काँग्रेसच्या पाठिंब्यावर तिसरी आघाडी देशाला स्थिर सरकार देईल, असे भाकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वर्तवले आहे. सध्याचा कल पाहता सरकार स्थापनेसाठी भाजपकडे अपेक्षित संख्याबळ असणार नाही. तिसऱ्या आघाडीशी निगडित पक्षांना सर्वाधिक जागा मिळतील असा दावा त्यांनी केला. मात्र तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थिर राहत नाही असे विचारता, भारतीय लोकशाही प्रगल्भ झाली आहे असे उत्तर दिले. काँग्रेस जेव्हा कमकुवत होते तेव्हा ती समाजवाद्यांना पाठिंबा देते असा राम मनोहर लोहियांच्या वक्तव्याचा दाखलाही त्यांनी दिला.

काँग्रेसकडून मात्र खंडन
निवडणुकीनंतर यूपीए-३ आघाडी सरकार सत्तेवर येईल, असा दावा करीत काँग्रेसने तिसऱ्या आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणार असल्याची शक्यता सपशेल फेटाळली. आमचेच सरकार सत्तेवर येणार आहे, असे पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी सांगितले.