नरेंद्र मोदींचा झंझावाती विजय घेऊन आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेससह देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना ‘वाटेला’ लावल्याने आता या पक्षात पराभवानंतरचे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याची सुरुवात मोदींच्या पंतप्रधानपदावरून एनडीएशी फारकत घेतलेले जदयुचे नेते नितीशकुमार यांच्या बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याने झाली. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये तर सोनिया आणि राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र, अशी वेळ येणार नसली तरी पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत बिहारमधील २० जागा जिंकणाऱ्या जदयुला स्वबळावर यंदा दोनच जागा जिंकता आल्या. याची जबाबदारी घेत नितीशकुमार यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्याकडे सोपवला. ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल जदयुसाठी चांगले नाहीत. निवडणुकीत मी पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व केले. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी माझ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे,’ असे नितीश म्हणाले. परंतु, विधानसभा बरखास्तीची शिफारस करण्याचे टाळून त्यांनी राज्यातील राजकारणाला नवे वळण दिले. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत जदयुचे ११७ सदस्य असून भाजपचे ९० आणि राजदचे २४ सदस्य आहेत. जदयुला काँग्रेस, भाकप आणि दोन अपक्ष अशा सात सदस्यांचा पाठिंबा आहे. दरम्यान, जदयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड रविवारी केली जाईल, असे म्हटले आहे. त्याच वेळी राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे सांगत त्यांनी राष्ट्रीय जनता दलालाही साद घातली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यांत होऊ घातली आहे. या पाश्र्वभूमीवर बिहारमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी काँग्रेसची बैठक
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर सोनिया व राहुल गांधी पदाचा राजीनामा देणार असल्याच्या अफवांचे पेव फुटले आहे; परंतु दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिल्यास त्यांची जागा कोण घेणार, असा प्रतिप्रश्न विचारून पक्षातून या अफवांचे खंडन करण्यात येत आहे. सोनिया गांधी यांनी सोमवारी, २० मे रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा करिश्मा न चालल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे राहुल यांच्या सल्लागारांना बदलण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने जयराम रमेश, मोहन प्रकाश, सॅम पित्रोदा यांची पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. पराभवानंतर ‘नैतिक’ जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणाऱ्यांना सोनिया गांधी यांनी राजीनामा परत घेण्याची विनंती केली आहे. राज्यांतील पराभवाची जबाबदारी जर स्थानिक नेतृत्वावर असेल तर देशभरात झालेल्या पराभवासाठी गांधी कुटुंबातील सदस्यांनादेखील राजीनामा द्यावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कुणाचाही राजीनामा न घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत मांडण्यात येईल. मात्र पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.