07 July 2020

News Flash

युवा आव्हानापुढे अनुभवाची परीक्षा

सलग नऊ निवडणुकांमधील विजयाचा अनुभव गाठीशी असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित आणि भाजपच्या उमेदवार

| April 16, 2014 04:38 am

सलग नऊ निवडणुकांमधील विजयाचा अनुभव गाठीशी असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित आणि भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्यात होणारी नंदुरबार मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होईल. स्वातंत्रोत्तर काळापासून या मतदारसंघावर असलेली पकड कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला जिवापाड प्रयत्न करावे लागत असताना एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी डॉ. हीना यांचे समर्थकही सज्ज झाले आहेत.
सलग दहाव्यांदा विजयी होऊन विक्रम करण्याची ईर्षां माणिकरावांनी बाळगली असताना त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदावर पाणी सोडत आपली कन्या हीना यांच्या रूपाने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. मागासलेपण, कुपोषण, स्थलांतर आणि पुनर्वसन अशा नानाविध मुद्दय़ांनी गाजत राहिलेला आणि मानव विकास निर्देशांकाच्या फुटपट्टीवर सातत्याने शेवटच्या क्रमांकावर असलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख. जिल्हा निर्मितीपासून आजतागायत या जिल्ह्यावर केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबदबा राहिला आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच नंदुरबारमध्ये सवतासुभा राहिला असून त्यांच्यातील वाद यंदा अगदीच विकोपाला गेले आहेत. भाजप-शिवसेना यांसारख्या विरोधी पक्षाची ताकद काँग्रेस-राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीने हळूहळू वाढू लागली आहे.
माणिकरावांना शह देण्यासाठी डॉ. विजयकुमार गावित यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही भाजपसाठी काम करत असल्याचे चित्र आहे. त्यातच नंदुरबार जिल्हा गुजरातलगत असल्याने नरेंद्र मोदी यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षण आहे.  दुसरीकडे निवडणुकांचा गाढा अनुभव आणि काँग्रेस नेत्यांची एकजूट या जोरावर माणिकराव निवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीत माणिकराव विजयी झाल्यास तो ‘जागतिक विक्रम’ होऊन मतदारसंघास विशेष सवलती मिळतील, असा प्रचार होत असून त्याचा ईप्सित परिणाम दिसू लागला आहे. याव्यतिरिक्त वीरेंद्र वळवी यांच्या रूपाने आपने आपल्या क्षमतेची चाचणी घेण्याचे ठरविले आहे.
नंदुरबार जिल्ह्य़ातील चार आणि धुळे जिल्ह्य़ातील साक्री व शिरपूर या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभा मतदारसंघात आहे. गांधी कुटुंबीयांचा देशातील सर्वाधिक प्रिय मतदारसंघ म्हणून नंदुरबारची ओळख आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी या सर्व नेत्यांनी नंदुरबारमधील सभेपासूनच निवडणूक प्रचारास सुरुवात केल्याचा इतिहास आहे. इतक्या बडय़ा नेत्यांचे लक्ष असतानाही या मतदारसंघातील समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत. रोजगारासाठी लोकांना मोठय़ा प्रमाणात स्थलांतर करावे लागते. कुपोषण, मागासलेपण या समस्या कायम आहेत. गुजरातला वरदान ठरलेल्या सरदार सरोवरामुळे या मतदारसंघातील विस्थापित झालेल्या आदिवासींना आजही पुनर्वसनासाठी झटावे लागत आहे. त्यामुळे सत्ता कोणाचीही येवो, आमचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत, अशी मतदारांची अपेक्षा आहे.

जनमानसात ‘साधा माणिकराव दादा’ अशी माझी प्रतिमा आहे. आजही त्यांचा विश्वास कायम आहे. त्यामुळेच माझा विजय निश्चित आहे. त्यांच्या पाठिंब्यावर या मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली आहेत. यापुढेही या कामांमध्ये कोणताही खंड पडणार नाही.
   – माणिकराव गावित (आघाडी)

या वंचित मतदारसंघासाठी भरीव कामगिरी करायची आहे. सातत्याने निवडून येऊनही येथे काँग्रेसकडून कोणतीही विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी काम करण्याचा माझा निश्चय आहे.
    – हीना गावित, (महायुती)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2014 4:38 am

Web Title: experience versus youth challenges in nandurbar constituency
Next Stories
1 ‘मोदी लाट’ तारकही अन् मारकही
2 मतदान हा महत्त्वाचा अधिकार
3 चाकरमान्यांवर पोलिसांची करडी नजर
Just Now!
X