अमेठीत स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे चांगले काम सुरू आहे, असे मंगळवारी रात्री मी केलेले वक्तव्य म्हणजे काँग्रेसचे किंवा राहुल गांधी यांचे समर्थन नव्हे, असा खुलासा भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि राहुल यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांनी बुधवारी केला. वरुण यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती, तर राहुल यांनीही आपल्या कौतुकाबाबत समाधान व्यक्त केले होते.
वरुण यांनी बुधवारी ट्विटरवरून म्हटले की, ‘शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत मला अमेठीतल्या कामाबद्दल विचारले गेले.  स्वयंसहा-य्यता गटांच्या माध्यमातून तिथे चाललेल्या कामाची माहिती मी ऐकली आहे आणि ती अतिशय आशादायक आहे. स्वावलंबनातून लोकांचा विकास साधण्यासाठी माझादेखील भर राहील.’
मर्यादा पाळणार..!
विशेष म्हणजे, या आधी मार्च महिन्यात राहुल यांच्याविरुद्ध अमेठीत प्रचार करण्यास वरुण गांधी यांनी नकार दिला होता. राजकारणाविषयी काही मर्यादा मी स्वत:हून ठरविल्या असून त्या मी ओलांडणार नाही, असे वरुण यांनी सांगितले होते.