयाला साजेशी सुबक मांडणी करण्याचे काम प्रकाशकांनी केले आहे. यामुळे समसमासंयोग झाला आहे, हे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद. राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन या विषयाच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचकालाही संदर्भ ग्रंथ म्हणून हा ग्रंथ उपयुक्त वाटेल. ख्यातकीर्त विचारवंत म्हणून नावाजलेल्या या दोघांच्या यथार्थ तुलनीयतेमुळे जिज्ञासूंना एक आगळेच दालन खुले झाल्याचा आनंद लाभेल यात शंका नाही.
- ‘कौटिल्याच्या यथार्थ तुलनेत मॅकिएव्हेली’- डॉ. विजय प्रल्हाद देव,
- कॉन्टिनेन्टल प्रकाशन,
- पृष्ठे – ३५७, मूल्य – ३५० रुपये