प्रा. रिचर्ड एटन, टोनी ज्युड हे माझे अत्यंत आवडते इतिहासकार. यातील टोनी ज्युड यांचा युरोपचा इतिहास अद्वितीय, तर प्रा. एटन यांनी भारताच्या मुगल-कालीन इतिहासावर केलेल्या लिखाणास तोड नाही. प्रा. एटन यांचे लिखाण भारतविषयक. पण तितके अभ्यासपूर्ण लेखन भारतीय इतिहासकारांकडून क्वचितच झाले.
त्यामुळे प्रा. एटन यांच्यासारखा अभ्यासक जेव्हा ‘‘ताराराणींच्या कर्तबगारीस इतिहासात तोड नाही,’’ असे म्हणतो, ‘‘औरंगजेबासारख्या एकेकाळच्या अत्यंत सामर्थ्यवान राज्यकर्त्याविरोधात तिने दिलेला लढा अतुलनीय आहे,’’ असे म्हणतो; तेव्हा ताराराणींचे विश्वसनीय चरित्र वाचणे हे आवश्यक कर्तव्य ठरते. तथापि ते वाचल्यावर मनात खजीलतेची भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. हे विश्वसनीय चरित्र डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’.
मराठ्यांचा इतिहास, त्यातही कोल्हापूर गादीची पाळेमुळे, शाहू छत्रपतींची कर्तबगारी आदी विषयांवर डॉ. पवार यांच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी कोणती नसेल. त्यांच्या हातून जवळपास ८०० पानांचा हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. ऐतिहासिक लिखाणासाठी सर्व आवश्यक तपशिलाने तो भरलेला असूनही त्याच्या प्रवाहीपणात जराही अडथळा येत नाही. याची प्रमुख कारणे दोन. डॉ. पवार यांचा अभ्यास हे एक आहेच; पण त्या जोडीला ताराराणींना आयुष्यात करावा लागलेला संघर्ष. तो कमालीचा नाट्यमय आहे. आपला मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी आणि काही प्रमाणात राजाराम यांच्या पुरताच मर्यादित राहिलेला आहे.
राजाराम-ताराराणी या साधारण १६८९ ते १७०७ पर्यंतच्या कालावधीतील घडामोडींविषयी आपण तितके परिचित नसतो. म्हणूनच ताराबाईंची ही शौर्यगाथा अचंबित करून जाते. या कालातील तिच्या नेतृत्वाचे कौतुक जदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई आदींनीही केलेले आहे. तरीही स्त्रियांच्या कर्तृत्वास कमी लेखण्याच्या पुरुषी अहंकारामुळे असेल; पण ताराराणींच्या कर्तृत्वाबाबत बहुसंख्य अनभिज्ञ असतात हे खरे! ती मोठी उणीव हा ग्रंथ भरून काढतो. या ग्रंथास पवार यांची विस्तृत अशी चाळीस पानी प्रस्तावना आहे. तीत ते विविध इतिहासकारांचे ‘त्या’ इतिहासाचे आकलन यावर भाष्य करतात.
ग्रंथाचा प्रारंभ छत्रपतींचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या विवाहापासून होतो. त्याच्या तपशिलात ताराराणींचे माहेरचे घराणे आदी भाग येतो. ताराराणी या शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती म्हणून गाजलेले हंबीरराव मोहिते यांची कन्या. जन्म १६७५. म्हणजे छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर. पुढे १६८३-८४ च्या सुमारास राजाराममहाराजांशी विवाह. रायगडास मोगलांनी वेढा घातल्यानंतर १६८९ साली जिंजीला जाण्यासाठी महाराज राजाराम हे ताराबाईंना घेऊन बाहेर पडले आणि त्या मोगल सैन्याला चुकवीत विशालगड, जिंजी आदी ठिकाणी राहिल्या. राजाराम १७०० साली गेले. त्यावेळी ताराराणी पंचविशीतील असणार. पण त्या वयात त्यांनी दाखवलेले युद्धकौशल्य आणि राजकारण पाहणे कमालीचे कौतुकास्पद ठरते. पुढचा काळ महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचा. तो लक्षात घेणे महत्त्वाचे, कारण छत्रपती संभाजीराजांची पत्नी येसुबाई आणि मुलगा शाहू मुघलांच्या कैदेत असताना, एकापाठोपाठ एक किल्ले, प्रदेश शत्रुहाती जात असताना आणि महाराष्ट्र धर्म लयास जाणार असे वाटत असताना ताराराणींनी मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने हे मरण लांबवले.
संताजी-धनाजी यांस मदतीस घेऊन त्यांनी दाखवलेले युद्धकौशल्य हे औरंगजेबाच्या त्राग्याचे आणि अपयशाचे महत्त्वाचे कारण. या अपयशाच्या अपश्रेयाखालीच त्याचा मृत्यू ओढवला. पुढे ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी नर्मदापार मोगलांचा पाठलाग केला आणि त्यांना पराभूत केले.
परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या ताब्यातील शाहू महाराजांची सुटका झाली आणि ते आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला. त्यात ताराराणींच्या पक्षातले एकेक सरदार बाहेर पडून तिकडे शाहूस मिळाले. येथून पुढचा संघर्ष हा मराठ्यांमधील आपापसातील संघर्ष आहे. त्यातही ताराराणींनी दाखवलेला पोक्तपणा कौतुकास्पद ठरतो. त्यांना दीर्घायुष्य मिळाले. अगदी पेशवाईचा उदयही त्यांनी पाहिला. वयाच्या ८६ व्या वर्षी १७६१ साली त्यांचे निधन झाले. इतका प्रदीर्घकाळ इतिहासावर प्रभाव टाकणारी त्यांची कामगिरी.
त्याची अत्यंत विस्तृत आणि प्रवाही मांडणी डॉ. जयसिंगराव करतात. वेळोवेळी दिलेले मूळ दाखले, काही पत्रांच्या प्रतिमा, रेखाटणे इत्यादी असूनही कोठेही वाचनाचा प्रवाहभंग होत नाही. या ग्रंथलेखनासाठी डॉ. पवार यांचे मानावेत तितके आभार कमीच ठरतील.
पुण्या-मुंबईतील प्रकाशक, वर्तमानपत्राच्या पुरवणी संपादकांची धन करून आणि त्यांना हाताशी धरून इतिहासकार म्हणून मिरविण्याचे चातुर्य अंगी नसल्याने जयसिंगरावांचे इतिहास लेखन तसे दुृर्लक्षित राहिले. त्याचमुळे ताराराणींवरील या महत्त्वाच्या ग्रंथाची दखल जेवढी घेतली जायला हवी होती, तितकी घेतली गेली नाही.
‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ – डॉ. जयसिंगराव पवार
- प्रकाशक : महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी
- पाने- ७८६, किंमत १५०० रुपये
girish.kuber@expressindia.com