एखादी मोहीम सुरू होताच सेनापती ती अध्र्यावर सोडून अचानक दुसऱ्या कामगिरीवर निघून गेला तर सैन्याची अवस्था नेमकी कशी असेल. अशीच काहीशी अवस्था गेल्या महिनाभरापासून ठाण्यातील शिवसैनिकांची झाली आहे. एकनाथ िशदे यांच्यासारखा खंदा नेता कल्याणमध्ये चिरंजीवाच्या व्यूहरचनेत अडकून पडल्याने ठाण्यावर भगवा फडकविण्याची मोहीम सर करताना शिवसेनेला अक्षरश घाम फुटू लागला आहे. तरीही नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊन आपण दिल्ली गाठूच, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात विस्कळीत प्रचार आणि आर्थिक रसदेचा अभाव यामुळे शिवसेनेच्या गोटात सावळागोंधळ असला तरीही पालकमंत्री गणेश नाईक आणि विद्यमान खासदार संजीव नाईक यांना यंदाची निवडणूक सोपी राहिलेली नाही. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये मोठय़ा संख्येने असलेला गुजराथी-मारवाडी समाज यंदा नेमकी कोणती भूमिका घेतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे ठाण्यावर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेला स्वपक्षाच्या करिष्म्यापेक्षा मोदी हवेवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाण्यातील तीन, नवी मुंबईतील दोन तर मीरा-भाईंदर परिसरातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सुमारे २१ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात ठाण्यातील दहा लाख तर नवी मुंबई, मीरा-भाईंदर परिसरातील सुमारे ११ लाख मतदारांचा समावेश होतो.
शिवसेनेने या मतदारसंघातून ठाणे शहराचे आमदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. ठाण्यातील उमेदवार ही बाब विचारे यांच्या पथ्यावर पडणारी असली तरी प्रचारादरम्यान घरच्या मैदानातूनच त्यांना संघटनेची हवी तशी साथ मिळत नव्हती, असे दिसून आले. नवी मुंबईसारख्या बालेकिल्ल्यात मोठे मताधिक्य पदरात पाडून घेताना नाईक यांना यावेळी कसरत करावी लागेल, असे चित्र आहे. संजीव नाईक यांचा व्यक्तिगत जनसंपर्क ही त्यांच्यासाठी या भागात जमेची बाजू आहे. मनसेने येथून शिवसेनेतून आयात केलेले अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली असली तरी संघटनात्मक पातळीवर मनसेचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याने पानसे यांना मतदारांपर्यंत पोहचविताना पदाधिकाऱ्यांना बरीच कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील जाहीर सभेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने मनसेच्या गोटात अस्वस्थता आहे. आम आदमी पक्षाकडून संजीव साने आणि धर्मराज्य पक्षाकडून नितीन देशपांडे हे दोन ठाणेकर उमेदवार कोणाच्या मतांवर डल्ला मारतात याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.
संसद अधिवेशनाचे दिवस सोडले तर सतत मतदारसंघात राहण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर येथील रहिवाशांसाठी रेल्वे सेवा सक्षम करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात विस्तारित स्थानक उभारण्याचा माझा प्रयत्न असेल.
– डॉ. संजीव नाईक (आघाडी)
ठाणेकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे खासदार म्हणून संजीव नाईक यांना अखेपर्यंत समजलेच नाही. नवी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराने टोक गाठले असून नाईक कुटुंबीयांच्या घराणेशाहीला नागरिक कंटाळले आहेत.
राजन विचारे (महायुती)
लोकप्रतिनिधींना मूलभूत प्रश्नांची जाण दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. त्यांचा विकास म्हणजे बिल्डर, निविदा, एफएसआय हाच आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा प्रमुख मुद्दय़ांवर काम करणार आहे. मूलभूत शिक्षणासाठी क्रांती निकेतन सुरू करण्यात येणार आहे.
– अभिजीत पानसे (मनसे)