आंदोलनातून जन्म घेऊन राजकारणात उतरलेल्या आम आदमी पक्षात सारे काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत. पक्षाचे संस्थापक सदस्य अश्विनी उपाध्याय यांची हकालपट्टी केल्यानंतर पक्षात नेतृत्वाचा वाद उफाळला असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वास डॉ. कुमार विश्वास समर्थकांनी आव्हान दिल्याने पक्षातील आपलेपणाला उतरती कळा लागल्याचे दिसू लागले आहे.
उपाध्याय यांनी सतत पक्षविरोधी कारवाया सुरू ठेवल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे एका वाक्याचे प्रसिद्धिपत्रक आपने जारी केले असले, तरी उपाध्याय यांनी मात्र असा आदेश आपल्याला मिळाला नसल्याचे म्हटले आहे. उलट, केजरीवाल यांच्या जागी पक्षाच्या निमंत्रकपदी कुमार विश्वास यांच्या नियुक्तीसाठी आग्रह धरला जाईल, असे सांगत त्यांनी केजरीवाल गटालाच आव्हान दिले. केजरीवाल यांना निमंत्रकपदावरून हटविण्याबाबत आम्ही कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करत आहोत, असे उपाध्याय यांनी सांगितल्याने पक्षात खळबळ माजली आणि कुमार विश्वास यांनी तातडीने त्याचे खंडन करण्याचाही प्रयत्न केला. अरविंद केजरीवाल हे केवळ पक्षाचे नेते नव्हेत, तर आपल्याला बंधूसमान आहेत, अशी ट्विपण्णी त्यांनी प्रसारित केल्यानंतरही ही मोहीम थंडावली नसल्याचे कळते. आम्हा दोघांमध्ये अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आमच्यातील नात्याची कल्पना नसावी, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.
नक्षलवादी, दहशतवादी आणि विघटनवाद्यांच्या सहानुभूतीदारांना पक्षातून हटविण्याची मागणी अश्विनी उपाध्याय यांनी एका पत्राद्वारे केजरीवाल यांच्याकडे केली होती, त्यानंतरच पक्षातील संघर्ष चिघळला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याआधी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने उपाध्याय यांनी केजरीवाल यांच्यावर खोटारडेपणाचा व सीआयएचे हस्तक असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, काही उमेदवारांनी मतदारांना पैसे वाटप सुरू केल्याच्या बातम्यांनी आपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या लखनऊ मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी आपचे उमेदवार व अभिनेते जावेद जाफरी यांनी मतदारांना पैसे वाटल्याची एक व्हिडीओफीत सोशल साइटवर फिरत आहे. प्रतिकूल अहवाल आल्याने १५ जणांची उमेदवारी मागे घ्यावी लागली, तर काही मतदारसंघांत प्रचार साहित्य व निधीही मिळत नसल्याने उमेदवारांनीच माघार घेतल्याने आपवर आफत ओढवली आहे. गेल्या काही दिवसांत या कारणामुळे चार उमेदवारांनी आपली नामांकनपत्रे मागे घेतल्याने आपचा पक्षांतर्गत ताप वाढला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या जागी पक्षाच्या निमंत्रकपदी कुमार विश्वास यांची नियुक्ती करण्याबाबत आग्रह धरला जाईल. केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रकपदावरून हटविण्याबाबत आम्ही कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करत आहोत.
अश्विनी उपाध्याय
अरविंद केजरीवाल हे केवळ पक्षाचे नेते नव्हेत, तर आपल्याला बंधूसमान आहेत. आम्हा दोघांमध्ये अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आमच्यातील नात्याची कल्पना नसावी.
कुमार विश्वास
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘आप’मध्ये आफत
आंदोलनातून जन्म घेऊन राजकारणात उतरलेल्या आम आदमी पक्षात सारे काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत. पक्षाचे संस्थापक सदस्य अश्विनी उपाध्याय यांची हकालपट्टी केल्यानंतर पक्षात नेतृत्वाचा वाद उफाळला
First published on: 07-04-2014 at 12:56 IST
TOPICSअरविंद केजरीवालArvind Kejriwalलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trouble in aap