मतांसाठी मुंडे मनसेच्या दारात!

‘मनसेला महायुतीत घेण्याचा मुद्दा आता संपला आहे’,‘मनसेच्या पाठिंब्याची एनडीएला गरज पडणार नाही’.. अशी वक्तव्ये करून शिवसेनेला खुश करणारे भाजपचे ज्येष्ठे नेते गोपिनाथ मुंडे

‘मनसेला महायुतीत घेण्याचा मुद्दा आता संपला आहे’,‘मनसेच्या पाठिंब्याची एनडीएला गरज पडणार नाही’.. अशी वक्तव्ये करून शिवसेनेला खुश करणारे भाजपचे ज्येष्ठे नेते गोपिनाथ मुंडे यांनी स्वत:च्या, बीड मतदारसंघात मते मिळवण्यासाठी मात्र मंगळवारी मनसेला अक्षरश: साकडे घातले. बीडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मंगळवारी दुपारपासून राज ठाकरे यांना फोनवर फोन करणाऱ्या मुंडेंना राज यांनी जाहीर पाठिंबा दिला खरा; पण मंगळवारी सायंकाळीच मुंबईत झालेल्या सभेत या ‘मिनतवारी’चा तपशील मांडत त्यांनी मुंडे यांची कोंडी केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये अशी विनंती केल्यानंतर सेना नेतृत्वाने गडकरी यांची व्यापारी म्हणून संभावना करत प्रचंड आगपाखड केली. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीच राज यांना दोन वेळा दूरध्वानी करून बीडमध्ये स्वत:साठी लेखी पाठिंबा देण्याची मागणी केली आणि राज यांनीही ‘उदार’पणे मुंडे यांना लेखी पाठिंबा जाहीर केला. मात्र यामुळे शिवसेनेत ‘राज’कीय भूकंप झाला असून आता भाजपबाबत काय भूमिका घ्यायची असा प्रश्न सेनेनेत्यांपुढे निर्माण झाला आहे.
राज ठाकरे हे सकाळी रंगशारदा येथे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातील मुलाखतीसाठी जात   असताना गोपीनाथ मुंडे यांचा दूरध्वनी आला. ‘राजसाहेब, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय.. बीडमध्ये मनसेचा पाठिंबा मला द्यावा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे..’ असे आर्जव मुंडेंनी यावेळी केले. त्यानंतर थोडय़ाच वेळात पुन्हा मुंडे यांचा फोन आला आणि तुम्ही लेखी पाठिंबा जाहीर केला तर तुमचे कार्यकर्ते निश्चितपणे मला मत देतील, असे सांगत त्यांनी पुन्हा राज यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जोगेश्वरी येथील सभेला जाण्यापूर्वी राज यांनी मुंडेंना पाठिंबा देण्याचे जाहीर पत्रक काढले. बीड लोकसभा मतदारसंघातून मुंडे यांना निवडून आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करावे असे आवाहन राज यांनी केले.
राज यांच्या या पाठिंब्यामुळे मुंडे सुटकेचा निश्वास सोडत असतानाच, जोगेश्वरीमधील सभेत खुद्द राज यांनीच या संपूर्ण घडामोडींचा तपशील मांडून मुंडे यांची चांगलीच गोची केली. मुंडे यांचे ‘पितळ’ उघडे पडल्याने मनसेविरोधात आक्रमक असलेला भाजपचा मित्र पक्ष शिवसेना आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
‘मन मोठे असल्यानेच मुंडेंना पाठिंबा’
गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला पाच-सहा वेळा दूरध्वनी करून पाठिंबा मागितला. माझे मन मोठे असल्याने त्यांना बीड लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. कालपर्यंत मनसेची गरज नाही, त्यांची ताकद नाही आणि मनसेला महायुतीची दारे बंद, असे सांगणाऱ्या मुंडे यांची खिल्ली उडवत त्यांना मतदान करण्याचे आवाहन राज यांनी बीडमधील आपल्या कार्यकर्त्यांना केले. आपला पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे, राजनाथसिंह यांना नाही, असा टोलाही त्यांना लगावला.
महाराष्ट्राच्या हितासाठी आपण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला असून त्याबदल्यात मंत्रिपद अथवा काहीही मागणार नाही, असेही राज यांनी उत्तर पश्चिम येथील मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांच्या जोगेश्वरी येथील प्रचारसभेत सांगितले. मनसेच्या वर्धापनदिनापासून सातत्याने मोदींना पाठिंबा का दिला म्हणून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मी जर कोणाला पाठिंबा दिला नसता तर याची काँग्रेसशी छुपी युती आहे, असेही म्हणण्यास माध्यमांनी कमी केले नसते. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत पोहोचावा यासाठीच लोकसभा निवडणूक लढत असून मोदी हेच देश सक्षमपणे चालवू शकतील असा मला विश्वास आहे. उ. प्रदेशमधून एवढे पंतप्रधान निवडून आले. मग तेथील विकास का होऊ शकला नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns support gopinath munde in beed