|| देवेंद्र गावंडे

नक्षलवादाची समस्या हा तसा गुंतागुंतीचा विषय. यात अनेक कंगोरे दडले आहेत. केवळ सरकार विरुद्ध लोकशाही मान्य नसलेले व क्रांतीची भाषा करणारे लोक एवढय़ापुरती ही समस्या मर्यादित नाही. त्याला अनेक सामाजिक व आर्थिक संदर्भ जोडले गेले आहेत. अशा वास्तववादी विषयाला हात घालण्याचे धाडस लेखक सुरेश पाटील यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी कादंबरीचा प्रकार निवडला आहे. असा प्रकार निवडल्यानंतर त्यात कल्पनाविस्ताराला भरपूर वाव असतो. त्याचा पुरेपूर उपयोग लेखकाने करून घेतला आहे असे ही कादंबरी वाचताना जाणवत राहते. परंतु ही कादंबरी केवळ रंजनाच्या पातळीवरच मनात रुंजी घालते;  विचार करायला प्रवृत्त करत नाही.

मुळात नक्षलवाद हा विषयच गंभीर आणि अनेकांच्या जीवनमरणाचा प्रश्न ठरलेला. तरीही पाटलांची ‘नक्षलबारी’ ही कादंबरी वाचताना मात्र आपण एक वेगवान, मसालेदार सिनेमा तर बघत नाही ना, असा भास होत राहतो. पाटील यांची भाषा प्रवाही व रसाळ आहे. कादंबरीचे कथानक वेगवान ठेवण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, ते वास्तवाशी मेळ खात नाही. या मुद्दय़ावर अनेक ठिकाणी ही कादंबरी भरकटते. वाचक कुठलाही असो- तो ही कादंबरी वाचताना ‘नक्षलवाद’ डोळ्यासमोर ठेवणारच. तिथे लेखक अपेक्षाभंग करतो. मुळात असे विषय हाताळताना त्यासंबंधीचे बारीकसारीक तपशील लेखकाने ध्यानात घेणे आवश्यक असते. तेव्हाच ते पुस्तक परिपूर्णतेच्या पातळीवर उतरते. लेखक नेमका इथेच कमी पडला आहे.

या कादंबरीचा नायक आहे पोलीस अधीक्षक महेंद्र वाघरा. तो नक्षलग्रस्त जिल्ह्य़ाचा प्रमुख होतो- तिथून ही कादंबरी सुरू होते आणि त्याची बदली झाल्यावर संपते. नायकाला त्याच्या कार्यकाळात आलेल्या अनुभवावर या कथानकाचा विस्तार होत जातो. तो करताना लेखकाने नक्षलवादी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, पोलीस अधिकारी अशी अनेक पात्रे उभी केली आहेत. यापैकी बहुतांश पात्रांचे वागणे, त्यांच्या तोंडी असलेली भाषा, ते वावरत असलेल्या परिसराचे वर्णन वास्तवाशी अजिबात साधम्र्य असणारे नाही. नायकाला सलामी म्हणून नक्षलींनी घडवून आणलेल्या पहिल्या स्फोटात, शहीद झालेल्या जवानांची संख्या लेखक कुठे नऊ, तर कुठे २३ इतकी नोंदवतो. अशा स्फोटाची चौकशी माजी पोलीस महासंचालकांकडून करण्याचे एकही उदाहरण वास्तवात नसताना लेखक कथानक फुलवताना तशी नोंद करतो. केवळ गडचिरोलीच नाही, तर एकूणच नक्षलग्रस्त भागात बहुतांश व्यापार बंगाली, मुस्लीम व आर्यवैश्य समाजांत एकवटलेला आहे. लेखक मात्र सिंधी, पंजाबी, मारवाडी यांचा उल्लेख करतो. यासारखी अनेक उदाहरणे कादंबरीत ठिकठिकाणी सापडतात. असले विषय हाताळायचे म्हटल्यावर कथानक जरी काल्पनिक असले तरी त्याला खरेपणाची जोड देण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास आवश्यक ठरतो. एक- आदिवासींची संस्कृती, त्यांची जीवनशैली व दुसरी- नक्षलींची कार्यपद्धती. या दोन्ही मुद्दय़ांचा लेखकाचा सखोल अभ्यास नाही, हे जाणवते.

‘गोटूल’ हा आदिवासींच्या जीवनातील अविभाज्य घटक. या जमातीतील मुलामुलींचे नाते त्याभोवती विणलेले असते. लग्नानंतर- विशेषत: मुलींवर अनेक मर्यादा येतात. लेखक गोटूलचा उल्लेख कुठे करत नाही; पण मुलामुलींच्या संबंधांबाबत अनेकदा चुकीची विधाने करतो. ‘आदिवासींमध्ये प्रणयाला फार महत्त्व नाही. त्यामुळे नक्षलींचे फावले,’ असे बेजबाबदार विधान लेखक सखोल माहितीअभावी करतो.

नक्षलवादामुळे सर्वात जास्त कोंडी झाली आहे ती आदिवासींची. या कादंबरीच्या माध्यमातून ही घुसमट दाखवण्याची चांगली संधी लेखकाला होती, पण त्यांनी ती दवडली आहे. पोलीस दलात गेलेले आदिवासी वगळता, उर्वरित सारेच नक्षलसमर्थक असल्याचे चित्र यातून उभे राहते पण ते वास्तवाला धरून नाही. उलट, या युद्धात अडकले आहेत ते आदिवासीच! त्यांची व्यथा सांगणारे एकही पात्र यात नाही. नक्षलींची कार्यपद्धतीही लेखकाला फारशी अवगत नसावी. नक्षलवादी भाकरी खातात, असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. मुळात नक्षलग्रस्त भागातील मुख्य पीक भात हे आहे व तेच आदिवासी, नक्षली व त्या भागातील सर्वाचेच खाद्य आहे. नक्षली ब्रेड-बटर खातात, स्वयंपाकासाठी स्टोव्ह वापरतात, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली वापरतात.. असे सर्रास आलेले उल्लेख चुकीचे आहेत. येथील लोकजीवनाचे खरे चित्र असे नाही. कादंबरीत अनेकदा नक्षली, प्राण्यांची शिकार करण्यासाठी बंदूक वापरतात असा उल्लेख आहे. मुळात नक्षली केवळ शत्रूविरुद्धच बंदुकीचा वापर करतात. आदिवासींना मारण्यासाठीसुद्धा ते अनेकदा कुऱ्हाडीचा वापर करतात. नक्षली जंगलात उठसूठ कधीही बंदुकीचे बार उडवत नाहीत. नक्षलींच्या हिंसक कार्यपद्धतीबाबतही लेखकाचा गोंधळ उडालेला दिसतो. बुकेत बॉम्ब ठेवणे, झाडावर लपून हल्ला करणे अशी नक्षलींची कार्यपद्धती नाही. माओवादी व नक्षली एकच आहेत, तरीही लेखक ‘आंध्रमधील माओवाद्यांनी नक्षलींची सूत्रे हाती घेतली..’असे चुकीचे विधान करतो.

या कादंबरीत खटकणारा मुद्दा भाषेचासुद्धा आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना लेखक ‘वडाप’ म्हणतो. हा शब्द पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित आहे. या भागात नाही. ‘गायीचा पाडा भुळकी लागून मेला’ हेही वाक्य असेच खटकते. नक्षलींकडून आदिवासी मुलींचे शोषण होते हे खरे आहे. मात्र, कादंबरीत ते रंगवताना लेखकाने अतिरेक केला आहे. दिसली मुलगी की कर शारीरिक शोषण अशी नक्षलींची कार्यपद्धती अजिबात नाही. चळवळीतील महिलांचा सामूहिकरीत्या उपभोग घेण्याचे अनेक प्रसंग कादंबरीत आहेत, ते वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहेत. ही कादंबरी असल्याने यातील कथानक कसे असावे, हे ठरवण्याचा अधिकार लेखकाला आहेच; तरीही वास्तववादी विषय हाताळताना जी काळजी घ्यायला हवी होती, ती लेखकाने घेतलेली नाही.

लेखक एकीकडे या कादंबरीचा वास्तवाशी काही संबंध नाही असे सांगतो व दुसरीकडे नक्षलवादाबद्दल माहिती देताना देशभरात घडलेल्या अनेक घटनांचा आधार घेतो. हे विरोधाभासी आहे. कादंबरीतील केवळ नक्षली व आदिवासींच्याच बाबतीत नाही, तर इतर पात्रांच्या बाबतीतसुद्धा शरीरसंबंधांबाबत लेखकाने लिहिलेले तपशील येथे अप्रस्तुत ठरतात कारण ही शृंगारप्रधान कादंबरी नाही. नक्षलींच्या विचारांत मूर्तिपूजेला स्थान नाही. यातील नक्षलप्रमुख केटी गावच्या पुजाऱ्याला- म्हणजे भगताला सोबत ठेवतो व बंगालमधील मूर्तिपूजेचे उदाहरण देतो हेसुद्धा पटणारे नाही. तेथील नक्षलींनीसुद्धा कधीही मूर्तिपूजेवर विश्वास ठेवलेला नाही, हा इतिहास कदाचित लेखकाला ठाऊक नसावा. त्याचवेळी लेखक आदिवासींचे नेतृत्व करणाऱ्या नक्षलींचे धर्मातराकडे कसे दुर्लक्ष झाले आहे, हा मुद्दा प्रभावीपणे मांडतो. या भागात नक्षलींना मिळणारी मदत, त्यांना मदत करणारे राजकारणी, मंत्री व कंत्राटदार तसेच नक्षलींचे संबंध यांतून उद्भवणारे प्रसंग यांची गुंफण मात्र लेखकाने अतिशय प्रभावीपणे केली आहे. कादंबरीत प्रसंगानुरुप येणाऱ्या वर्णनांत नक्षलवादाचे भयावह स्वरूप दाखवताना, लेखकाने या विषयावरील इतर पुस्तके व वृत्तपत्रीय बातम्यांचा आधार घेतला आहे. मात्र, हे करताना अनेक चुकीचे उल्लेखही आले आहेत. या कादंबरीचा सूर नक्षलविरोधी आहे. पोलिसांना नायक व नक्षलींना खलनायक ठरवताना लेखकाने या समस्येचे मूळ काय, या सगळ्यात आदिवासींची कोंडी कशी होते याचा वेध घेणे मात्र टाळले आहे. नक्षलींचा मार्ग चुकीचा असला आणि त्यांची हिंसा अजिबात मान्य नसली, तरी त्यांनी उपस्थित केलेले अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याला ही कादंबरी फारच उथळपणे स्पर्श करते.  या विषयावर आलेली ही मराठीतील दुसरी कादंबरी. खूप वर्षांपूर्वी सुरेश द्वादशीवारांची ‘हाकूमी’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्या तुलनेत सुरेश पाटील कमी पडले असले तरी त्यांचा प्रयत्न रंजनाच्या पातळीवर कौतुकास्पद आहे. एकूणच सखोल अभ्यास न करता लिहिलेली ही कादंबरी अपेक्षाभंग करते.

  • ‘नक्षलबारी’- सुरेश पाटील,
  • संस्कृती प्रकाशन, पुणे.
  • पाने- ६२४, किं.- ६८० रु.

devendra.gawande@expressindia.com